शिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

Submitted by मी_आर्या on 19 July, 2016 - 08:15

मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात.
अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय . यातही ८ पैकी पहिल्या ५ बहिरंग योगावरच इथे सांगणार आहे.

नुसता प्राणायाम किंवा धारणा, ध्यान, समाधी हे इतके स्वतंत्र , विस्तृत विषय आहेत की ते त्या त्या वक्त्यांकडून ऐकणे हीच एक मोठी पर्वणी ठरेल!
*****

पातंजलयोगसुत्रात- १९५ सुत्रे आहेत.
सुत्र- सुत्र म्हणजे सायंटीफीक फॉर्म्युला. कमित कमी अक्षरात जास्तीत जास्त ज्ञान

अष्टांग योग- या ८ योगाच्या पायर्या नसुन ही योगाची अंगे आहेत.
महर्षी पातांजलीच्या अष्टांग योगातल्या ८ सुत्रांपैकी
१)यम
२)नियम
३) आसन
४) प्राणायाम
५) प्रत्याहार
हा बहिरंग योग आहे. जो अ‍ॅक्शन पार्ट म्हणजे साधना आहे. यातले महत्वाचे अंग म्हणजे प्राणायाम.

६) धारणा
७) ध्यान
८) समाधी
हे ३ अंतरंग योग असुन यातील 'ध्यान' हे महत्वाचे अंग आहे.

बहिरंग योगसाधनेची फलश्रुती अंतरंग योग असे म्हणता येईल.

पहिले ५ यम नियम सामाजिक स्तरावर व्यवहार कसा असावा हे सांगतात. आणि नंतरचे ३ नियम वैयक्तिक स्तरावर काय करावे हे सांगतात.
योगसाधना करायची असेल तर यम-नियमांचे महाव्र्ताने पालन केले पाहिजे, अनुव्रताने नाही- असे पातंजल मुनी म्हणतात.
महाव्रत- म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नियमपालन तंतोतंत करणे.

"जाति देश काल समयावच्छिन्ना, सार्वभौम महाव्रतम | "

उदाहरणादाखल आपण हिंसा हा विषय घेतला तर
जाति- मनुष्याला मारणार नाही पण प्राण्यांना मारेन ,अशी हिंसा नसावी
देश- माझ्या देशातल्या माणसांना मारणार नाही पण परदेशातल्या लोकांना मारेन अशी हिंसा नसावी
काल- चातुर्मासापुरते अभक्ष्य भक्षण करणार नाही. पण इतर वेळी करेन अशी हिंसा
समय- सकाळी सकाळी खोटे बोलणार नाही, दिवेलागणीला खोटे बोलणार नाही. असा प्रकार नसावा.

जो अस जाती, देश, काल, समयाला अनुसरुन महाव्रताच पालन करतो तो खरा योगी होउ शकतो.

प्रत्येक यम-नियमासोबत एक शक्ति जोडली आहे. आणि महाव्रताने ते पालन केले तरच त्या शक्तीचे प्रकटीकरण होते.
योगत्व म्हणजे प्रत्येक जीवामधे ''शिव' आहे. प्रत्येक मनुष्यात सुप्त अध्यात्मिक शक्तीचा स्रोत (पॉवरहाउस्) आहे. योगसाधनेत या शक्तीचे जागरण आहे.

१) यम- सामाजिक स्तरावर पाळावयाची साधना. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह
*अहिंसा- एक विशेष म्हणजे मानसिक स्तरावर केलेली हिंसा जास्त प्रभावी असते. "अहिंसा प्रतिष्ठायां तत् सन्निधौ वैरत्याग: "
जो योगी महाव्रताने अहिंसेचे पालन करतो त्याच्या स्वतःकडून तर हिंसा होणार नाहीच पण त्याच्या तपस्येच्या प्रभावात/ आभामंडलात, त्याच्या संपर्कात जो कोणी येईल तो माणूस असो की प्राणी तोसुद्धा वैरभाव विसरेल . अश्या ठिकाणी कट्टर वैर असणारे प्राणी सुद्धा गुण्यागोविंदाने नांदतात. या बाबतीत भगवान बुद्धांची एक कथा सांगितली जाते.
भगवान बुद्ध जिथे जंगलात तपश्चर्या करत होते, त्याच्या १६ किमी पर्यंतच्या परिसरात त्यांच्या तपस्येचे प्रभावक्षेत्र होते. अंगुलीमाल राक्षस जेव्हा त्यांना मारायला आला, तेव्हा टप्याटप्प्यावर त्याच्या मानसिकतेत बदल होत गेला आणि सर्वात शेवटी बुद्धापर्यंत पोहोचता पोहोचता त्याला उपरती झाली आणि तो भगवान बुद्धाना शरण गेला. (या वर आम्ही स्कीट सादर केले होते)
याबाबतीत मला श्रीवासुदेवानंद सरस्वतींचे ( टेंबे स्वामी) शिष्य नारेश्वर चे रंगावधूत स्वामी (दत्तबावनीकार) यांची कथा आठवली. ते साधनेसाठी जागा शोधात नर्मदातटावर फिरत होते. फिरता फिरता त्यांना एका ठिकाणी साप-मुंगूस, वाघ आणि इतर शाकाहारी प्राणी एकत्र खेळत आहेत असे दिसले. तीच जागा त्यांनी नक्की केली ती जागा म्हणजे नारेश्वर.

