रात्रभर!

Submitted by मुग्धमानसी on 5 July, 2016 - 02:10

आठवत राहिलास... रात्रभर!
टिचभर चांदण्याच्या मुठभर प्रकाशात,
आकाशभर रात्र... कणकण जळत-उजळत राहिली.
मनभर उगवलेले तुझ्या आठवांचे चंद्र....
तेजाळलास, उजळलास, स्नेहाळलास...
माझ्या आत आत दिव्यावरच्या काचेसारखा काजळलास...
मावळला मात्र नाहीस!
उधळत राहिलास.... रात्रभर!

तशी तुझी एकही खूण नाही माझ्याजवळ.
अंगावरले व्रणही पुसट होत होत नाहिसे झालेले.
तु घुसळलेले माझे केस... त्यानंतर कितीकदा पुन्हा पुन्हा बांधलेले.
तरिही तिथे उमटलेल्या तुझ्या ठशांनी...
झुळुकीच्या निमित्तानं अंगभर लगटणार्‍या तुझ्या श्वासांनी...
साधे पुस्तकाचे पान पलटतानाही झालेल्या आवाजानी...
असे वाटते तूच कुजबुजलास काहीतरी. कानाशी.
माझं अदृष्य इंद्रिय बनत चाललेल्या या तुझ्या भासांनी...
भेटत राहिलास... रात्रभर!

तुझ्या-माझ्या-आपल्या क्षणांच्या झिरझिरीत रेशमी रंगित तुकड्यांची...
रात्र विणत राहते एक गोधडी!
उबेसाठी तिच्या आत आपल्या एकरूप वेदनेचं अस्तर!
थोडी भूक... थोडी तहान... न भागलेली.
आणि वणवणलेल्या जीवांना एक हक्काचा दिलासा!
भोगायचा राहून गेलेला एक अनाथ आनंद!
काही जोपासायचे राहिलेले हसण्याचे... जगण्याचे छंद!
उशाशी साचत राहिले काही झेललेले... काही जपलेले बंध!
सगळंच रेशमी... सुंदर... शिवत उसवत राहिली रात्र...!
आणि तू...
जागत राहिलास... रात्रभर!

मातीवर ताठ उभी... दोन डेरेदार हिरवी झाडं!
आपापल्या रानात एकाकी... अबोल...
कुणाला सावली, कुणाला आसरा, कुणाला आधार...
घनदाट स्वप्न... ना रंग ना आकार...!
जमिनीच्या खोल खालून त्यांची मुळं गुंतून जावीत एकमेकांत...
आणि ओळखूही न यावं एकाला दुसर्‍याशिवायचं आपलं असणं... किंवा नसणं...
तसं आपलं नातं! अदृष्य़... जमिनीच्या खोल खाली...
असाच माझ्याही नकळत तू... मला समजत गेलास.
बोलत राहिलास... रात्रभर!

आता...
आपली एकमेकांना देण्याची राहून गेलेली काही उत्तरं...
करून घ्यायचे राहिलेले काही लाड... पुरवुन घ्यायचे राहिलेले काही हट्ट...
तुझ्या खांद्यावर शिंपडायचं राहून गेलेलं काही क्षणांचं अत्तर
द्यायचे राहून गेलेले काही निरोप...
अर्धवट बिलगून चुरचुरणारे काही स्पर्श...
आणि... थोडंसं निभवायचं राहून गेलेलं एक अर्धमुर्ध नितांत सुंदर नातं...
अशाच कच्च्या ओल्या भिजर्‍या आठवणींतून...
मनाच्या खोल साठवणींतून...
आठवत राहतोस... साठत राहतोस... रात्रभर!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

!!!!!

खूपच सुंदर लिहिलंय।।।।मस्तच।।।
>>जमिनीच्या खोल खालून त्यांची मुळं गुंतून जावीत एकमेकांत...
आणि ओळखूही न यावं एकाला दुसर्‍याशिवायचं आपलं असणं... किंवा नसणं...
पुर्ण कविताच अप्रतिम आहे ।।।पण ह्या ओळी खूप आवडल्या।।।वाह।।।अप्रतिम।।।