पाकिस्तान, फवाद खान आणि मी.

Submitted by विद्या भुतकर on 15 July, 2016 - 10:34

गेल्या वर्षी नोकरी शोधत असताना एक वेगळाच अनुभव आला. इंटरव्ह्यूला गेले तर तिथे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला ते मॅनेजर पाकिस्तानी होते. इंटरव्ह्यू छान झाला. अर्थात सर्व बोलणं इंग्लिश मधेच होत होतं आणि तेही अमेरिकेत त्यामुळे तसा विचार करायचं काही कारण नव्हतंच. सर्व बोलणी झाल्यावर मला त्यांनी एक प्रश्न विचारला,"तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना की आमचं ऑफशोअर चं ऑफिस पाकिस्तान मध्ये आहे?" खरंतर भारतीयांनी जगात आय टी मध्ये इतकं नाव मिळवलं आहे (चांगलं आणि वाईट दोन्हीही) की पाकिस्तान वगैरे मध्ये ऑफशोअर म्हणल्यावर मला जरा हसूच आलं. कधी असा विचारच केला नव्हता. अर्थात मला काय इथे बसूनच काम करायचं होतं. आणि याआधीही मी २-३ पाकिस्तानी लोकांसोबत काम केलं आहे. त्यामुळे मला असा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि मी तसं सांगितलंही.

पुढे होऊन त्यांनीच सांगितलं मग,"मी इथेच राहिलोय, वाढलोय आणि बरेच वर्षे काढलीत त्यामुळे माझे विचार जास्त विस्तारित आहेत. तिथे राहणाऱ्या लोकांची मनोवृत्ती थोडी संकुचित आहे. मी तर तिकडे टीममध्ये ३-४ हिंदू लोकांनाही घेतलं आहे. आणि त्यासाठी भांडलोही आहे. " आता हे ऐकून मात्र मला जरा भीतीशी वाटली. माझ्या आजवरच्या आयुष्यात कधीही अशी वेळ आली नव्हती जिथे कुणी केवळ हिंदू आहे म्हणून त्यांना ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आला आहे. आणि त्यांचे बोलणे ऐकून लोकांना तिथे काय त्रास होत असेल असा विचार करून थोडी भीतीही वाटली. पण खरं सांगायचं तर जे माझ्याशी बोलत होते ते मात्र एकदम छान, सुसंकृत होते आणि खूपच छान बोलले होते. पुढे जाऊन तिथे मला त्यांचा दुसरा कॉलही आला. पण तोवर दुसरीकडे नोकरी पक्की झाली होती त्यामुळे तिथे काम करण्याचा प्रश्न आला नाही. पण आजही त्या अनुभवाबद्दल विचार करते. खरंच एक स्त्री म्हणून आणि तीही भारतीय, मला तिथे कसे अनुभव आले असते? कदाचित एक वेगळे जग अनुभवायचा माझा चान्स हुकला. असो.

आज त्याबद्दल बोलायचं कारण म्हणजे गेल्या १०-१५ दिवसांत एक पाकिस्तानी सिरीयल पाहिली. बऱ्याच लोकांनी बऱ्याच दिवसांपासून सांगितली होती, शेवटी पाहिलीच. नाव आहे 'जिंदगी गुलजार है." आता ती कशी वाटली हे सांगायला नकोच. फवाद खान असलेली सिरीयल काय डॉक्युमेंटरी बघायलाही मी तयार आहे. सॉलिड फॅन झाले मी त्याची. फवाद खानचे दोन्ही चित्रपट मी पाहिले आहेत. त्यामुळे ती सिरीयल एका पाठोपाठ एक करत पटापट सर्व एपिसोड्स संपवले आणि एकदम महाभारत, रामायण, DDLJ, हम दिल दे चुके सनम वगैरे संपल्यावर वाटलं तसं वाटलं. असो त्याबद्दल तर काही करू शकत नाही. पण ती सिरीयल बघून वाटलं की पाकिस्तान मध्ये कितीतरी वेगळं वातावरण आहे. अगदी मॉडर्न म्हणून असलेल्या स्त्रियांचे कपडे पण पूर्ण अंगभर होते. तेच आपल्या सिरीयल मध्ये गुढघ्याच्यावर तरी असतेच किंवा ब्लाउज तरी बिनबाह्यांचे. अर्थात सिरीयल बघून देशाचा अनुमान काढता येत नाही. तरीही फरक जाणवलाच.

दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे आजपर्यंत मला तामिळ, तेलुगू आणि मल्याळम मुव्ही बघायलाही सबटायटल्स ची गरज पडली होती. पण ती सिरीयल पाहताना मला थोडेफार शब्द समजले नसतील पण बाकी पूर्ण समजत होते. आपण बोलतो ती भाषा इतकी सारखी असू शकते? बरेच बोलण्याचे संदर्भ, भाषा, कधी विचारच केला नव्हता की खरंच इतके साधर्म्य असेल. त्यांचे ते उच्चार ऐकून मला माझं बोलणं किती गावठी वाटत आहे असं वाटत होतं. किती सुंदर उच्चार, भाषा. गझल मला त्यामुळेच आवडत असतील. मनाला लागतात एकदम, कुठे तरी खूप आत.

पुढे माझ्या लक्षात आले की त्या सिरीयल मध्ये इस्लामाबाद, लाहोर, कराची वगैरे जे नावं घेत होते ती सर्व मला ऐकून माहीत आहेत. पण कुठल्याही नकाशात मी कधी नीट लक्ष देऊन पाहिले नाहीये की खरंच किती अंतरावर आहेत ती शहरं, किंवा त्यांच्यात विशेष असं काय आहे. यातलं मला काहीच माहीत नाहीये. बरेच ठिकाणी भाज्या करण्याचे किंवा मटण किंवा बिर्याणीचे संदर्भ होते. मग माझ्या मनात विचार आला की तिथे लोक काय खात असतील नाश्त्याला रोज? तिथेही कुणी डोसा, इडली, पोहे उपीट खात असेल का? एखाद्या शेट्टीचे तिथेही हॉटेल असेल का? की फक्त पाकिस्तानीचं जेवण खात असतील? आणि असेल तरी काय असते ते? काहीच माहीत नाही मला.

गेल्या काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता साहिर लुधियानवी यांच्यावर. गुलजार, साहिर यांच्याकडून कितीतरी गाण्यांचा, शब्दांचा, भावनांचा खजिना आपल्याला तिकडून आणून दिला. इतक्या गझल ऐकायला मिळाल्या. आजही राहत फतेह अली खानच्या आवाज ऐकला की ऐकत बसावसं वाटतं. पहिली सिरीयल संपल्यावर अजून एक पाहिली, 'हमसफर' आणि त्यात एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे त्याचं टायटल सॉंग. काय आवाज आहे. संदीप म्हणालाही, "घंटा एक शब्द कळत नाहीये." खरंच बरेचसे उर्दू शब्द होते. पण त्या गाण्यात जे दु:खं, प्रेम ऐकलं ते केवळ शब्दांत सांगता येणार नाही. आता त्या गझल बद्दल आणि त्या गायिकेबद्दल माहिती काढायची आहे. एक ध्यासच लागलाय म्हणा ना?

