जोन ऑफ आर्क - एक धगधगती अग्नीशिखा ....

Submitted by अजातशत्रू on 13 July, 2016 - 00:10

अवघी सतरा वर्षाची एक खेडवळ तरुणी अकस्मात पुढे येऊन आपल्या देशाच्या सैन्यात चेतनेचे हुंकार भरते, दैवी ताकद अंगात संचारल्यागत त्याचे नेतृत्व करते अन आपल्या चढायांच्या जोरावर एका सर्वशक्तिमान महासत्तेला धूळ चारते, पण ज्या देशाच्या रक्षणासाठी, स्वाभिमानासाठी, अस्तित्वासाठी ती लढते त्या देशाचा राजाच तिला कार्यभाग उरकल्यावर शत्रूच्या ताब्यात देतो. तिथे तिची दैवी शक्ती, त्यातले दैवी संदर्भ खोटे ठरवण्यासाठी चर्च पुढे येतं. तिचा अनन्वित छळ होतो अन या महापराक्रमी तरुणीला चेटकीण ठरवून वयाच्या २१व्या वर्षी जाळलं जातं !

उत्तर पूर्व फ्रान्सच्या डोम्रेमी या गावी इस. १४१२ मध्ये, ६ जानेवारीच्या मध्यरात्री जन्मलेल्या जोन ऑफ आर्क या तरुणीची ही कहाणी. अत्यंत नाटय़मय, थरारक अशी आणि धर्मशास्त्र, तत्त्वज्ञानाच्या गहनतेला आव्हान करणारी. तिच्या कथेची स्फुर्तीच न्यारी आहे. आयुष्यभर पुरेल अशी चैतन्याची महती तिच्या कथेत आहे....

एके काळी संध्याकाळ झाल्यावर अंधार गडद झाला की रात्रीची जेवणं व्हायची. आजी किंवा आजोबांच्या भोवती नातवंडांचा वेढा पडायचा. गोष्ट सांगा म्हणून तगादा सुरू व्हायचा. मग थोडे आढेवेढे घेत आजी-आजोबा गोष्ट सांगायला सुरुवात करायचे. कधी रामायण-महाभारताची, कधी राजा-राणीची, कधी पंचतंत्रातली, कधी इसापनीतीतली, कधी आटपाट नगराची; तर कधी एक हजार एक रात्रींची. मुलं तर या गोष्टी ऐकत असायचीच, आता आपण गोष्टी ऐकत नाही तर टीव्हीवर पाहतो तर त्यामुळे जर जोन ऑफ आर्क वरचे लेखन किमान वाचण्यात आलेले नसेल तर तिच्यावर निघालेल्या ढीगभर सिनेमांपैकी एखादा सिनेमा जरी पाहण्यात आला तर केवळ तो दिवस / रात्र या पुरता फिल मर्यादित न राहता बरेच दिवस या सिनेमाची पर्यायाने जोनची नशा डोक्यात राहते...
jon1.jpg

ही कहाणी मध्ययुगाच्या अंतास अन आधुनिक युगाच्या उदय काळात घडली होती, तेंव्हा मन विशुध्द करणारे नवयुगाचे वारे जरी वाहूं लागले होते तरी मध्ययुगांतील सुरुवातीचे दुष्टतेचें भूत पश्चिम युरोपच्या मानगुटीस बसलेंच होतें. हे वारे एका दुष्ट धुक्यासारखे पश्चिम युरोपच्या मूखमण्डलास आच्छादून राहिले होतें. पंधराव्या शतकभर फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, बोहेमिया, इत्यादि देशांत हजारों स्त्रीपुरुषांत जिवंत जाळण्यांत येत होतें. मानवी चरबी अनेक महानगरात सर्वत्र जळत होती व तिची घाण चोहोंकडे भरून राहिली होती. धर्मान्त आचार्यांना टीकेचें तोंड बंद करण्याचा फारच सोपा उपाय सांपडला होता. तो म्हणजे टीकाकारांना ठार मारण्याचा. जे जे चर्चशीं सहमत नसत अगर ज्यांची ज्यांची संपत्ति पाहून पोप प्रभृतींचा स्वार्थ जागृत होई, त्या सार्‍यांना जिवंत जाळून त्यांची धनदौलत जप्त करण्यांत येईल !

