जाळ आन धूर.... संगटच

Submitted by Sano on 11 April, 2016 - 03:23

काळ्या काताळ दगडातून घडवलेली प्रशस्त अशी, पाच-पन्नास ऐसपैस पायऱ्या उतरणारी, जुन्या इतिहासाच्या खुणा सांगणारी आणि थंडगार पाण्याने भरलेली विहीर. विहिरीच्या कमानीवरून कॅमेरा हळुवार घुमतो आणि दिसतात ते दोन कोवळे प्रेमी, पायऱ्या उतरत येणारी ती आणि तिची वाट बघत कठड्यावर बसलेला तो. पाठीमागे हळुवार घुमणारे आणि वातावरणात मिसळून जाणारे संगीत. बस्स, अत्यूच्च दर्जाचं जे काही असतं ते हेच, पाहताच क्षणी मोहून टाकणारं. आपल्या मातीतलं.

सैराट ह्या आगामी चित्रपटाचा हा पहिला टीजर. जेव्हा सारे क्रिएटिव्ह लोक एकत्र येऊन एकाच धेय्याने काम करतात तेव्हा अशा अप्रतिम कलाकृती घडतात आणि अश्या कलाकृती म्हणजे आपल्या सारख्या रसिक पामरांसाठी पंचपक्वांनी मेजवानीच असते.

ह्या पहिल्या टीजर पासूनच हा चित्रपट काय असेल हि उत्सुकता लागून राहिलीय. नागराज मंजुळे, ज्याच्या फँड्रीने अक्षरशः माझी विकेट काढलेली, तो हि मोट चालवतोय म्हटल्यावर अपेक्षा खूपच वाढल्यात. ह्या चित्रपटाचा संपूर्ण असा ट्रेलर आजून आला नाहीय त्यामुळे कथा काय असेल ह्याचा नक्की आढावा घेता येत नाही पण तीन चार गाण्यांच्या व्हिडिओ मधून नागराजचा कॅनव्हास किती मोठा आहे हे जाणवते.

गावाची भव्यता, दूरवर पसरलेली माळराने, तिथली हिरवीगार शिवार, तिथल्या अश्याच कितीतरी कथांच्या साक्षी असलेल्या वास्तू आणि मुख्य म्हणजे ह्या गावातली खरी वाटणारी माणसं. एकूणच चित्रिकरण अगदी international level चे असलं तरीही मातीशी इमान राखणारं वाटतेय.

फँड्री नंतर नागराज हा चित्रपट घेऊन येत असल्यामुळे खूप अपेक्षा आहेत. एका मुलाखतीत नागराज ने स्पष्ट केलेय कि तो त्याच्याच गोष्टी सांगणार आणि आशा आहे कि 'कमर्शियल' आणि त्याची गोष्ट ह्यांची सांगड घालून तो काहीतरी भन्नाट सादर करेल.

सैराट चे संगीत आणि त्यातले शब्द हि ह्या चित्रपटाची फार मोठी जमेची बाजू. अजय-अतुलचे 'सैराट झालं जी' गोड आहे त्यात टप्प्या-टप्प्यावर वर येणारी मराठमोळी वाद्यें आणि पाश्चात्त्य वाद्यें ह्यांची घातलेली सांगड म्हणजे 'टू मच'.
'झिंगाट' हे गाणं तर अगोदरच लोकांच्या पसंतीस उतरलंय. फँड्री मधले 'तिचा झगा गं' आणि आता सैराटचे 'झिंगाट', माहित नाही हि गाणी कोणत्या प्रकारात येतात पण गावरान भाषा किंवा तिथल्या लोकसंगीताचीे छाप असल्याने कानात भरून राहतात.

"आता उतावीळ झालो, गुडघा बाशिंग बांधलं,
तुझ्या नावाचं मी इनीशल ट्याटुनं गोंदलं."

सर्वसाधारण भाषेत पण 'मॉडर्न' होऊ पाहणाऱ्या शब्दात लिहलेले हे गाणे कळस आहे.

