स्नेहालय परिसस्पर्श

Submitted by विक्रम देशमुख on 30 July, 2016 - 05:17

अहमदनगर येथील स्नेहालय या संस्थेनी आपल्या लाभार्थी आणि कार्यकर्त्यांचे अनुभव कथन करणारे “स्नेहालय परिसस्पर्श” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकातील काही अनुभव इथे टप्प्याटप्प्याने प्रकाशित करत आहोत.

निमित्त परिसस्पर्शाच्या अनुभूतीचे

मनोभाव

एखादी घटना संवेदनशील कार्यकर्त्याला अस्वस्थ करते, तेव्हाच मानवतेची एक दिंडी प्रवाही बनते. दिंडीत निर्माण होणाऱ्या चुंबकीय गारुडाने अनेक थबकलेली पावले दिंडीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेतात. या प्रवासात हजारो माणसांना आत्मभान येत त्यांचे रूपांतर संवेदनशील व्यक्तिमत्वात आणि त्यापुढे जाणीवसंपन्न कार्यकर्त्यात होते. प्रेरित झालेले प्रेरक बानू लागतात. माणसांच्या गर्दीतून मूठभरांचा एक संवेदनशील समाज संघटित होऊ लागतो. जाणिवांना व्यापक आणि परिणामकारक करण्याची धडपड संवेदना जागृत झालेल्यांनी सुरु केल्यावर काही चळवळी, काही संस्था किंवा संघटना उभ्या राहतात. स्नेहालय अशाच एका नैसर्गिक प्रक्रियेतून हळूवार आणि सहजपणे अंकुरले. या प्रक्रियेत लाभार्थींचा एक लक्ष्यगट होता. त्यांचे जीवन बदलण्याची अनिवार उर्मी आणि उत्तुंग नैतिक प्रेरणा, यातून लाभार्थींचे जीवन स्नेहालयाने बदलले. या बदलाच्या प्रक्रियेत कृतिप्रवण कार्यकर्ते, सहयोगी दाते, आपले श्रम कौशल्य-वेळ इतर विविध क्षमता सत्कारणी लावणारे साथी संस्थेतील अल्प-स्वल्प मानधनाबद्दल न कुरकुरता बेभानपणे झोकून देणार सेवाव्रती, वर्षानुवर्षे न थकता आपली स्वतःहून स्वीकारलेली जबाबदारी जीवनधर्म म्हणून हसत-खेळत अनुसरणारे स्नेहालयाचे सहप्रवासी असे अनेकजण आपापली भूमिका निष्ठेने बजावत आले. अनुभवातून घडत जाणारी परिणामकारक भूमिका, बदल आणि विकास घडविणारे विचार आणि कृती सामूहिक स्वरूपात मागील २७ वर्षे अखंड प्रवाही राहिली. या प्रवासात बदल केवळ या प्रक्रियेच्या शेवटी असणाऱ्या लाभार्थींमध्येच घडले नाहीत, तर या दिंडीशी सूर जुळवित चिखल -मातीत पावले उमटविणाऱ्या प्रत्येकातील अस्सल माणूसपण त्यातून विकसित होत गेले. अनेकांना लाभार्थींमध्येच आपला राम-कृष्ण-अल्लाह-येशू-बुद्ध-महावीर-झरतुष्ट्र-नानक इ. दिसू लागला. धर्म आणि प्रेषित यांच्या बद्दलच्या पारंबारीक कल्पनांचे वावडे असणाऱ्या काहींना आपले जीवन आशयसंपन्न होत असल्याची आणिभूती या प्रक्रियेने दिली. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि महात्मा गांधी यांच्या प्रेरक विचारांची अनुभूती घेताना स्वतःमधील माणूसपण सखोल होत गेले. “शिवभावे जीवसेवा” करताना जगण्याचा उद्देश गवसला. त्यातून काहींचे निरर्थक जगणे अर्थपूर्ण झाले. भविष्याचा अज्ञात प्रवास भेडसावणाऱ्यांनी आपल्या पुढील पिढीची चिंता म्हणून सकारात्मक विकासाच्या कामाशी स्वतः:ला जोडून घेतले. आयुष्याचे खुजेपण खुपणारी अनेकजण स्वत:च्याच नजरेत या कामामुळे उत्तुंग बनले. स्नेहालयच्या कार्याची तनामनात रुजलेली हि बहूआयामी जबरदस्त उर्मी, म्हणजेच स्नेहालयाचा परिसस्पर्श!

