परीकथेची दोन सव्वा दोन वर्षे - भाग ८

Submitted by तुमचा अभिषेक on 1 June, 2016 - 11:16

९ एप्रिल २०१६

आजी आजोबांनी नातवंडांचे हात धरून अक्षरे गिरवायला शिकवायचा काळ केव्हाच ईतिहासजमा झालाय.
सध्या आमच्या रात्रशाळेत प्रौढशिक्षणाचे वर्ग भरतात.
ज्यात परी आजीआजोबांचे बोट पकडून त्यांना स्मार्टफोन वापरायला शिकवते Happy

.
.

१७ एप्रिल २०१६

बाबड्या चुरूचुरू बोलायला लागलीय तशी कॉमेडी, आगाऊ आणि बरेच काही झालीय. प्रत्येक गोष्टीत आपले लॉजिक लावू लागलीय.

त्या दिवशी गार्डनमध्ये आम्ही पकडापकडी खेळत होतो. तिच्या हाताला सहजी लागणार नाही एवढा वेग ठेवून मी पळत होतो. मी पुढे पुढे, ती मागे मागे. थोड्याच वेळात ती समजली, की पप्पाला काही आपण पकडत नाही. तसे म्हणाली, "जास्त नको पळू. थोडे थोडे पळ. परी पकडणार Happy

आजोबांच्या गालावरच्या खुरट्या दाढीवरून हात फिरवत म्हणते कशी, "हे छोटे छोटे काय आहे? पप्पांचे किती मोठे मोठे आहे Happy

सध्या घडी घालायचे प्रशिक्षण चालू आहे. रुमालाची घडी जमू लागली तसे मोठ्या चादरीला हात घातला. पण पंख्याच्या वार्याने चादर सैरावैरा फडफडू लागली. तसे हिची सुद्धा चुळबुळ सुरू झाली.. "घडी घालायची आहे, फॅन बंद करा.. हवा नकोय Happy

सध्या ती सोफ्याखालचे ड्रॉवर उघडून त्यावर चालायचा खेळ करतेय. त्याचे कवर स्टीलच्या पट्ट्यांचे बनलेय. पट्ट्यांची रुंदी तिच्या पायाच्या अंगठ्याएवढी आहे आणि त्यातील फट माझ्या पायाएवढी. म्हणजे तिचा पाय त्या पट्टीच्या बाहेर सरकला की ती सरळ आत. कारण ते चालायला नाही तर त्यातील चादरी बाहेर काढायला तसे बनवले आहे. पण आम्ही चालतो. डोंबार्याचा खेळच जणू. परवा अशीच त्यावरून चालत होती आणि मी जवळ सोफ्यावरच बसलो होतो. चालताना तिचा पाय सरकला आणि तोल डगमगला. कसाबसा सोफ्याचा आधार घेत तिचा तिनेच तो सावरला. आणि मला म्हणाली, "अरे पकड ना मला.. मी पडेन ना.. बाबड्या, तू सरदार आहेस.. Happy

आणि काल तर आगाऊपणाचा कहर केला. एकीकडे आम्ही घरातल्या घरात बॅटबॉल खेळत होतो. आणि दुसरीकडे आयपीएलची मॅच चालू होती. मुंबई विरुद्ध गुजरात. अत्यंत अटीतटीचा सामना आणि शेवटच्या दोनचार ओव्हर्स. त्यामुळे तिच्याशी क्रिकेट खेळत असताना माझे अर्धेअधिक लक्ष टीव्हीवरच्या क्रिकेटवरच जात होते. तसे शेवटी ती चिडून म्हणाली, "मॅच नको बघू. फटके देईन Happy

.
.

१ मे २०१६

जन्म एका मुलीला दिला आहे, पण फिरवायला तीन पोरींना लागते.
परी, पिंक जोजो आणि येल्लो जोजो Happy
त्यातही पिंक जोजो फेवरेट!
जे आमच्यासाठी परी आहे तेच परीसाठी पिंक जोजो आहे. ती परीची सख्खी बाहुली आहे आणि येल्लो जोजो सावत्र.
म्हणून ती काल फक्त पिंक जोजोलाच गार्डनमध्ये घेऊन गेली आणि तिला लहान बाबूसारखे घसरगुंडी खेळवून आली Happy

.
.

