’कळते न कळे कसे’ - डॉ. अरुणा ढेरे यांचं अभिवाचन

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

परब्रह्माचा साक्षात्कार व्हावा म्हणून साधक साधना करतात खरी; पण त्या ब्रह्माला हवं असतं ते साधकाचंच समर्पण. संपूर्ण समर्पण. तुमचाच प्राण, तुमचीच आहुती त्याला हवी असते. मी माझ्या ज्ञानब्रह्मापुढे अशा आहुतीच्या तयारीनं उभा राहिलो आहे. - डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

***

महाराष्ट्राचा इतिहास, धर्म आणि संस्कृती यांवर आपल्या संशोधनानं प्रकाशझोत टाकणारे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे हे ज्ञानसाधकांच्या भारतीय परंपरेचे प्रमुख पाईक होते. वैदिक परंपरेखेरिज इतर विविध परंपरा होत्या, या परंपरांना जोपासणारे विद्वान होते, त्यांनी निर्माण केलेलं वाङ्मय होतं आणि हे वाङ्मय आपलं सांस्कृतिक संचित आहे, हे भान बाळगत अभिनिवेश-रहित संशोधन करणारे मराठीतले एकमेव अभ्यासक म्हणजे डॉ. ढेरे. खरं म्हणजे प्राचीन साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रतिभाशाली संशोधक, व्रतस्थ ज्ञानोपासक, लोकसंस्कृतीचे मीमांसक ही विशेषणं डॉ. ढेर्‍यांच्या कामाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यांचं अभ्यासक्षेत्र एकरेषीय, सरधोपट आणि साचेबंद कधीच नव्हतं. अनेक विषय त्यांच्या संशोधनानं कवेत घेतले होते. लोकपरंपरा, धर्म, तत्त्वज्ञान, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, अध्ययनशास्त्र, साहित्य, साहित्यमाध्यमं, साहित्यप्रकार, नाटकं या सार्‍यांचाच आपल्या परीनं त्यांनी वेध घेतला. मात्र प्राचीन साहित्य, परंपरा आणि लोकसंस्कृती हे त्यांच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी राहिले.

संतसाहित्य, लोकसाहित्य आणि लोकपरंपरा या अभ्यासक्षेत्रांविषयीची त्यांची आस्था आणि अनावर ओढ लहानपणीच्या संस्कारांशी निगडीत आहे. अंदरमावळातल्या एका निसर्गरम्य खेड्यात त्यांचं बालपण गेलं. गावाचं नाव - निगडं. ते साडेपाच वर्षांचे असताना त्यांचे आईवडील वारले. सोबतीला फक्त धाकटी बहीण प्रमिला. ती अडीच वर्षांची. ते १९३६ साल होतं. बहीणभाऊ मग आजोळी पुंडल्यांच्या घरात वाढले. या घरात एक सत्तरीचे, अशक्त असे भिक्षुक मामा, नव्वदीला टेकलेली म्हातारी आजी आणि अपार दु:ख व दारिद्र्य. पण हे आजोळचं घरच नव्हे, तर संपूर्ण खेड्यातलं जीवन परंपराशील संस्कृतीनं रंगलं होतं. भागवतधर्माच्या प्रभावानं भारलं होतं. संतसाहित्य आणि लोकसाहित्य ही गावकर्‍यांच्या जगण्याचीच अंगं होती. या दोहोंच्या अनुबंधाचं एक अद्भुत रसायन तिथे तयार झालं होतं. अभंग, कीर्तन, प्रवचन, भारूड, आख्यान यांचं बाळकडू ढेर्‍यांना आजोळी मिळालं. लहानपणापासून अभंग रचायची सवय. गावकरी त्यांच्याकडून भारुडं म्हणवून घेत, पोथ्या वाचून घेत. आपल्या गावात ज्ञानेश्वरच जन्माला आला आहे, असं गावकर्‍यांना वाटे. गावातलं हे सत्त्वसंचित ढेर्‍यांना आयुष्यभर पुरून उरलं.

