मी : निळू फुले - पहिला भाग

Submitted by Admin-team on 21 August, 2009 - 02:40

१३ जुलै २००९... सकाळमध्ये निळू फुले यांच्या निधनाची बातमी वाचली आणि मनापासून खूप वाईट वाटलं.
निळू फुले हा मराठी रंगभूमीवरचा आणि चित्रपटातला एक ताकदीचा, सशक्त अभिनेता गेल्याचं दुख: तर होतच पण त्याचबरोबरीनं ’अरेरे, निळूभाऊ गेले यार’ ही ओळखीचं कोणीतरी माणूस गेल्याची जाणीव जास्त क्लेशदायक होती. कारण माझ्या किंवा माझ्या बहिणीच्या आठवणीतले निळू फुले हे आधी - कायम काही ना काही पुस्तक वाचताना दिसणारे किंवा हातात खुरपं धरून बागकाम करणारे "निळूभाऊ’ होते....नंतर मराठी नाटय-चित्रपट क्षेत्रातले एक आघाडीचे कलाकार निळू फुले !
माझ्या लहानपणापासून सुदैवानं मला अनेक ’मोठी’ लोकं पाहायला मिळाली...पण ज्या वयात या लोकांचा सहवास लाभला त्या वयात ’ती किती मोठी आहेत’ याची जाणीवपण नव्हती आणि आता जेव्हा ह्या लोकांचं काम, त्यांचं कर्तृत्व समजण्याइतपत, ते appreciate करण्याइतपत समज आलीये... ही लोकंच एका मागोमाग एक हे जग सोडून निघून जाताहेत.
कुठेतरी आपल्याही सरत्या वयाची जाणीव झाली निळू भाऊ गेले तेव्हा. त्यांच्या कामाविषयी त्यांना सांगायचं राहूनच गेलं असं वाटत राहिलं पुढचे काही दिवस.....
ह्याच विचारात असताना आठवण झाली बाबांनी किस्त्रीमच्या दिवाळी अंकासाठी १९८९ साली घेतलेल्या निळूभाऊंच्या मुलाखतीची. २० वर्षापूर्वी वाचलेली ती मुलाखत पुसटशी आठवत होते...परत एकदा निळूभाऊ काय ’चीज’ होते हे समजून घ्यावं म्हणून बाबांना ती मुलाखत scan करून पाठवायला सांगीतली. मुलाखत वाचताना निळू फुलेंनी साकारलेल्या अनेक भूमिकांमागची ’भूमिका’ उलगडत गेली... नव्यानी निळूभाउ समजत गेले..
आणि बोलता बोलता माझ्याही नकळत मी समीरला म्हणून गेले ’ ही मुलाखत interesting झालीये... लोकांनी वाचाली तर कदाचित पडद्यामागचे निळूभाउ कसे होते... आणि ते पडद्यावर जसे दिसले तसे का दिसले? हे लोकांना समजेल."

माझ्याही नकळत बोलला गेलेला हा विचार ’उचलून धरुन’ त्याला मूर्त स्वरूप देण्याचं आणि ही मुलाखत तुम्हा लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केल्याबद्दल सर्व स्वयंसेवकांचे मन:पूर्वक आभार !

- आरती रानडे

*************************************************

NiluPhule2.jpg

व्यावसायिक सिनेमा-नाटकांमधून स्थिरावलेला, चांगलं नाव कमावलेला एक नट म्हणून आज मी तुमच्यापुढं आहे. दोन-अडीचशे चित्रपटांमधून मी कामं केली आहेत. मराठीमध्ये केली तशीच हिंदीतही केली. कथा अकलेच्या कांद्याची, सूर्यास्त अशांसारख्या काही नाटकांचे प्रयोग अजूनही जोरात चालू आहेत. 'निळू फुले' या नावाला, व्यक्तिमत्वाला, सामान्यातल्या सामान्य मराठी माणसाच्या मनात कुठंतरी जागा आहे.

दुसर्‍या बाजूला समाजवादी चळवळीतला, सेवादलातील एक सक्रीय कार्यकर्ता, चळवळीचा एक हितचिंतक म्हणूनही माझा प्रवास सिनेमाबरोबरच घडला आहे. समाजातल्या उपेक्षित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी चाललेल्या या धडपडीत मीही माझ्या कुवतीनुसार आणि पद्धतीनुसार सहभागी झालो.
या दोन्ही क्षेत्रांतील प्रवासाबद्दल आज 'मागे वळून पाहताना' काय वाटतं? लहानपणात, तरूणपणात ह्या प्रवासाची बीजं कुठंकुठं होती हे ताडून पाहण्याचा माझा मीच केलेला हा प्रयत्न.

