फुकटेगिरीतली मौजमजा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 June, 2016 - 16:26

कितीही पैसे ओतले तरी फुकट खायची मजा विकत घेता येत नाही Happy

मग ते फुकट खाणे असो, फुकट पिकनिकला जाणे असो, किंवा फुकटात कुठेतरी रहाने असो ..

आयुष्यात कधी फुकटेगिरीतून आनंद उचलला असेल तर ते तेवढ्याच आनंदाने इथे शेअर करून तो आनंद द्विगुणित करा.

सुरुवात करून देतो ..

आमचे कॉलेज सुटल्यावर तासा दिडतासाने म्हणजे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कॅन्टीनमध्ये उरल्यासुरल्या खाद्यपदार्थांचे फुकटात वाटप व्हायचे. बटाटावडे, समोसे, भज्या हे प्रामुख्याने असायचे, तर सोबत ईडलीवडे, शिरा, उपमा अन पोहे सुद्धा कमी अधिक प्रमाणात मिळून जायचे.

साडेसहाला वाटप होणार तर सहा-सव्वासहा वाजताच आम्ही उपाशीतापाशी मित्रमंडळ कॅन्टीनपाशी जमा व्हायचो. एखादा फंटर काऊंटरवर चक्कर मारून आज किती माल शिल्लक आहे याची नजरेनेच मोजदाद करून यायचा. कधी जर स्टॉक कमी आणि गर्दी जास्त असेल तर बाह्या सरसावून सारे तयार व्हायचो. तसे कितीही असले तरी बाह्या सरसावल्या जायच्याच कारण स्पेशल आयटमवर सर्वांचाच डोळा असायचा. त्या गर्दीत जो सर्वात पुढे त्याला चॉईस सगळ्यात जास्त, हा साधा हिशोब होता.
सव्वासहानंतर जी मुले पैसे देऊन विकतचे खायला यायची त्या बड्या बापाच्या पोरांना आम्ही खाऊ की गिळू नजरेने बघायचो. कारण त्यामुळे आमच्या वाट्याचे खाणे कमी व्हायचे.

असो, तर सहा-पंचवीस झाले रे झाले की काऊंटरवर गर्दी करायला सुरुवात. पुढचे पाच मिनिटे.. "माsलssक, माssलक .. क्लॅप क्लॅप क्लॅप".. अश्या घोषणा आणि टाळ्यांनी कॅन्टीनच्या मालकाला चढवले जायचे. साडेसहाच्या ठोक्याला त्याने कॅन्टीनच्या पोरांना 'हम्म आता वाटा या फुकट्यांना' असा इशारा दिला की आरोळ्या देत, कॅन्टीनमध्ये उपस्थित पोरीबाळींसमोर आपले ईम्प्रेशन डाऊन तर नाही ना होत याचा विचार न करता, आम्ही त्यांच्यावर तुटून पडायचो. फुल्ल सत्ते पे सत्ता स्टाईल. त्यांनी वाटायच्या आतच एकेकाच्या हातातून हिसकावून घ्यायचो. त्यांनी चांगलेचुंगले पदार्थ आमच्यासाठी राखून ठेवावेत यासाठी कॅन्टीनच्या पोरांना आधीच पटवून सेटींगही लावल्या जायच्या. फार काही नाही, त्यांच्या तंबाखू चुन्याची सोय आणखी कुठूनतरी करणे एवढेच पुरेसे ठरायचे.

मग जमा झालेला ऐवज घेऊन आमचा भलमोठा ग्रूप दोनतीन टेबल एकत्र जोडून बसायचा. ज्याने जास्त जमवले त्याचे कौतुक आणि ज्याने कमी आणले त्याला शिव्या देऊन झाल्यावर मग मात्र अफाट मैत्रीचे उदाहरण देत हावरटपणा न करता प्रत्येकाला एकसमान खायची संधी देत आरामात चवीचवीने समूहखान केले जायचे. एखादा राजा उदार व्हायचा आणि आपल्या खिशातून तीसचाळीस रुपये काढून पोरांसाठी चहाची ऑर्डर द्यायचा. मी चहाचा अट्टल शौकीन असल्याने हे राजेपद मी देखील बरेचदा मिरवायचो. प्रत्येकी पंचवीस-तीस रुपयांचे फुकट खाउन झाल्यावर तो तिनेक रुपयांची कटींग चहा भले स्वत:च्या खिशातून का आला असेना एकंदर पार्टीची लज्जत वाढवायचा.