आपल्या देशाला, मला माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला तिकडून मिळाल्या असतील. किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या अजिबात माहीत नाहीयेत. अक्खा देश भारत-पाकिस्तान मॅच बघतो, आपण हरलो की रडतो, चिडतो. ते हरले की फटाके वाजवतो. त्यातला प्रत्येक खेळाडू आपल्याला तोंडपाठ असतो. कुठल्या मॅच मध्ये किती धावांनी आपण जिंकलो यावर तासन तास गप्पा होऊ शकतात. काश्मीरमध्ये चाललेला दहशतवाद, नेहमीची भांडणं, कधीही येऊ शकतं असं युध्दाचं सावट हे सर्व बघून खूप त्रास होतो. आपल्या एका सुंदर राज्याला इतके वर्षे इतका त्रास सहन करावा लागत आहे. तिथलं वातावरण बघून लोक कसे जगत असतील असा विचार नेहमी येत राहतो. भांडण, युद्ध, मॅचनंतर चे फटाके सर्व तर करूच पण निदान ते सर्व करताना त्या देशात अजून काय काय आहे हेही बघायला पाहिजे एकदा असं आज पहिल्यांदा वाटायला लागलं आहे. आणि शिवाय मुव्ही बघायला 'फवाद खान' ची भर झालीच आहे. Wink

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेहद पाहिली. Yes joining the club a little late. Sad सध्या क्रश आहे फवाद वर त्यामुळे शोधून बघत आहे त्याचे व्हिडीओ. Happy

विद्या.

पण या लेखाचा मूळ हेतू माझे पाकिस्तान बद्दल आहे. कितीतरी माहीत नाहिये मला आणि माझ्यासारखे किती अस्तील अजून. असो. Happy

माझ्या मुलीच्या day care मधे दोन पाकिस्तानी teacher (care giver) होत्या. त्यातली एक तर माझ्या मुलीच्या वर्गावरच होती. तिच्याशी बरेच वेळा बोलणं व्हायचं. सभोवतालच्या अमेरिकन वातावरणात, तिचं बोलणं, वागणं, विचार, माझ्या भारतीय विचारांशी खूपचं मिळते जुळते वाटायचे. त्याच वेळेस, पाकिस्तानात शाळेतल्या ८० मुलांना मारल्याची घटना घडली. तेव्हा ती आणि मी दोघी जणी खूपचं अस्वस्थ झालो होतो. त्या बद्द्ल राग, चिंता सगळं व्यक्त करून झालं आमचं.

लेख खूप विस्कळीत वाटला, इथल्या दक्षिण भागातल्या भाषा, चालीरीती यांची तुलना पाकिस्तानशी करून काय दाखवायचे ते कळले नाही कारण मुळात भारत भाषावैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे एका प्रांताची भाषा दुसऱ्याला कळत नसल्यास नवल काय?

1947च्या आधी पाकिस्तान अस्तित्वात नव्हता, त्या भागालाही ब्रिटिश इंडियात धरले जात होते याचा लेख लिहिताना बहुतेक विसर पडलेला दिसतो. तरी असो.

व्यक्तीशी: मला तरी पाकी लोकांबद्दल कसला आकस नाहि, ते शत्रू आहेत असेही कधी वाटत नाही, वाटत असेल तर कदाचित थोडे ममत्व वाटत असेल. तिथल्या लोकांना दुश्मनी वाटत असेल तर त्यांना मुद्दाम त्याच विचारात ठेवण्यात आलेय. मला त्यांच्याबद्दल कायम एक कणव वाटते, एका देशातून तयार झालेले दोन देश, पण त्यांच्या कर्माने त्यांना किती वेगळे दिवस दाखवलेत आज.

पण बांगलादेशाबद्दल मात्र काहीही वाटत नाही. ना दोस्ती, ना दुश्मनी. ते अस्तित्वातच नाहीयेत माझ्यासाठी.

सीमंतिनी!
Wink

ते टिव्ही सिरीयलच्या जगाच्या नियमांच्या अनुशंगाने लिहिले असावे.
भारतात बाई मॉडर्न दाखवायचीय तर कमी कपडे, कापलेले केस इ. दाखवतात.

कारण बाकीच्या तर (सिरीयलमध्ये ) लग्न झाल्याझाल्या घरात पण महागड्या साड्या , दागिने आणि मेकपच्या थराने मढून वावरतात.