चर्चशी सहमत नसणारे तेवढेच नव्हेत तर राजकीय गुन्हेगारही नास्तिक म्हणून जाळण्यांत येत असत. पोप व राजे स्वार्थासाठी हातांत हात घालून काम करत होते. राजाला धर्माचा व धर्माला राजाचा पाठिंबा असे. राजाविरुध्दचे वर्तन ईश्वराविरुध्दच समजण्यांत येई. जणूं ईश्वरच राजांना अभिषेक करतो असें मानण्यांत येत असे. चर्चनें मान्यता दिलेल्या शासनसंस्थेस विरोध करणें हें देहान्त शिक्षेचा गुन्हा करण्यासारखें गणण्यांत येई. हा गुन्हा केवळ शासनसंस्थेविरुध्दच नसे, तर चर्चच्याहि विरुध्द असे. जोन ऑफ आर्कची जीवितकथा समजून घेण्यासाठीं चर्च व स्टेट यांच्यातील हें परमैक्य लक्षांत ठेवणें आवश्यक आहे. चर्चचे अधिकारी ज्याला धार्मिक गुन्हा समजत. तो हातून घडल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणें धार्मिक गुन्ह्याच्या सदराखालीं तिचा खटला चालणें क्रमप्राप्तच होतें व नास्तिक म्हणून तिला जाळण्यांत येणार हेंही ठरलेलेंच होतें. आजच्या चिकित्सक मनाला जोन ऑफ आर्कचें सारें जीवन विश्वासार्ह वाटत नाहीं; पण पंधराव्या शतकांतल्या भोळ्या श्रध्दाळू मनाला तिचें जीवन विचित्र वाटत नसे आणि तत्कालीन परिस्थितींत तिला ज्या प्रकारचें मरण आलें ते साहजिक होतें.
Joan_of_arc_miniature_graded.jpg

मध्ययुगांत प्रत्येक जण जणू देवदूतांशीं बोले, प्रत्येकाचा चमत्कारांवर विश्वास असे. पॅरिसमध्यें रिचर्ड नांवाचा कोणी एक साधु होता तो आपणास स्वर्गाचा प्रत्यक्ष आवाज ऐकूं येतो व आपणास देवाच्या इच्छेचा अर्थ समजतो असें म्हणे. त्यानें सार्‍या पॅरिस शहराला वेड लावलें. श्रध्दाळू धर्मभावनांना वाटे कीं, पॅरिसमध्यें त्यानें जणूं समुद्रच उंच बनविला ! दुसरा एक कार्थेलाइट पंथी थॉमस कॉनेटा नांवाचा साधु होता तो स्वर्गांतील देवदूतांनीं आपणास धर्माची किल्ली दिली आहे असें म्हणे. फ्रान्समध्यें व बेल्जियममध्यें त्याच्या प्रवचनांस पंधरा ते वीस हजारपर्यंत श्रोते जमत. ब्रिटनीमधली पिएरेटी नामक एक स्त्री आपल्या बंधुभगिनींस म्हणे, ''मी नेहमीं ख्रिस्ताशीं बोलत असतें.'' एका फ्रेंच धनगराचा एक मुलगा होता, त्याच्या अंगातून रक्ताचा घाम बाहेर येई असें सांगत. ज्यांच्या अंगांत येतें असे स्त्रीपुरुष प्रत्येक प्रान्तांत असत. आपण स्वर्गांतील आत्म्यांशी सदैव बोलतो असें हे स्त्रीपुरुष मानीत व इतरांना मानावयास लावीत. असे अनेक चमत्कार आणि त्याच्या सुरस कथा सर्वत्र आढळत असत.

