भिंतीवरची ओल…!

Submitted by Charudutt Ramti... on 1 July, 2016 - 08:02

भिंतीवरची ओल ही एक राष्ट्रीय समस्या आहे.

फ्लॅट बूकिंगचा चेक बिल्डर कडे देताना दोन्ही गालाच्या आणि टाळूच्या मधल्या पोकळी मधे तोंडात मावतो त्यापेक्षा कितीतरी जास्त बाबा जरदा, केसर पानपराग किंवा मघई पान भरलेले हे गुज्जूभाई बिल्डर - “क्वालिटी मद्दी एकदम चिंता नाय करायची. आपला काम आहे ना एकदम च्यायनाच्या भिंती सारका मजबूत ( मजबूत मधला 'ज' - जाम मधला, जहाजातला नाही ) आपला काम असा आहे ना की, तुम्ही सांगत गेला पाहिजे आणि पुढचा कस्टमर विचारात आला पायजे...गोपाल भाईचा बिल्डींग कुठला ? काय ? समजला की नई...द्या मॅडम चेक, उजव्या हतानि द्या..."

पझेशन घेतलं आणि पहिल्याच पावसाळ्यात भिंतीवरुन ओल पसरली. तेंव्हा गोपालभाई ना भेटायला गेलो, 'ओल' येतेय सांगायला, तर गोपाल भाई नि एकदम ओलिंपिक मधे चाइनिज मुली मारतात तशी कोलांटी उडी मारत...

"सर, तेचा काय आहे, भिंती वरच्चा 'ओल' असतो ना तेच्या बदद्ल जगात कुन्निच गेरॅंटी देऊ नाय शकत. तो काय असतो, तो वीट असतो ना तो एकदम सच्चिद्र असतो. पोरस! ते गादी मद्ला स्पंज असतो ना तसा एकदम पोरस. खमण धोकळा असतो तसा. तो वीट पाणी खेच्तो. मग ओल येते. हे बगा माझ्या बी ओफीस मन्दि सेम प्रॉब्लेम हाय.” उजवीकडच्या बाजूला छता कडे मधल बोट दाखवत गोपाल भाई बोलले.

जनरली बोट दाखवताना सगळे जण अनामिकेने दाखवतात, पण गोपाल भाई, ओल दाखवताना मधल्या बोटाने दाखवत होते. काय विचित्र सवय. अंगुली निदर्शन करताना बोटांमधे विविध प्रकारच्या खड्यान्च्या अंगठया चमकून गेल्या. पूष्कराज पासून ते माणिक पर्यंत आणि पाचू पासून ते प्रवाळा पर्यंत. पुराणात देवादिकांना समुद्र मंथनात जी जी काही रत्न सापडली असतील त्यातली बहुतेक सगळी गोपाल भाई अंगावर लेऊनच धंदा करत होते. खरतर गोपालभाई स्वत:च एक रत्न होत. 'अमृत' तर त्यांच्या वाणी मधून पाझरतच होत.

"पण गोपाल भाई हे तर ए. सी. च पाणी गळतय असं वाटतय." … मी माझ्या परीने गोपाळभाईन्ना माझं या क्षेत्रातील द्न्यान तस बरं आहे हे समाजाव म्हणून आर्ग्युमेंट गेल.

"तेच तर सांगतोय साहेब तुमाला...हा 'एलजी' चा चव्वेचाळीस हजाराचा एसी हाय. आता एल्जी एवडी ग्लोबल कंपनी हाय. त्याना एवढ्याश्या एसी चा लीकेज थांबवता येत नाय. आपली तर एकदम छोटी कंपनी हाय. एवढी मोठी बिल्डींग मधे एक दोन लीकेज व्हायचाच. उलट थोडा तुमच्या स्लॅब ला जास्त पाणी मिळेल आणि एकदम मजबूत होईल...पण तूमी काय बी टेन्षन नका घेऊ...मी उद्या माणूस पाठवतो. तो जाईल पाहून. आणि तसा बी यंदा बारिश सरासरी पेक्षा कमीच हाय...तुमि पेपर बिपर मन्दि वाचले असेल ना...अरे बहादूsड...साहेबला च्या दे...चला, जय श्री क्रिष्ण , भेटत जा आदी मदी...काम तर काय चालूच असते..." रिमोट-चावी ने गोपालभाई ने त्याच्या डाळिंबी रंगाच्या स्कोडा-सुपर्ब चे लॉक उघडले आणि तोंड पसरून हसत निघून गेला.