साधना> तुलना यासाठी होती कारण मी खूप तेलुगू, तामिळ आणि मल्लू मुव्ही पाहिल्या आहेत आणि अजूनही पाहते. त्या मला आवडतात .पण त्या समजून घ्यायला मला सबटायटल ची गरज पडते. मी पहिल्यांदाच पाकिस्तानी कार्यक्रम पाहिला त्यामुळे मला त्यात आणि हिंदी भाषेत साधर्म्य पाहून जास्त नवल वाटले. मला ती मालिका आवडली, कळली याचा मला आनंद झाला. माझा हा पाकिस्तानी क्रिकेट मॅच सोडून दुसरे काही बघायचा पहिला अनुभव आहे. त्यामुळे त्यात मला ज्या गोष्टी जाणवल्या त्या लिहिल्या आहेत. अर्थात आता मला कुतूहल निर्माण झाले आहे त्यामुळे अजून माहिती काढत राहणार आहे.

सीमंतिनी? तू जे वाक्य बोलत आहेस ते मी पाहिलेल्या पाकिस्तानी सिरीयल बद्दल आहे. त्यांच्या तुलनेने भारतीय सिरीयल मध्ये बरेच तोकडे कपडे वापरलेले मी पाहिले आहेत. त्यामुळे तुलना साहजिक होती. मला कळले नाही की यात काय चुकीचे लिहिले. आणि यात मी कुणाचे चूक किंवा बरोबर असेही म्हटले नाहीये. अगदी शारीरिक जवळीकही एकदम कमी दिसली भारतीय सिरीयल च्या मानाने. असो.

मी अमेरिका, कॅनडा मध्ये राहिले आहे आणि त्यांबद्दल बरीच माहिती आहे असे वाटते तरी.. त्यामानाने पाकिस्तान बद्दल काहीच माहीत नाही. साधा नकाशाही. तर आता त्यांचे जेवण, रीती, नवीन गायक, लेखक यांच्या बद्दल जाणून घ्यायची इच्छा या सिरियल्स मुळे झाली इतकेच.

विद्या.

डॉन (www.dawn.com) वाचा. सुंदर पेपर आहे. त्यांचे फोटोब्लॉग्स अप्रतिम असतात! झालंच तर coke studio Pakistan आहेच. त्याचा नवीन सीझन लवकरच येणार आहे.

सी, I guess she meant that the modern girls depicted in the Pakistani dramas break the stereotype of the modern girls often shown on Indian Television through their attires and she found that amusing.

सीमंतिनी, तुम्ही पाहिल्या आहेत का या सिरियल्स? मी फक्त तुलना करत आहे, भारतीय आणि पाकिस्तानी सिरियल्स ची. माझे मॉडर्न मुलीबद्दलचे विचार काय आहेत त्यावर पुहा कधी तरी. पण सध्या इतकेच बोलत होते की सो कॉल्ड मॉडर्न मुलगी म्हणून जी त्या 'जिंदगी गुलजार है' मध्ये दाखवली आहे तिचे कपडे बाकी भारतीय सिरियल्स मधल्या मुलींपेक्षा जास्त होते. असो. यावर मला अजून बोलायचे नाहीये. भारतीय मीडिया आणि पाकिस्तानी मीडिया मध्ये अनेक फरक जाणवले. उदा: मी पाहिलेल्या जिंदगी गुलजार है आणि हमसफर मध्ये भडक मेक-अप नव्हते. कुठे ही ४-५ वेळा ठोकून दाखवणारे कॅमेरे नव्हते बरेच रियल वाटत होते ते निदान सध्याच्या भारतीय सास बहू सिरियल्स पेक्षा. मला असे वाटते की यात माझ्या मूळ लेखात मुद्दा हाच आहे की फरक आहेत आणि साधर्म्य ही आहेच. पण ते किती लोकांना माहीत आहे? निदान आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करावा असा विचार आहे.

जिज्ञासा, मला जे म्हणायचे होते ते सांगितल्याबद्दल धन्यवाद.