प्रेक्षकांसाठी तळटीप: फँड्री चे प्रोमोज सुद्धा असेच लव्हस्टोरी दर्शवणारे होते आणि रिलीजची तारीख पण जवळपास १४ फेब्रुवारीच होती. त्यामुळेच कि काय माझे बरेचससे मित्र आपापल्या 'हि'ला घेऊन हा चित्रपट पाहायला गेले होते पण तिथे त्यांना मिळाला तो जातीयव्यवस्थेचा ४४० चा झटका. चित्रपट अप्रतिमच होता पण चुकीच्या अपेक्षा घेऊन गेलेल्या माझ्या मित्रांचा पूर्ण भ्रमनिरास झालेला आणि चित्रपट टुकार आहे असा त्यांचा सूर लागलेला. असो, फँड्री ने लव्ह स्टोरी ला दिलेली हूल आणि त्यामुळेच रोमान्स च्या शोधात असणाऱ्यांचा झालेला भ्रमनिरास सैराट दूर करेल असे वाटतेय. पण तरीही हि नागराजची गोष्ट असल्याने काहीतरी वेगळे असेल असे जमेस धरूनच चित्रपटगृहात जा.

सैराटचे जे काही प्रोमोज youtube वर येताहेत त्यातून दिग्दर्शक नागराज मंजुळे, छायाचित्रकार सुधाकर रेड्डी आणि एडिटर कुतुब इनामदार ह्यांनी केलेली करामत जाणवते. त्यातीलच काही अप्रतिम फ्रेम्स खाली देत आहे. बाकी, बॅकग्राऊंड ला 'सैराट झालं जी' चालू असुदेच. Happy

प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.


प्र. चि. १


प्र. चि. २


प्र. चि. ३


प्र. चि. ४


प्र. चि. ५


प्र. चि. ६


प्र. चि. ७


प्र. चि. ८


प्र. चि. ९


प्र. चि. १०


प्र. चि. ११


प्र. चि. १२


प्र. चि. १३


प्र. चि. १४


प्र. चि. १५


प्र. चि. १६


प्र. चि. १७


प्र. चि. १८

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी वाटला ट्रेलर, गाणी, मुलाखती, ऑर्केस्ट्रा रेकॉर्डिंग व्हिडिओ सर्वच.
मित्रांशी बोलता बोलता पोरगा तिच्या आठवणीत अचानक थिरकू लागतो आणि ती सामुदायिक व्यायामाची गंमत मस्त जमली आहे. चपलांवर फुले आणि गाढवाची राईडसुद्धा.
पिक्चर नेटवरच बघावा लागेल इतक्यात महाराष्ट्रवारी नसल्याने.

ट्रेलर पाहील्यावर सिनेमा सुन्न करणारा असावा असं वाटतंय. ही काही नेहमीची गुडी गुडी प्रेमकहाणी नसणार

"ट्रेलर पाहील्यावर सिनेमा सुन्न करणारा असावा असं वाटतंय. ही काही नेहमीची गुडी गुडी प्रेमकहाणी नसणार" >>>
पहिल्याच दिवशी पाहिला सैराट, चित्रपटाबद्दल बरेच आहे बोलण्यासारखे पण थियेटर मध्ये प्रेक्षकांच्या sad, bad, अति joyce अश्या अगदी टोकाच्या प्रतिक्रिया पाहून कमाल वाटली. पूर्वार्धात झिंगाट होऊन नाचणारे, उत्तरार्धात अगदी एकमेकांच्या श्वासांचा आवाज ऐकू येयील एव्हढे शांत होते.

सैराट या सिनेमाला जे यश मिळालं ते अभूतपूर्व असंच आहे. शंभर कोटी क्लबच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेला आहे हा सिनेमा. हे यश पाहता सैराटची तुलना थेट शोले किंवा मुघल ए आझम शी केली तर वावगं ठरणार नाही. यशाच्या बाबतीत अर्थात.

पण त्याचबरोबर पुढे काय ही शंका निर्माण होते.

- नागराज मंजुळे कडून अशाच अपेक्षा ठेवल्या जातील. तो एक क्रिएटीव्ह दिग्दर्शक आहे. त्यामुळे कमर्शियली यशस्वी होण्याच्या अपेक्षांच्या दडपणाखाली तो कशा प्रकारे कामगिरी करेल याची उत्सुकता , खरं म्हणजे भीती आहे.

