आदरणीय डॉ. प्रकाश आमटे

Submitted by Charudutt Ramti... on 17 April, 2015 - 04:17

आदरणीय डॉ. प्रकाश आमटे,
आज तुमच्या जीवनावर आधारित "द रियल हिरो" चित्रपट पाहिला. खर म्हणजे हा चित्रपट् पहायला थोडा उशीरच झाला. मला पाहायलाच काय, चित्रपट बनवयलाच थोडा उशीर झाला असे म्हणालो मी तरी चालेल. अलौकिक व्यक्तीच्या हयातीत त्यांच्या जीवनकार्यावर चित्रपट प्रदिर्शित होण्याची घटना तशी फारच दुर्मिळ. चित्रपटातील, खरे तर चित्रपटातील म्हणणे थोडे हास्यास्पद होईल, पण तुमच्या हेलमलकश्याच्या अक्षरश: प्रेमातच पडलो. ती सुंदर नदी, ते निबीड जंगल, त्या जंगलातले काटेरी पायवाट वजा रस्ते...त्या शांत ओढ्यातून वाहणार्या निमुळत्या वल्हेवाल्या नावा... सगळे कसे एखाद्या सुंदर गोष्टीत असते तसे.
आम्ही तशी साधी माणस. शहरात लाखो लोक रहातात तसे राहणारी. पाच दिवस मान मोडून ओफीस मधे काम करायची, शनिवारी एखादा आठवडी बाजार, रविवार पोराबाळान्ना घेऊन एखादा पिक्चर किंवा नाटक, येता येता एखादा डोसा उत्तापा किंवा अगदीच निमित्त फारा असेल तर चिकन किंवा मच्ची ताट की परत सोमवार लागू. गेला बाजार एखाद दिवशी मॉल किंवा तत्सम ठिकाणी सणासूदिची खरेदी. आमच आयुष्य हे अस मोबाईल नेटवर्क, एचडी टीवी चॅनेल्स आणि सो-कॉल्ड कम्फर्ट शोधत फिरणार.
डॉक्टर खरे तर तुम्ही बुध्धीन अतिशय तल्लख…म्हणूनतर तुम्ही सत्तरी च्या दशकात डॉक्टर झालात. खरतर असे कॅम्फर्टेबल जगायला तुम्हालाही कुठल्यातरी क्षणी वाटल असणार. पण मग आमच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला असता. हेमलकश्याच्या जमिनीला तुमचे पाय लागायचे अशी काहीतरी गूढ घटना घडायची होती. बाबा आमटे यांच्या सारखी अत्यंत अवजड 'लेगसी' तुम्ही घेऊन हेमलकश्यात आलात. गवायाच पोरही सुरातच रडत म्हणतात तस तुमच्या आमटे घराण्यात ब्लडग्रूप च अलौकिक असावा अशी शंका यावी इतपत ही 'धरोहर'. ‘वाहणे’ हा गुणधर्म सोडून तुमच्या रक्ताने 'वाहून' घेणे हा धर्म स्वीकारलाय... चित्रपट पहात असताना अनेक वेळा अंगावर काटा आला. इतके वेळा की त्याची ही थोड्या वेळाने सवय व्हावी. पापण्यान्च्या भोवती अनेकदा धुक जमा झाल. एक आवन्ढा गिळता गिळता दुसरा आणि तिसरा आला... आम्ही जे घटनाक्रम साधे पडद्यावर पाहून स्थब्द झालो ते आयुष्य तुम्ही प्रत्यक्षात कसे काय जगला असाल? आदिवासींची पराकोटीची अंधश्रध्धा, निसर्गाच तांडव, तुमची गळणारी झोपडी, झोपडीत अर्धमेल्या अवस्थेतले तुमचे आदिवासी रुग्ण, पेटीत ठेवलेल्या तुमच्या पोटच्या नवजात अर्भकालाही भेटायला न जाता तुम्ही कोण कुठल्या आदी वासींच्या दवा दारू