तू लिहीलेल्या नाही पाहिल्या. मलिका ए आलिया नावाची एक सिरीयल पाहिली - २०१४ मधली मॉडर्न. निदान कमी कपडे घातले असते त्या बायकांनी तर काहीतरी प्रेक्षणीय मिळाले असते असा चुकार विचार मनात यावा इतकी टुकार!

छान लेख!
पाकिस्तानी जेवढे भारताला आणि भारतीयांना फॉलो करतात तेवढे आपण करत नाही हे खरे आहेच.

साधना,
एका देशातून तयार झालेले दोन देश, पण त्यांच्या कर्माने त्यांना किती वेगळे दिवस दाखवलेत आज
.>>>>
आर यू शुअर? आपले म्हणजे सरासरी भारतीयांचे दिवस त्यांच्यापेक्षा चांगले आहेत याबाबत..

अरे ह्या मॉडर्न कपड्यांच्या नादात मूळ उद्देश राहतोय बाजूलाच!

मला पाकिस्तानी गझल फार आवडतात. आबेदा परवीन आणि फरीदा खान्नूम ह्या तर अगदीच आवडतात.

बाकी दुबईत बरेच पाकिस्तानी भेटले. हलाल आणि हराम समजून घेताना एका पाकिस्तानी सिनिअर ने लग्नाचे उदाहरण दिले होते. हिंदू लोकांमध्ये ७ फेरे घेतात लग्न लागताना. ७ फेरे किंवा अग्नी ची साक्ष ह्या गोष्टी जश्या मानल्या तर आहेत, नाही मानल्या तर अर्थ नाही तसच आहे हलाल हराम चं. अशी ऍनॉलॉजि दिलेली त्याने! त्याला हिंदू लग्नांबद्द्ल एवढी माहिती आहे हे ऐकून उडालेच होते. अर्थात बॉलीवूड मुळे त्यांना बरीच माहिती असते आपल्या कडची!

देशाबाहेर असताना अचानक पणे पाकिस्तानी आपले वाटतात ही गोष्ट अनुभवली आहे मी. पाकिस्तान्यांना कधीच भेटलो नसू तर आपण त्यांचा एक वेगळ्या देशातले पूर्ण वेगळे लोक असा विचार करतो. पण भेट झाली, की भाषेतलं साम्य, खाण्यापिण्याच्या पदार्थांत साम्य, साधारण पणे आदरातिथ्य, मोठ्यांचा आदर वगैरे अनेक संस्कारांमध्ये साम्य हे सगळं दिसतं आणि 'अरे! हा तर आपला बिछडा हुवा भाई' टाईप फिलिंग येतं!

बाकी फवाद खान ठीकच आहे! आपल्या इकडे जास्त चांगले ऍक्टर आहेत! हे. मा. वै. म

तुलना "माॅडर्न"पणाशी होत नसून सिरियल्समधल्या 'कंन्टेन्ट'शी केली जात आहे असे मला वाटते. मलाही पाकिस्तानी सिरियल्स याचसाठी आवडतात कारण त्यात अवास्तव भडकपणा नसतो, जो भारतीय सिरियल्समधे (अगदी मराठी सिरियल्सपण) ठासून भरलेला असतो. जशी भारतातली प्रत्येक सिरियल वाईट नाही तशीच प्रत्येक पाकिस्तानी सिरियलही चांगलीच नाही. पण हमसफर आणि जिंदगी गुलजार है पाहून न आवडणारा प्रेक्षक मलातरी अजून भेटायचाय.

अमेरिकेत नाही येणार, पण गल्फ देशांत पाकिस्तानी लोकांशी संपर्क येतोच.

त्यांचे कल्चर बर्‍यापैकी पंजाबी आहे ( अर्थात भेद आहेतच ) आपले दाक्षिणात्य पदार्थ त्यांना रुचणे शक्यच नाहीत पण त्यांचे जेवण पंजाबी पद्धतीचे असते. चविष्ट असते, पण मसाले कमी असतात. त्यांच्याकडेही दुधी हलवा वगैरे असतो, ( बॉम्बे बिर्याणी पण असते ) अर्थात जेवणात मांसाहाराचे प्रमाण जास्त असते.

