असच आपलं सटर फटर.... भाग बारा

Submitted by ह.बा. on 15 June, 2016 - 07:37

मायबोलीवर न येणारे सगळे निर्बूध्द आहेत असे म्हणुया का? घ्या ना सर क्यालेंडर घ्या.... आपल्यापेक्षा चांगली गाडी घेणार्‍या मित्राची गाडी जाळून टाकूया का? हे आमचं नाही तुमचंच काम आहे ते आम्ही करतोय... सकाळी सहाला न उठणार्‍यांना एकाच वेळी झोपेच्या पन्नास गोळ्या देऊया का? साबण, गोमूत्र हवय का?... माझ्या लेखावर चांगली प्रतिक्रीया न देणारे म्हणजे मराठी अस्मितेचे मारेकरी आहेत असेच म्हणायला हवे ना? समाज आपल्या मुळांपासून दूर कसा काय जाऊ शक्तो... पोस्टर घ्या ना... पुर्वेला लावा... मी माझा विचार आणि हा समाज यांच्यात साखळ्दंडांनी एक न तुटणारं नातं बनवायचय मला.... त्यांनी ऐकायला हवं हे माझं मत... ऐकायला हवं? अरे हे माझं मत नाहिये त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हा.... त्यांना तो स्विकारावाच लागेल...
********************************************************************************************************
मला म्हणायचय की डोळे उघडे ठेवा... सत्य आहे ते घ्या. घ्याच असं नाही म्हणत. पटलं तर घ्या. मनगटावर विश्वास ठेवा... बघा मी दाखवतो तुम्हाला कसे फसता तुम्ही ते. हा बघा अंगार्‍यात औषध आहे... हा बघा पैशांचा पाऊस आला... बलात्कार झाले बाया बापड्यांचे... कोवळी पोरं कापली गेली... हंडे मेंदूत आहेत रे... बुध्दीचे ऊत्खनन करायला हवे आणि मग यशाचे हिरे वर येतील असं मला वाटतय... असच करा असं नाही म्हणत मी...
***********************************************************************************************************
त्याला द्वेषाशी नका जोडू. त्याला माणसाशी जोडा. स्वाभिमानाशी जोडा. जिद्द, चिकाटी, धाडसाशीही त्याला जोडा. मग आपल्या कारुण्याशी लढायचं तो बळ देईल... आपले हात एकमेकांच्या हातात येतील. त्याला तुमचा नका म्हणू किंवा तुमच्या धर्माचा नका म्हणू .... त्याला आपल्या मातीचा म्हणा...
कष्टाच्या डोक्यावरच फाटकं पटकूर काढून तिथे भरजरी फेटे बांधायचेत मला. मग मी त्यासाठी ऊघड्या डोळ्यांनी लढणार आहे. मी सुध्दा मेंदू वापरणार आहे... धुरकटलेल्या हस्तलिखितांना माझ्या जगण्याभोवती भिंती बांधायला बंदी आहे महाराज... मी स्वतंत्र आहे....
**************************************************************************************************************
"काय च्यायला बोंबाबोंब चाल्लीये. काल ऑफिसला जायला तासभर उशीर झाला"
"हो ना राव काय बुध्दी सत्य न गोमूत्र च्यायला नुसता वेळच वेळ असणार यांच्याकडे..."
"मी पण घेतलेलं क्यालेंडर परवा... सोसायटीतच आहे एकजण."
"मी पण एक पुस्तक वाचलय ते... पटलं मला. डोळे उघडे हवेतच..."
"ड्बा उघडा डोळ्यांसोबत...."
"आयला कारल्याची भाजी"
"आजकाल माझे पण हालच आहेत भाजीबाबत"
"महाग पण बर्‍याच झाल्यात ना भाज्या"
"कुणी वाजवला असेल रे त्याचा....?"
"जेव लवकर दुपारी मिटींग आहे.."
"हं..."
**********************************************************************************************
"ही लोकशाही आहे. विज्ञानवादी बना असे आपली राज्यघटना सांगते आपल्याला. मग हे कसे चालेल. आम्ही याचा छ्डा लावणार हा आमचा शब्द आहे."
"पण सर बरीच वर्षे झाली"
"होऊदे ना"
"मग शोध?"
"सांगितलं ना लावणार म्हणजे लावणार"