- सैराट च्या यशात प्रमोशनचा फार मोठा वाटा आहे. प्रमोशन मधे झी कडे जी कला आहे ती इतरांकडे दिसत नाही. त्यामुळे जर झी टॉकीज चं पाठबळ नसेल तर सिनेमा या प्रमाणात यशस्वी होईल का ?

- सैराटच्या प्रमोशन साठी ज्या युक्त्या वापरल्या (सोशल मीडीयावर दोन गटात लावून देणे इ.) त्यामुळे सैराटला रिपीट ऑडीयन्स मिळाला.

- सिनेमाच्या यशात संगीताचा मोठा वाटा आहे. नागराज ने सिनेमाचं श्रेय अजय अतुलला दिल्याचं दिसत नाही. उलट भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल बोलताना त्याला सिनेमात संगीत असावं लागतं, जे प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात नसतं. प्रेक्षकांनी आपली मानसिकता बदलावी असं तो सातत्याने सांगतोय. फॅण्ड्री साठी अजय अतुल ने बनवलेलं गाणं ही त्याने सिनेमात घ्यायला नकार दिला होता. त्याने पुन्हा संगिताशिवाय सिनेमा बनवला तर तो चालेल का हा ही प्रश्न आहे आणि संगीत असू देण्याविषयी दबाव आला तर पुन्हा सैराट सारख्या जागा बनवणं जमेल का ?

- सैराट च्या यशात कॅमे-याचं पण खूप महत्व आहे, पण सुधाकर रेड्डींच्या कामाचं कौतुक नागराज कडून झालेलं नाही. टीम लीडर म्हणून त्याच्याकडून ही अपेक्षा नाही. ज्यांच्या जिवावर कामगिरी करायची ते दुखावले जाऊन चालत नाही.

- या सिनेमाची भट्टी जमली होती. सुरूवातीचा भाग पूर्ण कमर्शियल तर नंतरचा भाग नागराज मंजुळेच्या आधीच्या कलाकृतींशी इमान राखणारा. हीच भट्टी पुन्हा जमेल का ? सिनेमात भट्टी जमून येणे दर वेळेला घडतेच असं नाही.

- रमेश सिप्पींना पुन्हा शोले बनवता आला नाही. त्यांचे पुढचे सिनेमे खूप वाईट होते असं नाही. शान जर शोले च्या आधी आला असता तर चालला असता. पण पुढे शोलेशी तुलना होऊन पुढचे सिनेमे खुजे वाटू लागले. त्यातही रमेश सिप्पी हे कमर्शियलफिल्म मेकर असल्याने त्यांच्यापुढे नागराज मंजुळेसारखा पेच नव्हता.

लोकाश्रय, शंभर कोटींचा क्लब इ. अपेक्षा जर झुगारून दिल्या आणि मला हवा तसाच सिनेमा मी बनवीन हे धोरण ठेवलं तर कदाचित कमर्शियली यशस्वी सिनेमा नाही देता आला तरी चांगले सिनेमे नक्कीच नागराजकडून बनत राहतील.

- सिनेमाच्या यशात संगीताचा मोठा वाटा आहे. नागराज ने सिनेमाचं श्रेय अजय अतुलला दिल्याचं दिसत नाही.----->> अस नाहि वाटत... जवळपास सर्व मुलाखतीत त्यन्नि अजय अतुल यांचा उल्लेख केला आहे... स्वतहून नाही पन जेव्हा चित्रपटाच्या संगितचा विषय आला तेव्हा तर नक्किच केला आहे..

सुरूवातीच्या प्रमोशनच्या मुलाखतींमधे स्वतः अजय अतुल होते. त्या वेळी सिनेमा एव्हढा यशस्वी होईल याची कल्पना कुणालाही नव्हती. अलिकडेच रवीशकुमार ने घेतलेली नागराजची मुलाखत ही प्रमोशन नव्हती. त्यात त्याने दोघांचाही उल्लेख केलेला नाही. उलट गाणी सिनेमाला मारक आहेत हे मत मांडलंय. एबीपी माझा च्या कट्ट्यावर पण संगीतकारांचा उल्लेख नाही केलेला. कदाचित मी मिस केले असेल तर ठाऊक नाही. पण लोकांच्या सवयींबद्दल तेव्हांही तो बोलला होता.