* सत्य- सत्याचा महाव्रती म्हणजे राजा हरिशचंद्र
"सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम "
असा मनुष्य मृत्यू जरी आला तरी सत्याची कास सोडत नाही. असे महाव्रताने सत्याचे पालन केले तर त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. तो जे बोलेल ते सत्य होते.
श्री रामकृष्ण परमहंसाची कथा इथे सांगितली होती. की एकदा त्यांचा एक शिष्य अगदी इरेला पेटला की जो योगी नेहमी सत्य बोलतो त्याला वाचासिद्धी प्राप्त होते, तो बोलतो ते सत्य होते, हे खरे आहे का हे समजावून सांगाच गुरुजी! या शिष्याकडे रोज बागेतील फुले गोळा करून, त्यांचे हार करून कालीमातेला अर्पण करायचे काम होते. तो शिष्य तिन्ही त्रिकाळ गुरुजींची पाठ सोडेना. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, अरे हो बाबा, असे खरेच असते.
तेव्हा त्याने विचारले, की आता जर कुणी एका योग्याने ही इथली अनंताची पांढरीशुभ्र फुले लाल होतील असे म्हटले तर खरंच होतील का?श्रीरामकृष्ण ही वैतागून म्हणाले हो, होतील!
आणि हा शिष्य दुसर्या दिवशी पहाटे अनंताची फुले तोडण्यास गेला ते ओरडतच परत आला की अनंताला लाल फुले आली आहेत.

*अस्तेय - म्हणजे चोरी न करणे. मग ती वाड्मयचौर्य ही असु शकते. दुसर्याचे श्रेय लाटणे ही असु शकते.

* ब्रम्हचर्य- कोणताही इंद्रियोपभोग न घेणे हे ब्रम्हचर्य

*अपरिग्रह- म्हणजे बराच संग्रह न करणे, भेटवस्तूंचा स्विकार न करणे

२) नियम- शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान

*शौच- म्हणजे शुद्धता, पवित्रता मग ती शारिरीक, मानसिक दोन्हीही असेल.

* संतोष - समाधानीवृत्ती. आहे त्यात समाधान

*तपस- शरीर, मन यांचेसुद्धा तप असते. 'कार्येंद्रिय शुद्धी तपसः" ज्या साधनेने काया, इंद्रियांची शुद्धी होते ते तप.
"प्राणायामः परम तपः" - सर्व तपात प्राणायाम हे उत्कृष्ट तप आहे. कारण यात प्राणवायुचे नियमन आहे.
उपास करणे म्हणजे पोटाचे तप. प्रदक्षिणा घालणे हे पायाचे तप

*स्वाध्याय- मी कोण याचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया. भगवद्गिता, उपनिषदे यांचा अभ्यास, या प्रकारच्या विषयांची चर्चा, व्याख्यान ऐकणे हा स्वाध्याय

*ईश्वरप्रणिधान- ईश्वराप्रती समर्पणाचा भाव. अर्थार्थी, जिज्ञासु, आर्त, समर्पण. सर्वात मोठे समर्पण हे अहंकाराचे समर्पण. परब्रम्ह व आपल्यात सर्वात मोठी भिंत अहंकाराची आहे. अहंकाराच्या आवरणाखाली 'आतला' इश्वर झाकोळुन गेला आहे.
आवृत्तचक्षु- 'आत' बघण्याचा यत्न
योग्याचा डोळा अंतर्चक्षूं असतो. चेतना अंतर्मुखी करतो.

शारिरीक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक सर्वच स्तरावर यम-नियम पाळावयाचे असतात.

३)आसन- योगासने
पतंजलीने पतंजलीयोगसूत्रात फक्त ३ सूत्रात 'आसने' हा संपूर्ण विषय संपवला आहे. ज्यात पहिले सूत्र व्याख्या, दुसरे त्याची पद्धती आणि तिसरे त्याचा परिणाम दर्शवते

व्याख्या: 'स्थिरं सुखम् आसनं "
पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
परिणाम : "ततो द्वंद्वानाभिघात: "

१) व्याख्या- पहिल्या सूत्रात 'आसने म्हणजे काय' ही व्याख्या आहे. आसनात स्थिरता हवी आणि सुखाचा अनुभव आला पाहिजे.
आसनात आणि व्यायामात हा मूलभूत फरक आहे.

*योगासने ही मुख्यत्वे मनोनियंत्रणासाठी प्रक्रिया आहे. ज्यात स्थिरता नाही, दु:ख आहे, बल वापरणे आहे, स्पर्धा आहे, त्याला पतंजली 'आसन' म्हणत नाही.

*योगासने एका वेळी एकदाच करायची असतात.

* अंतिम स्थितीत जास्तीत जास्त वेळ टिकून राहणे याला महत्व आहे.

*व्यायामाचा परिणाम फक्त शरीरासाठी होतो. तर आसनाचा परिणाम शरीरसौष्ठवासाठी आहेच, आणि मनाच्या शांतीसाठी पण आहे.

