डोक्यात रुतून बसलेले अजित आणि 'लॉयन' !

Submitted by अजातशत्रू on 22 June, 2016 - 07:13

आसपास अर्धउघड्या मुलींचा गराडा घेऊन हातामध्ये व्हिस्कीचा ग्लास फिरवत, सिगारेटचा धूर उडवत अजित आपल्या मोठ्या मोठ्या काचेच्या लाल, पिवळ्या रंगाच्या गॉगलमधून खलनायकी कट रचत असे, तेव्हा पिवळ्याधम्मक नागाच्या विषारी डोळ्यांची नजर आठवत असे. त्याच्या डोळ्यांतील पुढे घडणार्‍या घटनांचा विषारी प्लॅन सोबतच्या सुंदरीला न कळल्यामुळे ती वेड्यासारखे काही प्रश्न विचारत असे. आणि त्यावर अत्यंत शांतपणे अजित काय मूर्खांसारखे प्रश्न विचारत आहे, असा भाव धारण करून ‘लिली डोंट बी सिली’सारखे फर्मास डायलॉग मारीत असे.

ही त्याची सखी बर्‍याच वेळा ‘मोना डार्लिंग’ असे. ‘मोना तुम सिर्फ खाना, पीना और सोना’ अशी तिच्या अकलेची सालं काढत थिएटरमध्ये प्रेक्षकांना रिझवणारा अजित आणि त्याची ‘मोना’ कोण विसरेल! त्याच्या हाताखालच्या एखाद्या माणसाने चांगले काम केले, वा चांगली बातमी आणली की ‘स्मार्ट बॉय’ म्हणून त्यांचे कौतुक करून झाले की दुसऱ्या क्षणाला गोळी घालून ठार केले जाई.

चटकदार आणि झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याचा कुट आणि लाल मिरचीचे तिखट यातून बनते, एकदा का ही चटणी तयार झाली की त्यातले तिखट आणि कुट बाजूला करता येत नाही. या चटणीसाठी मिरचीचे तिखट ठसकेबाज असले की चटणी चवदार होते. सिनेमाच्या चटणीत खलनायक हे या लाल मिरचीच्या तिखटासारखे असतात.आताच्या या वेगवेगळ्या तिखटाप्रमाणेच पुर्वी खलनायकांची सुद्धा एक वर्गवारी होती. प्राणचा खलनायक भारदस्त पण काहीसा एकसुरी टोनिंगचा होता, के.एन.सिंगचा खलनायक हा नेहमी गूढ आणि अगम्य वाटायचा, प्रेमचोप्राचा खलनायक हा आचरट, शक्ती कपूरचा खलनायक सुरुवातीस कपटी तर नंतर वात्रट होता, कुलभूषण खरबंदा कधी खलनायकच वाटला नाही, रणजीतचा खलनायक डोक्याने अधू असल्यागत वाटायचा, जीवनचा खलनायक पाताळयंत्री पण शेळपट होता, मदनपुरी- प्रेमनाथ यांचे खलनायक मर्यादित असत, अमरीशपुरीचा खलनायक विविधरंगात न्हालेला होता, बरयाचदा नायकांनी देखील खलनायकाचे रोल केले आहेत पण या सर्वांपेक्षा अजित अगदीच वेगळा होता. अजितचा राग यायचा पण तो पडद्यावर हवाहवासा वाटायचा. अजित स्वतःची भूमिका खलनायकी ठेवून इतरांच्या भूमिकेचा कचरा करायचा. अजितचे बोलणे आणि त्याबरहुकुम त्याचे अफलातून हावभाव हे एक अजब रसायन होतं. फडतूस संवाद देखील त्याने अजरामर करून ठेवले, अजितचा आवाज, त्याचा पेहराव आणि त्याची देहबोली याचे कॉम्बीनेशनची तुलना ३६-२४-३६ अशा मादक सौंदर्याच्या छापील मापदंडाशी केली तर त्याच्याशी न्याय केल्यासारखे होईल.