या गुणी मुलाचं भलं व्हावं, म्हणून आजी-मामांनी गाव सोडलं आणि शिक्षणासाठी त्याला वयाच्या चौदाव्या वर्षी पुण्यात आणलं. विद्येच्या या माहेरघरी एका दीड वितीच्या खोलीत राहून म्युनिसिपालिटीच्या आठ नंबरच्या शाळेत शिक्षण सुरू झालं. व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत जिल्ह्यात पहिला नंबर आला. पण तेवढ्यात मामांची नोकरी सुटली. मग दिवसा काम करून रात्रीची शाळा सुरू झाली. उरेल तो वेळ अभ्यासात आणि वाचनात. औपचारिक शिक्षणाची परवड झाली तरी वाचन मात्र उदंड केलं. असंख्य कीर्तनं-प्रवचनं-व्याख्यानं ऐकली. वाचनाचा पैस इतका अफाट की, सरदार आबासाहेब मुजुमदारांच्या संग्रहातली पुस्तकं हा चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा वाचायला आणत असे. वृद्ध आबासाहेबांनाही या मुलाच्या विलक्षण बुद्धिमत्तेबद्दल कौतुक होतं. दरवर्षी त्यांचा टांगा नारायण पेठेतल्या त्या जिन्याखालच्या खोलीसमोर थांबे - ज्ञानाची उपासना करणार्‍या या मुलाला गणेशोत्सवाच्या जेवणाचं समक्ष आमंत्रण करण्यासाठी.

गावाकडे गोळा केलेलं संचित पुण्यात उभं राहण्यासाठी कामी आलं. त्या संचिताचा अन्वय लावण्याची बुद्धी आपल्याजवळ आहे आणि त्याला एक मोल आहे, याची त्यांना जाणीव झाली आणि वाट लख्खपणे समोर दिसू लागली. गावाकडचं लोकजीवन, तिथल्या श्रद्धा-समजुती, ग्रामदैवतं, सण-कुळाचार, देवळांतले सोहळे, प्रवचनं आणि कीर्तनं, व्रतवैकल्यं यांचा आधार घेत लोकसंस्कृती आणि संतसंस्कृती यांनी दिलेली ठेव उलगडणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं. सुरुवातीच्या काळात काही किरकोळ नोकर्‍या केल्या, पण नंतर संशोधन हे त्यांच्या आयुष्याचं श्रेयस-प्रेयस बनलं. वयाच्या तिशीपूर्वीच त्यांनी अठ्ठावीस पुस्तकं लिहिली - संपादित केली. पहिलं पुस्तक विशीत लिहिलं - सरदार वल्लभभाई पटेल यांचं चरित्र. औंधच्या पंतप्रतिनिधींनी दत्तसंप्रदायाचा इतिहास लिहिणार्‍यास अडीचशे रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या बक्षिसासाठी नव्हे, तर ज्ञानलालसेमुळे ढेर्‍यांनी दत्तसंप्रदायाचा धांडोळा घेऊन आपल्या सांस्कृतिक शोधयात्रेचा श्रीगणेशा केला. ज्या विषयावर तोवर मराठीत ऐतिहासिकदृष्ट्या एकही लेख लिहिला गेला नव्हता, त्या विषयात संशोधन करण्याचा अग्रमान त्यांनी मिळवला. जाहीर केलेलं बक्षीसही अर्थातच मिळालं असलं, तरी या पुस्तकामुळे एका विलक्षण शोधयात्रेला सुरुवात झाली. पाठोपाठ लिहिली गेली संतचरित्रं, स्थलवर्णनं आणि नाथसंप्रदायाचा इतिहास अशी आजही मराठीत प्रमाणभूत ठरणारी पुस्तकं!

संस्कृतीच्या शोधाची साधनं म्हणून संतसाहित्य, संतसाहित्याशी निगडित धर्मसंप्रदाय आणि लोकसाहित्य यांचा अभ्यास देवतांच्या शोधापर्यंत जाऊन पोहोचला. अभ्यासाची क्षेत्रं विस्तारत गेली. ’खंडोबा’, ’मुसलमान - मराठी संतकवी’, ’श्रीविठ्ठल - एक महासमन्वय’, ’लज्जागौरी’,' श्री आनंदनायकी', 'तुळजाभवानी', ’संतसाहित्य आणि लोकसाहित्य - काही अनुबंध’, ’प्राचीन मराठी वाङ्मय : शोध आणि संहिता’ इथपासून ’भारतीय रंगभूमीच्या शोधात’ आणि ’बोरकरांची प्रेमकविता’ इथपर्यंत! इतिहास, पुरातत्व, समाजविज्ञान, धर्मेतिहास, लोकतत्त्व, दैवतविज्ञान आणि नवी-जुनी संपर्कमाध्यमं, नाटकं आणि कविताही! या संशोधनांत अनेक ज्ञानशाखा एकत्र आल्या. संस्कृतीचे नवे अर्थ लागत गेले. अनेक कोडी सुटली.