लहानपणातला माझा बराचसा काळ मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या बॉर्डरवर गेला. त्याचं कारण असं होतं की, आम्ही सर्व भावंडे आमच्या काकांकडे रहात असू. आर्थिक भार कमी व्हावा हे महत्वाचं कारण त्यामागे होतं. ते दिल्लीला नोकरीला होते, त्यांच्या बदल्या निरनिराळ्या ठिकाणी व्हायच्या. त्यांचा परिसर हा शक्यतो मध्यप्रदेश असाच राहिलेला आहे. त्यामुळे शाळेची पहिली दोन-तीन वर्षं मी इकडच्या शाळेतच काढली.

काकांना एकच मुलगा होता, पहिल्या पत्नीचा. ही पहिली जी पत्नी होती ती ज्योतीराव फुल्यांच्या अगदी जवळच्या नात्यातील होती. वाघोलीची. त्यांचं आडनाव वाघोले. ज्योतिबा फुल्यांच्या समुहात वाघोले येतात. सातबा वाघोले यांचा जो मुलगा, महादू वाघोले त्यांची ही मुलगी. ज्योतिबा फुल्यांच्या अगदी जवळची. चळवळीमध्ये तिच्या वडिलांनी खूप मदत केली असा उल्लेख आहे.

ही एक चळवळीसाठीची पार्श्वभूमी माझ्यापाशी आहे. घरामधलं वातावरण सांगायचं तर चुलते नास्तिकच होते. वडील आणि बाकीची मंडळी सगळी अतिशय आस्तिक होती. घरामध्ये वातावरण धार्मिक असायचं. काकांच्या वडिलांची जी आत्या होती ती विधवा होती. तिने आमचा सांभाळ केला. वडिलांचा व चुलत्यांचाही. सगळ्यांनी शिक्षण घ्यावं असा तिचा आग्रह होता. कारण तिला त्या चळवळींची जाणीव होती. शिक्षणाच्या बाबतीत, कुठल्याही पोराला तिनं कधी खुलं सोडलं नाही. माझी चार-पाच वर्षं चुलत्यांकडे गेली. अगदी जग समजायला लागल्यानंतरची. चुलते अतिशय रसिक, नाट्यसंगीत, त्यावेळचं संगीत म्हणजे अनिलांच्या कविता किंवा कांतांच्या किंवा जोशी म्हणून गायक होते या सगळ्यांच्या ज्या रेकॉर्डस् होत्या त्या सगळ्या चुलत्यांकडे होत्या.

त्यावेळी आमच्याकडे एच.एम.व्हीचा टि.व्ही साईजचा एक ग्रामोफोन होता. त्यावेळचा अतिशय महागडा समजला जात असे. अन् स्टेशनवरचे सगळे लोक फोनो लावला की बाहेर व्हरांड्यात ऐकायला यायचे.

पहिला सिनेमाही तिथंच पाहिला.त्यावेळी मी जालम नावाच्या स्टेशनला होतो. तिथून आम्हांला जालमहून खामगांवला जावं लागायचं बाजाराकरता. तर रोज सकाळी ट्रेनने जायचो खामगांवला. ती संध्याकाळी यायची, मग आम्ही फर्स्ट क्लासमधून त्यावेळी खामगांवला अगदी ऐशमध्ये जायचो. पडदा मध्ये लावलेला. पाठीमागच्या बाजूला स्त्रिया बसलेल्या नि समोर पुरुष बसलेले. मध्ये पडदा आणि दोन्ही बाजूला ते दिसायचं अशा रितीने पहिल्यांदा मैदानातला सिनेमा आम्ही पाहिला. तेव्हा मात्र पुढे आपण या क्षेत्रात काही करणार आहोत असं बिलकुलच डोक्यात नव्हतं.

खाण्यापिण्याची अतिशय चंगळ तिकडं. मध्यप्रदेशातले लोक खाण्यामध्ये भयंकर पटाईत. त्यांच्या घरामध्ये गेलं की पहिल्यांदा मिठाई नि शेव असा सगळा जामानिमा. तिथला रिवाजच आहे तो. चहा वगैरे भानगड नाही. घट्ट सायीचं दूध मोठ्या पेल्यात दिलेलं असायचं. बासुंदी सारखं असायचं ते.