हातात चामड्याचे हंटर, पायात लेदरचे शूज, डोळ्यावर चित्रविचित्र गॉगल्स, कंबरेला मोठाले बेल्ट, डोक्यावर नानविध टोप्या, तोंडातला पाईप आणि कधीकधी लांब ओव्हरकोट अशा वेगवेगळ्या गेटअपमध्ये अजित यायचा,क्वचित तो बेढब वाटायचा पण ते त्याला शोभून दिसायचे. अजितभोवतीची नशीली दुनिया आणि रंगीत कबुतरं हा तर एक वेगळाच विषय आणि वेगळीच दुनिया असायची. कधीकधी अजितच्या त्या तुर्रेबाज जिंदगीचे आकर्षण वाटावे इतका अजित त्यात मुरलेला असायचा. अवतीभवतीच्या ललनांचा आस्वाद ण घेता पाईपमधून धूर सोडणारा अजित बघितला की त्याचा हेवा वाटायचा. अजितचा खलनायक बंद गळ्याच्या कोटात देखील शोभून दिसायचा आणि लक्तरे झालेल्या कपड्यातदेखील जहरी वाटायचा. असा हा अजित ! त्याचा तो नंबर १७ चा 'लॉयन'चा 'घोळ' आणि दोन वेगवेगळ्या नंबरचे शूज सगळेच मजेदार होतं...

१९७६ मध्ये सुभाष घईच्या 'कालीचरण'मधला 'सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है'हा त्याचा डायलॉग इतका प्रसिद्ध झाला की शत्रुघ्नने पुन्हा अजितचे तोंड बरीच वर्षे पडद्यावर आमने सामने येणार नाही याची काळजी घेतली. कालीचरण हा शत्रुघ्नसिन्हाचा माईलस्टोन मुव्ही आहे, यात अजितने अनपेक्षितपणे असा काही भाव खाल्ला आहे की संवादफेकीत राजकुमार नंतर बॉलीवूडमध्ये ज्याचा कोणी हात धरू शकणार नाही अशा शत्रुघ्नला अजितने अगदी चोथा करून टाकले. अजितचे सर्वात मोठे भांडवल त्याचा घसा खाकरल्यासारखा वाटणारा खर्जातला कडक आवाज ! तो बोलायला लागल्यावर चाबूक चालविल्याचा भास होई ! आपल्या अजब आवाजाबरोबर त्याचे गजब एकसप्रेशन्स याचे कॉकटेल कॉंबिनेशन होते. ही अजितची विशेष शैली बनून राहिली.सिनेमात खलनायकी करणारा अजित वास्तविक जीवनात एक सृजन आणि शांत शीतल स्वभावाचा कुटुंबवत्सल व्यक्ती होता....

सिनेमाच्या पडद्यावर असं आगळ वेगळ खलनायकीचं एकाच वेळेस खट्याळ आणि धक्कादायक असं सत्र अजितनेच सुरु केले, अजितचे खरे नाव हमीद अली खान.
हमीद अली खानचा जन्म (जानेवारी २७, १९२२) गोवळकोंड्याचा. त्याचे वडील निझामाचे पर्सनल खजिनदार होते. या हमीदला मायानगरीचे फार वेड होते. सतत याच ध्यासात असणारया हमीदने त्यासाठी जंग जंग पछाडले. शेवटी कॉलेजमध्ये जाण्याच्या वयात हमीद अली आपली कॉलेजची पुस्तके-वह्या विकून सिनेमामध्ये नशीब काढण्यासाठी घरातून पळून आला. तो थेट मुंबईत आला. मुंबईत आल्यावर त्याला वस्तूस्थितीची जाणीव झाली आणि हे सर्व सिनेमावेडाचे प्रकरण वाटते तितके सोपे नाही हे देखील त्याच्या लक्षात आले. सिनेमात एक काम मिळावे म्हणून तो मुंबईत काय वाट्टेल ते करायला तयार होता आणि पडेल ती काम करू लागला. त्यासाठी तो हमीदचा अजित देखील झाला.

पण अखेर मुंबईत धक्के खात असतानाच हमीदला हीरो म्हणून १९४६मध्ये ब्रेक मिळाला आणि सिनेमासाठी नामकरण झाले ‘अजित’. त्याआधी युसूफ खानचा ‘दिलीपकुमार’ झाला होताच. अजितचा पहिला सिनेमा होता ‘शाहेमिर्जा’ आणि हिरॉइन होती गीता बोस. त्यानंतर वनमालाबरोबर ‘सिकंदर’, खुर्शिदबरोबर ‘आपबीती’, लीनाकुमारीबरोबर ‘सोने की चिडिया’, मीना शौरीबरोबर ‘ढोलक’, ‘चंदा की चांदनी’मध्ये मोनिका देसाई अशा त्या काळच्या नामांकित हिरॉइनबरोबर सिनेमे एकामागोमाग येऊ लागले. नलिनी जयवंतबरोबर तर मोजून १५ चित्रपट झाले. यापैकी बर्‍याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर राम म्हटले. पण अजितच्या घरी चूल पेटत होती. माहिमच्या ‘पॅराडाइज’समोरच्या इमारतीमध्ये तेव्हा आणि त्यानंतर बराच काळ त्याचे वास्तव्य होते.