ढेर्‍यांचं हे संशोधन वाचकांचा तेजोभंग करणारं नव्हतं. अत्यंत रसाळ, लालित्यपूर्ण भाषेत त्यांनी आपलं संशोधन लोकांसमोर आणलं. समन्वित अध्ययनदृष्टीचा समर्थ अवलंब करणारं हे संशोधन केवळ वाङ्मयीन संशोधन असण्यापेक्षा संस्कृति-संशोधन आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या संशोधनामुळे अनेकांगांनी उलगडत गेला. हे बहुस्पर्शी संशोधन फक्त जुनी पुस्तकं वाचून केलेलं नव्हतं. संशोधनाचं हे अद्भुत कार्य क्षेत्रीय आहे. हस्तलिखितं - ताम्रपट - शिलालेख, मौखिक स्वरूपातली माहिती मिळवण्यासाठी पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, आंध्र-कर्नाटकात ढेर्‍यांनी हजारो मैलांचा प्रवास झाला. प्रकृतीची पर्वा न करता, खिशात पुरेसे पैसे नसताना प्राथमिक घरगुती गरजा बाजूला ठेवून, मिळेल त्या वाहनानं किंवा पायी प्रवास करून संशोधन-सामग्री जमवली. या शोधयात्रांमुळे शोधविषय उजळून निघाले.

व्यासंगातून आणि क्षेत्रीय अभ्यासातून जे निष्कर्ष समोर आले, ते अनेकदा रूढ समजुतींच्या विरुद्ध होते. पण तरीही हे उत्पातक्षम निष्कर्ष निर्भयपणे मांडले गेले. प्रामाणिक शोधदृष्टीला गवसलेल्या तथ्यांचा आणि निष्कर्षांचा उच्चार करताना वाचकांच्या प्रस्थापित समजुतींचा किंवा स्वत:च्याही पूर्वग्रहांचा आणि संस्कारांचा त्यांनी कधी अडथळा मानला नाही. या अभ्यासानं बहुजनांनी सांभाळलेला, वाढवलेला संस्कृतीच्या वारसा समोर आणला. शोधविषय लहान असो किंवा मोठा, त्याला भिडताना संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाचा व्यापक संदर्भ क्षणभरही दृष्टिआड झाला नाही. या आंतरज्ञानशाखीय शोधदृष्टीमुळे अभ्यासाच्या कक्षा विस्तारल्या तशी अभ्यासाची साधनंही विस्तारली. शिलालेख, ताम्रपट यांच्याबरोबरच वाघ्यामुरळी, भुत्ये, वासुदेव आणि गोंधळी महत्त्वाचे ठरले. अभिजनांच्या ग्रंथनिर्मितीइतकीच जातिपुराणं, स्थलमाहात्म्य महत्त्वाची ठरली.

ज्या कामातून आज मराठी समाज आणि संस्कृती यांच्या अनेक दिशा विस्तारल्या आहेत, ते प्रचंड काम एखाद्या विद्यापीठानं करावं तसं ढेर्‍यांनी एकट्यानं, एकहाती आणि तेही प्रतिकूलतेशी अखंड सामना करीत केलं. गाठीशी पैसे नव्हते, दळणवळणाची साधनं अपुरी, तरीही ढेरे काम करत राहिले. डॉ. ढेरे खर्‍या अर्थानं ग्रंथोपजीवी होते. पानशेतच्या पुरात सगळा संग्रह वाहून गेला. पुराच्या पाण्यात घर बुडत असताना घरातली भांडीकुंडी न वाचवता, रडणार्‍या लहान मुलीला कडेवर न उचलता ते जिवाच्या आकांतानं पुस्तकं वाचवत होते. जिद्दीनं त्यांनी पुन्हा ग्रंथसंग्रहास सुरुवात केली. आज भारताच्या, नव्हे आशियाई देशांच्या सांस्कृतिक अभ्यासाची अनेक दालनं खुली करणारा ढेरे यांचा ग्रंथसंग्रह आहे. अनेक संस्थांना आणि व्यक्तींना देऊन उरलेला चाळीस हजारांपेक्षा अधिक ग्रंथांचा खजिना त्यांनी उभा केला.

साहित्य अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र शासनाचा पहिला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, रॉयल एशियाटिक सोसायटीचे कॅम्पबेल सुवर्णपदक आणि फेलोशिप, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाची आणि पुणे विद्यापीठाची डी.लिट, पुणे विद्यापीठाचा जीवन-साधना गौरव यांसह अनेक पुरस्कार ढेरे यांना मिळाले.

