सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 7

Submitted by Suyog Shilwant on 6 July, 2016 - 19:27

चॅप्टर तिसरा

"आश्रमाची ओळख "

सकाळ चांगलीच उजाडलेली आठ वाजत आलेले. आश्रमाच्या आत गेल्यावर सुर्याचे ऊन दाराशी उभ्या चैतन्य आणि त्रिनेत्रींवर पडत होते. सुयुध्दने पहिल्यांदाच आश्रम पाहिला समोर एक लांब कच्चा रस्ता दिसला ज्याच्या दोन्ही बाजुला झाडे लावलेली होती. तो रस्ता दुरवर एका छोट्या टेकडीकडे जात होता ज्यावर एक मंदिर दिसलं. त्याच्या मागे आजुबाजुला डोंगराच्या रांगा पसरलेल्या आश्रम डोंगराच्या मधोमध वसलेला. स्वच्छ गार हवा त्याच्या अंगाला स्पर्श करुन जात होती. एक छान सुगंध आश्रमाच्या हवेत पसरलेला. रस्त्याच्या उजवीकडे बघता त्याच्यापासुन ते टेकडीपर्यंत खुप मोठं हिरवळीने आच्छादलेलं मैदान दिसलं ज्यावर दाटीवाटीने मुलं युध्दकला शिकत होती. त्यापलिकडे मैदानाच्या एका कोपऱ्यात त्याला दोन खुप मोठ्या इमारती दिसल्या ज्यामधुन काही मुलं बाहेर येत होती.

त्याचे लक्ष जवळच उभ्या दोन जणांनकडे गेले. एक बाई व एक माणुस बोलत उभे होते. ह्या सगळ्यांना आश्रमाच्या आत प्रवेश करताना बघुन ते दोघे आता यांच्या दिशेने येऊ लागले. त्या दोघांच्या मागे सुयुध्दला मैदानात काही मुलं हातात काठी घेऊन लढताना दिसली. त्यांच्या बाजुलाच एक उंच धिप्पाड माणुस त्या मुलांना लढत असताना काही सांगत होता. ते पाहुन सुयुध्दला ही हे सर्व शिकायची इच्छा झाली.

त्याच्या डाव्या बाजुला कुणी ठाकठोक करत असल्याचा आवाज आला तसं त्याने मान डावीकडे वळवली. तिकडे काही अंतरावर त्याला रांगेत पाच सहा घरं दिसली ज्याच्या समोर काही माणसं औजारं घेऊन ठाकठोक करत होती. घराच्या कोपऱ्याशी तीन जण बोलत उभे होते. सुयुध्दने त्यांच्याकडे पाहीलं तसे तिघे आपलं बोलणं थांबवुन ह्याच्या दिशेने येऊ लागले. त्या तिघांमधे दोन पुरुष व एक बाई होती. एव्हाना उजव्या बाजुने येणारी दोघं त्यांच्या बाजुला येऊन ही उभे राहिलेले. चैतन्य त्यातल्या माणसाकडे पाहुन बोलला.

' अजिंक्य दादा ...गुरु कुठे आहेत? काया वहिनींना दुखापत झाली आहे. त्या बेशुध्द आहेत त्यांना उपचाराची गरज आहे.'

सुयुध्दने जवळ आलेल्या त्या माणसाला निरखुन पाहिलं तर तो थोडासा चैतन्य सारखा दिसला. गंभीर चेहरा करत त्या माणसाने कायाला पाहिले.

कायाला हातात उचलुन घेतलेल्या चिरंतरला पाहुन त्यांना कल्पना आलीच असावी. तसं अजिंक्यने जवळ उभ्या दोन तरुण शिष्यांना मदतीसाठी बोलावले.

' सुनिल, संजय इकडे या. जा लवकर. वैद्यगृहातुन रुग्णशिबिका (स्ट्रेचर) घेऊन या. '

हे ऐकताच दोघे पटकन वैद्यगृहाकडे निघुन गेले. उजव्या बाजुला असलेल्या वैद्यगृहातुन थोड्यावेळाने ते दोघे शिष्य रुग्नशिबिका घेऊन त्रिनेत्रींजवळ आले. कायाला रुग्नशिबिकेवर ठेवुन चिरंतर म्हणाला.