मात्र काही असेही लोक जन्मास येऊन गेले की त्यांनी खूप कमी काळात इतिहास बदलून टाकला अन धर्मसत्ता व राजसत्ता दोहोंना आव्हान दिले. त्यापैकीच एक अद्वितीय अन अलौकिक अशी ही १५ व्या शतकातली गोष्ट फ्रान्स मधल्या ‘जोन ऑफ आर्क’ या वीरस्त्रीची आहे. जोन ऑफ आर्क किंवा फ्रेंच उच्चारानुसार ‘ज्यॉं डि आर्क’ ही आजघडीला फ्रान्सची स्फूर्तिदेवता मानली जाते. ती १५ व्या शतकात होऊन गेली. त्या वेळी फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात युद्ध सुरू होतं. इंग्लंडची सरशी होत होती. फ्रान्सचा उत्तर भाग इंग्लंडने जिंकला होता. ऑर्लिन्स या फ्रेंचांच्या महत्त्वाच्या ठाण्याला इंग्रजांचा वेढा पडला होता. अशा वेळी जोन ही एक स्त्री पुढे आली. ती कुण्या सरदार-जहागीरदार अगर श्रीमंत व्यापार्‍याची मुलगी नव्हती; तर एका गरीब शेतकर्‍याची मुलगी होती. ती स्वतः शेतमजूर होती.

तेरा वर्षांची असल्यापासून जोनला `देवाचा आवाज' ऐकू येत होता. तत्कालीन फ्रान्सवर कब्जा केलेल्या जुलमी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येणार आहे, हे तिला देवानं सांगितलं. ही राजवट स्वत: जोन उलथवून टाकणार आहे, हेही तिला देवानं सांगितलं. फ्रान्सच्या पदच्युत राजाच्या मस्तकी राजमुकुटाची स्थापना करण्याची जबाबदारीही तिच्यावर देवानंच सोपवली. कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी लढाईत इंग्रजांचा पराजय होणार, याचेही स्पष्ट संकेत तिला देवानं दिले आणि हे सगळं या खेडवळ मुलीनं खरं करून दाखवलं. जे जे तिला देवानं सांगितलं, ते ते वास्तवात सिद्ध झालं, म्हणजे `तो' आवाज देवाचाच हेही सिद्ध झालं. स्वर्गांतील देवदुतांशीं व आत्म्यांशीं बोलतां येतें अशा प्रकारच्या चमत्कारमय कथा छोटी जोन ऑफ आर्क आपल्या आईच्या तोंडून नेहमीं ऐके. तिची आई धर्मशील होती. जोनला लिहितां-वाचतां येत नव्हतें. तें तिला शिकविण्यांत आलें नव्हतें. धार्मिक दन्तकथा व पर्‍यांच्या गोष्टी हेंच तिचें शिक्षण. तिला या गोष्टी खर्‍या मानावयाला शिकविण्यांत आलें होतें.
jon2.jpg

