पेले: बर्थ ऑफ अ लेजंड

Submitted by फूल on 17 July, 2016 - 23:43

मी आंग्ल भाषेतले चित्रपट मुळात फारसे नाहीच बघत. कारणं अनेक आहेत. त्या भाषेवर प्रभुत्व न मिळवता आल्याने त्या भाषेबद्दलाचा दुस्वास आणि मग त्यातून डोकावणारा मराठी, हिंदीबद्दलचा पोकळ अभिमान, भाषा कळत नसल्याने समोर घडत असलेलं काहीच आपलं न वाटणं, मी मूळची भावनाप्रधान असूनही ते आत न झिरपणं. हिंदी किंवा मराठी सिनेमा कसा चित्रपटगृहातून माझ्याबरोबर माझ्या आयुष्याला जोडल्यासारखा माझ्या मागोमाग येत राहतो पण असं या आंग्ल भाषेत घडत नाही. हे सगळं मी कालपर्यंत अगदी ठामपणे म्हणू शकत होते. पण एक इंग्रजी चित्रपट मनात रूंजी घालत राहिलाय अजूनही. चित्रपटाचं नाव आहे पेले: बर्थ ऑफ अ लेजंड.

या पुढे जे काही मी लिहिणार आहे ते परीक्षण, समीक्षा अश्या कुठल्याही स्वरूपात मोडत नाही. मला तो चित्रपट पाहून जे भावलं ते कागदावर उतरलंय इतकंच. फुटबॉल या खेळाविषयी, त्यातल्या शैलींविषयी बोलण्याचाही मला अधिकार नाही कारण मी त्याबद्दल फारसं जाणतच नाही. पण एक माणूस म्हणून जे काही भिडलं, आत झिरपलं ते लिहिण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून हा खटाटोप.

नवऱ्याने कुठेसा बघितलेला हा चित्रपट. माझ्या मागे लागून लागून आणि मी अनेकदा टाळून शेवटी काल पाहिला आम्ही एकदाचा. नि:संशयपणे मी प्रेमात पडले या चित्रपटाच्या.

पेले: बर्थ ऑफ अ लेजंड. अमोल पालेकरांच्या गोलमाल चित्रपटातला सुप्रसिद्ध इंटरव्यूचा सीन; ज्यात उत्पल दत्त अमोल पालेकरांना विचारतात, “आप black pearl के बारेमे क्या जानते है?” ज्यावर अमोल पालेकर आपल्या अमोल पालेकर शैलीत उत्तर देतात, “मुझे तो पता नही था कि मोती काले रंग का भी होता है, मुझे तो लगा था की मोती सिर्फ श्वेतवर्णीय होता है|” आणि मग उत्पल दत्त म्हणतात, “नही नही मै तो पेले की बात कर रहा हूं|” हा आणि एवढाच माझा पेले या खेळाडूशी चित्रपट पाहण्यापूर्वी परिचय झाला होता. पण चित्रपट पाहिल्यावर मात्र पेले हा ब्राझीलला गवसलेला खराखुरा मोतीच आहे ही खात्री पटते.

चित्रपटाची सुरुवात ब्राझीलमधल्या एका बॉरू नावाच्या लहानश्या खेड्यातून होते. साल १९५०. एका गरीब वस्तीतली काही मुलं वाऱ्याच्या वेगाने त्या वस्तीतूनच पळताना दिसतात. सकाळची उन्हं पडलीयेत आणि किरणं जवळ जवळ बांधलेल्या कौलारू घरांच्या छपरातून ऊनसावलीचा खेळ खेळतायत. अगदी आपल्या गावात दिसणारं चित्र. घरोघरी आया कपडे वाळत घालतायत आणि अश्यातच ही वार्यासारखी धावणारी मुलं दोरीवरचे नेमके कपडे टिपतात आणि एका जागी जमून त्या कपड्यांचा बॉल तयार करतात. याच फुटबॉलने खेळायला सुरुवात. अगदी नेमक्या झिंगा शैलीत. लहान मुलांची कामं अप्रतिम झालीयेत. त्यांच्या फुटबॉल खेळताना होणाऱ्या पायांच्या अगदी नेमक्या हालचाली आणि मागे चाललेलं रेहमानचं संगीत. मला इथेच चित्रपटाने अर्धं जिंकून घेतलं.