*शरीराची लवचिकता वाढणे, वजन कमी होणे ही आरोग्याची लक्षणे आहेत.

“Man is as old as his spine”
माणसाचे वय त्याच्या मेरुदंडाच्या लवचिकतेवर अवलंबून असते "असे आजचे मेडिकल सायन्स सांगते.
शारीरिक स्तरावर अस्थिसंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था अशा विविध संस्थांना जोडण्याचे, त्यांच्यात सुसंगती घडवून आणण्याचे कार्य योगासने करतात.

२) पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
शारीरिक स्थितीत प्रयत्नाची शिथिलता हवी. सहजपणे एफर्टलेस आसने करावीत.मानसिक स्तरावर अनंताचे (अनंत आकाश, अनंत सागर ) ध्यान करावे. अंतिम स्थितीत सहजपणा हवा. अवयवांवर कुठल्याही प्रकारचा अवास्तव ताण नको. ज्या स्थित्तीत सुखाची अनुभूती आहे ती आपल्याकरता अंतिम स्थिती आहे.

आसनांच्या अंतिम स्थितीत मन शरीरापासून विलग करून अनंतात विलीन करणे म्हणजे 'आसनसिद्धी' झाली.
एखाद्या आसनात अंतिम, सुखदायी स्थितीत तुम्ही कमीत कमी ४ तास २० मिनिटे राहू शकतात तेव्हा ते असं सिद्ध झाले, असे योगशास्त्रग्रंथात म्हटले आहे.

३) परिणाम : जेव्हा अंतसमाप्तीभ्याम स्थिती येते तेव्हा योग्याचे जीवनातील द्वंद्व नाहीसे होते. द्वंद्वाने मन असंतुलित होते. आसनांच्या सिद्धतेमुळे मनुष्य द्वंद्वातीत होतो. शीत- उष्ण, मान-अपमान ,सुख-दु:ख ही काही द्वंद्वाची उदाहरणे.

||समत्वं योग उच्चते|| या उक्तीप्रमाणे याचा अर्थ कोणत्याची परिस्थतीत मनाचे समत्व टिकले पाहिजे,तर मनुष्य योगी होतो. आणि आसनांनी हे साधते. हिमालयातल्या अतिथन्ड तापमानात अंगावर फक्त लंगोटी लावून काही योगिजन तपसाधना करतात ती योगामुळे शक्य होत असेल का?
गीतेत कृष्णाचे एक नाव 'योगेश्वर कृष्ण' असे आहे. त्याच्या चेहर्यावरचे स्मित कधीही ढळले नाही. कुरुक्षेत्रावर अतिशय तणावपूर्ण स्थितीत त्याने अर्जुनाला गीतोपदेश केला.

आसनांमध्ये 'जाणिवेचा विस्तार' कसा करता येईल याचा अभ्यास केला तर ती 'साधना' होईल. जाणिवपुर्वक आसने कशी करावीत हा शिबीरात गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचा प्रकार आहे. यावर सम्पुर्ण २ लेख होउ शकतात इतका हा विषय व्यापक आहे.

१) आसने ही जाणीवपूर्वक करावीत. यांत्रिकी पद्धतीने नाही. म्हणून असणे करतांना डोळे मिटलेले असावेत. आणि शरीरात होणारे बदल जाणीवपूर्वक बघावेत.

आवर्ती ध्यानात आम्ही उभ्याने ३, बसून ३ आणि पोटावर झोपून आसने करायचो.सर्वात शेवटी शवासन. ही सगळी आसने करतांना डोळे मिटलेले असायचे. लोक गम्मतीत म्हणतात, शवासन म्हणजे आमचे आवडते आसन! पण शवासन हे सर्वात अवघड आसन. आवर्ती ध्यानात ही शवासनातली ही स्थिती आमच्या ताई इतक्या सुंदर रीतीने सांगायच्या की आईच्या कुशीत आपण झोपलो आहोत असा फील यायचा. खरोखर काही लोकांना झोप ही लागायची.

२) स्नायूंची जाणीव- काही आसनात स्नायू ताणले जातात तर काहींमध्ये आकुंचित होतात ही पहिली जाणीव. जे स्नायू आसनांमध्ये भाग घेत नाही, ज्यांचा आसनांशी संबंध नाही ते स्नायू शिथिल असावेत.

३)पोट आणि छातीमधील दबावाची जाणीव. उदा. शशांकासन

४) रक्ताभिसरणातील बदल- अंतिम स्थितीत स्थिरत्व आणि शांती अनुभवली तर काही आसनात रक्तदाबात बदल होतो हा सूक्ष्म फरक ही लक्षात येतो. पादहस्तासन मध्ये रक्तप्रवाह मेंदूकडून चेहर्याकडे येत असल्याची जाणीव होते. याला स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणे म्हणतात.

५) मज्जारज्जूमधील संवेदनांची जाणीव- ही सुद्धा सूक्ष्म जाणीव आहे. पश्चिमोत्तानासनात स्थिरत्व आले तर मेरुदंडातून सूक्ष्म करंट गेल्याची जाणीव होते.