संशयीत म्हणून एकजण ताब्यात. बाकीचे फरार.
*****************************************************************************************************
विचारांच्या बुडाशी लावून बुध्दीची प्रजनन शक्ती नष्ट करणारे बॉम्ब बनवूया का? मग आपण म्हणतोय त्यापेक्षा वेगळे काही म्हणनारे कुणी राहणारच नाही.
आपण म्हणतोय ना पहिल्यापासून? मग दुसरे का म्हणतायत सांगा बरं? का म्हणायचं त्यांनी? पण मग हे बुध्दी वगैरे कशाला काढायचं? आहे ना आपल्याकडे लिहून ठेवलेलं?
माझ्या लेखांना खूप प्रतिसाद हवेत.... आडमीन प्लीज त्यांची खाती ब्लॉक करा.... नो एंट्री ऑन मायबोली.... 'मी' ईज ओन्ली ग्रेट रायटर... वाचकांना वाचावच लागेल कारण हा त्यांच्या जीवनाचा पाया आहे... भविष्याचा आधार आहे.
का मग असं करुया की....
सगळ्यांना डोळे ऊघडे ठेऊदेत? सगळ्यांना विचार करुदेत? त्या सायंसच्या पुस्तकांनाही नोकरीतून जगण्यात प्रवेश देऊन टाकूया?
आणि त्या अस्मितेलाही मानवतावादी करुया का? तलवारी नाचवण्यापेक्षा स्वाभिनासाठी एकसाथ चालुया. टाळ्यांसाठी गरम गरम बोलण्यापेक्षा मातीच्या संपन्न ईतिहासाची पुनराव्रुत्ती वगैरे घडवुया का?
पण कोण कुणाला मारणार हा प्रश्न आहेच कुठे? मारण्याची मानसिकता तयार होतीये त्याची भिती आहे... मी संध्याकाळी भाजी आणायला जातो. आणि दिवसभर बसने किंवा गाडीवर फिरत असतो... मला कुणाचा अजेंडाच माहीती नसतो... कोण मला मारणार आहे? कोणाला कशाचा राग आलाय तेच कळत नाही... मी देवाशप्पथ सांगतो मी कुणालाच शिव्या दिल्या नाहीत. मी कधीच गोमूत्र प्यायलो नाही. मी कधीही त्या बाईला क्यालेंडर घ्यायला नकार दिला नाही... मग असा अचानक का मरणार मी... मला या लोकांनी किमान अजेंडा कळवायला हवा. माझी बायको माझा मुलगा सगळे कामाला किंवा शाळेला जातात. त्यांनीही कधी कुणाच्या देवळात चप्पल घालून प्रवेश केलेला नाही पण तरीही ते कदाचीत मरतील असं वाटतं मला... बंदी कुणावरही घाला... मेंदूवर घाला, सत्यावर घाला, देवळांवर घाला ... मला काय करायचय? कुणाला विनाकारण मरू देऊ नका म्हणजे झालं.... मला त्याची खूप भिती वाटतीये. लोकशाहीचा पाला चघळून खाल्ला की भिती जाते असं ऐकलय मी. पण साला आता ती कुठे उगवते ते शोधायला देशभर फिरायला लागेल... आपल्याकडे तर झाडं तोडली आणि बियांच्या बेंबीत गोळ्या घातल्या मागेच...
बघा रे थोडा पाला सापडला तर... थोडीशी लोकशाही चघळली की बरं वाटेल मला...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users