चक्क चौकडीची लुंगी घालून महाराज फुटपाथवर गप्पा मारीत उभे राहत असत. हीरो म्हणून फारसे हाताला काही लागत नाही, बघून अजितने आपला मोर्चा सेकंड लीड रोलकडे वळवला. ‘मुगले आझम’ आणि ‘नया दौर’ हे त्या काळातील नाव घेण्यासारखे चित्रपट आणि त्यामधील अजितचे रोलही लोकांच्या नजरेत भरले. दोन्ही चित्रपटांचा हीरो ‘दिलीपकुमार’ होता. मधल्या काळात तो पुन्हा हैदराबादला स्थायिक होण्यासाठी परत गेला. तेथे त्याला कोणी मांत्रिक, तांत्रिक, भविष्यवाणी करणारा पंडित भेटला. त्याने सांगितले, एखादा रोल ज्यामध्ये पूर्ण पांढरे कपडे असतील, तो तुला पुन्हा सिनेमामध्ये आणेल. खरं-खोटं तो मांत्रिक आणि त्याचा देव जाणो; पण अजितचा पुन:प्रवेश व्हिलन म्हणून झाला, तो ‘जंजीर’मधून आणि त्यामध्ये पूर्ण पांढर्‍या वेषात, पांढर्‍या केसात, पांढर्‍या बुटामध्ये वारंवार पडणार्‍या स्वप्नांमधील पांढर्‍या धुक्यातील पांढर्‍या घोड्याच्या प्रतीकाने झाला. ज्युवेल, द्रोही, यादों की बारात अशी जवळपास ५७ चित्रपटांची बारात निघाली. अनेक चित्रपटांमध्ये अजित बाप आणि प्रेम चोप्रा मुलगा अशी बाप-लेकाची खलनायकी जोडी ही खूप वापरली गेली.अजितचा खलनायक नेहमी उच्चवर्गीय, अत्यंत मृदू बोलणारा, पण बोलण्यात जरब असणारा होता. त्याचा अनुनासिक आवाज, त्या आवाजाची मृदू पण खतरनाक धमकीची नक्कल अनेक नकलाकार दिवसरात्र करू लागले. हम किसी से कम नहीं (१९७७), कर्मयोगी, देस परदेस (१९७८), राम बलराम, चोरनी (१९८१), खुदा कसम (१९८१), मंगल पांडेय (१९८२), रजिया सुल्तान (१९८३) और राज तिलक (१९८४)जिगर (१९९२), शक्तिमान (१९९३), आदमी (१९९३), आतिश, आ गले लग जा और बेताज बादशाह (१९९४) हे त्यांचे काही निवडक चित्रपट होत...

सिनेमातल्या अजितची आणखी एक तऱ्हा होती, त्याच्या हाताखालच्या एखाद्या माणसाने चांगले काम केले, वा चांगली बातमी आणली की ‘स्मार्ट बॉय’ म्हणून त्यांचे कौतुक केले जाई; आणि दुसर्‍याच क्षणी गोळी घालून ठार केले जाई. अशी ‘स्मार्ट बॉय’ माणसे आपल्याच जिवावर कधी उठतील याचा नेम नाही; म्हणून नेम धरून त्याला मारला, हे आपले लॉजिक शांतपणे सांगणारा अजित अगदी आतल्या गाठीचा, आपल्या मनातील विचारांचा थांगपत्ता न लागू देणारा, पांढर्‍या कपड्यातील काळा कर्दनकाळ वाटू लागे. २२ डिसेंबर १९९८ रोजी हैदराबादमधील आपल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने हमीद अली ऊर्फ ‘अजित’ पैगंबरवासी झाला. त्याच्या पश्चात उरले त्याचे चार मुलगे आणि एक मुलगी. त्याच्या पोराने बापाची नक्कल करीत टेलिव्हिजनवर अँकर होण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा चालला नाही. नकला नकलाच राहतात. ‘आखिर असली सोना तो सोना होता है ना, मोना?”