८ मे २०१६

जिथे आमचा शब्दकोष संपतो तिथे ती सुरू होते.
पण तरीही थोडेफार,
आज्जी’स फेव्हरेट डायलॉग :

- परे परे.. काय करायचे तुझे
- बघ बघ, कसली धुडतर मुलगी आहे
- अशी कशी ग्ग तू परी
- बघ आहे आहे.. जरा भिती नाही जिवाची
- परे तुला मार देईन हा आता
- देऊ, देऊ का एक धपाटा
- बाई ग्ग, कसली मुलगी आहे ही.. जरा म्हणून पर्वा नाही.
- काय करायचे आता या पोरीचे
- पात्र आहे नुसते देवाघरचे
- एक नंबरची नाटकी आहे. ही मिमिक्री आर्टीस्ट चांगली बनेल.
- अरे रामा.. कमाल आहे या पोरीची
- मध्येच संचारते का ग्ग तुझ्या अंगात
- आलं आलं.. अंगात वेड आलं
- शॅम्पल आहे नुसती
- धन्य आहे या पोरीची
- लबाड मुलगी आहे
- आली आली आमची कॉमेडी एक्स्प्रेस आली
- बाबा रे, देवाने कसे घडवले हिला काय माहीत..
- नुसती धावा धाव, नुसती धावा धाव. सरळ चालायचे माहीतच नाही या पोरीला.
- परे, तुझ्या ना अंगात नखरे फार

अ‍ॅण्ड देन बेस्ट ऑफ ऑल .. "अरे देवाऽऽ"

आणि आजीने असे म्हणताच परी आपले दोन्ही हात डोक्यावर मारणार Happy

Happy " Happy Mother's & Grandmother's Day " Happy

.
.

९ मे २०१६

परी इफेक्ट !

सध्या आमच्याकडे ईथून तिथून उड्या मारणे चालू असते. जिन्याच्या सगळ्या पायर्‍या इज्जत मध्ये एक दोन तीन आकडे मोजत उतरल्या जातात. शेवटच्या पायरीवरून मात्र जंप मारली जाते. दिसला उंबरठा की सश्यासारखी दोन पायांची उडी मारूनच आत प्रवेश करावा लागतो. दिसला अडथळा की तो तसाच पार करावा लागतो. या खुर्चीवरून त्या खुर्चीवर देखील मधल्या हाताच्या दांड्याला धक्का न लावता उडी मारले जाते. या नादात कधी जरा जरी पाय अडखळला तर.......

या तर ची आम्हाला पर्वाच नसते.
तर.. आज मी ऑफिसहून घरी येत होतो. बिल्डींगखालीच परी भेटली. तिच्या मावशीबरोबर गार्डनला खेळायला जात होती. त्यांना टाटा बायबाय करून मी बिल्डींगच्या मागे गेलो. तिथे परीने दुपारी खिडकीतून फेकलेले रुमाल, मोजे असे ढीगभर कपडे गोळा केले आणि परतू लागलो. बिल्डींगच्या आत शिरताना गेटचा उंबरठा दिसला. नुकतेच परी भेटल्याने आणि हातात परीचे कपडे असल्याने डोक्यातही परीचेच विचार चालू होते. बस्स त्याच नादात चालता चालता सहजच तो उंबरठा जवळ आला तसे दोन पाय उचलून टुणकन त्यावरून उडी मारत पार झालो. उडी मारताना आणि मारल्याक्षणीच माझ्या डोक्यात आले, अरे बाबा काय वेडेपणा केलास. लगेच चाचपून मागे इथे तिथे बघितले. नशीब थोर माझे कोणी हे पाहिले नव्हते. पण तिथून घरी जाताना आणि घरी जाऊन परीच्या आईला हा ‘परी इफेक्टचा’ किस्सा सांगताना मनात आले, मोठे होता होता अश्या किती छोट्या मोठ्या गोष्टींतील छोटा छोटा आनंद आपण मागे सोडत जातो..