६) ध्वनीस्पंदनांची जाणीव- शवासनात 'अ' 'उ' 'म' कार जप करतांना अनुक्रमे नाभीजवळ, छातीजवळ, आणि मस्तकात स्पंदनाची जाणीव होते. भ्रामरी प्राणायामात टाळूवर हात ठेवला तर स्पंदनांची जाणीव होते.

७) शरीरापासून विलग होणे- शवासन हे सर्वात कठीण आसन मानले जाते. आपल्या शरीरातून विलग होऊन आपणच आपल्या शरीराचे अवलोकन करत आहोत असा अनुभव योग्यांना येतो. याने देहबुद्धी नाहीशी होते. यात आपल्या शरीरात चेतना फिरवावी लागते. संपूर्ण शरीरातले तणाव शोधून ते बाहेर काढावे लागतात.
शरीरात सर्वात जास्त तणाव चेहर्यावर असतात. चेहर्यातही दाताच्या मुळाशी तणाव असतो.

८) अनंतसमापत्ती - आपल्या शरीरारापासून आपण वेगळे झालो की अनंतात विलीन होतो. म्हणजे अनंताशी एकरूप होणे. उदा. अनंत आकाश, अनंत सागराशी एकरूप होणे तीच अनंतसमापत्ती होय. यासाठीच डोळे बंद करून आसने करतात.

रोज किती आसने करावीत?
मागच्या बाजुस, पुढील बाजुस, डावीकडे, उजवीकडे मेरुदंड वाकेल अशी कॉम्प्लीमेंटरी आसने करावीत.
मेरुदंडाला पीळ (ट्वीस्ट होईल) तसेच मेरुदंड उलटा होईल असे कमीत कमी एक आसन तरी करावे.

३ प्रकारची योगासने आहेत.
१.ध्यानासन- पद्मासन, सिद्धासन, वज्रासन
२. स्वास्थ्यकर आसन- भुजंगासन, सर्वांगासन, शलभासन
३. आराम आसन- शवासन, मकरासन

पातंजलयोगसूत्रांचा मुख्यतः ध्यानासाठी उपयोग होतो.

४) प्राणायामः
प्राण म्हणजे जीवशक्ती. 'प्राण' आहे म्हणुन 'प्राणी' म्हणतात."प्राणस्य आयामः प्राणायमः" विश्वातल्या जितक्या शक्ती आहेत उदा. विद्युत शक्ती, चुम्बकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती या सर्वांचा स्रोत प्राणशक्ती आहे. आणि या जीवशक्तीचे नियंत्रण करणे हा प्राणायामाचा उद्देश.
शरीरातल्या जेवढ्या क्रिया आहेत, संस्था आहेत, त्यांना प्राणशक्ती लागते. विचारशक्तीचे कार्यही प्राणशक्तीमुळेच चालते. या शक्तीचे संयमन करणे म्हणजे प्राणायाम.
प्राणशक्ती ५ प्रकारे काम करते. प्राण, अपान , उदान, समान, व्यान
प्राण- शरीराच्या वरच्या भागात( उदा. डोळे, कान, नाक) काम करते.
अपान - शरीराच्या खालच्या भागात (उदा. मलोत्सर्जन, ) काम करते
समान - प्राण व अपान मध्ये समन्वयन करते. पचनसंस्थेचे कार्य यांच्यामुळे चालते.
व्यान- स्पर्श, रक्ताभिसरण क्रिया
उदान - हा वायू सुप्त स्थितीत असतो. सर्वसामान्यपणे असं म्हणतात की उदान वायू मृत्यूच्या वेळी स्थूल शरीरापासून मुक्त होऊन सूक्ष्म शरीराला घेऊन हा देह सोडतो.
पूरक - संथ गतीने घेतलेला श्वास
रेचक - त्याहीपेक्षा संथ गतीने सोडलेला प्रश्वास
कुंभक - रोखलेला श्वास
१:४:२ हे श्वासोच्छवासाचे प्रमाण आहे.
शरीरातल्या ९ संस्थानापैकी काही ऐच्छिक तर काही अनैच्छिक असतात.
चालणे, बोलणे, काम करणे - ऐच्छिक संस्था
हृदयाभिसरण, पचनसंस्था- अनैच्छिक संस्था
श्वसनसंस्था ही थोडी वेगळी आहे. ती थोडी ऐच्छिक तर काही प्रमाणात अनैच्छिक आहे. म्हणून प्राणशक्तीचे नियमन करण्यासाठी श्वसनसंस्थेचा आधार घेतला जातो.

प्राणायामाच्या २ शाखा आहेत .
* हठयोग शाखा (हठयोगप्रदीपिका ग्रंथ): पूरक-कुंभक- रेचक, यात नाडीशुद्धी आवश्यक आहे. कुंभकावर जास्त भर दिला आहे.
* वसिष्ठ शाखा (योगावसिष्ठ ग्रंथ) : पूरक-रेचक. इथे 'केवल कुंभका'वर(आपोआप येणारी स्थिती) जास्त भर दिला आहे.
सर्वसामान्यांसाठी वसिष्ठ शाखा जास्त उपयुक्त आहे. खरा प्राणायाम म्हणजे कुंभक. कुंभक अश्या ठिकाणी करावे जिथे शुद्ध हवा आहे, आहार सात्विक आहे, आहार, विहारावर नियंत्रण आहे, तसेच गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करतात . हे शहरात शक्य नाही. कुंभक करण्यासाठी नाडीशुद्धी झालीच पाहिजे असे हठयोगप्रदीपिकेत वारंवार उल्लेख येतो.