पुढे दोन रविवार झाले तरी गोपालभाई ने पाठवलेला माणूस काही आला नाही. गोपालभाई ला फोन करायचे प्रयत्न केले तेंव्हा गोपालभाई थायलंडला सुट्टी साठी गेलाय अस समजल. माझ्या इथे एवढी प्रचंड ओल आलीय आणि आमचा बिल्डर मात्र तिकडे थायलंडला ओल्या पार्ट्या झाडतोय.

गोपालभाई च्या नादी लागून काही हशील होणार नाही, म्हणून मी तावा तावा ने सोसायटी ऑफीस मधे कंप्लेंट करायला गेलो. सोसायटी च्या ऑफीस मधे 'सुरेश बुरले' आमच्या सोसायटी ऑफीस मधला क्लार्क कम स्वय्मघोषित आर. आर. सी. कन्सल्टेंट 'दै. पुढारी’ वाचत बसला होता. सुब्रमण्यम स्वामींना जसं देशातल्या सगळ्या गोष्टी मधे द्न्यान अस्तं, तसं बुरले ला आमच्या सोसायटीतल्या सगळ्या गोष्टींमधे गती आणि रस दोन्हीही आहे.

ओला कचरा सुका कचरा, रेन वॉटर हारवेस्टिंग, सिवेज वॉटर रिसाइकलिंग, गांडूळ खत प्रकल्प, इत्यादी पासून ते नवीन घोशीत झालेले एफ.एस.आय, टी.डि.आर. चे नियम, कोणती नवीन गावे महापालिकेत यावर्षी समाविष्ट होणार, सोसायटीच्या पलीकडच्या प्लॉट वर 'रिझरवेशण' पडणार…अश्या सगळ्या खबरी चोमड्याला कुठून लागतात काय माहिती. पहाटे लोकांच्या गाड्या पुसणार्या पोरांच्या पासून ते कोण- कोणत्या बायका क्लब मधे जाऊन उशिरा रात्री परत येतात त्या सगळ्यांची लफडी याच्या कडे उपलब्ध. कॉमन पॅसेज झाडायला येणार्या झाडूवाल्या आणि दुपारी घरोघरी धुणीभांडी करायला येणार्या बायकांवर तर ह्याने सहज शोधनिबंध लिहिला असता. त्यांच चारित्र्य, त्यांचे वैवाहिक आणि विवाहबाह्य संबंध, त्यांची मनोशारिरिक विश्लेशणे हे बुरलेचे विशेष अभ्यासाचे विषय.

'साहेब...मायक्रोमॅक्स चा नवीन फोन पायला का? झिटा फोर ? '....मला पाहता पाहताच बुरलेला त्याचं इलेक्ट्रॉनिक्स जगतातलं अगाध द्न्यान माझ्या पुढे विशद करण्याचा मोह आवरता आला नाही.

" बुरले...आपल्या सोसायटीच कंप्लेंट बुक दे लवकर"....मी

" का ओ साहेब, काय झाल? आज लै गरम ? " बुरले चा फाजील सवाल.

" अरे गरम काय गरम ? पहिल्याच पावसात सगळी भिंत ओली झालीय...आणि बेडरूम मधली ओल आता पसरत पसरत किचन आणि हॉल मधे यायच्या मार्गी आहे. तो हारामी गोपाळ शेठ तिकडे थायलंड ला..."

