कोकण .... पावसाळ्यातलं

Submitted by मनीमोहोर on 25 July, 2016 - 14:29

पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण त्याच रुप सर्वात खुलुन येत ते पावसाळ्यात. मी पहिल्यांदा गेले कोकणात तेच मुळी पावसाळ्यात. ढगांची दुलई पांघरलेला बावडा घाट श्वास रोखत पार करुन कोकणात प्रवेश केला आणि मग मात्र त्या हिरवाईने मनाला जी भुरळ घातली ती अगदी आज पर्यन्त. मग पुष्कळ वेळा पावसाळ्यात ही निरनिराळ्या वेळी कोकणात , घरी जाणं झालं आणि कोकणातलं पावसाळ्यातलं नित्य नव रुप ही तितकच मोहवणारं भासलं.

आंब्या, फणसांचा आणि रतांब्यांचा मोसम चालु असेतो पर्यन्त रोज " चार दिवस येऊ नको रे बाबा, तेवढी आंब्यांची काढणी होऊ दे.... मग ये " अस विनवलं जातं पावसाला. पण एकदा का सिझन संपला आंब्याचा की मग मात्र त्याची अगदी आतुरतेने वाट पहिली जाते. आठ पंधरा दिवस आकाशात ढग जमवून त्याने ही तयारी केलेलीच असते. एखाद दिवशी संध्याकाळी किंवा रात्री ताशे वाजंत्र्यांच्या गजरात आगमन होत या हव्या हव्याशा वाटणार्‍या पाहुण्याच. कितीही तयारी केली असली तरी पहिल्या पावसात तारांबळ उडतेच कारण घरावरची कौलं दरवर्षी शाकारली तरी कुठेतरी फट राहुन पाणी गळती होतेच. मग गड्याला वर चढवून ते गळतं काढलं जातं. मागील दारचा आणि खळ्यातला मांडव ही झापा कुजुन खराब होऊ नयेत म्हणून तातडीने काढला जातो. मांडव काढला की खळं खूप मोकळं मोकळं दिसायला लागत. मुलांचे क्रिकेट वैगेरे सारखे खेळ मांडवाचा अडसर नसल्याने अधिक रंगतात. पण ते थोडे दिवसच कारण एकदा का पावसाची झड बसली की आठ आठ दिवस संततधार सुरु असते कोकणात. मग खळ्यात खेळणं तर सोडाच पाच मिनीटं बसता ही येत नाही.

पावसाच्या आगमनाबरोबरच भात शेतीची कामं सुरु होतात. भर पावसात ही कामं करावी लागतात. आमच्याकडे काही जमीन उतारावरची आहे त्यामुळे तिथे वेगवेगळ्या लेवलला ( पायर्‍या पायर्‍यांची ) भात शेती केली जाते. ते शेत फार सुंदर दिसत . लावणीच्या वेळी भरपूर पाउस आणि चिखल ही लागतो . घरातली मुलं आवर्जून जातात मजा करायला आणि चिखलात लोळायला . आमचे काही गडी खूप गमत्ये आहेत. ते मुलांना मुद्दाम चिखलात लोळवितात वैगेरे . मुलांना काय तेच हव असत. (स्मित) घरातल्या बायका ही चहा, बिस्कीट, वडापाव वैगेरे द्यायच्या निमित्त्ताने जातात शेतावर. खाली गुडघाभर चिखल पाणी, वरतुन मुसळधार पाउस, गारठलेली हवा , आणि हातात तो लाल चहाचा कप !

आमच्या कडे रेडे ही जुंपले जातात शेतीकामाला

From mayboli

लावणी लावताना

From mayboli

हा एक दुसर्‍या शेताचा

From mayboli

From mayboli

रोपं वाढली की असं दिसत

From mayboli

ही आमची डोंगर उतारावरची शेती . ह्याला पॅनोरमा पॉइंट असं नाव आहे आमच्याकडे. " कशाला हवं आहे माथेरान बिथेरान ला जायला ? " असं ही जोडुन देतात पुढे ( स्मित)