अर्थात, त्याचे म्हणणे योग्यच आहे. सिनेमात गाणी असलीच पाहिजेत असं काही नाही. त्याशिवायही जगभर सर्वत्र सिनेमे धंदा करतातच.

सिनेमाची जाहिरातच "अ‍ॅन अजय-अतुल म्युझिकल" अशी केलेली आहे. त्यामुळे उल्लेख नाही वगैरे पटत नाही.

- झी वाले नागराजला पुढच्या सिनेमाला का पाठबळ देणार नाहीत असे वाटते? त्याच्या सिनेमाने ४ कोटींच्या इनव्हेस्टमेंटवर २५ पटींनी रीटर्न्स दिले असताना?

- नागराजच्या पुढील परफॉर्मन्सची गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही. किंबहुना तशी कोणाचीच देता येत नाही. त्यानेच एका मुलाखतीत सांगितलेले आठवले "तुम्ही काय परफॉर्म करताय हे फक्त तुमच्या फ्रेम मधून दिसते" फ्रेमच्या बाहेर तुम्ही काय करता ह्याला महत्व नाही.

सुधाकर, कुतुब ह्यांचेही त्याने योग्य तिथे श्रेय दिलेले आहे. एका मुलाखतीत तर हे दोघे, रींकू आणि नागराज सोबतच सिनेमावर बोलत होते.

सैराट ची निर्मीती ही 'समसमा संयोग की जाहला' प्रकाराचे समर्पक उदाहरण म्हणून देता येईल

नेत्रसुखद छायाचित्रण, सुश्राव्य संगीत / गाणी, सहज सुंदर अभिनय आणि ह्यासगळ्याची मोटली बारीक सारीक तपशीलासकट बांधणारे दिग्दर्शन ह्यांचा सुंदर मिलाफ आहे. ह्या सोन्याला सुगंध आहे आजच्या युगातल्या हमखास यशाच्या परवलीचा शब्द असलेल्या उत्तम मार्केटींगचा. जे झी ने केले.

नागराज मंजुळे हा जगाचे टक्केटोणपे खाल्यावरही कवीमनाला जपणारा, जमिनीवर पाय असणारा माणूस वाटतो. त्याच्या सैराटच्या यशानंतरच्याही कुठल्याच मुलाखतींमधे अहंकार गर्व अशा भावनांचे पुसटसे / ओझरते दर्शन झालेले दिसत नाही. त्याच्या मुलाखतींमधला संगीतकारांचा / कॅमेरामनच्या हातभाराचा अनुल्लेख हा सहेतुक वाटत नाही. खरेतर तो मुद्दामहून गोडमिट्टं प्रशंसापुर्ण बोलत नाही हेच किती बरे आणि खरे.

त्याने त्याचे सगळे पुढचे सिनेमे देखिल असेच स्वतःशी ईमान राखून करावेत / करू शकावे ह्यासाठी त्याला बळ मिळो हीच प्रार्थना !

याड लागलं............सैराटचं याडं लागलं!!
या धाग्यावर मस्त फोटो आहेत म्हणून इथेच लिहीते.

युट्युबवर वगैरे पायरेटेट बघू नका. मोठ्या स्क्रीनवर बघा. सिनेमॅटोग्राफी फार छान आहे. आणि त्याला जोड मिळाली आहे जबरी बॅकग्राउंड म्युझिक आणि अतिशय नैसर्गिक अभिनयाची. काही उदा देते. मला केवळ या दृश्यांसाठी परत परत पाहायला आवडेल. पण आमच्या शहरात एकच शो होता काल.

परश्या रानातून पळतो ते सगळे सीन्स - हिरवंगार रान आणि त्याची मनात अल्लड प्रेमाच्या गुदगुल्या होणारी expressions
सैराट झालं जी गाण्यात ते दोघे झेंडुच्या शेतात बसले आहेत तो सीन
जुनी दगडी विहीर आणि गडद पाणी - विहीरीची भव्यता, सौंदर्य काही सेकंदात डोळ्यात भरतं.
तो प्रोमो मधला सूर्याचा सीन तो तर अफलातून आहे
पक्षी उडण्याचे बरेच सीन आहेत - ते ते त्या त्या प्रसंगाला अनुसरून हळवे, सुंदर किंवा गोळीबारानंतर भयाण वाटतात.
हैदराबादला स्टेशनचा शॉट एका सेकंदात वास्तवात आणतो.
आणि हैदराबादची (पुण्यातल्या पर्वतीची) ती बकाल वस्ती वास्तव अंगावर आणते.