नाडीशुद्धी म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे असे मानतात की आपल्या अन्नमयकोषांच्या बाहेरून प्राणमय शरीरकोष आहे. त्यात ७२००० नाडया आहेत ज्यातून आपल्या शरीराला प्राणशक्तीचा पुरवठा होतो. या नाड्या जर कुठे कुंठित झाल्या तर त्या ठिकाणी व्याधी होतात.

नाडीशुद्धी झाली हे कसे ओळखावे?
वपुपुषत्वम - सडपातळ, लवचिक शरीर
वदनेप्रसन्नता- चेहरा नेहमी प्रसन्न
नादेस्फुटत्वम - स्वर मधुर असतो
नयनेसुनिर्मले - डोळ्यात तेज असते
अरोगतम - कुठल्याही प्रकारचा रोग नाही
बिंदूजयम- वीर्यावर नियंत्रण
अग्निदीपम - जठर, पचनसंस्थेवर संपूर्ण नियंत्रण

ही सगळी लक्षणे ज्याच्या शरीरात प्रकट झाली तोच कुंभक करण्यास पात्र आहे असे हठयोगप्रदीपिकेत म्हटले आहे.
कुंभक जर नीट जमलां नाही तर योग साधण्याऐवजी रोग होतो.

त्या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे- उचकी लागणे , धाप लागणे, दम कोंडल्यासारखा वाटणे, डोके दुखणे, कानात दुखणे ही चुकीच्या प्राणायामाची लक्षणे आहेत.

वसिष्ठ शाखेत म्हटलेय की सर्वसामान्य मनुष्याला पूरक रेचक संथ गतीने १:२ या प्रमाणात केले की 'केवल कुंभक' ही स्थिती आपोआप अगदी विनासायास येते. आणि ती सर्वात चांगली स्थिती आहे. जेव्हा शारीरिक मानसिक स्तरावर अतिरिक्त शक्तीची गरज असते, तेव्हा आपोआप श्वास रोखला जातो, म्हणजे 'केवल कुंभक' स्थिती येते.

४) प्रत्याहार- स्वम स्व विषयाप्रमोशे चित्तस्वरूपानुकाराइव इंद्रियाणाम प्रत्याहार:। इंद्रिये जेव्हा आपापल्या विषयातून असंलग्न होऊन चित्तात लीन होतात तेव्हा प्रत्याहाराची स्थिती येते.

पंचेंद्रियांना त्यांच्या विषयांपासून अलग ठेवणे, तोडणे. ते केले की बाह्यविश्वाची अनुभुती येत नाही. व योगी अंतर्विश्वाकडे वळतो.
इंद्रिये तत्व विषय
नाक- पृथ्वी - गंध
जिव्हा - आप - रस
नेत्र - तेज - रूप
त्वचा - वायू - स्पर्श
कान - आकाश - शब्द
आपले मन या पंचेंद्रियांच्या माध्यमातून विषयाशी संपर्क साधत असते.
बाह्यजगताची जाणीव आपल्याला पंचेंद्रियांमुळे होते. या इंद्रियांनी असहकार केला तर ती स्थिती प्रत्याहाराची आहे.
गाढ निद्रा म्हणजे प्रत्याहार नव्हे. कारण त्यात जाणीव नाही. इंद्रिये जाणीवपूर्वक असंलग्न झाली तर ती स्थिती प्रत्याहाराची.
****

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> @लिंबू, १-२-४ असे प्रमाण मी तरी ऐकले नाहीये. नक्की खात्री करून सांगाल का ? >>>>
उप्प्स, आय वॉज रॉन्ग.... १-४-२ असे प्रमाण आहे.... (नाकाला पकडुन करुन बघितले अन सवईने होते ते मोजल्यावर चुक लक्षात आली... क्षमस्व, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद)

<<१:४:२ हे श्वासोच्छवासाचे प्रमाण आहे.<<
थोड विस्ताराने सांगाल का?<<

लिम्बु! __/\__ निर्गुणत्वाच्या प्रतिसादासाठी.
तरी हे आधीच म्हटल्याप्रमाणे नुसते प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधीवर एकेक लेख होतील. विषय विस्तृत आहे.

१:४:२ हे प्रमाण म्हणजे पुरकच्या दुप्पट वेळ कुंभकला आणि चौपट वेळ रेचकला लागायला हवी.
कुंभकचे २ प्रकारः
बाह्यकुंभक - श्वास पूर्णतः बाहेर काढणे
आणि अंतर्कुम्भक - पूर्ण श्वास भरून श्वास आत रोखून धरणे.