From mayboli

डॉगर उतारावरची शेती जवळून

From mayboli

भात शेती बरोबरच नाचणी , वरी, हळद, आरारूट हे ही लावल जात थोडं थोडं. कसं काय ते महित नाही पण लावणीच्या दिवशी रात्रभर बेडकांच संगीत सुरु असतं . आमचं शेत तसं घराजवळच आहे, रात्री त्यांच डराँव डराँव घरी ही ऐकु येत. भात लावताना थोडं थोडं अंतर सोडुन रोपं लावलेली असतात पण थोडेच दिवसात रोपं वाढतात आणि एक हिरव्या रंगाचा गालिचाच तयार होतो शेतात. गणपतीच्या सुमारास काही पिकात गोड दुधाचा दाणा तयार होतो त्यावेळी शेतात अतिशय सुंदर सुवास पसरतो त्या दाण्यांचा. चारी बाजूने घनदाट झाडी, पावसाळी हवा, दुरुन येणारा व्हाळाच्या पाण्याचा खळखळाट आणि मध्ये आमचं शेत.... जगातल सर्वात सुंदर दृश्य असत ते. वार्‍यावर हे शेत जेव्हा डुलत ना तेव्हा तर विचारुच नका किती सुंदर दिसत ते.

लावणीचं मुख्य काम झालं की मग गडी आंब्यांच्या कलमांकडे वळतात. कलमांची टाळमाती, कलमांभोवती असलेले गडगे दुरुस्ती, नवीन कलमांची लागवड वैगेरे कामं असतात.

घराजवळ ही परसदारी काकडी, कार्ली, दुधी, पडवळ, यांचे वेल मांडवावर सोडले जातात .सड्यावरच्या मांगरावर लाल भोपळ्याचे वेल सोडले जातात. उन्हाळ्यात मरगळेलं अळू ही पावसाळ्यात चांगलच फोफावत.
त्रिपुरी पौर्णिमेला आमच्याकडे कोहाळा लागतो खरा पण कोकणात कोहाळा हा अशुभ समजला जातो. मुद्दाम लावला जात नाही. पण कधी कधी आपोआपच कोहाळ्याचे वेल ही रुजून येतात. घरच्या भाज्या काही ही मसाला न घालाता ही चवीला अप्रतिम होतात. काकडी तर मुलं एक ठेवत नाहीत मांडवावर. पावसाळ्यात आमच्याकडे फुलांचा महोत्सवच असतो जणू. अनंत, अनेक प्रकारच्या तगरी, कर्दळी, सोनटक्का, गावठी गुलाब,प्राजक्त, विविध रंगाच्या आणि आकारच्या जास्वंदी, संध्याकाळी फुलणारी गुलबाक्षी वैगेरे आमच्या आगराची शोभा वाढवत असतात.

जास्वंद

From mayboli

From mayboli
पावसात गुरांना ओला चारा मिळतो पण गुरांनी कुणाच्या शेतात तोंड घालुन नुकसान करु नये म्हणून ह्या दिवसात गुरांच्या पाठी राखण्ये ( गुराखी ) असतात दिवसभर. चार पाच राखण्ये मिळुन सड्यावर मजा करत असतात तेव्हा कृष्णाची आणि त्याच्या सवंगड्यांची आठवण येते पण त्याच वेळी ही मुलं शाळेत का शिकायला जात नाहीत हा ही विचार मनात आल्या शिवाय रहात नाही. सड्यावर हिरच्या कुरणात चरणारी गुरं फार लोभस दिसतात. पण सड्यावर जायच्या वाटेच्या दोन्ही बाजुला आपल्या कंबरेपर्यन्त गवत माजलेलं असतं. पावसाची काळोखी आली असेल तर तिथुन जाताना भितीच वाटते.