फूटबॉल, हॉकी हे तिथले खेळ. क्रिकेट त्यावेळी फारसं नव्हतं. क्रिकेट तसं मी पुण्यात आल्यावर खेळायला लागलो. मला तिथं हॉकी, फूटबॉलचं भयंकर वेड होतं.

NiluPhule4.jpg

शाळेत शिक्षण मराठी अधिक हिंदी असं दोन्हींतून असायचं. त्याची गंमत आहे विशेष. त्या भागातला महाराष्ट्रीय माणूस घरी फक्त मराठी भाषा बोलायचा. बाहेर आला की हिंदीच बोलायचं. अजूनही तीच पद्धत आहे. नागपूर त्यावेळची राजधानी होती मध्यप्रेदशची. आणि आजही नागपूरमध्ये हिंदीचा प्रभाव जास्त आहे मराठीपेक्षा. तिथं मला वाटतं मी तिसरी-चौथीपर्यंत शिकलो. त्यानंतर पुण्यात मी साधारण ४५ च्या पुढे आलो. पुण्याची ओढ एकीकडे होतीच. पुण्यात आल्यावर इथे शिवाजी मराठा शाळेत प्रवेश घेतला.

पुण्यात मला शाळेत जावंसं वाटायचं नाही फारसं, पण एकच होतं की मराठी या विषयाविषयी खूप ओढ होती. सर्जेराव जगताप हेडमास्तर होते. बाबूरावांचा संबंध त्या काळामध्ये आला. बाबूराव अतिशय उत्तम इंग्लिश शिकवायचे. विशेषतः इंग्रजी उच्चार कसे करावेत. आपण नेहमी 'हॉटेल' म्हणतो ना, ते कधीही आम्हांला 'हॉटेल' म्हणू द्यायचे नाहीत. 'ऑटेल' म्हणायचे. उच्चारांबाबत त्यांचा फार आग्रह असायचा.

मराठीचा तास भयंकर आवडायचा. मराठीला खांडेकर म्हणून आमचे एक शिक्षक होते. आता त्यांचं वय माझ्या अंदाजे ८७/८८ असेल. परंतु उत्तम संस्कृतचे आणि मराठीचे शिक्षक. कवितांमध्ये ग.ह. पाटलांच्या ज्या कविता होत्या त्यांनी आम्ही खूप झपाटलो होतो. पण परीक्षेत मात्र कसंबसं पास होत जायचं. म्हणजे वरच्या वर्गात गेला एवढंच समाधान. घरामध्येही तशी जबरदस्ती नाही केली कुणी. पास होतोय, शिकतोय एवढंच खूप आहे असं असायचं आणि शिवाय कुणाचंच आमच्या अभ्यासाकडे लक्ष नसायचं.

आमची 'शिवाजी मराठा' म्हणजे त्यावेळचं चळवळीचं केंद्र होतं.बहुजन समाजाच्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे आणि बहुजन समाजाच्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे अशा स्वरुपाचा आग्रह धरणारी ती शाळा होती. तरी तिथे शिक्षक बरेचसे ब्राम्हणही होते. आश्चर्याची गोष्ट ही की बाबूराव जगतापांनी बहुजन समाजासाठी शाळा काढली तरी असा दु:स्वास कधी केला नाही की शिक्षक मराठा पाहिजे किंवा माळी पाहिजे किंवा अमुक पाहिजे. पुण्यामधल्या चांगल्या शिक्षकांचा जो गट होता तो त्यांनी उचलून आणला होता. शाळेत खूप शिस्त होती आणि शिक्षक जी 'ढ' मंडळी होती त्यांच्याकरता शाळा सुटल्यानंतर स्पेशल वर्ग घ्यायची. बस! त्रासच व्हायचा खरं म्हणजे. इतर मुलं क्रिडांगणावर खेळत असायची आणि आम्हांला मात्र टांगून ठेवलेलं. ज्या विषयात आम्ही ढ आहोत त्याची उजळणी व्हायची आणि हे अगदी डिव्होटेडली व्हायचं कारण तोपर्यंत शिकवण्या वगैरे भानगड नव्हती. उलट शाळा सुटल्यानंतरचे वर्ग हीच शिकवणी आणि त्याच्याकरता पैसे नाही द्यावे लागायचे. दप्तराचं मात्र फारसं ओझं नसायचं. अजूनही आठवतं की फार तर दोन-तीन वह्या आणि दोन-तीन पुस्तकं यांच्याशिवाय काही नसायचं. साधारण ३-४थी ला पाटी सुटली. त्यानंतर सगळ्या विषयांकरता म्हणून एक वही. मोडी वगैरे गिरवली नाही. पण कित्ता गिरवला. त्या काळी व्ह. फा. ची परिक्षा होती. ती एक फार प्रेस्टीजचा प्रश्न मानली जायची. साधारण खेड्यातून आलेली मुलं व्ह. फा. होऊन लगेच शिक्षक होऊन जायची. त्यांना स्कॉलरशिप असायची.