बाकी सगळं - संगीत, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन वगैरे वर बरंच बोलणं झालंय त्यामुळे रीपीट नको. पण सिनेमा मोजक्या १० त गेला. Happy

धनश्री + १
मध्यंतरानतंरचं शुटिंग इतकं डिटेल मध्ये घेतलयं की प्रत्येकवेळा काहीतरी नवीन पैलु दिसतो , मंजुळेना हॅट्स ऑफ.

आज सैराट मूडच आहे. परत परत काहीतरी लिहावं वाटतंय. स्मित
बाकीचं सगळं कास्टिंग बेश्ट झालंय पण मंग्या प्रिन्स हवा होता असं वाटलं. प्रिन्स म्हणजे सूरजने आधी काम खूप चांगलं केलंय पण या सिनेमात तो कमी वाटतो. कलाकार म्हणून नाही पण पात्राची जशी आवश्यकता आहे - पाटलाचा मुलगा, गावातली पॉवर पार्टी, ती गुर्मी तो माज आर्चीत दिसतो पण प्रिन्स कमी पडतो.
शरीरयष्टी, रंग, उंची इ.इ. फॅक्टर लावले तर तात्या पाटलाचा मुलगा म्हणून मंग्याच (म्हणजे तो कलाकार) शोभला असता.

कलाकार म्हणून नाही पण पात्राची जशी आवश्यकता आहे - पाटलाचा मुलगा, गावातली पॉवर पार्टी, ती गुर्मी तो माज आर्चीत दिसतो पण प्रिन्स कमी पडतो.
>>

हो. जो माज, गुर्मी अार्चीच्या वडिलांनी दाखवली आहे, त्याच्या अासपास पण नाही जात प्रिन्स.
इतरांच्या तुलनेत बराच फिका वाटला त्याचा अभिनय.

धनश्री, मंग्या पण कदाचित नसता शोभला पण प्रिन्स रंग, उंची, ठेवण ह्याबाबतीत त्यांचा मुलगा म्हणून शोभत नाही ह्याबद्दल + १००
अभिनयात कमी पडला असं नाही वाटलं. आतल्या गाठीचा दाखवलाय तो. शिवाय तापट असला तरी एकीकडे थंड डोक्याने कृत्य करणारा, माजुरडा. ते बरोबर उतरलंय त्याच्या देहबोलीत.

धनश्री, मंग्या पण कदाचित नसता शोभला पण प्रिन्स रंग, उंची, ठेवण ह्याबाबतीत त्यांचा मुलगा म्हणून शोभत नाही ह्याबद्दल + १००
अभिनयात कमी पडला असं नाही वाटलं. आतल्या गाठीचा दाखवलाय तो. शिवाय तापट असला तरी एकीकडे थंड डोक्याने कृत्य करणारा, माजुरडा. ते बरोबर उतरलंय त्याच्या देहबोलीत.

आतल्या गाठीचा दाखवलाय तो.
>>
हो. बरोबर अगो. म्हणून त्याला जास्त डायलाॅग पण दिले नसावेत.

प्रिन्स फाटक्या अंगकाठीचा दाखवलाय ते बरोबर आहे, बिल्ड बॉडी नसताना बापाच्या दबदब्यामुळे माज करणं, ठंड पणे परश्या आणि मित्रांना मारहाण, बापाच्या वयाच्या परश्याच्या बापाला उर्मटपणे तुझं आळतनं कुठाय म्हणून दरडावनं(या शब्दाचा नक्की अर्थ काय बाय द वे) हे सर्व त्याच्या फाटक्या लुकड्या अंगकाठीमुळे जास्त नजरेत भरतं.

प्रिन्स! म्हणजे फॅन्ड्रितला पिर्‍या आहे ना! तो फॅन्ड्रित केवढासा वाटतो आणि चेहरा पण निरागस आहे अगदी, त्यामानाने इथे बराच बदल दिसतोय त्याच्यात.
फॅन्द्रितल गाण पण मजेशिर आहे त्याच" तुझा झगा ग झगा ग .."

Pages