पावसाळ्यातली आणखी एक सनसनाटी घटना म्हणजे आमच्या घरा मागेच असणार्‍या व्हाळाला ( वहाळाला) येणारा हौर म्हणजे पूर. तीन चार तास जोरात पाउस झाला तर हा वहाळ दुथडी भरुन वाहु लागतो. पाण्याला प्रचंड वेग आणि खळखळाट असतो . ते चहा सारख्या रंगाचं पाणी पहायला मग मंडळी अगदी छ्त्र्या वैगेरे घेऊन व्हाळापर्यन्त जातात. कधी कधी पाणी साकवा वरुन ही वहात असत तेव्हा मात्र इकडची मंडळी तिकडे जाऊ शकत नाहीत. थोडावेळ सगळं ठप्प होऊन जातं. खूप मोठा हौर असेल तर व्हाळाच पाणी आमच्या आगरात ही शिरत कधी कधी. कोकणातल्या विहीरी खूप खोल असतात पण व्हाळाला हौर आला की आपसु़कच विहीरींच ही पाणी वर येतं इतक की रहाटाशिवाय ही काढता येईल. कोकणातला हौर तो ... जसा येतो अचानक तसा पाऊस जरा कमी झाला की ओसरतो हि लगेच. .. पण हौर येऊन गेला की व्हाळ मात्र अगदी साफ, स्वच्छ आणि नितळ होऊन जातो

पावसाळ्यात वादळ वार्‍यांमुळे कुठे अपघात वैगेरे होऊ नये म्हणून MESB लाईट घालवूनच टाकते कित्येकदा. ढगाळ हवेमुळे भर दिवसा ही घरात विशेष करुन माजघरात आणि देवघरात अगदीच कमी असतो उजेड. अशा वेळी देवघरात भर दिवसा ही निरांजनं तेवत ठेवली जातात त्यांचा मंद, शांत आणि स्निग्ध प्रकाश एक प्रकारची समाधानाची गुंगीच आणतो मनावर. लाईट घालवले म्हणून मनोमन आभारच मानते मी वीज मंडळाचे. असो.
घरातल्या बायकांची आंब्या फणसाची आणि इतर उन्हाळी कामं झाली असली तरी अगदी वटसावित्री पासुन ते गौरीगणपती पर्यन्त अनेक सण उत्सव असतातच पावसाळ्यात . नागपंचमीच्या दिवशी अगदी भक्तिभावाने आगरातच असलेल्या वारुळाचे पुजन केले जाते. पिकाची नासाडी करणार्‍या उंदरांचा नाश नागोबा करतात म्हणून. मंगळागौर, हरतालिका, श्रावणी सोमवार, शनिवार हे ही जोरात साजरे करतो आम्ही. त्यामुळे घरातही एकंदर उत्साहाचेच असते वातावरण .

कोकणात जनरली उन्हाळ्याच्या दिवसात जातात मंडळी. पण पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग असतो. मी तर मनाने कायमच कोकणात असते पावसाळ्यात आणि हे सर्व अनुभवत असते. ह्या अनुभुतीत तुम्हाला ही सामील करुन घेण्यासाठी हा लेखन प्रपंच......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा काय लिहिलंय हेमाताई, भारीच माहोल. मी एकदाच पावसाळ्यात गेले होते, आमची शेती नाही पण भाज्यांचा मांडव घातलेला असतो खळ्यात, ते मस्त वाटतं. स्वतःच्या हाताने त्या भाज्या खुडणे, मज्जा येते.

हेमाताई खुप सुरेख लिहिलंयस.

तुमचे आणि जागुचे लेख खास आपल्या मातीतले वाटतात Happy

काय जीवघेणं वर्णन आहे. कोकणातले फोटु पाहुनच सतत वाटत रहात की पुढचा जन्म तरी कोकणातला मिळावा. ममो, खूप सुंदर लिहील आहेस आणी फोटो पण मस्त आलेत.:स्मित:

पावसाळ्यात वादळ वार्‍यांमुळे कुठे अपघात वैगेरे होऊ नये म्हणून MESB लाईट घालवूनच टाकते कित्येकदा. ढगाळ हवेमुळे भर दिवसा ही घरात विशेष करुन माजघरात आणि देवघरात अगदीच कमी असतो उजेड. अशा वेळी देवघरात भर दिवसा ही निरांजनं तेवत ठेवली जातात त्यांचा मंद, शांत आणि स्निग्ध प्रकाश एक प्रकारची समाधानाची गुंगीच आणतो मनावर.>>>>>> हे तर अगदी नजरेसमोर आले.

