चंद्र हरवला आहे

Submitted by संतोष वाटपाडे on 21 July, 2016 - 08:32

रात्र कधीची काळी झाली चंद्र हरवला आहे
कुणीतरी झोपडीतला कंदील विझवला आहे
किंकाळीचा सूर कोठुनी येतो आहे कानी
अंधाराच्या कायेवर आसूड उमटला आहे..

धडधड करते छाती.. पदराखाली मूल लपवले
दाराच्या डोळ्यांवर कापड काळेकुट्ट चढवले
तगमगलेली भिंत जुनी कानोसा घेते बसुनी
तिला छताने पुन्हा असावे हातोहात फ़सवले...

मानेखाली हात.. बांगडी सोबत उरली नाही
डोळ्यांतिल स्वप्नांची पणती अजून विझली नाही
झाकावा डोळा तर विस्तव डोळ्यातुन घळघळतो
भेदरलेली रात्र त्यामुळे निवांत निजली नाही...

कूस बदलल्यावरती रडते मूल उपाशी आहे
ओठांच्या दगडात राहिली ओल जराशी आहे
आक्रोशाच्या ठिणग्या दिसती चुलीमधे पुरलेल्या
पोटाच्या खड्ड्यात पेटला जाळ अधाशी आहे...

-- संतोष

Group content visibility: 
Public - accessible to all site users