फ्रेंच इतिहासकार मेश्ले तिच्याबद्दल म्हणतो, ''चर्चच्या भिंतींजवळ ती जन्मली होती. चर्चमधील घंटांच्या नादावर ती पाळण्यांत आंदुळली जाई, झोंपविली जाई. तिचें मन व तिची बुध्दि हीं दंतकथांवर पोसलीं गेलीं होती. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे तीच एक जिवंत दंतकथा बनली. तिच्या बापाच्या घराजवळ जंगल होतें. त्या जंगलांत पर्‍या राहतात असें मानण्यांत येई. वर आकाशांत नाचणार्‍या मेघमालांवर किंवा तेजस्वी रथांवर बसून देवदूत उडत्या-पळत्या मेघांमधून जात आहेत असे तिला दिसे. जेव्हां तिचे वडील शेतांत काम करीत असत आणि आई घरकामांत मग्न असे, तेव्हां उंबर्‍यावर बसून ती गावांतील सारे आवाज ऐकत राही. सर्वांचा मिळून एक संमिश्र, संमीलित आवाज होई. अतिमधुर व स्वप्नमय अशी ती अस्पष्ट वाणी तिला गुंगवी. 'माझ्याशीं बोलणार्‍या देवदूतांचाच नव्हे का हा आवाज ? हो, तोच.हा आवाज " असें तिला वाटे. 'परलोक व इहलोक यांची सीमान्त-रेषा कोठें, कशी, कोण काढणार ? स्वर्ग व पृथ्वी जणूं एकमेकांशीं मिळूनच गेलीं आहेत व शेजारचीं माणसें रस्त्यावर एकत्र येऊन भेटतात, बोलतात, त्याप्रमाणे स्वर्गीय देवदूत व मानव एकमेकांस भेटूं शकतील, परस्परांशीं बोलूं शकतील' असें तिच्या बालनिर्मळ कल्पनेस वाटे. स्वयंपाकघरांतून आईनें हांक मारावी इतक्या सहजतेने देवदूतांचे बोलावणें वा हांक मारणें तिला सहज वाटे. हे सर्व साहजिक असून त्यांत चमत्कार वगैरे कांहीं नाहीं असें तिला वाटे. इतकेंच नव्हे तर उलट देवदूत देवाच्या या पृथ्वीवरील लेंकरांबरोबर कधीं बोलत नाहींत असे तिला कोणीं सांगितलें असतें तर तो मात्र तिला चमत्कार वाटला असता. थोडक्यांत सांगावयाचें तर जोन अशा जगांत जगत होती कीं, तेथें सत्य व असत्य, खरें व काल्पनिक यांत फरक करणें तिला अशक्यप्राय होतें. देवदूत आपणांस भेटावयास येऊं शकतील व आपणांसहि त्यांना भेटण्यासाठीं वर नेलें जाणें शक्य आहे असें तिला वाटे.

ती अशा काल्पनिक पर्‍यांच्या सुंदर जगांत, स्वत:च्या कल्पनारम्य जगांत जगत होती. तिच्या या जगांत प्रत्यक्ष सृष्टींतील एकच कुरुपता होती, एकच दुष्ट गोष्टीचा डाग होता व ती म्हणजे इंग्रजांनीं तेंव्हा तिच्या मायभूमीवर चालविलेली लढाई होय. फ्रेंच लोक इंग्रजांना 'देवाचा शाप' म्हणत, 'नतद्रष्ट व प्रभुशापित लोक' मानीत. हे शापित इंग्रज फ्रान्सच्या दुर्दैवी राज्यावर हल्ले चढवीत होते, सारा प्रदेश उध्वस्त करीत होते; इंग्रज टॉमी फ्रेंच शेतकर्‍यांचीं पिकें कापून नेत होते, त्यांच्या घरादारांची राखरांगोळी करीत होते, गुरेंढोरें पळवून नेत होते. कधीं कधीं मध्यरात्रीं आसपासच्या गांवांहून आश्रयार्थ येणार्‍या अनाथ स्त्रीपुरुषांच्या व मुलांबाळांच्या आक्रोशानें ती जागी होई. एकदां तिच्या आईबापांसहि या लुटारुंपासून रक्षणार्थ पळून जावें लागलें. जेव्हा ती आईबापांसह परत आली तेव्हा त्यांना काय आढळलें ?—सारा गांव बेचिराख झाला होता, जोनचें घर लुटलें गेलें होतें, चर्चची होळी शिलगलेली होती ! नंतर तिच्यासमोर इंग्रज सैनिक तिचं राहिलेलं गाव जाळलं जातं, तिच्या बहिणीचा खून करून तिच्या प्रेतावर बलात्कार केला जातो. या घटनेनंतर जोनला विलक्षण `चमत्कारिक' वातावरणात शेतात तिची सुप्रसिद्ध तलवार सापडते. ती देवानं दिली असं जोन समजते. या तलवारीचा उपयोग आपण केला पाहिजे यासाठीच ही तलवार आपल्याला दिली आहे या विचाराने ती भारून जाते. या प्रेरणेतूनी जोन पुढे होते आणि ती फ्रेंच सैन्याला सांगते की, 'मला दिव्य दृश्य दिसलं आणि देवदूताचा आवाजा ऐकू आला. मला देवाचा आदेश मिळाला की, फ्रान्सच्या पवित्र भूमीवरून इंग्रजांना हाकलून द्या.'