" साहेब...गोपाळ शेठचा काही दोष नई ह्यामधे..." बुरले मधे मुरलेला आर. सी. सी. कन्सल्टेंट जागा झाला.

" अरे गोपाळ शेठ चा दोष नाही म्हणजे. ? बिल्डींग कुणी बांधली ? गोपाळ शेठ नेच ना ? मग दोष काय आमचा राहणार्यांचा ?”

" साहेब...तस नाई...मला एक सांगा गेल्या महिन्यात एवढा अवकाळी पाऊस पडला. पण तुमच्या घरात ओल आली का ? नाही !. …का नाई आली ?"

" अरे तो प्रिमोन्सून होता..आता मान्सून सुरू झालाय..."

साहेब...भिंतीना आणि विटांना काय समज्त्य व्ह्य तुमच्या त्या प्रीमान्सून ला गळायच नाय आणि मान्सून ला गळायच...काय सायब...तुमी शिकलेली मान्स अस बोलायला लागल्यावर आवग्ड झाल की मग."

" बुरले...स्पष्ट बोल,काय ते "...मला माझी बोलण्यात झालेली चुक लपवायला, बुरलेवर थोड साहेबी आवाजात डाफरण्या शिवाय पर्याय नव्हता.

माझ्या डाफरण्याचा त्या बुरल्यावर परिणाम शून्य.

" साहेब, गाय छाप काडा...सांगतो " मी अपरिहार्य पणे, बुरलेच्या हातात, गाय छाप ची पुडी सोपवली.

" साहेब मला एक सांगा...तुमच्या वर एक मजला सोडून आणखी वर कोण रहातं ? "

" वेळनेकर " … मी.

" का s रे क्ट " .... बुरले

" कधी आले राहायला वर..." ... बुरलेचा लगेचच पुढचा प्रश्न.

" चार पाच आठवडे झाले असतील..." … मी.

" का s रे क्ट " .... बुरले

" हेच्या आदी त्ये कूट व्होते ? " … बुरले.

" दुबईला " .. मी

" का s रे क्ट " .... बुरले

दोन पाच मिनिटा नंतर बुरले पोलिससब इनस्पेक्टर आणि मी गुन्हेगार असावा तसा बुरले मला प्रश्न विचारत होता आणि मी अद्न्या धारक पणे उलट तपासणी ची उत्तर देत होतो.

" ए बुरले...पटकन सांग, तुला काय सांगायच ते. " मी जरा बुरलेचा रीधम तोडला.

" त्याच काय आहे साहेब. डी - ७०२ मधले भाडे करू गेले सोडून. अकरा महिन्याचा करार संपला. आणि वेलणेकर स्वत: राहायला आले की नई दुबई वरुन परत आल्यावर. राह्याला यायच्या आधी तीन आठवडे इंटेरर केल ना. लै तोड फोड केली राव. माश्टर बेडरूम च्या खिडक्या मोठ्या केल्या. सगळा फ्लॅट 'वास्तू' प्रमाण चेंज केला. बातरूम च्या फारश्या फोडून टब बसवला. त्यांच्या आई साठी बेडरूम मधे तिसरा कमोड बसवला....आता एवड सगळ करताना एखादी पाइप बिप फूटल नाही तर काय हुईल ?. त्यांनी इँटेरेर केल आणि सगळ प्राब्लेम सुरू झाला बगा सायब. "

बुरले बोलत होता तेंव्हा त्याचा उजवा डोळा एखाद्या डिटेक्टिव ने बारीक करावा तसा बारीक होत होता. बुरलेला आपण काहीतरी 'सनसनाटी' निर्माण केलीय याच समाधान होत असल्याच दिसत होत.

मग मी बुरलेच्याच ओळखीचा एक लीकेज काढणारा कनसल्टिंग प्लम्बर गाठला. बुरले कडून नंबर घेतला. आणि फोन केला.

