बिट्टूची शाळा

Submitted by तिलोत्तमा on 17 July, 2016 - 07:29

बिट्टूची शाळा
एकदा काय झाले , एका जंगलात खूप ससे राहत होते. ससे घाबरट असतात , झाडाचं पान पडलं तरी घाबरतात , लगेच बिळात लपून बसतात अशी सशांची ओळख आपण बदलून टाकायची असे त्यांच्यातील वयस्कर ससे ठरवतात . त्यासाठी आपल्या नवीन पिढीची शाळा घ्यायची असे एकमताने ठरते. जेणे करून आपल्या अनुभवातून ही नवीन पिढी आपण धीट करू शकू असे त्यांना वाटते .
दुसऱ्याच दिवसापासून सर्व सशांनी आपली पिल्लं सकाळी वडाच्या झाडाखाली भरणाऱ्या शाळेत पाठवावी असे जाहीर केले जाते . प्रत्येक बिळात निरोप दिला गेला . सर्व पिल्लांना प्रश पडला की आम्हालाच का बरे उद्या बोलावले आहे ? आधीच ते ससे त्यात ही तर बिचारी गोंडस पिल्लं . ती गेली की सगळी घाबरून.
सशांच्या पिल्लांमद्धे एक खूप सुंदर ,पांढरा शुभ्र व लाल लाल डोळे असलेला गब्बू गब्बू ससा होता . त्याचे नाव होते बिट्टू . बिट्टूला जेव्हा सकाळी झाडाखाली हजर होण्याची बातमी समजली तेव्हा तोही घाबरून गेला. बिळातील त्याच्या खाटेखाली जाऊन लपून बसला बिचारा .
सकाळ होताच बिट्टूच्या आईने बिट्टूला नाष्टा दिला व ठरलेल्या ठिकाणी ती बिट्टूला घेऊन गेली. तेथे बिट्टूसारखी बरीच पिल्लं जमली होती . आता सशांना एका वेळेस भरपूर पिल्लं होत असल्यामुळे जवळ जवळ पन्नास पिल्लं तेथे जमलेली बिट्टूने पाहिली.
कोणी करड्या रंगाची पिल्लं होती तर कोणी तपकिरी रंगाची होती. पण बिट्टू सारखा पांढराशुभ्र एकही नव्हता . हळू हळू सर्व जण जमल्यावर उंचावर बसलेल्या मोठ्याआजोबांनी बोलायला सुरुवात केली .
ते म्हणाले ," बाळांनो , आपण ससे मुळात भित्रे म्हणून हिणवले जातो . म्हणून आम्ही सर्व आजोबांनी रोज तुमची शाळा घ्यायची ठरवले आहे. आता आपण धीट कसे व्हायचे , आपले संरक्षण कसे करायचे व धाडसी कसे व्हायचे हे शिकणार आहोत . कठीण प्रसंगी कोणती युक्ती योजावी हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत . प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी एक स्पर्धा घेतली जाईल . जो स्पर्धेत पहिला येईल त्याला चमचमणारा मुकुट दिला जाईल. "
सर्व पिल्लं श्वास रोखून आजोबांचे भाषण ऐकत होते. धीट बनणे, साहसी बनणे हे सर्व पिल्लांसाठी काहीतरी नवीनच होते. हे कसे शक्य आहे असे त्यांना वाटत होते. बिट्टूसुद्धा कान उभे करून मोठ्या आजोबांचे भाषण ऐकत होता. त्याला ही साहसी बनण्याची कल्पना खूप आवडली . त्याने मनोमन रोज शाळेत जायचा निश्चय केला. त्याने उगाचच धाडशी सारख छाती फुगवून मोठा श्वास घेतला.
रोज सकाळी लवकर उठून बिट्टू शाळेत जाऊ लागला. सर्व आजोबांनी आपापसात विषयांची विभागणी केली. एक आजोबा योग शिकवू लागले तर दुसरे आजोबा मुलांना डोंगरावर पळायला घेऊन जाऊ लागले. एकाने कराटेचा अभ्यास घेतला तर एक प्रसंगावधानाचे धडे घेऊ लागले.