आताचे माहित नाही, पण आपल्या सर्वच हिंदी फिल्म्स तिथे ( अवैध मार्गाने का होईना ) पोहोचलेल्या असत. त्यामूळे आपल्या ( फिल्मी) कल्चर बद्दल त्यांना नक्कीच माहित असते.

सध्या जरी त्यांची नावे खान वगैरे असली तरी अनेक जणांच्या पासपोर्ट वर चौधरी, शर्मा अशी मूळ आडनावे असतात.

आणि हो त्यांची भाषा कळायला अजिबात प्रयास पडत नाहीत.. मला तर वाचताही येते.

पाकिस्तानी सिरियल्स कळल्या तर त्यात नवल ते काय ? हिंदी समजत असेल तर उर्दू समजतेच की. आणि तसेही कितीतरी भारतीय सिरियल्स , सिनेमे यात भरपूर उर्दू ऐकायची सवय असते आपल्याला लहानपणापासून. पाकिस्तानी खाणे पिणे चालीरितीही असंख्य सिनेमे सिरियली, इतर माध्यमातून काहीच नविन नाहीत.
आताच काहीतरी नविन शोध लागल्याप्रमाणे लिहिलेले मला तरी काही रीलेट करता आले नाही!!

अरे वा! दिनेशदा तुम्हाला उर्दू वाचता येते? सहीच! मी पण सध्या उर्दू शिकतेय..हौस म्हणून Happy

आपले सर्व हिंदी सिनेमे पाकिस्तानमध्ये व्यवस्थित प्रदर्शित होतात आणि धो धो चालतात सुद्धा.

मैत्रेयी, आपल्याला उर्दू कळेल का? अशी शंका बऱ्याच जणांना पडताना मी पाहिली आहे आणि मला ती रास्त वाटते. आपण जेव्हा लिखित उर्दू पाहतो तेव्हा काहीच कळत नाही म्हणून असेल कदाचित. पाकिस्तानी मालिका पाहिल्यावर "अगं हे किती आपल्यासारखंच आहे!" ही प्रतिक्रिया देखील खुपदा ऐकली आहे.

ऋन्मेश, यात सिरीयस न असण्याबद्द्ल काय आहे? भारताची परिस्थिती पाकिस्तानपेक्षा खूप चांगली आहे हे मी आजवर जितके पाकबद्दल वाचले त्यावरून काढलेला निष्कर्ष आहे. तुला तसे वाटत नसेल तर तू भारतीय परिस्थिती सुधारायचे काम हाती घेऊ शकतोस. शेवटी कुठलाही समाज किती चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत आहे हे त्याच्या स्वतःच्या कर्मावरती अवलंबून आहे. अगदी राज्यकर्त्यांना दोष द्यायचा झाला तरी तेही समाजातूनच आलेले, समाजानेच निवडून दिलेले असतात. त्यामुळे ते चांगले वाईट असण्याची निघण्याचीहि अप्रत्यक्ष जबाबदारी समाजाची असते. आणि हा समाज तुम्ही आम्ही मिळून बनलाय.

सिरियल्स सोडून बाकीही गोष्टींवर जाणून घ्यायचं आहे आणि बोलायचं होतं. विषय तिकडे वळल्याने मूळ मुद्दा बाजूला राहिला. त्यामुळे लेखापेक्षा कमेंट मोठी होती आहे. असो.

सीमंतिनी, नक्की बघ मला दोनीही आवडल्या. फवाद मुले जरा जास्तच. बाकी हमसफर बोअर झाली थोडी पण जिंदगी गुलजार है आवडली. अर्थात त्यातही थोडे दोष आहेतच. पण फवाद साठी काहीही. Wink
मूळ मुद्दा तिथले साहित्य, समाज, तिथले संगीत आणि बाकी माहिती घेणे हा आहे माझ्यासाठी तरी.