याचं मुलांपैकी एक आपला पेले. हो, चित्रपट इतका जवळचा वाटला की पेलेला आपलं म्हणावंसंच वाटलं. लहानपणापासून फुटबॉलची आवड आणि तो खेळ खेळण्याची झिंगा शैली अंगी बाळगणाऱ्या पेलेचं आपण संपूर्ण चित्रपट कौतुक करत राहतो.

पेलेला पेले हे नाव कसं लाभलं यालाही एक इतिहास आहे पण तो चित्रपटातच बघावा. पेलेला त्याचे आईवडील डिको या नावाने हाकारताना दिसतात.

“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या उक्तीप्रमाणे त्याचे आईवडीलही त्याला साजेसे आहेत. गरीब असले तरी विचारांनी घरंदाज. वडील एका दवाखान्यात सफाईकामगार आणि आई बड्या घरांमध्ये अश्याच वरकामाला. फुटबॉल खेळतानाच वडिलांचा एक पाय दुखावलेला. शिवाय डिको (म्हणजेच आपला पेले) याच्या पाठीवर अजून दोन धाकली लेकरं घरात. पण कुठेही भांडण, आदळ-आपट दिसत नाही. सर्वार्थाने समाधानी कुटुंब पहात राहतो आपण आणि या कुटुंबाच्याही प्रेमात पडतो.

चित्रपटातले सगळेच प्रसंग खरंतर वर्णन करण्याजोगे पण मग इथे संपूर्ण चित्रपट वाचणं योग्य ठरणार नाही. म्हणून मोह आवरते. तरीही काही प्रकर्षाने लक्षात राहिलेले प्रसंग. या प्रसंगातून पेले हा फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर माणूस म्हणून घडताना दिसतो. मला हे जास्त भावलं.

१९५० सालचा फुटबॉल वर्ल्ड कप ब्राझीलला मिळत नाही. या छोट्या पेलेचे वडील आणि तो स्वत:, दोघेही रडतात. याचवेळी हा पेले वडलांना वचन देतो की मी ब्राझीलसाठी वर्ल्ड कप मिळवून आणेन. पण वडलांचा फुटबॉल खेळताना दुखावलेला पाय आणि त्यामुळे आईचा घरातून या खेळाला असलेला विरोध हे जाणून वडील त्याला सांगतात तू आईचं ऐक. अभ्यास कर, मोठा हो. पेलेचं खेळाबद्दलचं अपार प्रेम, त्याचं त्या खेळातलं अंगभूत कौशल्य आणि स्वत: वडिलांची या खेळाबद्दल असलेली अपार प्रीती हे सगळं सगळं जाणूनही वडील एकीकडे त्याला हा सल्ला देताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला ते आईपासून लपवून मुलाची आवड जोपासायला त्याला मदतहि करतात. कुटुंबातला समतोल राखणारे हे वडील माझ्या मनात घरच करून बसलेत.

पेलेचं वडिलांबरोबरचं नातं फार फार सुंदर रंगवलंय. लेकाची नस अचूक पकडून, त्याला आतून काय दुखतंय, खुपतंय हे न सांगताच समजून घेउन, त्याच्या सतत बरोबर राहणारे वडील हा पेलेच्या करिअर मधला सगळ्यात मोठा पाठींबा आहे. वयोमानाप्रमाणे चित्रपटातली पेलेची भूमिका करणारी मुलं बदलत राहतात पण वडील तो समांतर दुवा टिकवून ठेवतात. त्या माणसाची भूमिका जरा काकणभर सरसच.

आपला मुलगा खूप मोठ्ठा खेळाडू व्हावा, त्याने प्रसिद्धी, मान-मरातब, पैसा मिळवावा या कुठल्याही घाईत आई-वडील दिसत नाहीत. पण त्याला कुणी वाईट म्हणू नये तो एक चांगला माणूस म्हणून घडावा यासाठी मात्र त्यांचे प्रयत्न सतत डोकावत राहतात.