रोज चाललेल्या ह्या प्रशिक्षणाने बिट्टूची तब्ब्येत सुधारली. त्याचा लठ्ठपणा कमी झाला . नवीन युक्त्या शिकून तो चलाख झाला व त्याचे डोळे चमकू लागले. खरतर त्याच्यात झालेला बदल त्याच्या आईवडिलां बरोबर सर्व शिक्षकांच्याही ध्यानात आला होता. परंतु शेवटच्या दिवशी होणाऱ्या स्पर्धेत जो जिंकेल त्यालाच तो चमचमणारा मुकुट मिळणार होता.
अखेर तो दिवस उजाडला . जंगलातील सर्व ससे स्पर्धा बघण्यासाठी उपस्तीथ होती. बिट्टू त्याच्या आईवडिलां सोबत डोंगरावर स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला . सर्व स्पर्धकांना एका रेषेत उभे केले गेले . एकूण वीस स्पर्धकांनीच फक्त भाग घेतला होता. बाकीच्यांना एव्हडे प्रशिक्षण देऊन सुद्धा काही उपयोग झाला नव्हता.
मोठ्या आजोबांनी स्पर्धेच्या नियमांची व अटींची माहिती दिली . एकूण वीस मिनिटात स्पर्धकाने डोंगरा खालची नदी ओलांडून पलीकडील शेतातून जास्तीत जास्त गाजर डोंगरावर ठेवलेल्या प्रत्येकाच्या टोपलीत आणून ठेवायचे . सर्वात जास्त गाजर जो आणेल त्यालाच चमचमणारा मुकुट दिला जाईल. बिट्टूने नदीकडे पाहिले . तो कधीच नदीकडे काय किव्वा ह्या डोंगराकडेही आला नव्हता. आपल्या घराच्या आसपासचेच जग त्याला ठाऊक होते. परंतु आता धीट बिट्टू ह्या नवीन नावाची त्याला जणू ओढ लागली .
बिट्टूने आईबाबांकडे नजर टाकली . ते तर उड्या मारून मारून त्याला चियर करत होते. पण स्पर्धेचा प्रकार ऐकून वीस पैकी फक्त आता पाचच जण उरले होते. उरलेल्या पंधरा जणांनी सपशेल माघार घेतली होती. कारण इतक्या लांब पिल्लंच काय त्यांचे आईबाबा पण कधी गेले नव्हते . बिट्टूने नदीकडे पाहिले. नदीचा उथळ भाग कुठला तो त्याने हेरला .
3,2,1 जोरात शिट्टी वाजली व स्पर्धेला सुरुवात झाली . बिट्टू धावतच डोंगर उतरताच नदीच्या उथळ भागाकडे पळाला . बाकीचे चौघे नदीच्या मुख्य प्रवाहात घुसले . त्यांना वाटले लहान तर प्रवाह आहे. पण पाण्याला जोर असल्यामुळे प्रवाहातून पलीकडे जाणे त्यांना कठीण जाऊ लागले.
बिट्टूने मात्र दगडांवर टुणटुण उड्या मारत पलीकडचा काठ लांब असूनही पटकन गाठला . नदीकाठच्या शेतातील लहान लहान गाजर तोंडात कोंबून तो पटापट आपल्या टोपलीत आणून टाकू लागला. असे करत करत त्याने वेळ संपेपर्यंत तीस गाजर जमा केली. बाकीच्यांची जेमतेम वीस पंचवीसच भरली .
बिट्टूला स्टेज वर बोलावून मानाचा चमचमणारा मुकुट घातला गेला. बिट्टूच्या हुशारीची तसेच युक्तीची सर्वांनी स्तुती केली व टाळ्या वाजवून शाबासकी दिली. बिट्टुचे आईबाबा बिट्टूच्या आनंदात सामील झाले.
अश्या तर्हेने घाबरट बिट्टूचा धीट बिट्टू झाला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिलोत्तमा खूपच छान कथा, काल मी ही गोष्ट माझ्या मुलीला सांगीतली.तीला खूपच आवडली.अश्याच छान छान गोष्टी लीहित रहा.

छान !