देवाने दिलेल्या तलवारीच्या बळावर आपण कुणालाही परास्त करू या परमश्रद्धेच्या बळावर फ्रेंच सेनेचं नेतृत्त्व करण्यापर्यंत तिची मजल जाते. या सगळ्याला केवळ तिची दबलेली सूडबुद्धीच कारक होती, असं तिची सद्सद्विवेकबुद्धी तिला सोदाहरण आणि तर्कशुद्ध पद्धतीनं पटवून देते. ' थेट देवाच्या आज्ञेवरून आपण `हंड्रेड इयर्स वॉर`नावाने ओळखल्या जाणा-या युद्धात फ्रेन्च आर्मीचं नेतृत्त्व करत आहोत' असं सांगणाऱ्या जोनमुळे फ्रेंच सैन्यात नवी वीरश्री संचारली. शिवाय असा नुसता दैवी आदेश देऊन स्वतः जोन थांबली नाही. पुरुष वेष चढवून, चिलखत घालून, पांढरया शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, हाती तेजस्वी तलवार घेऊन ती फ्रेंच सैन्याचं नेतृत्व करीत ऑर्लिन्सच्या वेढ्यावर तुटून पडली. फ्रेंच सैनिक बेभानपणे लढले आणि इंग्रजांचा पराभव झाला. ही घटना १४२९ सालच्या मार्चची. अवघ्या १७ वर्षांच्या एका गावंढळ मुलीनं, एका देशाच्या निस्तेज सैन्यामध्ये प्राण फुंकला, अनेक चढायांत तिने इंग्रज सैन्याला मात दिली. एका बलाढय़ महासत्तेचा पराभव घडवून आणला. राजघराणातल्या वारसाला विधिवत राजमुकुट मिळवून दिला.

राजघराणातल्या वारसाला विधिवत राजमुकुट मिळवून देणाऱ्या जोनला १९व्या वर्षी त्याच राजाकडून दुष्मनांच्या (इंग्रजांच्या) हाती सोपविले गेले. `देवाची दूत' म्हणून डोक्यावर घेतल्या गेलेल्या या मुलीवर चर्चनं खटला चालविला. जोनची वाढती लोकप्रियता व फ्रेंचांचे प्रतिआक्रमण यामुळे जोन इंग्रजांसाठी डोकेदुखी ठरली होती. तसेच व्हाल्वा राजघराण्याची मक्तेदारी नको असलेले व इंग्रजांशी हितसंबध जुळवलेले अनेक सरंजामदार जोनचे शत्रू बनले होते. त्यापैकी बरगंडीच्या सैनिकांनी जोनला २३ मे, १४३०ला पकडले व पैशाच्या मोबदल्यात तिला इंग्रजांच्या ताब्यात दिले. तिला उत्तर फ्रांस मधील रुआ येथे डांबून ठेवले. इंग्रजांनी तिच्यावर धार्मिक खटला चालवला. यात जर जोन दोषी आढळली तर फ्रेंच जनतेवरील तिचा प्रभाव कमी होइल हा बेत त्यात होता. तिच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप ठेवण्यात आले. पण देवावर आपार श्रद्धा असलेली जोन त्या आरोपांना सहज सामोरी गेली. तिने ते आरोप मान्य करावेत म्हणून तिचा खूप छळ करण्यात आला. तिची दैवी साक्षात्काराची हकीकत खोटी ठरविण्यासाठी या तथाकथित न्यायालयाने जंगजंग पछाडले. इंग्रजांना तिला काहीही करून दोषी सिद्ध करायचे होतेच, सरतेशेवटी तिला युद्धाच्यावेळेस पुरुषी वेष धारण केला म्हणून व तिने कोणतीही संतांची आकाशवाणी ऐकलेली नाही, उलट सैतानाची चेटकीण दूत म्हणून तिला दोषी सिद्ध (?) करून जिवंत जाळण्याची jon3.jpg शिक्षा ठोठाविण्यात आली. ३० मे १४३१च्या सकाळी सीएन(Seine) नदीच्या किनाऱ्यावरील रोएन या बंदरातल्या जुन्या बाजारात तिला जिवंत जाळून मारण्यात आलं. त्या काळी कॅथलिक चर्चमध्ये त्यांची रूढिवादी परंपरा, कट्टरता आणि आपण म्हणू ती पूर्व दिशा याचा इतका अतिरेक झाला होता की, चर्चने जोन ऑफ आर्कची दोनदा राखरांगोळी करून, ती राख फ्रान्सच्या सीएन नदीत विसर्जित करून टाकली. मृत्युनंतर पंचवीसेक वर्षांनी पोपनी तिच्या खटल्याचा वृत्तान्त तपासला आणि तिला निर्दोष घोषित केलं. चर्चद्वारे केल्या गेलेल्या या नृशंस हत्येच्या कृत्यासाठी व्हॅटिकनने अडीचशे वर्षांनंतर जाहीरपणे जगाची माफीदेखील मागितली. जोनच्या हत्येनंतर सुमारे पाचशे वर्षांनी १९२० मध्ये व्हॅटिकन सिटीतून पोप बेनेडिक्ट (पंधरावे) यांनी तिला संतपद बहाल केलं. आता जोन ऑफ आर्क फ्रान्सच्या पेट्रन सेंट्समध्ये आहे आणि त्यांच्या राष्ट्रीय नायिकांमधली एक आहे.