काल ते गेल्याचं कळलं आणि पोरकं वाटू लागलं. ढेर्‍यांच्या पुस्तकांनी मला खूप आनंद दिला होता. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा असा आधार दिला होता. मलाच नव्हे, तर माझ्यासारख्या अनेक संशोधकांना ढेर्‍यांचा आधार होता. त्यांच्यासारख्या ज्ञानोपासकांच्या केवळ 'असण्या'चाही भरभक्कम आधार होता. आपल्या समाजात संशोधकाला मान देण्याची पद्धत नाही. आपला समाज संशोधकाला आणि त्याच्या संशोधनाला जगण्यासाठी मदतही करत नाही. राजवाडे, केतकर, कोसंबी यांनी अपार कष्ट करून, प्रसंगी निंदानालस्ती सोसून संशोधन केलं. त्या संचिताचं आपण नक्की काय केलं? ढेरेही याच परंपरेतले. किंबहुना ढेर्‍यांसारखं आणि ढेर्‍यांइतकं काम करणारा भारतात दुसरा संशोधक नाही. सभोवताली सगळीच विपरीत परिस्थिती असूनही ढेरे काम करत राहिले. संशोधनातून आनंद मिळवत राहिले. इतरांना आनंद देत राहिले. आपल्या संशोधनातून आपल्याला मिळणारा आनंद आपल्या वाचकांपर्यंत कसा पोहोचवायचा, हे संशोधकांना शिकवत राहिले.

ढेर्‍यांनी लिहिलं होतं - 'गेली कित्येक वर्षे मी अनावर ओढीने एकेका कहाणीची अंतःकहाणी उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे; परंतु तो शोध अजूनही अपुराच राहिला आहे. या अशा अपुरेपणाच्या खंतीतूनच माझ्या शोधाच्या ऊर्मी चैतन्याने रसरसलेल्या आहेत आणि शोध-साक्षात्काराच्या विलक्षण आनंदाचे क्षण मला लिहिण्याची प्रेरणा देत राहिले आहेत. या क्षणांची धुंदी जगण्यातल्या सार्‍या व्यथा-वेदनांचा विसर पाडते. शोधसाक्षात्कार अनुभवताना आणि तो अक्षरांत अवतरताना व्हावहारिक लाभ-हानीचा हिशेब निमिषभरही मनाला स्पर्श करीत नाही. असतो तो निखळ आनंदच आनंद!

हा निखळ आनंद आयुष्यभर मिळण्याइतकं भाग्याचं दुसरं काही नाही. डॉ. रा. चिं. ढेरे यांना तो मिळाला. त्यांनी तो आपल्या वाचकांनाही दिला.

त्यांच्या व्यापक अभ्यासविषयांच्या कक्षेतली त्यांची प्रदीर्घ शोधयात्रा, परिशीलन-पद्धती, सत्यान्वेषी व सहिष्णु दृष्टी येणार्‍या अनेक पिढ्यांना असाच आनंद देत राहो! संशोधकांना आपला अभ्यास करण्याचं बळ देत राहो!

***

२००८ सालच्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी 'तारांकित' या विशेष विभागाची योजना केली होती. साहित्य-काही दिग्गजांनी आपल्या आवडीच्या साहित्याचं अभिवाचन केलं होतं.

डॉ. अरुणा ढेरे यांनी त्यावेळी त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या, म्हणजे डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याविषयी 'बापलेकी' या पुस्तकात लिहिलेल्या लेखाच्या काही भागाचं वाचन केलं होतं.

गेला काही काळ हे अभिवाचन मायबोलीवर काही तांत्रिक कारणांमुळे उपलब्ध नव्हतं. ते आता मायबोलीच्या यूट्यूब वाहिनीवर पुन्हा उपलब्ध करून दिलं आहे.

हे अभिवाचन मायबोली.कॉमसाठी केल्याबद्दल आणि ते मायबोलीवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे आणि मौज प्रकाशन गृह, मुंबई, यांचे मनःपूर्वक आभार.

***
प्रकार: 

ज्या कामातून आज मराठी समाज आणि संस्कृती यांच्या अनेक दिशा विस्तारल्या आहेत, ते प्रचंड काम एखाद्या विद्यापीठानं करावं तसं ढेर्‍यांनी एकट्यानं, एकहाती आणि तेही प्रतिकूलतेशी अखंड सामना करीत केलं.>>> अगदी!

लेखाबद्दल धन्यवाद!

लेखासाठी आणि अभिवाचन उपलब्ध करून दिल्याबद्दल खूपखूप धन्यवाद.कान आणि मन तृप्त झाले.फेसबुकवर शेअर करत आहे.