अपवाद वगळता हे रोजच व्हायचे. अपवाद वगळता आम्ही ठरलेले मेंबर तिथे रोजच जमायचो. दोघातिघांची घरची परीस्थिती अशी होती की बाबांना सांगून ते कॅन्टीन विकत घेतील. पण कसलीही घमेंड नसल्याने या खादाडीची मजा त्यांनीही आमच्याईतकीच लुटली.

आता पुन्हा हे असे करणे जमेल की नाही माहीत नाही. जमले तरी तितकीच मजा येईल की नाही ठाऊक नाही. पण अश्या कैक आठवणी जागवणारे प्रतिसाद माझ्याकडून या धाग्यात नक्की येतील.. तुमचेही कोणाचे असे किस्से असतील तर येऊ द्या. लाजलात तर थिजलात Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कॉलेज च्या मागे जवळच देऊळ होते..तिथे लोक पेढ़े अन नारळ द्यायचे. तिथला पुजारी दुपारी जेवायला घरी जायचा आणि आम्ही आमचे डबे घेऊन देवळात जायचो .नेमके त्या वेळी कोणीतरी भक्त यायचेच आणि आम्ही त्यांची पाठ वळली की लग्ग्गेच् पेढ़े ताब्यात घ्यायचो आणि सावकाशिने खायचो..हळू हळू पूजार्याच्या लक्षात आले अन मग तो पण डबा घेऊन यायचा नंतर नंतर आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय पण बंद केली त्याने Lol

अरेरे, काय हे?!
एका बाजूला म्हणायचे भारतात श्रीमंती वाढली आहे नि इकडे चांगले शिकले सवरलेले लोक फुकट अन्नासाठी असले धंदे करतात! कुणा कॉलेज शिकलेल्या मुलाला वाटले नाही की आपण कँटिनच्या मालकाबरोबर संगनमत करून ते उरलेले अन्न गरीब वस्तीत जाऊन वाटावे?

वाईट, वाईट!
असो. असेच चालायचे - सगळे मला, मला हव्यासाने!

निदान ६:२५ ला क्यू करून तरी उभे रहाता का? आमच्याकडे असे गरीब, न शिकलेले अनेक दिवसाचे भुकेले लोक सुद्धा क्यू करून उभे रहातात. बघतो मी दर सोमवारी - जेंव्हा ११ वाजेपर्यंत न संपलेले ताजे पाव, नि बेकरीतले इतर ताजे पदार्थ अश्या गरीब लोकांना वाटण्याच्या ठिकाणी वाटप करायला मी अधून मधून जातो.

मला वाटले भारतीय संस्कृति फार उच्च असेल - असे काही दिसत नाही. पैसा असो, शिक्षण असो - माणसे आपली जंगलीच. कसली संस्कृति नि कसले काय!!

भारी केलिय की मौजमजा..
मी आदी चा अनुभव पण छान पण किमान पुजार्‍याच्या पोटावर तरी पाय द्यायला नको होते तेच बिचारे दान दक्षिणेवर जगतात त्यात त्यांचे काय हिसकवायचे..

यात कसली मौज मजा ?
फुकटेगिरी ,उधारी, उसनवारी, बुडवेगिरी यात मौजमजा वाटण्यासारखे कधी काही वाटले नाही.

काल शिवसेनेतर्फे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम होता. चांगले चांगले लोक जमले होते. रस्ता अडला होता. आम्ही त्या गर्दीतून वाट काढत स्टेशनरीच्या दुकानात चाललो होतो. ते वह्या वाटप गरीबांसाठी, गरजूंसाठी होतं. ज्यांना विकत घेणं शक्य आहे त्यांनी सुद्धा रांगा लावाव्यात याचं नवल नाही वाटलं. जगात काही फुकट नसतं. आता निवडणुका झाल्यावर याची किंमत द्यावी लागेलच..