गेल्या साडेपाचशे वर्षात जोन ऑफ आर्कच्या या घटनेवर असंख्य कथा, कादंबर्‍या, काव्यं, नाटकं, पोवाडे, चित्रपट निघाले आहेत आणि अजूनही निघत असतात. जोन ऑफ आर्कची गोष्ट ही फ्रान्सच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे, असं प्रत्येक फ्रेंच नागरिक मानतो.जोन ऑफ आर्कवर १९२८ पासून (द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्क- दिग्द. कार्ल ड्रेयर) २०१५ पर्यंत अनेक सिनेमे निघाले. या कहाणीच्या ताकदीमुळे इन्ग्रिड बर्गमनसारख्या सुजाण अभिनेत्रीला १९४८ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी व्हिक्टर फ्लेमिंगच्या सिनेमात निम्म्या वयाची जोन साकारावीशी वाटली. रोबेर्तो रोझेलिनीलाही या अग्नीशिखेची धग अनुभवावीशी वाटली. (त्यात त्याची होरपळ झालीच.) जॉर्ज बनॉर्ड शॉच्या `सेंट जोन' या नाटकावरही सिनेमा निघाला. दोनेक वर्षांपुर्वी आलेल्या `द मेसेंजर: द स्टोरी ऑफ जोन ऑफ आर्क' या सिनेमाने तर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती अन आजवरच्या सिनेमात न दाखवलेला जोनचा वेगळा कंगोरा यात होता. जोनची सद्विवेकबुद्धी पुरुष व्यक्तिमत्वाच्या रुपात (डस्टीन हॉफमन) वेगळी करून तिच्या प्रभुत्वाचा वेगळा आधार घेऊन याआधीच्या जोनच्या प्रतिमा मोडीत काढल्या होत्या ! राजकारणी आणि धर्मकारण्यांच्या निष्ठुर डावपेचांत `बळी' गेलेली निष्पाप, कोवळी कुमारिका ही जोनची प्रतिमा तिच्या मरणोत्तर संतपदाला वलयांकित करणारी अशी दाखवण्यात आली आहे. ज्या फ्रान्सच्या स्वातंत्र्यासाठी जोन लढली त्याच फ्रान्सच्या दिग्दर्शकानं, लुक बेसाँ यानं तिच्या या प्रतिमेवर मर्मभेदक आघात करावा, हेही काव्यगत न्यायासारखं विलक्षण नाटय़मय घटित आहे.