.
.

२८ मे २०१६

मम्माज मोबाईल - परीच्या हातात
Unlock ..
Phone ..
Call Log ..
Abhi ..
Dial ..
Speaker ..

ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग ..

"हेल्लो पप्पाऽऽ .. मी तुला किऽऽती फोन केला"
" .... "

"तू कुठे आहेस?"
" ... "

"मला ऑफिसवरून येताना खाऊ घेऊन ये.."
" ... "

"केऽऽऽऽऽऽऽ क Happy "

...... याला खरे म्हणतात, स्मार्ट फोनचा स्मार्ट वापर,
...................संध्याकाळी पप्पा केक घेऊन हजर Happy

.
.

३० मे २०१६

बेडरूमची खिडकी दिवसा बंद ठेवायची की उघडी हा प्रश्नच आहे. बंद म्हटले तर गरम होते आणि उघडी ठेवायचे झाल्यास कुठल्या कपड्याचे कधी पाखरू बनेल काही सांगता येत नाही. आला मूड परीचा, गेला कपडा खिडकीबाहेर..

आजही तेच झाले! एक पाखरू उडाले. पण त्यानंतर प्रामाणिकपणाही दाखवला. कदाचित हे स्वत:च्या कामगिरीचे कौतुकही असू शकते. काही का असेना पण स्वत:च मम्मीला सांगितले की मी फ्रॉक खिडकीबाहेर फेकला. सोबत पिंक कलरचा फ्रॉक फेकला हे देखील सांगितले. कुठून कुठे फेकला ही जागाही दाखवला. आता एवढे डिटेल तर सीआयडीलाही कधी मिळत नाहीत. पण तरी मम्मीला बसल्या खिडकीतून फ्रॉक काही शोधता आला नाही.

मग काय, लागली पप्पांची ड्यूटी. ऑफिसातून येताना बिल्डींगच्या मागे जाऊन पडलेला फ्रॉक घेऊन यायची.

पप्पा बिचारे! बाजारातून येताना, जेव्हा तीनच्या वर वस्तू विकत आणायच्या असतात, तेव्हा मी एखादी तरी विसरतोच. आजही काही वस्तू विसरलो. ऑफिसची बॅग तशीच सोफ्यावर फेकली आणि पुन्हा त्या वस्तू आणायला खाली उतरलो. अर्थात पर्याय नव्हताच, कारण आज पडला सोमवार. बायकोचा ऊपवास. ऐकले नाही तर तिच्यासोबत आपलाही घडवायची. तसेच येता येता परीने टाकलेला फ्रॉकही आणायचा होताच.

परी मावशीबरोबर गार्डनला जायला निघत होती. तिला अडवून मी स्वत:ही एकदा पुन्हा विचारून कन्फर्म केले, की तिने पिंक फ्रॉकच टाकला होता. एक धपाटा घालायचा मोह होत होता, पण वात्सल्यापोटी आवरला. खाली जाऊन विसरलेल्या वस्तू तर घेऊन आलो, पण विचारांच्या नादात फ्रॉक बद्दल पुन्हा विसरलो.

तिसर्‍यांदा स्वत:वरच वैतागत खाली उतरलो. नशीब परी एव्हाना गार्डनला पोहोचली होती, नाहीतर आता धपाटा घालूनच निघालो असतो. त्रासलेल्या अवस्थेत शोधताना, फ्रॉक काही लवकर सापडत नव्हता. परीणामी आणखी चीडचीड होत होती. एकवेळ वाटले की फ्रॉक टाकलाच नसेल, काहीतरी दुसरेच टाकले असेल. पण परी फ्रॉक म्हणालीय म्हणजे फ्रॉकच असणार एवढा विश्वास तिने कमावलाय माझा. आणि ईतक्यात अखेर नजर पडलीच. क्षणभरासाठी का होईना, पोरीवर अविश्वास दाखवल्याचा पश्चाताप म्हणून कपाळावर एक हात मारला आणि तो फ्रॉक उचलून घराकडे निघालो.