फ्रीशिप आम्हांला नसायची. पण गरीब विद्यार्थ्यांसाठी होती. त्यांच्यासाठी वसतिगृह होतं शाळेचं. त्यांना सयाजीराव गायकवाड, शिवाजी मराठ्याला जे होते ते मदत करायचे. इतरही महत्वाचे लोक म्हणजे राजाराम महाराज, कोल्हापूरचे. त्यानंतर सयाजीराव गायकवाड, भालजी पवार या सर्व मंडळींचा खूप पाठिंबा होता. बहुजनसमाजाची शाळा आहे, त्यामुळे ही सर्व राजेमंडळी सहसा मदत करायची. शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये 'पंचहौद मिशनची' सगळी ख्रिश्चन मुलं यायची. त्यावेळी सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा परिणाम म्हणा, पण त्यावेळी ही सर्व ख्रिश्चन मंडळी आणि बहुमत समाजातील लोक यांचं एक नातं असायचं. पंचहौद मिशनचा प्रत्येक पोरगा हा शिवाजी मराठ्यात यायचा आणि त्यांचं एक आपुलकीचं नातं असायचं.

आमची ही शाळा शुक्रवार पेठेत. येणारे सर्व लोक हे प्रामुख्यानं बहुजन समाजातील लोक होते. त्यामुळे पुण्यातील सदाशिव, नारायण ह्या ब्राह्मण वस्तीपासून सर्वार्थानं लांब.

एकतर नारायण, सदाशिव पेठ यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत आणि आपल्याला तसं झालं पाहिजे, तसं बनलं पाहिजे, या स्वरूपाची शिकवण असायची. आपण मागे का राहिलो त्याचं कारण हे की, आपण शिक्षणामध्ये पाठीमागे आहोत आणि या समाजाइतकी जर तुम्हांला प्रगती करायची असेल तर तुम्हांला शिकलं पाहिजे, असं असायचं आणि विशेष म्हणजे हे जे सगळे ब्राह्मण शिक्षक होते, ते ब्राह्मण असले तरी त्यांनी असा भेदभाव केला नाही, जो नू. म. वि. मध्ये चालायचा.

ह्याउलट आमची शाळा ही चळवळीचं केंद्र होती. पारतंत्र्याबद्दल, त्याच्याविरुद्ध केल्या जाणार्‍या चळवळीबद्दल आम्हांला वर्गातच सांगितलं जाई. आमच्याकडे पवार नावाचे एक इतिहासाचे सर होते. मला वाटतं की इतिहास अशा पद्धतीनं शिकवला जाऊ शकतो, एक नवी दृष्टी देणारा तो असू शकतो हे पवारांकडून आम्ही शिकलो.

'इतिहासाला नवी दृष्टी देणारा माणूस' असे हे सर होते. आम्हांला समजून घेण्याची क्षमता फार नसल्यामुळे त्यांचं बरेचसं वाया जायचं पण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या.

कुठल्याही समाजामध्ये एखादा विशिष्टच एक समाजाचा घटक हा सबंध समाजावर आपलं एक वर्चस्व ठेवतो आणि तेही मग कसं धार्मिक पध्दतीनं करतो हेही सांगायचे. तर अशा पध्दतीनं इतिहास शिकवायचे. आता २०/२५ वर्षं झाली. आता ते माझ्या लक्षात येतं की, या माणसाने त्याकाळी खूप निराळी दृष्टी दिली. अर्थात आमच्यात कळायची क्षमता नव्हती एव्हढे मात्र खरे.