" चैतन्य कायाला सर्वात पहिले गुरुंकडे घेऊन जाऊ. "

' गुरु तुम्हाला ध्यानकक्षात भेटतील. ते तुमचीच वाट बघत आहेत. ' अजिंक्य टेकडीजवळील एका घराकडे बोट करत म्हणाला.

चैतन्यने आणि इतरांनी सहमती दर्शवली. त्यांच्या जवळ आलेले ते सर्वजण परत आपाआपल्या कामी निघुन गेले. तसं चैतन्य आणि बाकिच्यांनी टेकडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर चालायला सुरुवात केली. चालता चालता सुयुध्द आजुबाजुला पाहु लागला. डावीकडे घरांच्या मागे त्याला हिरवी गार शेतं दिसली ज्यात काही माणसं कामं करत होती. शेताच्या पलिकडे एक विहिर होती. ज्याच्या बाजुला असलेल्या हौदात गुरं पाणी पिताना दिसली.

पुढे चालता चालता त्याने आपली मान उजवीकडून येणाऱ्या तलवारीच्या आवाजाकडे फिरवली. काही तरुण दोन दोनचा गट करुन एकमेकांशी लढत होते. त्यांच्या आजुबाजुला मुलांनी चांगलाच घोळका केला होता. मैदान मुलांनी भरलेलं. त्यांच्या बाजुला उभा उंच धिप्पाड माणुस त्यांना कस लढावं हे शिकवत होता. त्या लढणाऱ्या मुलांना सुयुध्द आता लक्ष देऊन बघु लागला. त्याला हळुहळु कळु लागलेलं कि इथलं वातावरण कसं त्याला आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे वाटत होतं. हा आश्रम फक्त साधकांसाठी नाही तर दानव, दैत्यांशी लढणाऱ्या योध्दांचा सुध्दा आहे. त्या मुलांना युध्दकला शिकताना बघत तो इतक हरपुन गेलेला कि तो कधी रस्त्याच्या कडेला येऊन थांबला त्यालाच कळालं नाही. मुलांना असं लढताना पाहुन तो थक्क झालेला. त्याच्या सोबत चालणारे घरातले सर्व पुढे निघुन गेलेले. आज्जीने पाहिले कि सुयुध्द मागेच थांबला आहे. तशी ती बोलली.

' सुयुध्द बाळा मागे का थांबला आहेस. आपल्याला पुढे जायचे आहे…चल..'

आज्जीचे ऐकुन सुयुध्द जागेवरुन हलला आणि पळत पुन्हा त्यांच्या सोबत चालु लागला. आजोबा आणि चिरंतर आपल्या काठीने रस्त्याचा अंदाज घेत चालत होते. पुढे चैतन्य लगबगीने गुरुंच्या घराकडे निघालेला. कायाला रुग्नशिबिकेवर घेऊन दोघे शिष्य हळुहळु इतरां सोबत चाललेले. एवढ्यात सुयुध्दने आज्जीला विचारले.

' आज्जी मम्मी बरी होईल ना गं. '

आज्जी नातवाच्या ह्या प्रश्नाने थोडी बिथरली. तिला माहीत होत कि त्याला कायाची खुप काळजी वाटत होती. पण तिला मात्र कायापेक्षा त्याचीच जास्त काळजी वाटू लागलेली. आश्रमात पोहचुन सुध्दा सुयुध्द सर्व शिकायला तयार होईल का? ह्या प्रश्नाने तिला पछाडलेले. तिच्या मते तो अजुन लहान होता. एवढ्या लवकर त्याच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवनं तिला पटत नव्हते. आज्जी काहीच बोलत नाही हे पाहुन त्याने तिला पुन्हा एकदा विचारले.

'आज्जी.. बोल ना… मम्मी बरी होईल ना. '

सुयुध्दने तिला पुन्हा एकदा विचारता ती विचारतुन बाहेर आली व सुयुध्दला जवळ घेत म्हणाली.

' आपण आलोय ना आश्रमात. कायाला काही नाही होणार. बरी होईल ती.'