वयोमानाप्रमाणे कधीतरी मृत्यू येणारच वगैरे सगळं खरं असलं तरीही अशा माणसांच्या असण्याचा त्यांच्यानंतरच्या पिढ्यांना फार आधार असतो. ढेरे गेल्याने आपली जी काही अपरिमित हानी झाली आहे ती कशातच मोजता येण्यासारखी नाही.
हे विषय आडवाटेचे, एकांडे, झगमग ग्लॅमर नसणारे. विद्यापीठीय संशोधनव्यवस्थेत नसलेल्या संशोधकांना तर स्वतःचीच गंगाजळी खर्चायला लावणारे पण अगदी या व्यवस्थेत असलात तरीही व्यवस्थेची रोजची कर्तव्ये पार पाडून संशोधनासाठी अगदी कमी वेळ ठेवणारे. यासाठी लागणारी बौद्धिक कौशल्ये सहजासहजी आत्मसात करता येण्यासारखी नाहीत (विविध नव्या-जुन्या भाषा, त्यांच्यातल्या सांस्कृतिक परंपरांचं सखोल ज्ञान, अगणित जुन्या ग्रंथांमधले, मौखिक साहित्यातले संदर्भ मुखोद्गत असणे, इत्यादि इत्यादी आणि यापलिकडे या सगळ्याचं एकत्रित आकलन होऊन विश्लेषण करून निष्कर्षाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोचण्यासाठी लागणारी प्रज्ञा, शिवाय हे सगळं सुगम भाषेत लिहिता येण्याची प्रतिभा). तेव्हा ढेर्‍यांच्या निधनानंतर या शोधवाटांचं भवितव्यही अंधारलेलं आहे असं मला आत्ता या क्षणी तरी वाटतं आहे. छोटेमोठे हौशे-नवशे संशोधक आहेत पण खणखणीत प्रज्ञेचं कुणी, ज्याला ढेर्‍यांचा/ची वारसदार म्हणता येईल, असं कुणी चटकन आठवत नाहीये.
एकूणातच राजवाडे, ढेरे यांच्या आयुष्यातले व्यावहारिक पैलू बघितले, त्यांनी केलेल्या तडजोडी बघितल्या की समाज म्हणून असे संशोधक आपल्यात असायची लायकी नाही असं कधीतरी अगदी तीव्रतेने वाटते.

चिनुक्स , खूप धन्यवाद ! या उत्कृष्ट लेखासाठी तसेच अभिवाचनाची ध्वनिफित उपलब्ध करून दिल्याबद्दल .

समयोचित लेखवजा व्यासंगपूर्ण मूल्यमापन अन श्रध्दांजली चिनूक्स जी
वरदाजी तुम्ही देखील छान लिहिले आहे
ईश्वर त्यांना शांति देवो

लोकसाहित्य व संस्कृती, संतसाहित्य आणि दैवतविज्ञान अशा विषयांमध्ये संशोधन करणारे व्यासंगी अभ्यासक व साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मूलगामी संशोधनाचा आणि लालित्यपूर्ण लेखनाचा आनंद घेण्याच्या हेतूने त्यांच्या जन्मदिनी, म्हणजे गुरुवार दि. २१ जुलै रोजी अरभाट फिल्म्स्‌ आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी ’लौकिक व अलौकिक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात संध्या. ७ वाजता होणार्‍या या कार्यक्रमात ज्योती सुभाष, माधुरी पुरंदरे, ओम भूतकर आणि हर्षद राजपाठक डॉ. ढेरे यांच्या निवडक साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. चित्रपट-दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. संहिता-संकलन चिन्मय दामले यांचे आहे, तर दृश्य-संरचना सुनीत वडके यांनी केली आहे.

लोकपरंपरा, धर्म, तत्त्वज्ञान, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा अनेक विषयांना कवेत घेणारे, पण जनसामान्यांना सहज समजेल, असे विपुल लेखन डॉ. ढेरे यांनी केले. आपल्या रोजच्या धर्मजीवनाशी आणि लोकपरंपरांशी निगडित असे डॉ. ढेर्‍यांचं लेखन वाचकांना निखळ आनंद देणारे आणि समृद्ध करणारे आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या झळाळत्या शोधवाटांवरून चालण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे रसिक-वाचकांना मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपट-नाट्यक्षेत्रातल्या नामवंतांनी एकत्र येऊन डॉ. ढेरे यांच्या विविधस्पर्शी संशोधनाचा व साहित्याचा आस्वाद घेणारा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणार्‍यांस प्राधान्य असेल. काही जागा राखीव आहेत