" या रविवारी येणार का लीकेज पाहायला ? " मी

" सर..आपण पन्ध्रा ऑगस्ट पर्यंत बीजी आहे...सप्टेबर ला यू का ? " कनसल्टिंग प्लम्बर.

" अरे सप्टेबर पर्यन्त आक्खि भिंत वाहून जाईल..." मी

" खरय न सर , पण आपण फूल बीजी आहे ना..." कनसल्टिंग प्लम्बर.

काही केल्या कनसल्टिंग प्लंबर अपायंटमेंट साठी तयार होईना.

शेवटी बुरलेनेच मध्यस्थी करून मधला एक रविवार माझ्या साठी काढायचे उपकार करायला ‘कनसल्टिंग प्लम्बर’ भाग पाडले.

नाइलाजाने मग कनसल्टिंग प्लमबर "त्या बाजूला काम आल तर पाच मिनिट येऊन जाईन, ओळम्बा आहे का तुमच्या कडं ?" मला दोन मिनिट समजेचना, प्लमबर तो ? का मी ?

“नाही ओ! माझ्या कडे कुठला असणार ओळम्बा ?" मी उगाचच अपराधी भावनेने बोललो.

“काय राव तुमी, शिकलेली मानस? सादा ओळम्बा पण न्हाई ? " मला चटकन समजेना, शिक्षणाचा आणि ओळम्ब्याचा काय संबंध ?. पण प्लमबरचा आणि तो वेळेवर आला नाही तर होणार्या खोळम्ब्याचा किती घनिष्ट संबंध आहे ते मात्र मला त्यादिवशी चांगेलच समजले.

बुरलेचा चेहरा परत एकदा, माझ्या कडे पाहाताना 'कसे फेडशिल हे माझे पांग' असा झाला होता.

शेवटी दोन रविवार उलटून गेल्यावर कनसल्टिंग प्लमबर आले. रूबाब साधारणपणे गावातला तलाठी करतो तेवढा.

आल्या आल्या सुरुवातच “आपण नाही करत अशी बारीक-सारीक कामं, आता तुमि लैच्च माग लागला म्हणून आलो” अश्या उपकार-वाचक शब्दान्नि.

भिंती वरची ओल पाहाताना मला..."हा लाइट लावा...हा बंद करा....हे दार उघडा...ते बंद करा...." असे आदेश देत होता.

अधून मधून वाकून तळहतानि चाचपून फर्शि बिर्शी गार लागतिय का ते पाहत होता.

"केवढ्याला घेतला फ्लॅट" भिंत चाचपताना विचारले.

मी पटकन त्याच्या प्रश्नाने एकदम अचंबित झालो. त्याने मला प्रश्न समजला किंवा ऐकू आला नसावा अस समजून परत एकदा

" केवड्याला घेतला " असा परत प्रश्न केला. माझं उत्तर देऊन झाल्या वर मग पुढे " कुठल्या बॅंकेच लोन ? "

असे मला टॅक्स कन्सल्टेंट विचारतो तस्ले प्रश्नही विचारत होता. वर आणि ' चांगला बसला की..." वगरे एक्सपर्ट कॉमेंट ही करत होता.

" हे बातरूम वापरता का ? , ह्या वॅशिंग मशीन च ड्रेन कूट सोडलय ? असले तिस एक प्रश्न आणि वीस एक मिनिटांची चाचपणी करून झाल्यावर मग त्याने मला " बिलडेर नि घोळ घातलाय राओ "

" का काय झाल ? "

“ कदि पण ए ना...आदि टाईल बसवून झाल्या का, की मंग गिलावा करायचा...तुमच्या बिलडेर नि ना बारब्बर ए का , उल्ट केलय "

मला आता आब्सोल्यूट्ली समजेना, की दीड वर्षांपूर्वी बसवलेल्या बाथरूम मधल्या टाई ल्स आणि त्याच दरम्यान भिंतींना केलेला गिलावा यापैकी ‘आधी काय केलय?’ आणि “नंतर काय केलय?’ हे ह्या बुरले ने शोधून काढलेल्या ह्या तर्क तीर्थलक्ष्मणशास्त्री ला कस काय समजल?