निसर्गात इतक सौंदर्य भरलय की ते कॅमेर्‍यात टिपायचा मोह होतोच. पण काही वेळा कॅमेरा गुंडाळून ठेऊन नुसतेच पाहत रहावे अशी वेळ येते - एकतर समोरचा निसर्ग इतका अफाट असतो की आपल्या कॅमेर्‍याच्या तोकडेपणाची जाणीव होते. दुसरे म्हणजे ती सलगता तुकडे तुकडे करून कॅमेर्‍यात पकडायला नको वाटते आणि तिसरे म्हणजे डोळे निवणे म्हणजे काय याचा अर्थ समोर असताना कॅमेरा गौण ठरतो. आणि अशी वेळ पावसाळ्यातल्या कोकणात नेहमीच येत असते.

लेख अप्रतिम आहे हेमाताई.

छान व मनापासूनचं म्हणून भावणारं !
पाऊस थांबल्यावर झाडावरून खालच्या पाचोळ्यावर पडणार्‍या थेंबांचं बराच वेळ रेंगाळत रहाणारं टप-टप संगीत हाही कोकणातला एक आनंददायी पावसाळी अनुभवच !
माझ्यासारख्या अनेकाना पुन:प्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.

सुंदर लेख. तुमच्या सर्व लिखाणामध्येच एक लोभसपणा कायम असतो.

पावसाळ्यातलं कोकण म्हणजेच खरंच स्वर्ग असतो. हा जून महिना रत्नागिरीमध्ये काढला तेव्हा आपण हा पावसाळा किती आठवत होतो हे जाणवलं. भर पावसात मी आणि नवरा बाईकवरून कोळिसरेला गेलो होतो तेव्हा हिरवे माळ पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं.

लाईट नसले की रात्रभर पाण्याची संततधार ऐकत जागायचं मध्येच अपरात्री अंधारातच धडपडत चहा करून घ्याय्चा अणि निवांत मनाने परत पावसाची गाज ऐकत खिडकीबाहेर अंधारामधलाच पाऊस अनुभवत रहायचा!!!

मस्त मस्त मस्त... खरच कोकण आहेच असं हळवं करणारं...

खास तुमच्या लेखाला प्रतिक्रिया...
http://www.maayboli.com/node/26319

रिक्षा फिरवायची सवय नाही मला.. पण तुम्हाला आवडेल असा वाटलं म्हणून देतो आहे.

आभार सर्वांचे इतक्या सुंदर प्रतिसादांसाठी.

माधव, मी अगदी हेच लिहीणार होते. फोटोत एक शतांश ही पकडता येत नाही जे दिसत असत त्यातल.

रश्मी, पुढाचा जन्म कशाला अग आमच्या गावालाच जाऊ या ना . ह्या जन्मातच तुझी कोकणत रहायची इच्छा पुरे होईल

तुमचे आणि जागुचे लेख खास आपल्या मातीतले वाटतात स्मित >>> जिप्सी धन्स.

पाऊस थांबल्यावर झाडावरून खालच्या पाचोळ्यावर पडणार्‍या थेंबांचं बराच वेळ रेंगाळत रहाणारं टप-टप संगीत हाही कोकणातला एक आनंददायी पावसाळी अनुभवच ! हो भाऊ पटल अगदी .

सुंदर लेख. तुमच्या सर्व लिखाणामध्येच एक लोभसपणा कायम असतो. थँक यु सो मच नंदिनी

सत्यजित कविता खूप सुंदर. तिथे ही लिहीलं आहेच

ताई, अलगद बोट धरुन बालपणात नेऊन सोडलत Happy भाताची पाण्यानी भरलेली खाचरं, पावसाची ८ -८ दिवस लागलेली झड, बेडकांचे पागोळ्यांचे आवाज, दिवे जाण, दिवसा घरभर पसरलेला अंधार......... सगळचं आठवलं....... मस्तच.

सुंदर लेख ममो, आत्ताच तडक गावाला जावंसं वाटतंय +१

हर्ट - कोकणापेक्षाही अधिक हिरवाकंच ईंडोनेशिया हा देश आहे. असेलही पण
पावसाळ्यातल्या कोकणापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही कारण आमचं रक्त इथल्या मातीने बनलं आहे.