बेल वाजवली. परीच्या आईने दरवाजा उघडला. तसे हातातला फ्रॉक तिच्यासमोर नाचवत म्हणालो, हाच का ग्ग तुझ्या पोरीचा फ्रॉक ...
आणि हो, हो, हाच हाच.. हाच तिचा फ्रॉक म्हणत ती फुटली.. नव्हे आम्ही दोघेही एकसाथच कोसळलो .. एकमेकांना टाळ्या देत पोट धरून खदखदून हसलो .. कारण परीने खिडकीबाहेर फेकलेला "पिंक फ्रॉक" हा खालच्या फोटोतील होता Happy

.
.

pink frock.jpgपरीकथा ० , परीकथा १ , परीकथा २ , परीकथा ३ , परीकथा ४ , परीकथा ५ , परीकथा ६ , परीकथा ७

- तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे तुमची ही सिरीज.

फक्त २-२.५ वर्षाच्या मुलांना सरदार हा शब्द माहित असणे व तो खिल्ली उडव्ण्यासाठी असतो हे माहित असणे हे मला धक्कादायक वाटले. प्लीज स्टिरिओटाईप्स टाळा व तसेच शिकवा.

खूप गोड हे ही..

बस्के +१ .. या वयात पाहिलेलं, ऐकलेलं सगळं सगळं अ‍ॅब्सॉर्ब होतं असतं डोक्यात, आता तुमची खरी कसरत सुरु होणारे !! प्रत्येक ,' का" चं उत्तर तुझ्याकडे असणं एक्सपेक्टेड आहे .

बस्के धन्यवाद,
शिकवले असे काही जात नाही. आमच्या तोंडचेच शब्द उचलते आणि आम्ही कधी वापरतो हे तिचे तीच एनालाईज करते. जसे मी माझा नेहमीचा धांदरटपणा केला तर बायको सरदार म्हणते अशी साधारण कल्पना असेल तिला. त्यानंतर मी तिला "सरदार नाही बाबड्या शूर सरदार" असे शिकवले तर तेव्हापासून सरदार शूर सरदार असे बॉन्ड जेम्स बॉन्ड सारखे बोलू लागली Happy
असाच एक शब्द पोपट. फजिती झाली की बोलायचा हे समजलेय. साधे उदाहरण द्यायचे झाल्यास आमच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तिची बॅटींग असताना जेव्हा तिच्या बॅटला बॉल लागत नाही तेव्हा ती पोपट बोलते. आता ती सचिन तेंडुलकर नसल्याने दहा पैकी आठ बॉल तिच्या बॅटला लागत नाहीत. त्यामुळे ही पोपटपंची चालूच असते.
आणखी एक शब्द बहिरया.. मी घरी माझ्याच तंद्रीत वावरत असल्याने पहिल्या हाकेला ओ द्यायचे चान्सेस शून्य परसेंट असतात. तीनचार हाकांनीही नाही ऐकले तर मला घरी बहिरया अशी हाक मारली जाते. सेम तीच करते. एकदोन हाकेत मी ऐकले नाही तर ए बहिरया आईक..

कालांतराने मजा संपली की ती हे शब्द वापरायचे बंद होईल. पुढे जाऊन तिला नव्याने याचे अर्थ समजतील. आणि हे एकेकाळी आपले वापरून झालेत हे देखील तिला आठवणार नाही.

मस्त आहे हे पण. पण अभिषेक काही ठिकाणी आत्ताच लगाम घाला हो... काय होत आत्ता वय लहान आहे म्हणुन हसण्यावारी सोडुन दिल जात आणि मग एकदा त्या सवयी मुलांच्या अंगवळणी पडल्या की त्याचा त्रास आपल्यालाच होतो, म्हणुन बाकी काही नाही....

बाकी परी गोड आहे यात वादच नाही.