सकुरा..पोटावर पाय वगैरे नाही ओ..आम्ही दक्षीणे कड़े पहायचो ही नाही..दुपारच्या१ तासाच्या वेळेत येणारे पेढ़े फक्त घ्यायचो..
महाडचे कॉलेज आणि मंदिर गावापासून खुप लांब आहे त्यामुळे गरीब /लहान मुले वगैरे तिकडे नासयचीस नैतर त्याना वाटा नक्कीच दिला असता..
आणि आपण" हे फुकट खातोय" ही भावना मनाच्या कोपर्यात पण नसायची..आपण काहीतरी मजेचे करतोय आणि कोणाचेही मोठे नुकसान नाहीये हेच माहित होते आम्हाला..नाहीतर देवळातील पैसे पण उचलले असते की

ऋन्मेष.. अजिबात अपील नाही झालं.. रादर इट्स disgusting behaviour!!!

जाऊ दे.. या विषयावर जास्त लिहिलं तर ऑफेंसिव होईल..

सारासार विवेक बाजुला ठेऊन हे कृत्य बघितले तर मौज केली असे म्हणता येईल.

पण विवेकबुध्दी ने विचार केल्यास..... धत तेरे की... कॉलेज लाईफ मध्ये कसलं आलंय फिलॉसॉफी.. ते सुद्धा संध्याकाळी ाआ आणी परत स्थळ कोणते तर कँटीन..... म्हणजे फुल टु मस्ती

======

मी कॉलेजला असताना जेव्हा केव्हा कँटीन ला जात असे तेव्हा दरवाज्यातुन पहिली नजर ही आपला कोणता जवळचा मित्र आहे हे बघण्यात जाई. कोणी जर असेलतर त्याची प्लेट मी हादडलीच म्हणुन समजा. पण जर कोणी नसेल तर मग गपगुमानं समोसा.. पोहे.. वा इतरजे काही पदार्थ असेलतर ते विकत घेऊन बसायचो.
पण त्यात ही मी जर कोणी नाही हे बघुन बसलो तर माझे इतर मित्र त्याक्षणी येऊन मला "उपाशी" ठेवण्यासाठी हातभार लावत.

सबब,हे असले प्रकार सर्रास घडणारे किरकोळ पण आठवणीतले प्रसंग आहे

{{{ कॅन्टीनमध्ये उपस्थित पोरीबाळींसमोर आपले ईम्प्रेशन डाऊन तर नाही ना होत याचा विचार न करता, आम्ही त्यांच्यावर तुटून पडायचो. }}}

वाक्याचा भलताच अर्थ निघतोय. जरा वाक्यरचना बदलता आली तर पाहावे.

अमेरिकेत जाऊन श्रीमंत झालेले काही लोक बहुदा स्वत:च्या संपत्तीचे दान दर रविवारी टाईम्स स्क्वेअर वर स्टॉल लावून करतात. धन्य ते लोक Happy

हो. हे काही जणांना आवडणार नाही असे होऊ शकते. प्रत्येकाची दुनिया आणि विचार वेगळे असतात आणि त्यानुसार द्रुष्टीकोण बदलतात.
माझ्या नजरेतून पाहता आज मलाही असे वागायला जमणार नाही असे मी लिहिलेच आहे. पण जे तेव्हा केले त्यातही वावगे वाटत नाहीये. कुठे लूट टाकणे किंवा कोणाचा हक्क मारणे असा कुठलाही प्रकार त्यात नाहीये.
वर कोणीतरी सांगितल्याप्रमाणे ते एखाद्या गरीबाला देण्याचा विचार आवडला. हे तेव्हा का सुचले नाही याचा खेदही वाटला. पण कदाचित आम्ही स्वतालाच तेव्हा गरजवंत समजत असू. कारण दिवसरात्र आम्ही कॉलेजवरच पडलेलो असायचो. कधी टाईमपाससाठी तर कधी अभ्यासासाठी. अपवाद वगळता सर्वांचाच पॉकेटमनी जेमतेम. आणि ईतर गरजा दाबल्या तरी भूकेची सोय करावी लागायचीच. मग कोणाकडे आज किती पैसे आहेत याचा हिशोब घेत त्यात खाणेपिणे बसवताना हि संध्याकाळची पोटभरी कामाला यायची.