भारी! खुप सुरेख लिहिलंय..:)
<<कशाला हवं आहे माथेरान ला जायला असं ही जोडुन देतात पुढे >> खरंय Happy

हो हर्पेन.. नक्कीच आपल्या मातीची गम्मत आपल्यालाच ठावूक असते. मला तर भर पावसात डवरलेला चिखलदरा आठवतो. त्याचे रमणीय घाट. भिजलेले पशू पक्षी. डोंगराच्या रांगा पावसाच्या झाकोळात हरवून दिसेनाश्या झालेल्या.

आज पहाटे पहाटे इथे इतका पाऊस कोसळला की मस्त लताचे रिमझिम गिरे सावन ऐकले. हे गाणे अप्रतिम आहे. मौसमी चटर्जी साडी मधे मुंबईच्या चर्चगेटच्या जवळच्या समुद्र किनारी फिरते आहे. तिच्यापेसा खूप उंच अमिताभ तो तिचा हात धरुन फिरतो आहे. खूप सही गाणे आहे आणि चित्रीतही अफाट केले आहे.

धन्यवाद सर्वांचे परत एकदा.

पावसाळ्यातल्या कोकणापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही कारण आमचं रक्त इथल्या मातीने बनलं आहे. >>> हर्पेन शंभर टक्के पटलं. एक गोष्ट सांगते, आम्ही स्वित्झर्लंड ला गेलो होतो तर ते ही आम्हाला आमच्या कोकणासारखंच वाटल साधारण. यजमान तर कुठे ही गेलं तरी म्हणतात चांगल आहे पण नाडण एवढ नाही. माझा मुलगा ही शाळेत असताना कुठे ट्रिप ला जायचा बेत आखला की म्हणायचा, " आई, तुम्ही जा तिकडे मी नाडणला जातो. " आमच गाव म्हणजे आम्हाला सगळ्या जगातलं सुंदर ठिकाण वाटत. " आमचं रक्त इथल्या मातीने बनलं आहे." म्हणूनच अस वाटत असाव

<< पावसाळ्यातल्या कोकणापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही कारण आमचं रक्त इथल्या मातीने बनलं आहे. >>> कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठंही अगदीं स्थायिकही झाला असला, तरीही तिथं तो उपराच असतो; मनाने तो सतत कोकणातच वावरत असतो ! Wink

काल इतकं काय वाचलंत 'मायबोली'वरचं ? रात्रभर चाळत आणि
कुरवाळत बसलां होतात कोकणातल्या जमीनीचे कागदपत्र !!
rio-ds.JPG

कित्ती छान ! घरबसल्या फिरवून आणलेत कि कोकणातून... तुम्ही फार मोहक वर्णन करता... मज्जा आली वाचून... मन हिरवं आणि प्रसन्न झालं... छायाचित्रांबद्दल विशेष आभार! Happy

तुमच्या लेखांचे आता काय रोज रोज तेच कौतुक करायचे Happy
मात्र कोकणाबद्दल एवढे जरूर म्हणेन की मी आजवर जे आयुष्य जगलोय त्याच्या जेमतेम चार टक्केही कोकणात गेलो नसेन पण आजवर आयुष्यात जेवढा हिरवा रंग पाहिलाय त्याच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त या चार दिवसांत बघून होतो.. ती हिरवळ, ते पाणी, ते वातावरण, तो पाऊस, ती माती, ते शेत, ती शेतातील विहीर, ते आपले कोकण.. याला तोड नाही..

पावसाळ्यात तर आंघोळीचेच चार प्रकार तयार होतात.. कधी विहीरीचे पाणी उपसून आंघोळ करा, कधी वहाळाच्या खळाळत्या पाण्यात आंघोळ करा, कधी त्याच वहाळाच्या पाण्याला अडवून एके ठिकाणी हौद बनवलाय तिथे डुबक्या मारा, तर कधी पावसाने जोर पकडलेला असता तात्पुरते तयर झालेल्या धबधब्याखाली अंगाला साबण लावून बसा.. आहाहा.. जी सकाळच अशी होत असेल तिथे दिवस कसा जात असेल याची कल्पनाच करायला नको

Pages