साधना, मलाही वाटते की भारतीय समाजव्यवस्था जास्त सुधारली आहे पाकिस्तानच्या मानाने. पण आपल्याकडे होणारे काही गुन्हे, गरिबी पाहता आपणही तितके सुशिक्षित आहोत का की मागासलेले असे विचार येतात त्यामुळे सरसकट नियम लावू शकत नाही असे मला वाटते.

दिनेश, जिज्ञासा, माहितीबद्दल धन्यवाद. मलाही कॅनडामध्ये भेटलेले गृहस्थ जास्त ओळखीचे वाटायचे तिथल्या बाकी लोकांपेक्षा. फक्त आमचे वाद मॅच च्या दिवशी व्हायचे. एकदा आपण जोरदार हरलो होतो एक मॅचमध्ये. मला फार वाईट वाटले होते. पण २०११ च्या वर्ल्ड काप मॅचला एकजण होते ऑफिस मध्ये, त्यांना चिडवले होते. Happy बाकी तुम्ही कुठे शिकत आहेत उर्दू? मला तर ती स्क्रिप्ट बघून अजिबात वाटले नाही की ती मला लिहायला, वाचायला शिकता येईल. पण बोली इतकी सारखी आणि स्क्रिप्ट इतकी वेगळी.

चिन्मयी, हो ग. सर्वच चांगले नाहीयेत आणि कुठेच नसतात. आपल्याला जे चांगले आहे ते तरी बघायला, शिकायला मिळावे ही अपेक्षा आहे.

मैत्रेयी, मला आताच शोध लागला आहे. तुला अजून काही माहिती असतील सिरीयल किंवा साहित्य, संगीत तर जरूर सांग.

शरी ,आबेदा परवीन आणि फरीदा खान्नूम ह्या तर अगदीच आवडतात. >> धन्यवाद। या लेखातून बाकि लोकांचे काय अनुभव आहेत आणि त्याना माहित असलेल्या गोष्टी कळतील अशी अपेक्षा होती. मला तिथले गायक, लेखक यांच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्यांचा भूगोल बघायचा आहे. हळूहळू करणार आहे ते सर्व.

Thank you all for your comments and participation. I really would like to know more.

Vidya.

तुम्ही आताच शोध लागला म्हणताय, तर फक्त नावं लिहितो.

मेहंदी हसन, गुलाम अली, नूरजहाँ, मलिका पुखराज, नाझिया हसन,अतिफ अस्लम
सादत हसन मंटो, फैज अहमद फैज.
इम्रान अब्बास, अली झफर (हा गायक ही आहे),

तेरे बिन लादेन (हा बॉलीवुडचाच = भारतात बनलेलाच सिनेमा आहे. पण यात पाकिस्तान आहे)

जर तुम्हाला भारत-पाकिस्तान फाळणी माहीत असेल तर 'दास्तान' मालिका पहा. तीतही फवाद आहे. झी जिंदगीवर ती 'बानो' या नावाने दाखवली गेली.

भारतात जसं पंजाब राज्य आहे, तसाच पाकिस्तानातही पंजाब प्रांत आहे.

तुमच्यासाठी कदाचित धक्कादायक अशी आणखी एक माहिती : जिंदगी गुलजार है ही मालिकेचे दिग्दर्शन एका महिलेने केले आहे.सुलताना सिद्दिकी.