कुठल्याही संस्थेप्रमाणेच स्नेहालयालाही एक संस्थापक आहे. प्रांजळपणे तो नमूद करतो की, स्नेहालय हि सुसंघटित आणि सामूहिक प्रयत्नांची अविष्कृती आहे. कोना एकाचाच त्याग, बुद्धी किंवा कर्तृत्व नाही. समूहाच्या सामूहिक वैचारिक देवाणघेवाणीतून नात्यांची घट्ट वीण एकाशी नव्हे तर सर्वजण एकमेकांशी बांधले गेले. त्यामुळेच पोळ्यातील मधमाशांप्रमाणे स्नेहालय हा एक सामूहिक गुंजारव बनला. यातील चैतन्य आणि ऊर्जा स्नेहालय नावाच्या परिसाचाच चमत्कार आहे.

स्नेहालय हजारो हातांनी घडविले. त्यात संस्थेचे लाभार्थी सर्वप्रथम होते. कारण त्यांचा प्रतिसाद आणि विश्वास हाच स्नेहालयाचा पाय बनला. त्यानंतर कमी गरजांमध्ये स्वत:चे आयुष्य जगायचा आणि अडचणी आल्या तरी रणांगण सोडायचे नाही, या निर्धाराने लाभार्थींचे गणगोत बनलेल्या स्नेहालयच्या सेवकांचा उल्लेख करावा लागतो. स्नेहालयच्या परिसस्पर्श लाभलेल्या काहींच्या प्रांजळ आत्मकथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. काही विस्तृत तर काही संक्षिप्त परंतु सार-कथन करणाऱ्या आहेत. रूढार्थाने (म्हणजे आर्थिक निकषांवर) सामान्य म्हणता येईल, अशांना जीवन बदलाची प्रेरणा दिलेल्या या परिसाची अनुभूती नकळत आपल्याही जीवनाला स्पर्शते. आपण जिथे आहोत तेथे अंधारात लहान दिवा आपण लावू शकतो हि भावना जागृत व्हावी, समाजातील माणुसकी यातून सखोल गहिरी व्हावी, हाच या पुस्तकाच्या निर्मितीचा उद्देश. हे पुस्तक म्हणजे स्नेहालयच्या परिसस्पर्शाचा संपूर्ण लेखाजोखा नाही, तर प्रातिनिधिक स्वरूपातील अगदी मोजक्या जीवनकथा आणि अनुभूती आहेत. लालबत्ती आणि झोपडपट्ट्यांचा मोठा परीघ यात अस्पर्शच आहे. पुढील टप्प्यात त्याचेही शब्दांकन व्हावे. या खंड -१ प्रमाणेच परिसस्पर्श खंड-२ क्रमश:खंड-३, खंड-४ निभावत असा निरंतर प्रयत्न राहील. चला वाचूया ....बदलू या …. परीस बनूया.

एकच विनंती, आपले वाचून झाल्यावर हा परीस अलमारीत बंदिस्त करू नका. आपल्या परिचिताला या परिसाचा स्पर्श द्या.

राजीव गुजर
सचिव - स्नेहालय
मो: ९८२२०५६४००
ई-मेल: bhai@snehalaya.org

http://www.maayboli.com/node/59544

http://www.maayboli.com/node/59612

http://www.maayboli.com/node/59730

http://www.maayboli.com/node/59837

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तकातील काही अनुभव इथे टप्प्याटप्प्याने प्रकाशित करत आहोत.>>>>

पुढील भागांच्या प्रतीक्षेत..... ग्रास रूट लेव्हल ला काम केलेल्या कार्यकर्त्यांचे अनुभव कायम वाचनीय असतात. बरेच शिकायला मिळते.

कृपया प्रत्येक भागाला क्रमांक द्याल का? आणि लेखामध्ये आधीच्या व नंतरच्या लेखाची लिंक दिलीत तर एक सलग वाचता येईल.

_^_