आज्जीच्या उत्तराने सुयुध्दला जरा धीर आला. चालता चालता त्यांनी बरच अंतर कापलं होत. पण सुयुध्दला मैदानातली मुलं आता आपल्या कडेच पाहत आहेत अस जाणवलं. तसं त्याने त्यांच्याकडे लक्ष वळवलं. सर्व मुलं त्याला पाहुन कुजबुजत होती. सर्वजण आपल्याला का पाहत आहेत असा प्रश्न सुयुध्दला पडला. त्याच्या नजरेने एक वेगळाच फरक पाहिला तो म्हणजे मैदानात उभ्या सगळ्या मुलांनी टि शर्ट घातलेले जे वेगवेगळ्या रंगाचे होते. कुणाचे लाल तर कुणाचे निळे अगदीच कुठेतरी पिवळे आणि हिरवे सुध्दा होते. आश्रम पुरातन असुन सुध्दा त्यांच्या पेहरावा मुळे आधुनिक काळाशी मिळतं जुळतं घेणारा वाटला कारण त्या मुलांनी टि शर्ट घातले होते. टि शर्ट वर एका बाजुला कसलीशी चिन्ह ही त्याला दिसली. ती चिन्ह काय असावी असं त्याला वाटलं. पण ते जाणून घेण्या आधी त्याला गुरुंना भेटायची जास्त उत्सुकता होती. आपल्या आज्जी, बाबा व पप्पांच्या तोंडुन त्याने त्यांच्या बद्दल ऐकलं होतं. ते त्याच्या मम्मीला बरं करणार होते म्हणुनच सुयुध्दला पहिले त्यांना भेटायचे होते.

रस्त्याने पुढे जाताना त्याला काही मुलं ध्यान लावुन एका चारीबाजुंनी उघड्या गोल छता खाली बसलेली दिसली.
ध्यान लावुन ताठ बसलेल्या सर्व मुलांनी पिवळे टि शर्ट घातलेले. त्यांच्या पुढ्यात मगाशी आश्रमाच्या दाराजवळ दिसलेला एक जण उभा राहुन सर्व मुलांकडे निट लक्ष देऊन पाहत होता. धोतर नेसलेला, जाणवं घातलेला उघड्या अंगाने तो एखाद्या भटाप्रमाणे दिसत होता. नक्कीच तो त्या मुलांचा शिक्षक असावा असे सुयुध्दला वाटले.

त्याला पाहुन झाल्यावर सुयुध्दने आपली नजर डावीकडे वळवली. तिकडे शेतांच्या पलिकडे टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव दिसला. दोन चार जणं त्या तलावातुन पाण्याची कावड भरत होते. बराच वेळ चालून ते टेकडीच्या अगदी जवळ पोहचलेले. उजव्या बाजुला एक रस्ता टेकडीजवळील घराकडे जात होता. वळणावर पोहचुन ते उजवीकडे वळले. सुयुध्दने आजोबा व पप्पांच्या मधे जाऊन त्यांचा हात पकडून दोघांना उजवीकडे वळवले. अभिनव आजोबा व चिरंतर वळून घराच्या दिशेने चालू लागले.

सुयुध्दने चालत चालत आपल्या आजोबांच्या चेहऱ्याकडे पाहिले.. रात्री त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेली चिंता आता गायब झालेली. बाजुला चालत असलेले त्याचे पप्पा मात्र अजुन शोकाकुल चेहरा करुन काळजीत दिसले. मम्मीला झालेल्या दुखापती मुळे ते अस्वस्थ वाटले.
सुयुध्दने आजोबांना विचारुन आपली शंका दुर करण्याचे ठरवले. आजोबांचा हात पकडून तो बोलला.

' बाबा आपण आजपासुन इथेच राहणार का?'

आजोबा जे विचारात हरवलेले आपल्या नातवाच्या प्रश्नाने विचारातुन बाहेर आले आणि म्हणाले.

' हो बाळा. आपण आजपासुन इथेच राहणार आहोत. इथे राहुन तुला वेगवेगळया विद्द्या प्राप्त करता येतील. युध्दकलेचं चांगल प्रशिक्षण घेता येईल. आम्हीही अशाच आश्रमात प्रशिक्षण घेतलं होतं.'

'म्हणजे मला ही पप्पा आणि चैतन्य काकांसारख लढता येईल.'