वसिष्ठ शाखेने सर्वसामान्य मनुष्याला पुरक रेचक १:२ या प्रमाणात पुरेसे आहे असे म्हटले आहे. संथ गतीने पुरक रेचक केले असता 'केवल कुंभक'ची स्थिती आपोआप येते.
पुर्विच्या काळी योगगुरु शिष्याला योग शिकवताना नाकपुड्यान्च्या पुढे कापसाची वात धरत,असे ऐकलेय.

बाकी गोष्टीन्वर सविस्तर प्रतिसाद देतेय.

<<भक्तीमार्गासारखे इश्वरात विलीन होणे हे योगाचे गंतव्य पण नाहीये. In fact योगात इश्वर इतर कुठेच भेटत नाही. मग या एकाच तत्वापुरती इश्वर ही संकल्पना का वापरली आहे?<<

माधवजी, तुमची शंका रास्त आहे. मला वाटते आपण हे सगळे मार्ग समजून घेण्यात गल्लत करत आहोत. अर्थात इथे प्रॉपर डिमार्केशन नाही.
मुळात 'योग' या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहेच. योग "युज' या धातुपासुन निर्माण झाला. योग म्हणजे 'जोडणे' आत्म्याचा विकास म्हणजे योग. एकत्वाकडुन पुर्णत्वाकडे, 'अहं पासून वयं' पर्यंत, व्यष्टीपासून समष्टीपर्यंत , जीवात्मा- महात्मा - परमात्मा असा हा प्रवास! मग फक्त वैश्विक चैतन्याशी जोडले जाणे येवढाच उद्देश असेल का?
"Yoga is a platform to bring different spiritual lives together"

आम्हाला योगिक जीवनशैलीचे जे पाठ झाले त्यात खालील्प्रमाणे सांगितले होते.
योगिक जीवनपद्धतीचा पाया म्हणजे 'एकात्मता'

अस्तित्वाचा पहिला नियम- दृष्य स्वरुपात चराचर सृष्टी भिन्न दिसत असली तरी सम्पुर्ण चराचर एकमेकांवर अवलंबून आहे. सर्वांमध्ये एकच ईश्वरी चैतन्य(नास्तिक 'ईश्वरी ' शब्द काढून म्हणतील का?) भरलेले आहे. फक्त त्याचे प्रकटीकरण काहींमध्ये सुप्त (दगड, माती, लाकुड) तर काहीत थोडे प्रगट (झाडे, प्राणी) तर काहीत पुर्णपणे (मनुष्य प्राणी) विकसित आहे.

दुसरा नियम- सृष्टीतील प्रत्येक घटक एकमेकांपेक्षा वेगळा आहे. कुठलिही गोष्ट निरुपयोगी नाही. प्रत्येकाच्या जीवनाचे काही कार्य, हेतु ठरलेले आहे. प्रत्येकाला काही ना काही भुमिका आहे.

तिसरा नियम- जोपर्यंत आपण पुर्णत्वाशी जोडलेले आहोत तोपर्यंतच आपल्या अस्तित्वाला महत्व आहे. आणि पुर्णत्वाकडे पोहोचण्याचा हा प्रवास एकाच जन्माचा नाही तर जन्मजन्मान्तरीचा आहे.
कुटुंब, समाज, राज्य, देश आणि हे संपूर्ण जग ही आपल्या कुटुंब व्यवस्थेची व्यापक रूपे आहेत. आपला दृष्टिकोन व्यापक केला तर ही संपूर्ण साखळी एकमेकांवर अवलंबून असल्याचे आपल्याला जाणवेल.

आम्हाला 'जाणिवांचा विस्तार 'या सत्रात पॉईंटेड अवेअरनेस, लिनियर अवेअरनेस ई. वैयक्तिक संवेदनशीलतेपासून वैश्विक जाणिवेपर्यंतचा विस्तार शिकवला. आपल्या जाणिवा जसजश्या वृद्धींगत होत जातात, संवेदनशिलता वाढत जाते तसतसे आपण व्यक्ती, समाज, निसर्ग यांच्याशी जोडत जातो, पर्यायाने अखिल सृष्टीशी जोडले जातो.
'वसुधैव कुटुंबकम' मानणारी आपली ऋषीसंस्कृती , समाजाकडूनच अनेकविध छळ सोसुनही विश्वबंधुत्वाची संकल्पना प्रथम मांडणारे आणि विश्वात्म्याकडे 'विश्वस्वधर्म सुर्ये पाहो' असे विश्वकल्याणाचे पसायदान मागणारी आपली ज्ञानेश्वर माऊली यांनाही हेच अभिप्रेत असेल ना?

भगवद्गितेत सांगितलेले
१) कर्मयोग- निष्काम कर्म. कर्म करण्याची रीत जी आत्मदर्शन करुन देते. तुम्ही म्हणता तसे देशासाठी लढणारा सैनिक, बाबा आमटे हे कर्मयोगी माणसे. आपला अधिकार फक्त कर्म करण्यापुरता मर्यादित. त्याचे फल काय आहे त्यावर नाही. आपापल्या प्रकृतीच्या सत्व, रज, तम या गुणानी प्रेरित होउन आपण अनुक्रमे सात्विक, राजसिक, तामसिक कर्म करत तसतो.