एका कुठल्याश्या उच्चभ्रू क्लबमधली मुलं छोट्या पेलेच्या टीमला शू लेस टीम म्हणून संबोधतात. कारण या बिचाऱ्या गरीब मुलांकडे वापरायला शूज नसतात. अनवाणी पायानेच ही मुलं फुटबॉल खेळत असतात. पेलेचा आयुष्यातला पहिला सामना या टीमबरोबर होतो. कुठूनसे शूज मिळवून आणतात ही मुलं पण त्यांना तसं खेळायची सवय नसल्याने हरायला लागतात मग या लहानग्या पेलेच्या लक्षात येतं की आपलं कसब शू लेस खेळण्यातच आहे आणि पायातले शूज भिरकावून देउन ज्या शैलीत हा पेले खेळलाय ती शैली वाखाणण्याजोगीच. वडील कृतकृत्य होउन पहात राहतात लेकाचा खेळ. स्वत:ला “जसे आहोत तसे” स्वीकारणं महत्त्वाचं. एकदा ते झालं की मग तुम्हाला स्वत:तले गुणदोष सहज सापडतात. स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवतो हा प्रसंग. असे अनेक प्रसंग आहेत. जे छोट्या छोट्या गोष्टीतून आयुष्याचे खूप मोठे धडे शिकवून जातात.

कुठल्याश्या कारणाने हा लहानगा पेले खेळाकडे कायमची पाठ फिरवण्याचं ठरवतो तेव्हा त्याचे वडील त्याच्यातली ही खेळाची विझणारी ज्योत अतिशय कठीण प्रसंगातही कशी तेवत ठेवतात हे पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. आई हा बापलेकाचा खेळ पाहते आणि तिचा स्वत:चा विरोध तिथेच गळून पडतो. तिथे आईचा खोटा अहं दिसत नाही. तिला कुणी समजावत बसायची गरज पडत नाही. तिहूनच खेळातल्या कुण्या जाणत्याला परस्पर बोलावणं धाडते आणि पेलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सुरू होतं.

हे सगळं सगळं फार उच्च आहे. कल्पवृक्ष जन्माला यायचा तर त्याचं पालनपोषण, त्याला खतपाणी, हवामान सगळं साजेसंच व्हायला हवं नै? गरीब घरातला सगळ्यात मोठा मुलगा खेळायला म्हणून निघालाय, अजून पाठीमागे दोन भावंडं आहेत, आम्ही किती दिवस कष्ट करायचे?, मुलगा हाताशी आला तर तेवढंच आमचं ओझं कमी वगैरे असले काही काही विचार या कुटुंबातल्या कुणाच्याच टाळक्यात शिरत नाहीत. कौतुक वाटतं. असं राजस वागायला पैसे असावे लागत नाहीत.

त्यानंतरची पेलेची झिंगा शैली आणि शास्त्रशुध्द खेळी यातला तणाव आणि त्या सगळ्यावर मात करत त्याचं राष्ट्रीय संघात पोचणं. तिथेही पुन्हा झिंगा आणि शास्त्रोक्त खेळीतला संघर्ष. या सगळ्यात पेलेचं
पुन्हा एकदा एक माणूस म्हणून घडत राहणं फार फार सुखावणारं आहे. त्या वेळचाच एक प्रसंग.

१९५८ फुटबॉल वर्ल्ड कप साठीचा संघ ठरवतानाच पेलेचा पाय दुखावतो आणि जवळ जवळ सगळं वर्ल्ड कप ड्रेसिंग रूममध्ये बसून पाय शेकत बघावं लागणार अशी चिन्ह दिसायला लागतात. तेव्हा निराश झालेला पेले आईला फोन करून सांगतो, मी हे करायला नको होतं, इथे यायला नको होतं. तेव्हा आईचं उत्तर फार सुंदर आहे, “हा आपल्या संपूर्ण कुटुंबाचा निर्णय आहे; तुझा एकट्याचा नाही. कसाही असलास तरी तू आमचा आहेस आम्हाला आवडतोसच.” घरटं असंच असायला हवं नै? पिल्लासाठी कायम भक्कम उभं. त्यानं आकाशात भरारी मारून यावी. घरट्यात विसावून पुन्हा आत्मविश्वास मिळवावा आणि पुन्हा वेगाने आकाशात झेप घ्यावी.

स्वीडन बरोबरच्या शेवटच्या सामन्यात पेलेची झिंगा शैली पाहण्यासारखी. मगाशी सांगितलं तसं मला फुटबॉल या खेळातलं काही विशेष कळत नाही पण ती खेळी पहाणं मनोरंजक होतं एवढं मात्र नक्की.मूळ खेळाच्या किती जवळ किंवा लांब जाणारं होतं यावर वक्तव्य करण्याचा माझा अधिकार नाही.