' हो नक्कीच लढता येईल. तुला भेटायला गुरु विश्वेश्वर आपल्या घरी येणार होते कारण त्यांना तुझ्याशी बोलायचे आहे.' एवढ बोलून आजोबा थांबले. थोडासा विचार करुन ते पुन्हा बोलले.
' तुला इथे गुरुंशी भेटून सर्व काही लवकरच कळेल.'

सर्वजण टेकडीजवळील त्या घरापाशी येऊन थांबले. शिष्यांनी कायाला घरात नेले. चैतन्य व चिरंतर दोघे ही त्यांच्या मागोमाग आत शिरले. आजोबा आज्जी व सुयुध्द मात्र बाहेरच थांबलेले. सुयुध्दने त्या घराकडे निट पाहिले. लाकडी वास्याचे ते घर विस फुट उंच होते. त्याच्या आजुबाजुला छोटी छोटी झुडपं होती. घराचे दार प्रशस्त होते. दोन्ही बाजुला उघडणारे मोठे दरवाजे त्याला दिसले. लाकडी दाराला चांदीचे आकर्षक नक्षीकाम केलेले. दाराची चौकट जवळ जवळ दोन फुट रुंदीची होती. सुयुध्दच्या मनात विचार आला की, नक्कीच गुरु विश्वेश्वर इथे राहत असावेत. तेवढ्यात चैतन्य आतुन बाहेर आला आणि त्यांना इशाऱ्यानेच आत बोलावले.
सुयुध्द आजोबांचा हात पकडून त्यांना पायऱ्या चढवत आत घेऊन गेला. आज्जी त्यांच्या मागेच होती. सुयुध्दने आजोबांना आत नेऊन एका खुर्चीत बसवले. चैतन्य कडे पाहत सुयुध्द म्हंटला.

' मम्मी कुठे आहे? '

चैतन्य चेहऱ्यावर एकही भाव न येऊ देत म्हणाला.
' तुझी आई आत आहे. चला गुरुंनी तुम्हाला सर्वांना आत बोलावलं आहे. '

हे ऐकताच खुर्चीत बसलेले अभिनव आजोबा व आज्जी उठले. सुयुध्द व आज्जी आजोबा चैतन्यच्या मागे चालू लागले. जवळच असलेल्या एका खोलीत ते शिरले. आत शिरल्यावर सुयुध्दने समोर पाहिलं तर गुरु एका आसनावर डोळे मिटून ध्यान मुद्रेत पद्मासन घालुन बसलेले. पोटापर्यंत येईल एवढी दाढी, वर केसांचा बुचडा बांधलेला, माथ्यावर रक्त चंदनाचा लेप लावलेला ज्यावर व्ही आकाराचा सफेद नाम ओढेलेला दिसत होता. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या, अंगात सफेद पंचा होता. खांद्यावर आणि हातांवर तिन बोटांचा सफेद लेप ओढलेला. वयाने ते आजोबांपेक्षाही जास्त दिसत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होता. सुयुध्द एकटक त्यांच्याकडे बघतच राहीला.

कायाला त्यांच्या आसना समोर नेऊन ठेवलं होतं. चिरंतर आणि चैतन्य खोलीत उजव्या बाजुला उभे होते. सुयुध्द व आजोबा एकत्र चालत गुरुंच्या समोर जाऊन उभे राहिले. तसे चैतन्य ने सुयुध्द कडे पाहिले व त्याला डाव्या बाजुला सरकण्याचा इशारा केला. एवढ्यात गुरुंनी डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात एक तेज दिसत होता. त्यांनी समोर उभ्या सर्वांकडे पाहिले आणि सुयुध्दवर येऊन आपली नजर थांबवली. गुरु आपल्याकडेच पाहत आहेत हे पाहुन सुयुध्दही त्यांच्या नजरेत नजर मिळवुन पाहू लागला. तसं गुरुंनी दोन क्षण त्याच्याकडे पाहत एक स्मित हास्य केले. सुयुध्द मात्र हसला नाही. का जाणे पण त्याला तो चेहरा ओळखीचा वाटत होता. आज पहिल्यांदाच कुणाला पाहुन त्याला असं वाटलेलं. गुरुंनी खाली झोपवलेल्या कायाला पाहिलं व चैतन्यला बोलले.