२) ज्ञानयोग- ज्ञानाच्या माध्यमातुन माया आणि सत्य यातला फरक कळतो. "प्रज्ञानं ब्रम्ह" आत्म्यापासुन परमात्म्यापर्यन्तचा प्रवास बुद्धीच्या माध्यमातुन विश्लेषण करत करत सत्य जाणुन घेणे म्हणजे ज्ञानयोग. उदा. रमण महर्षी, गुरुदेव रानडे, जे. कृष्णमुर्ती हे ज्ञानयोगी लोक

३) भक्तीयोग- जीवाचा शिवाशी संयोग! भक्तियोग हा भावनेवर आधारीत आहे.त्याचा मुळ बेस म्हणजे प्रेम. प्रेमाचा अत्युत्तम अविष्कार त्याग. त्याग आणि सेवा यात जेव्हा समर्पणाची भावना येते तेव्हा ती भक्ती होते. मनुष्य भक्तिच्या माध्यमातुन आपल्या आतल ईश्वरतत्व प्रकट करु शकतो. नारदभक्तीसुत्रात नवविधा भक्ती, भक्तान्चे सात्विक, अर्थार्थी, जिज्ञासु आणि आर्त भक्त असे प्रकार दिलेत. भक्तियोगात आपली सगळी संतपरंपरा .

राजयोग(अष्टान्ग योग)- चित्तःवृत्ती निरोधः, योगाने मनुष्याची दृष्टी व्यापक होते.
हा या वरच्या ३ योगांकडे जाण्याचा साधनेचा मार्ग म्हणता येइल ना?

विवेकानंद केंद्राचा 'प्राण'स्वर हा अष्टांगयोग (राजयोग) आहे. शरीर, मन, बुद्धी, भावना, आत्मा यांचा विकास झालेला, पंचकोशांचा विकास झालेला माणुस घडवणे आणि परिणामी राष्ट्राचा विकास करणे हे स्वामी विवेकानंदांचे ध्येय होते. धर्माचा खरा अर्थ 'माझे समष्टीप्रति असलेले कर्तव्य' जाणुन घेणे अस ते म्हणतात. मग ते आधी म्हटल्याप्रमाणे Do this either by work, or worship, or psychic control, or philosophy - by one, or more, or all of these - and be free.

धन्यवाद, लिम्बु! Happy तुमची छान चर्चा चालु होती. म्हणुन जे शिकायला मिळाले ते मान्डायचे धारिष्ट्र्य केले. नाहितर आम्ही या मार्गात अजुन 'बालवाडीत'च आहोत. Lol

'ईश्वरप्रणिधान' याचा अर्थ माझ्या मते आपल्या प्रत्येक कर्मात ईश्वराचे अधिष्ठान ठेवणे. असे केले तर वाईट/ निंद्य कृत्य माझ्या हातून होणारच नाहीत.
ईश्वराला सगळी कर्मे अर्पण करणे. ईश्वरसाक्षीने सगळी कर्मे करणे. मुळात आपल्याला कोणाची साक्ष का लागते ? 'उजेडात होते पुण्य, अंधारात पाप... ' 'ईश्वरसाक्ष खरे सांगेन, 'अग्निब्राह्मणांच्या साक्षीने... या पापपुण्याच्या धार्मिक संकल्पना तेव्हा समाजात सुसंगती राहावी म्हणून सामाजिक बंधने म्हणून वापरल्या गेल्या.

भक्तीमार्गात या शब्दाला फार मोठा अर्थ प्राप्त होतो. तुम्हाला माहित आहेच. भगवद्गीतेतल्या ९व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात,
यत्करोषि यदस्नासी यज्जुहोषि ददासि यत् । यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम ।।
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबंधनै:। संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ।। २८।।

हे कौंतेय तू जे करतोस,जे भोगतोस , जे हवन करतोस, जे दान करतोस,जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. असे केले असता शुभाशुभ फल देणार्या कर्मबंधापासून तू मुक्त होशील आणि तू संन्यासयोगाने युक्त होऊन कर्मबंधनांपासून सुटून मला प्राप्त होशील. तू जे जे व्यवहार करशील किंवा शब्दादि विषयांचा भोग घेशील , किंवा अनेक प्रकारच्य यज्ञरूप कर्माने, अथवा सत्पात्री दान देशील, अथवा नोकरांना वेतन देशील, किंवा तपादी साधने अगर व्रते करशील ती सर्व कर्मे जसजशी तुझ्या हातून घडतील, तसतशी टी सर्व माझ्यासाठीच आहेत अशा समजुतीने कर. पण ती कर्मे मी केली, अशी कर्तृत्वाची आठवण ही मनात ठेवू नकोस. जसे अग्नीत टाकलेले बीज अंकुरदशेला मुकते त्याप्रमाणे शुभाशुभ कर्मे मला अर्पण केली की ती फल देत नाहीत. कर्मे जर कर्मरूपाने शिल्लक राहिली तर ती सुखदु:खाची फळे देतात व ती भोगण्यासाठी एखादा देह धारण करावा लागतो. पण ते कर्मच त्यांनी ज्या वेळी मला अर्पण केले त्याच वेळी त्याचे जन्ममरण नष्ट झाले.
यामुळेच आपल्या प्रत्येक धार्मिक कृत्याच्या शेवटी 'श्रीकृष्णार्पणमस्तु' म्हणण्याची प्रथा असेल ना?