पण आतापर्यंतचे प्रतिसाद पाहून आता ईतर कोणी आपले अनुभव लिहायला धजावणार नाही असे वाटते.

हो मला पण आठवल.. आम्ही ( मुली) कॉलेज मधे रोज डब्बा घेउन जायचो . आणी मुले आमच्या डब्ब्यावर ताव मारायची. पण काही वाटायचे नाही . चहा पिताना पण शेअर करुनच...खुप मस्त वाटतय .. क्या मस्त मजेचे दिवस होते... कोण काय म्ह्णेल वगैरे भावना मनाला शिवत नव्हत्या....निखळ आनद...

ऋन्मेऽऽष ...धागा काढुन मजा आणलीत....

काल शिवसेनेतर्फे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम होता. चांगले चांगले लोक जमले होते.
>>>>>>

कदाचित आपला अंदाज बरोबरही असेल, पण चांगले चांगले लोक हे आपण कश्याच्या आधारे ठरवले. पेहरावावरून का? शक्यतो मध्यमवर्गीय लोकं या रांगेत जास्त आढळतात. ते योग्यच आहे. कारण ज्यांची परिस्थिती ईतकी वाईट असते की ज्यांची मुले शिकतही नसतात असे या रांगेत नसणारच.
सध्याच्या महागाईमुळे लोकांचे डाळभात खायचे वांधे झालेत, मुलांच्या शिक्षणाचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढलाय, खाजगी क्लासेसमध्ये टाकावेच लागते कारण शिक्षणाचा दर्जा घसरलाय, स्पर्धाही तितकीच तीव्र झालीय. अश्यात जर किमान वह्या तरी मोफत मिळत असतील तर तो चांगल्या चांगल्या लोकांनाही आधार वाटणारच.

असो यावर चर्चा करून हलक्याफुलक्या मनोरंजनाच्या धाग्याला गंभीर वळण लावायचा हेतू नाही. लांबून बघताना कोणाची खरेच गरज काय आहे हे तुम्हीआम्ही जज करू शकत नाही ईतकेच सांगायचे होते Happy

सुहास्य, येस्स... एकत्र डब्बा खाणे, लेक्चर चालू असतानाच मित्राच्या बॅगेतला डब्बा लंपास करून भर लेक्चरमध्येच खाणे, चांगला डबा घेऊन दोघातिघांनी पळ काढणे, हॉस्टेलच्या मुलांनी आमच्याच डब्यात खाणे, कधी मुलींच्या ग्रूपमध्ये डबा खायला जाऊन धिंगाणा घालणे आणि अर्थातच त्यांनाही एंजॉय करवणे..

कॅन्टीनमध्ये वा त्याजवळच्या डबा खायच्या जागेत बरेच जण केक वगैरे कापून बर्थ डे सेलिब्रेट करायचे. आम्ही दोघेतिघे मित्र होतो जे बिनधास्त त्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये घुसायचो. मुलाचा बर्थडे असो वा मुलीचा. हॅपी बर्थडे गात चीअर करत माहौल बनवायला हातभार लावायचो आणि मग मस्त केकवर ताव मारून यायचो.
यात मला स्वताला केक आवडत नाही. पण ती धमाल करणे आवडायचे Happy

पण चांगले चांगले लोक हे आपण कश्याच्या आधारे ठरवले. पेहरावावरून का? >>> बरं, तू सांग कि ते चांगले होते कि नव्हते ते ? तुला नक्किच माझ्यापेक्षा जास्त चांगले माहीत असणार.

वितंडा आवडत असेल तर चालू दे.

ऋ न्मेष माझ्याकडून मात्र खुप खुप थांकु हा..आज परत खुउउप खूप दिवसांनी आमच्या जुन्या आठवनीना उजाळा मिळाला आणि आज दिवसभर आमची ग्रुप वर तिच चर्चा होती...कॉलेज मधे केलेली सगळी धम्म्माल
so थैंक्स

खुप छान...अगदी पूर्ण सीन डोळ्यांसमोर उभा राहिला...अगदी तुमच्या त्या वेळच्या ' expressions' सहित...पाच-दहा वर्षांपूर्वीचं काॅलेज लाइफ थोड्याफार फरकाने असंच होतं सगळ्यांसाठी...अर्थात ज्यांच्यासाठी असं नव्हतं,त्यांची प्रतिक्रिया 'प्रतिकूल' असणं स्वाभाविक आहे.