साठी त्या निबीड जंगलातच थांबण, आदिवासींच्या वाड्यात पसरलेल्या कॉलराच्या साथीत तुम्ही रक्ताच पाणी करून त्यांचे जीव वाचवण… तुम्ही नेत्रत्द्न्य नसतानाही निव्वळ पुस्तक वाचून व्रुध्ध आदिवासी स्त्री चा मोतीबिंदू काढून तिला दृष्टी प्रदान करण… शस्त्रक्रियेची कुठलीही सोय नसताना त्या झोपडी वजा दवाखान्यात तुम्ही मूल आडव आलेल्या स्त्री चा जीव वाचवण...आणि मूल वाचवू शकलो नाही या अपराधी भावनेन तुमच ते खिन्न होण. हे सगळच जणू अघटीत वाटाव अस... कोणत गणगोत होत तुमच त्या आदिवसींशी..म्हणून तुम्ही हे केलत त्यांच्यासाठी?
हातापाया वर काटे आणणारे असे किती तरी प्रसंग. तुमची पाळलेली वाघीण नेगलच कायमच निघून जाण… तुम्हाला सरका री दपतरां नि दिलेली 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी वर्तणूक. आदिवासी आणि नक्षलवाद्यानचा क्लिष्ट आणि न सुटणारा तिढा. पोलिसांकडून होणारी आदिवासींची पिळवणूक. सगळ पहिल्या वर मन क्षण भर विशणण व्हायला होत. सेन्सेक्स, इन्फ्लेशन आणि जीडीपी ची आकडे वारी घोळवणारे प्रगती पुस्तक किती बेगडी आहे याची जाणीव प्रकर्षाने मनाचा तळ पकडू लागते.
एसी कार मधून जाताना सिग्नल वर एखादी बाई पोटच्या अर्भकला घेऊन भिक्षा मागत असताना दिसते तेंव्हा आम्ही दिलाच तर दिला रुपया दीड रुपया नाही तर काच वर करून केले दुर्लक्ष या संस्कारांनी वाढलेली पिढी. तुमच्या सारखे पुण्य नाही आमच्या नशिबी, पुढच्या वर्षीच्या इनक्रिमेंट ची काळजी करणारे आम्ही झापडबंद चाकरमानी...आमच्या पेक्षा ते हेमलकश्याचे अर्धनग्न आदिवसिच खरे नशिबवान...त्याना निदान तुमच्या सारख्या परिसाचा आणि मंदाताईं सारख्या विलक्षण व्यक्तीमत्वान्चा सहवास तरी लाभला... आलोच कधी तुमच्या 'प्रकल्पा' कडे हेमलकश्याला तर भेट घडायचे भाग्य आहे की नाही माहिती नाही, पण तुमच्या दवाखान्याची चिमुटभर धूळ मात्र नक्की कपाळावर लाविन गंध समजून…
कळावे,
आपला, चारूदत्त रामतीर्थकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाहवा, चारूदत्त, फारच छान लिहिले आहे. खरे आहे,
शहरी सुखसुविधांमधे जन्माला येऊन एकाच एका चक्रात फिरत रहावे लागते, Sad
अनेकांना मनातुन वाटत असुनही काही करता येत नाही,
डॉ. प्रकाश यांच्यासारख्यांनी दाखवलेल्या वाटा या खरोखर प्रकाशवाटाच,
त्यावरून एखादा जरी चालू शकला तरी त्यांच्या तपस्येचे चीज होईल.

खरोखर छानच लिहिलंय.... मनापासून...
अनेकानेक धन्यवाद...

डॉ. आमटेंसारखी व्यक्तिमत्वे ही खरोखर अस्तित्वात आहेत का ? असा विचार मनाला क्षणभर चाटून जातो...

महेशजी - लेख वर काढल्याबद्दल मनापासून धन्स...