" पण हे तुम्हाला कस माहिती ? "

" तेच तर आमच्या धंध्याच कसब आहे ना सर "

सोनार, सुतार, लोहार इत्यादी बारा बलुतेदार आणि वेल्डर, फिटर, इलेक्ट्रीशियन, चष्मा दुरुस्त करणारे, मोबाईल दुरुस्त करणारे इत्यादी आधुनिक शा स्त्रद्न्य ह्या कुळातील कोणत्याही जीव प्राण्याला तुम्ही " हे कस ? " असा प्रश्न विचारलात, की त्याच उत्तर " हेच तर आमच्या धंध्याच कसब आहे ना...." आणि त्याच प्रमाणे " साहेब...हे तुम्हाला दुसरा कुणीच करून देणार नाही...मला पण इंटरेष्ट् नाही, पण तुम्ही मागे लागतात म्हणून करतो..." हा तुम्हाला उपकरच्या ओझ्याखाली दबवून टाकणारा मौलिक विचार ओसंडून वाहणारच. एकदा का हा सुविचार त्याच्या तोंडून बाहेर पडला की समजायच...आता तो सांगेल ती मजुरी आपण गुण्या गोविंदाने मान्य करायची! नाही तर, तो हातातला ओळांबा, आरी, स्क्रू ड्राइवर, करवत, गुण्या जे काही असेल ते पिशवित भरून चालता होतो. जाताना..." आपल्याला नाही जमणार, एवढ्याला...कुणी करत असेल तर दुसरा त्याच्या कडून करून घ्या " हे वाक्य ठणकावून जातो.

" काय हे,...ओल ए ना कदि पण...खालून वर येते...आणि पाणी ए ना जागा मिळेल तित घुस्त. कळल का ? आता तुमची बेडरूम ची भिंत ए का, ती बातरूम ला कॉमन ए...टाईल मधे मुरलेल पाणी ए का ते स्लॅप मधे जात आणि....मुळा मधून कस झाडाच्या पाना पर्यन्त पानि जात ना..तस ए ना, हे बातरूम च्या टाईल मधून पानि भिंतीच्या विट्ये मधे जात.” द्यानेश्वरी मधे कश्या उपमा आणि संदर्भ आणि दृष्टांत असतात त्या दर्जाचे दृष्टांत ह्याच्या तोंडून ऐकल्याने मी त्याच्या कडे पाहातच बसलो. त्याला एक टक पाहत बसल्यामुळे त्याला वाटल मला तो काय बोलतोय ते आजिबात झेपत नाही.

"सायब...तुमाला नाय समजायच...तुम्ही फक्त ए ना...तो काय सांगतोय ते ऐकून घ्या मी तूमाला नंतर व्यवस्थित समजावून सांगतो शांतपने. तूमी ए ना फक्त हो म्हणा..." श्रियुत बुरले मधेच पचकले आणि तंबाखुचा एक बार संपवून दुसरा भरायला ते बाहेर गेले.

“तुमि नका टेन्षन घेऊ...मी देतो करून बारा ते पंधरा हजार खर्च येईल...पण लीकेज थाम्ब्ल की नई ते कळायला येळ लागतो ह्या प्रोसेजर मधे...गडबड नाय आजिबात." … प्लमबर

प्लमबर, प्रोसीजर बीसिजर, वगरे बोलायला लागल्यावर मग मी जरा माघारच घेतली.

“ पण ते वेलणेकरांचा फ्लॅट मधल रिवर्क...ते बुरले काही तरी सांगत होते...त्यांनी रिवर्क केल्यापासूनच लीकेज सुरू झालय” मी आपली शंका व्यक्त केली.