शेवटचा प्रसंग पाहताना डोळ्यात पाणी कधी येतं कळत नाही. आई स्वयंपाक उरकतेय पण एकीकडे लेकाच्या खेळाची हुरहूर लागून राहिलीये. वडील आणि बाकीची दोन लहानगी गावात ज्या हाटलीत टी व्ही आहे तिथे जाउन लेकाचा सामना बघतायत. लेकाने गेल्याच महिन्यात आणलेल्या रेडिओवर सामन्याची कोमेंट्री ऐकण्याचा मोह नाहीच आवरत शेवटी माऊलीला. लावतेच तो.

इकडे वडलांची अस्वस्थता तितकीच आर्त, तीही पोचत राहते. पण तो पहिला गोल करेपर्यंतच वडील अस्वस्थ दिसतात. त्याचा पहिला गोल झाल्यावर जल्लोषही करतात. पण नंतर मात्र आता या पुढे काय होणार ते माहितच असलेले आणि लेकावर पूर्ण विश्वास असलेले वडील निर्धास्त दिसातात. भवताल सगळा लेकाच्या प्रत्येक हालचालीवर, त्याने केलेल्या प्रत्येक गोलवर उसळतोय. पण वडिलांच्या चेहऱ्यावर फक्त समाधानाचं हसू ओसंडत असतं.

ब्राझील हा सामना ४/१ इतक्या अफाट फरकाने जिंकतं आणि स्वीडनला उध्वस्त करतं. १९५८ सालचा वर्ल्डकप ब्राझीलकडे येतो. या सगळ्या कवतीकात मोलाचा वाटा असतो तो आपल्या पेलेचा.

यापुढे स्क्रीनवर दिसणारी पेलेची सगळी रेकॉर्ड्स नवरा वाचून दाखवत राहिला आणि मी भरल्या डोळ्याने फक्त ऐकत राहिले. मला त्यानंतरही दिसत राहतात ते कृतकृत्य वडील, समाधानी आई आणि एका उबदार घरट्यातलं उंच झेपावलेलं पाखरू, ज्याची त्या घरट्याशी जोडलेली नाळ आभाळातही अतूट, कायम आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रपट तुम्हाला किती प्रत्ययकारी वाटला हे या लेखात यथार्थतेने उमटलंय...

अतिशय सुंदर, भावपूर्ण लिहिलंय -

(पेले या व्यक्तिमत्वाबद्दल प्रेम आणि आदर आहेच, त्यामुळे चित्रपट पहाणे आलेच ओघाने)

हा चित्रपट तुम्हाला किती प्रत्ययकारी वाटला हे या लेखात यथार्थतेने उमटलंय...

अतिशय सुंदर, भावपूर्ण लिहिलंय - + १

प्रत्यक्ष फुट्बॉलची खास आवड नसूनही तुम्हाला पेले इतका भावला यांतच या सिनेमाची गुणवत्ता दिसते !
<< अतिशय सुंदर, भावपूर्ण लिहिलंय -(पेले या व्यक्तिमत्वाबद्दल प्रेम आणि आदर आहेच, त्यामुळे चित्रपट पहाणे आलेच ओघाने) >> १००% सहमत !

"""घरटं असंच असायला हवं नै? पिल्लासाठी कायम भक्कम उभं. त्यानं आकाशात भरारी मारून यावी. घरट्यात विसावून पुन्हा आत्मविश्वास मिळवावा आणि पुन्हा वेगाने आकाशात झेप घ्यावी."""
डोळ्यात पाणी आणलसं यार............... नशिब लागत असल घरटं मिळायला..........

सुंदर लिहीले आहे. नक्कीच बघणार हा चित्रपट!

त्या १९५० च्या पराभवाच्या कथा खूप वाचल्या आहेत. 'जिंगा' बद्दल फारसे माहीत नव्हते.

मेस्सी, क्लोस, मॅराडोना आवडण्या आधीपासुन पेले हा आवडता खेळाडु.

सुरेख लिहीले आहेत. आवडले Happy

खुप छान लिहिलय..

"""घरटं असंच असायला हवं नै? पिल्लासाठी कायम भक्कम उभं. त्यानं आकाशात भरारी मारून यावी. घरट्यात विसावून पुन्हा आत्मविश्वास मिळवावा आणि पुन्हा वेगाने आकाशात झेप घ्यावी.""">>>> क्या बात ..... थोड्क्यात सांगितलत