' चैतन्य माझा कमंडलू इथे आण.'
चैतन्य आज्ञाधारक पणे जागेवरुन हलला आणि गुरुंच्या डाव्याबाजुला ठेवलेला कमंडलू उचलून त्यांच्या हातात दिला.
गुरुंनी कमंडलू मधलं पाणी हाताच्या ओंजळीत घेतलं आणि डोळे मिटून मंत्र म्हणू लागले.

" ॐ हौं जूं सः। ॐ भूः भुवः स्वः ॐ त्रयम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।

 उव्र्वारूकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्।। ॐ स्वः भुवः भूः ॐ। ॐ सः जूं हौं। "

तीन वेळा जप करुन ओंजळीतलं पाणी त्यांनी कायाच्या तोंडावर शिंपडलं. काया हळुहळु आपले डोळे उघडु लागली. तिला डोळे उघडताना पाहुन सुयुध्द आपल्या आईजवळ खाली बसला. त्याने तिचा हात धरला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. काया पटकन त्याला बिलगली आणि रडयला लागली. तिला रडताना बघुन अचंबित झालेली आज्जी तिच्या जवळ गेली आणि म्हणाली.

' बघ सुयुध्द तुझी मम्मी एकदम ठिक आहे. गुरुंनी तिला बरं केलं. '

एवढ म्हणुन ती उठली आणि गुरु विश्वेश्वरांना नमस्कार केला. बाजुला उभा चिरंतर आता निश्चिंत झाला. कायाला शुध्दीवर आलेले जाणुन त्याला आनंद झाला.

गुरुंनी चैतन्यला जवळ बोलावलं व म्हणाले.

' मला अभिनव व चिरंतरशी बोलायचे आहे. तु बाकिच्यांना बाहेर जायला सांग.'

गुरुंचे बोलणे ऐकुन चैतन्य म्हणाला.
' आज्जी तुम्ही, वहिनी आणि सुयुध्द आता बाहेर थांबा. गुरुंना आजोबा आणि चिरंतरशी महत्वाचे बोलायचे आहे.'

त्याने तिघांनाही बाहेर जायला सांगितले. काया उठली सुयुध्द आणि तिने गुरुंना नमस्कार केला. ते तिघे बाहेर निघाले. बाहेर निघुन ते माजघरात येऊन बसले. सुयुध्दला फारच बरं वाटलं तिला पुन्हा ठिक झालेलं बघुन. तो जेव्हा कधी आजारी पडायचा तेव्हा ती त्याची खुप काळजी घ्यायची. पण ह्यावेळी दुदैवाने उलटं झालं होतं. ती अशी जखमी झाल्यानंतर त्याला कळालं कि त्याला आपल्या आईची किती गरज आहे. आता ती पुर्ण बरी झालेली. पुर्वी सारखीच चालत होती बोलत होती. तिला पाहतच त्याने कायाला घट्ट मिठी मारली व बोलला.

' मम्मी…. मी खुप घाबरलो होतो तुला जखमी झालेलं पाहुन. तुला काही झालं तर माझ्यावर प्रेम कोण करणार. मी परत तुला काहीच होऊ देणार नाही.'

काया त्याला बोलली.
' वेडोबा कुठला...मी आहे ना तुझ्यापाशी. बघ मला काहीच झालं नाहीए.'

सुयुध्दला आपल्या आईच्या मिठीत येऊन खुप आनंद झाला होता. त्याला आता आणखिन कशाचीच गरज नव्हती. पण नशिबाने त्याच्या आयुष्यात पुढे काय लिहलेलं ते अजुन त्याला माहीत नव्हत.

क्रमशः

भाग आठवा लवकरच….

________________________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद टीना...पण ह्या विषयावर जागतिक दर्जा असलेले फिक्शन मधे लिखाण आधीच खुप आहे. फक्त मराठी कादंबऱ्यांमध्ये असे काही दिसुन येत नाही. म्हणुन हि कथा मला उपजली. अशा कथा फारच रंजक असल्यामुळे मनाला भावतात. त्यात माझ्यातर्फे अशाच एका गोष्टीची भर. अर्थात ती तुम्हा वाचकांना किती आवडते ही धाकधुक लागुनच असते माझ्यासारख्या लेखकाला.