आज अजित नाही पण त्याची जागा तशीच रिकामी आहे, अनेक खलनायक आले आणि गेले पण प्राण,के एन सिंग, जीवन, प्रेमचोप्रा,रणजीत, अमजदखान, अमरीश पुरी आणि अजित यांची बातच और होती. या सर्वांमध्ये अजितची एक वेगळीच शैली होती जिचा आनंद रसिक आजपण घेताना दिसतात.

आपल्या आयुष्यातील काही क्षण आनंदाचे करण्यात खारीचा वाटा उचलणारे हे लहानमोठे कलाकार काळाच्या उदरात गडप होतात पण त्यांच्या आठवणी आणि त्यांची बेमिसाल शैली अजरामर होतात. अशा लोकांपैकीच एक अजित होता ...आजही अजितच्या आवाजाची नकल केली जाते आणि टाळ्या वसूल केल्या जातात ..."किसी कलाकार के लिये उसके जाने के बाद भी इतने प्यार और इज्जत की बात बडी माईने रखती है ! है ना मोना डार्लिंग ?"

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2015/10/blog-post_23.html

ajit.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.
अजित ची स्टाईल इतकी आगळीवेगळी होती, की मध्यंतरी त्यावर अनेक जोक्स सुद्धा येऊन गेले.
पोराने बापाची नक्कल करीत टेलिव्हिजनवर अँकर होण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा चालला नाही. नकला नकलाच राहतात >>> त्याचा मुलगा शेहजाद खान याने साकारलेलं 'अंदाज अपना अपना' मधला 'भल्ला' हे पात्र मात्र मस्त जमलं होतं. अर्थात तो अख्खा सिनेमाच भन्नाट आहे , त्यातलं प्रत्येक पात्र त्याच्या त्याच्या वेगळेपणाने लक्षात राहतात हे वेगळं !

छान लिहिले आहे. सौंदर्याचा छापील मापदंड बहुधा ३६-२४-३६ असावा, तुम्ही २४-३६-२४ लिहिला आहेत. मलाही नक्की माहीत नाही. लेख आवडला.

@ बेफिकीर - आणि @ अनघाजी तुम्ही बरोबर लिहिलंत ! चुकीची दुरुस्ती केलीय ....चूक लक्षात आणून दिल्याबद्दल अन अभिप्रायाबद्दल धन्यवाद ...

चांगला लेख आहे. पण उत्सवमूर्तीची भलावण करताना इतरांचा पाणउतारा करण्याची गरज नव्हती. प्राण, के एन सिंग, जीवन हे दिग्गज खलनायक होते. प्राणच्या तुलनेत अजितच एकसुरी वाटतो. राम और शाम मधला खलनायक प्राण पहा आणि हाफ टिकट मधला पहा. कोण एकसुरी म्हणेल? असो.
अजितला कितीही क्रूर खलनायक दाखवला तरी तो खरा आतून एक सभ्य सुसंस्कृत माणूस आहे असेच वाटते. अभिनेता म्हणून हे यश म्हणावे का अपयश हे मला नक्की कळत नाही.
अजितच्या निमित्ताने एक नवा खलनायकी प्रयोग झाला आणि लोकांना तो आवडला हे नक्की.
हम किसिसे पेक्षा मला यादोंकी बारात आणि जंजीरमधले रोल जास्त आवडले.
इथे त्याची लहानशी मुलाखत आहे.
https://www.youtube.com/watch?v=uU526oxFMK0
ह्यात असे म्हटले आहे की रंगीत चित्रपट यायला लागल्यावर राजेंद्र कुमारने अजितला खलनायक बनण्याचा सल्ला दिला.

नटवरलालपेक्षा मला शम्मी कपूरच्या अंदाजमधली भूमिका आठवते. राजेश खन्नाचा बाप दाखवला आहे. छोटा पण लक्षात राहणारा रोल होता. हयात नसणार्‍या मुलाची विधवा सून म्हणून रहाण्यापेक्षा शम्मी कपूरबरोबर राहणे जास्त योग्य आहे हे तो स्वीकारतो.

प्रतिज्ञा नामक एका पडेल सिनेमात अजित दरोडेखोर दाखवला आहे. एक भीषण दिसणारा टोप, काळा टिळा वगैरे लावलेला अजित काहीच्या काही दिसतो! तशात शोले येऊन गेल्यामुळे एक अस्सल दरोडेखोर खलनायक कसा असावा ह्याची कल्पना तयार झाली होती त्या पार्श्वभूमीवर हा भरत डाकू अगदीच "हा" वाटला!