मला याबाबतीत काही संदर्भ आठवतात. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात ज्या तात्यासाहेब केतकरांचा उल्लेख येतो ते अगदी नविन पॅंट किंवा चप्पल जरी आणली तरी आधी महाराजांना दाखवुन मग घालत, की 'महाराज, हे तुमच्या कृपेने मिळाले आहे. "
तुम्हाला कदाचित हास्यास्पद वाटेल, पण आजच्या काळातसुद्धा असेल काही साधक आहेत. नुकतीच एक गोष्ट ऐकली,की एक अगदी वय झालेल्या स्त्री साधक इतक्या अखंड अनुसंधानात आहे की त्या सतत श्रीमहाराज त्यांच्यासोबत आहेत अश्या कल्पनेत असतात. अगदी गाडीवर बसायचे असेल, रिक्षात बसायचे असेल तर क्षणभर आधी थांबून 'महाराज, आधी आपण बसा' अस मनोमन म्हणतात.
आताही आमच्या आरती मंडळात काही पोहोचलेले साधक असे आहेत जे 'माझ' घर, 'मी बांधलेले घर' असे म्हणत नाहीत. "महाराजांनी मला रहावयास दिलेले घर' असा उल्लेख करतात. असो.
शेवटी हा देहसुद्धा जर पंचमहाभूतांकडून उसना घेतलेला आहे तर स्वकर्तृत्वाचा अभिमान तरी कसा घ्यावा?

बरं, हे इतर धर्मातही थोड्याफार फरकाने दिसते. थोडं अवांतर होईल पण सांगते. फेसबुकवर नुकत्याच वाचनात आलेल्या या ओळी.

पूँछा, तवक्कुल का अदना दर्जा क्या है ? फरमाया उम्मीदोंका खत्म कर देना.
फिर पूँछा, दर्मियानी दर्जा क्या है ? फरमाया कि अख्तियार का छोड देना.
फिर पूँछा, आला दर्जा क्या है ? फरमाया कि उसको वहीं पहचान सकता है जो दूसरे दर्जेपर पहूँच जाए.
तीसरा दर्जा जो सबसे आला है, वह यह है कि अल्लाह के साथ ऐसा हो जाए जैसा कि मुर्दा नहलानेवाले के हाथमें कि उस की अपनी कोई हरकत रहती ही नहीं. इसी दर्जेपर पहुँच कर अल्लाहसे माँगनेका भी मुहताज नहीं रहता.

इमाम गज्जाली रह.( रहमतुल्लाहिअलैहि - म्हणजे अल्लाची कृपादृष्टी ज्यांना लाभली असे) एक महत्त्वाचे इमाम आहेत.
त्यांना एकाने विचारले, अल्लाहवर विश्वासाची लहान पातळी कोणती ? ते म्हणाले, 'अपेक्षांचे संपवणे.' मग विचारले, मध्यम पातळी ? ते उत्तरले, 'जे करायची ताकद आहे ते सोडणे.' मग विचारले, उच्च पातळी कोणती ? म्हणाले, याला तोच ओळखू शकतो जो मध्यम पातळीपर्यंत पोहोचतो.
मग म्हणाले, ' सर्वात उच्च पातळी ती आहे ज्यांत भक्ताचे नाते अल्लाहशी असे बनते जसेकी आंघोळ घालणाऱ्याच्या हातात मयत. की त्याची स्वतःची अशी कोणती हालचाल उरतच नाही. ह्या पातळीवर पोहोचून त्याला अल्लाहशी काही मागायची गरजच लागत नाही.'

'ईश्वरप्रणिधान' याचा अर्थ माझ्या मते आपल्या प्रत्येक कर्मात ईश्वराचे अधिष्ठान ठेवणे. असे केले तर वाईट/ निंद्य कृत्य माझ्या हातून होणारच नाहीत.
ईश्वराला सगळी कर्मे अर्पण करणे. >>>>> uttam post....

धन्यवाद सोनाली, प्रकाशजी! धन्यवाद विठ्ठल, शशांकजी, लिंब्या!
तुम्हा लोकांकडून खूप काही शिकायला मिळतंय! किती बारकाईने वाचतात तुम्ही आणि त्यावर चिंतन पण करतात.

अतिशय उत्तम लेखन... निवांतच ३-४ वेळा वाचावे लागेल.

लिंबू टिंबू यांनी 'त्यांचा ' द्वेष सोडून मन शुद्ध केल्याशिवाय काहीही उपयोग होणार नाही या साधनेचा. नुसते पालथ्या घड्यावर पाणी...

.

अतिशय उत्तम लेखन. धन्यवाद .तुम्हा लोकांकडून खूप काही शिकायला मिळतंय!
Many many thanks. The knowledge we are getting from here is just incredible and help us to awake and emerge from within. To say Thanks is just a little in comparison of the information you all are writing here. Thanks to
Aaryaji, Shashanji and Madhavji and above all Thanks to our Maayboli . Keep posting

Pages