मलाही पाकिस्तानी सिरियल्स याचसाठी आवडतात.>>>> मलाही.एकतर भरजरी साड्यांचे फलकारे,हेवी मेकप्,दागदागिन्यांचा भडीमार नसतो आणि मालिका २५-३० भागात संपते.यू ट्यूबवर पाहिल्यामुळे पटकन संपतेही.
दास्तान,बेहद (टेलीफिल्म),जि.गुल्जार हैं या मालिका आवडल्या होत्या.नंतर फवाद्चे ओठ मुडपून हसण्याची एकसुरी स्टाईल त्यामुळे त्याच्या मालिका टाळते.दूर-ए- शहरेवार मला खूप आवडली होती.नेहमीचीच कौटुंबिक कहाणी,पण प्रेसेंटेशन मस्त होते.तसे तर बर्‍याच पाकिस्तानी मालिकांमधे असतेच.अगदी स्वाभाविक अभिनय असतो.शारीरिक जवळीक एकदम कमी असणे,अकारण अंगप्रदर्शन नसणे हा भागही मस्त आहे.
त्या मालिकांतील धीट,बाहेर (बाहर हिंदीत) असे अनेक मराठीत रुळलेले शब्द ऐकले की वाटले अरे मग आपली भाषा नेमकी कोणती? मग विचार केल्यानंतर बाह्य, धार्ष्ट्य अशा संस्कृत शब्दांवरून हे शब्द रुळले आहेत.तशाही संस्कृत व फारसी भाषा बहीणीच आहेत.बाकी मैत्रेयीच्या प्रतिसादाशी सहमत.

मेहंदी हसन, गुलाम अली,ऑल टाईम फेव्हरीट.साअदत मंटोचे अनुवादित लिखाण वाचले आहे.तेहमिना दुर्राणीचे 'ब्लास्फेमी' शॉकिंग होते.

काही पाकिस्तानी सिरीयल्स आवडतात हे ठीक आहे. पण त्यावरून त्यांची भारतीय सिरीयल्सशी तुलना करणे म्हणजे सफरचंदे आणि संत्र्यांची तुलना करणे सारखे आहे. भारतीय सिरीयल्सची फारशी आवड नाही पण सध्या नेटफ्लिक्सवरील भारतीय सिरीयल्स अतिशय छान आहेत - राधिका आपटेने चोकेर बाली केले आहे, एक "अद्रिश्य" म्हणून आहे इ इ .

क्वांटीकोत प्रियांका आवडली म्हणून सबटायटल लावून लावून सात खून माफ बघणारे अभारतीय लोक ह्या निमित्ताने उगीचच आठवत आहेत Happy

भरत, देवकी, Thank you. Happy दूर-ए- शहरेवार बघेन नक्की. पुस्तके आणि सन्गित सुरु कराय्चे आहे.

I know I am late to realize all this. But better late than never.

Thanks,
Vidya.

मी पण गुलाम अली, अबिदा परवीन आणि मेहंदी हसन यांचा चाहता आहे. काय सुंदर गातात...... लॉंग ड्राइव्ह ला जाताना लोकं धिंगाणा गाणी पेन ड्राइव्ह मध्ये टाकतात आणि मी मात्र गुलाम अली, मेहंदी हसन..... सुनसान रस्त्यांवरून रात्रीच्या वेळी गाडी चालवताना त्या गझल ऐकणे हा अनुभव शब्दात सांगता येण्यापलिकडचा आहे.

पाकिस्तान चा कोक स्टुडिओ पण मस्त....

माझ्या आणि माझ्या अनेक मित्रांच्या गुलाम अली आणि मेहंदी हसन ने गायलेल्या कित्येक गझल, त्यांचे लाइव्ह परफॉर्मन्स, त्यांनी घेतलेल्या तानेसकट पाठ आहेत. पण मला माझ्या आसपासच्या वयाचा एकही पाकिस्तानी असा भेटला नाही की तो आवर्जून या गझल ऐकतो. कधीतरी कुठेतरी नाव ऐकल्यासारखे तोंड करतात.

फार पूर्वी , तेव्हा पी टीव्ही भारतात दिसत असे, एक सिरिज की पिक्चर पी तीव्ही वर उत्सुकतेने पाहिला होता त्यात एका हिंदू राजाचे पात्र होते ( अर्थातच खलनायक म्हणून ) त्याचे तोंडचे संवाद इतके संस्कृत प्रचुर होते की मला प्रश्न पडला की याना त्याचा डायलॉग रायटर कोठून मिळाला असेल ?

Pages