जाता जाता - जोन ऑफ आर्कच्या काळानंतर ४०० वर्षांनी झालेली एक घटना तिचा प्रभाव फ्रेंचांवर किती मोठा आहे हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. १९४० साली हिटलरच्या नाझी सेनांनी महायुद्धात एका सपाट्यातच फ्रान्सचा चुराडा उडवला. जर्मनांनी फ्रान्स व्यापला. जर्मनव्याप्त फ्रान्समध्ये हिटलरने जे प्रशासन निर्माण केलं, त्याला ‘व्हिशी (Vichy) सरकार’ म्हणत. या व्हिशी सरकारचा प्रमुख होता फ्रेंच सेनापती मार्शल फिलिप पेतॉं. तर दुसरा एक फ्रेंच सेनापती चार्ल्स डी गॉल जो पुढे ब्रिटनमध्ये पळून गेला. त्याने तिथे स्वतंत्र फ्रेंच सरकार स्थापन केलं. व्याप्त फ्रान्समध्ये भूमिगत सशस्त्र प्रतिकार उभा करून जर्मनांना हुसकावून लावणं, हे अर्थातच त्याचं मुख्य काम होतं. यात त्याला ब्रिटनचं पूर्ण सहकार्य होतं. कारण युद्धात जर्मनीविरुद्ध ब्रिटन-फ्रान्स अशी युतीच होती. या कार्यात, गॉलनेही जोन ऑफ आर्कची स्मृती जागृत करून लाभ घेण्याचा प्रयत्न केला, अर्थात हे स्वाभाविकही होते. जोनप्रमाणेच जर्मन शत्रूंविरुद्ध लढा, अशी प्रेरणा तो पराभूत फ्रेंच जनतेत निर्माण करत होता. पण, चक्क मार्शल पेतॉंच्या व्हिशी सरकारनेदेखील जोन ऑफ आर्कच्या कथेला उजाळा दयायला सुरुवात केली. त्यांनी या इंग्रजांना आपल्या फ्रान्सच्या पवित्र भूमितून हाकलून द्या, हे जोनचे शब्द अक्षरशः वापरून लोकांना वेड्यात काढण्याचा खटाटोप करून बघितला अर्थात, फ्रेंच जनतेने जोन ऑफ आर्कपासून प्रेरणा घेऊन जर्मनांना हुसकावून लावलं आणि जनरल आयसेनहॉवरच्या मुक्तिदात्या अँग्लो-अमेरिकन सैन्याचं स्वागत केलं. इतिहासामध्ये जगभरात होऊन गेलेल्या रणरागीणींची नोंद घेताना जोन ऑफ आर्कचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले आहे. तिचे देवदेवतांबद्दलचे दावे जरी आपण कपोलकल्पित मानले तरी तिच्या वयाची मर्यादा, स्त्रीत्वाची बंधने अन तिने तलवारीच्या जोरावर केलेला पराक्रम यावरून तिची महती पटते. तिच्यावरचे पुस्तक वाचायला मिळाले नाही तर अलीकडेच येऊन गेलेला `द मेसेंजर: द स्टोरी ऑफ जोन ऑफ आर्क' हा प्रेक्षणीय चित्रपट जरी बघितला तरी तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अन शौर्याचा थोडासा अंदाज नक्की येतो, जो आपल्याला संघर्षाची नवी प्रेरणा देऊन जातो.

- समीर गायकवाड.

ब्लॉगपत्ता ..
http://sameerbapu.blogspot.in/2016/01/blog-post_5.html

( छायचित्रे - विकीपिडिया आणि `द मेसेंजर: द स्टोरी ऑफ जोन ऑफ आर्क' चित्रपटातून साभार,
संदर्भ - 'मध्ययुगातील रानटीपणा' - साने गुरुजी, 'चेंज ईन व्हॅटिकन' - तरुण विजय, 'जोन ऑफ आर्क - फॅक्ट अँड समरी' - हिस्टरी वर्कशॉप )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती विविध विषयांवर लिहित असता तुम्ही... आणि तेही अगदी सहजतेने, रोचकपणे मांडता इथे...

हा लेखही खूप आवडला...

जोन ऑफ आर्क ची गोष्ट आधी संक्षिप्त रूपात वाचली होती. हा लेख पण आवडला. हे युरोपियन लोक मग अंधश्रद्धेतून बाहेर कसे आणि कधी पडले? याविषयी कोणतं पुस्तक असल्यास प्लीज सांगा.