आज दिवसभर आमची ग्रुप वर तिच चर्चा होती...
>>>
+७८६
मी हा अनुभव ३ ग्रूप वर घेतला. पैकी एकात वरचीच सामील मुले Happy

अक्की धन्यवाद
धागा वर काढल्याबद्दल
कोणी ईथे लग्नातही घुसून फुकट जेवले नाहीये का?
थ्री ईडियटसमधील आमीरखा आणि माधवनसारखे Happy
ते बघायला ईतकी मजा आलेली. मग खरया अनुभवात किती मजा येत असेल विचार करा.. फुकटातल्या जेवणाची मजा तर असतेच. पण ईथे सोबत एक थ्रिल सुद्धा असते.
आमच्या कॉलेजशेजारी एक मैदान हॉल होता. तिथे बरेचदा सिंधी गुजराती मारवाडी वगैरे नॉन महाराष्ट्रीय समाजाची लग्ने व्हायची. तिथे आम्ही तीन मित्रांचे टोळके बरेचदा तृप्त झालो आहोत. गंमत म्हणजे त्यांच्यातील वाटायला आम्ही झगमग कपडे घालून यायचो, जे नेहमीचेच ठरलेले असायचे Happy

शेजारी मैत्रिणींकडे खेळायला गेल्यावर त्यांच्याकडे काही जेवणाखाणाची तयारी सुरु झाली तर तात्काळ घरी निघून यायचे हा दंडक होता. कोणी घरी तर खात-पीत असताना ताटकळायचे नाही अशी कडक शिस्त होती.

राजसी आमच्याकडे लहानपणी, म्हणजे दक्षिण मुंबई चाळ संस्कृतीत शेजारयांकडे लहान मुलांनी खाणेपिणे मस्ती करणे खूप कॉमन होते. मुळात कोणाच्या घराचे दरवाजे बंद व्हायचे नाही. जेवताना लोटले जायचे पण कडी लागायची नाही.

येनीवेज, बट यू आर मिसिंग द क्ल्यू गाईज.. आपल्याच शेजारयांकडे मुद्दाम जेवणाच्या वेळी जाणे आणि लोचटसारखे खाणे हे असे कोणी करत असेल तरी ते या धाग्यावर अपेक्षित नाही. या फुकट खाण्यात ती धमाल नाही जी ईथे या धाग्यावर अपेक्षित आहे.

बर्रं कोणी कॉलेजला असताना ओळखपाळख नसलेल्या ग्रूपच्या बर्थडे पार्टीत केक खायला घुसले आहे का? अर्थात लपूनछपून नाही तर बिनधास्त त्यांच्यासोबत हॅपीबड्डे साँग गात बड्डे बॉय गर्लला विश करत..

दुसऱ्याकडे खायचं नाही/ जेवायच्या-खायच्या वेळेला जायचं नाही - हे बिंबवले / बिंबले आहेत अजूनही झोपेत सुद्धा डोकं तसाच विचार करत. मला तरी कुठेही आमंत्रण असल्याशिवाय जाऊन खाण ह्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसेल. चुकुन ऐनवेळेस गेल्यामुळे फुकट मिळालं तरी घशाखाली जाणार नाही. घशाखाली गेलं नाही म्हणून घेऊन टाकण्यापेक्षा आत्ता खाऊन आले, उपास आहे पासून काहीही कारण सांगीन पण खाणार नाही. फुकटेपणातली मजा not for me and not for my childhood friends.

इकडचे (कोतबो वगैरे) फुकटचे सल्ले घेण्यात / देण्यातसुद्धा फुकटेगिरीतली मौजमजा दडलेली असावी काय ! Lol

बालाजीनगरमध्ये शंकर महाराज मठात संध्याकाळची आरती झाल्यावर प्रसादाचा शिरा मिळत असे. आम्ही मैत्रिणी मिळुन जायचो खायला Happy

Pages