" कोण येल्नेकर , ते बी ७०२ वाले...दुबैस्न आले तीन म्हैन्या पुर्वी ते? "

कनसल्टिंग प्लमबर एकदम धबधब्यातल पाणी जोशात वरुन खाली पडत तस बोलला... त्याचा काय संबंध. तो ७०२. तुमचा ५०२. मधि आक्खा एक प्लोर हाय की....आणि त्याच बातरूम मध्ल टब बसवायच काम आपणच केलय की राव...एक नंबर झालय काम. ह्या बुरलेनच तर माझा मोबाईल नंबर दिला की वरच्या येल्नेकरास्नि."

मी चाटच पडलो. हा बुरले ह्या प्लमबर करून कमिशन घेतो की काय...? मी पटकन " ए बुरल्या “ अशी हाक मारायला वळलो, तर बुरले केव्हाच, पसार झाला होता.

तेवढ्यात प्लमबर ला आणखी एक कॉल आला मोबाईल वर...

" नाय ना सर....आजिबात वेळ नाय....पंधरा औगस्ट पर्यंत....फूल हाय "

प्लमबर जायच्या तयारीत होता. मी पटकन बारा तेरा हजार जे काय ठरवता येतील ते ठरवले. आणि काम सुरू करण्याची सुपारी दिली. कारण हा पंधरा औगस्ट वाला गेला तर, दुसरा सहवीस जानेवारीच्या आधी येईल की नाही माहीत नाही.

पहिल्याच पावसात आलेली आमच्या भिंती वरची ओल, स्कोडा मधून फिरणार्या गोपाल शेठ ने कन्स्ट्रक्षन करताना केलेला झोल, आमच्या बुरलेने मला आणि वरच्या वेळेननेकारांना सुचवलेल्या कॉमन कनसल्टिंग प्लमबर चे उद्दात्त बोल...ह्या तीन तिगाड्यामधे मीच एखादा ओळम्बा असल्यासारखा, झोके खातोय असा भास तो प्लंबर गेला तरी बराच वेळ मला होत होता.

चारूदत्त रामतीर्थकर
१ जुलै १६, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

D Lol Lol

“काय राव तुमी, शिकलेली मानस? सादा ओळम्बा पण न्हाई ? " मला चटकन समजेना, शिक्षणाचा आणि ओळम्ब्याचा काय संबंध ?. >>> हसुन हसुन खपलो ना राव. काय जबरी लिहिताय , लिहित रहा. Rofl

Lol
आमच्या खिडकीला ग्रिल करुन देणारा माणुस डिसेंबरपासुन येतोय! तेव्हा विचारलं काम सुरु करता ना? तर म्हणे ख्रिसमस सुट्टी झाल्यावर येतो! बरं हे काका अगदी ५ मिनीटाच्या अंतरावर राहतात .. दर महिन्याला मी आठवण करुन देते तरी दरवेळी नवीन कारण तय्यार असतं!

अग्ग्गदि खरे
मागच्या रविवारी खिड़कीला ग्रील करून देणारा एक जण सकाळी साडे आठ पासून रात्री नऊ पर्यन्तच्या प्रत्येक फोन कॉल वर १५ मिनिटांत पोहचतोय
हे काय तुमच्या बिल्डिंग च्या मागेच् आहे
etc etc अशी काहीही कारणे देत होता नि आला मात्र नाहीच

आताचे माहित नाही पण आम्हाला science ला गणिते असायची ओळम्बा ची
नीट आठवत नहिये पण एका ओळम्बा रेषेत असलेल्या भिंती बद्दल असायची
अर्थात मला ती कधीच नै आवडायची .त्या भिंतीचा आमच्याशि काय संबंध..आमाला का त्रास त्या ओळ्मबा रेषेतल्या भिंतीचा असा प्रश्न पडायचा

मस्तच