शाळेमध्ये इतर चळवळी खूप होत्या. सेवादलाची चळवळ 'शिवाजी मराठा' पासून सुरू झाली. पहिल्यांदा अप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी यांनी अवस्थी वाड्यापासून, म्हणजे शिवाजी मराठाच्या पाठीमागची वस्ती आहे तिथून सुरू केली. गोपाळ अवस्थी चळवळीत होता. त्याच्या मांडीला एक गोळी लागली होती. एस्. पी. कॉलेजवर जो गोळीबार झाला होता त्यात. धारिया त्यावेळी विद्यार्थी संघटनेचे चिटणीस होते. आणि त्या काळात आनंदराव पाटील, मोहन धारिया, गोपाळ अवस्थी, भाई वैद्य, बाबा आढाव हे त्या चळवळीत सामील होते. सेवादलाची ती शाखा त्या भागामध्ये पहिली. विशेष म्हणजे शाळेतून त्याला विरोध नाही झाला. उलट शाळा सुटली रे सुटली की आम्ही तिकडं जायचो. कारण मला असं वाटतं की संघाच्या अगदी निराळं तत्त्वज्ञान मानणारी ही संघटना आहे, याचं भान शाळा प्रमुखांना होते. तेव्हा सेवादलाला विरोध नव्हता. सेवादलाशी बाबुराव जगतापांचं नातं फार चांगलं होतं. इतर बुरसटलेल्या विचारांपेक्षा आपण वेगळ्या प्रकारे जातो आहोत किंवा गेलं पाहिजे, ही जाणीव त्यावेळी कुठंतरी होती. कारण ही जाणीव त्या शाळेत होती. मुस्लिमांविषयी आज जे वातावरण आहे तसं शाळेत नव्हतं. त्यावेळी खरं आश्चर्य वाटायचं की, इथं जास्तीत जास्त मुस्लिम विद्यार्थी शिवाजी मराठ्यात होते, जास्तीत जास्त ख्रिश्चन विद्यार्थी होते. जास्तीत जास्त दलितांना फ्रीशिप्स् असायच्या.

सेवादलात संघाइतकी कडक शिस्त नव्हती. सगळा मुख्य भार असायचा तो बौद्धिक कामावर. दर शनिवार रविवार बौध्दिकाचा तास असायचा. शिबिरांमध्ये खेळाचा भाग थोडा असायचा. दुपारचा, विश्रांतीनंतरचा काळ सगळा बौध्दीकाचा. संध्याकाळी बौद्धिक असायचं. बौद्धिकामध्ये ब्रिटिश, एकंदर हिंदुस्तानची आजची परिस्थिती यावर भर असायचा. हिंदु-मुस्लिम संबंधावरही भर असायचा.

पुढे सेवादलाशी जवळीक आणखी वाढली. कलापथकातून काम करायला लागलो. सेवादलाची खड्डा पटांगणाची जी शाखा झाली त्यावेळी कलापथक चालू झालं होतं. कुठलीतरी एकांकिका होती, सावकार आणि त्याचा वेठबिगार अशी त्याची गोष्ट होती. त्यात मी काम केलं. मी कधीच रंगमंचावर घाबरलो नाही. मी पहिल्यापसून बाजी मारत आलो. त्यावेळी माझंच काम लोकांना आवडलं. त्यावेळी पोरांची निवड करण्याकरता अंबिके, डॉ. देशपांडे होते. तेव्हा त्यांनी माझीच निवड केली. ग्रामीण जो बाज आहे तो तुझ्याशिवाय कुणाला जमणार नाही असे ते म्हणाले.

कलापथकात सर्वात जास्त रस घेणारा कोण? तर निळूच. त्यामुळे माझ्याकडे कलापथकाचं प्रमुखपद आलं. आणि मला मनापासून रसही होता त्या कामात. मला वाटायचं काम करावं. आणि त्या निमित्तानं वाचनही करायचो. नाटकांचं वाचन व्हायचं, मराठी साहित्याशी जवळचा संबंध यायचा. तो शांताबाई नावाच्या माझ्या शिक्षिकांचा प्रभाव होता. शांताबाई मराठी शिकवताना दरवेळी काही ना काही मराठी साहित्याबद्दल सांगायच्या, कथा सांगायच्या. मोपासाँ नावाचा कुणीतरी आहे, मॅक्झिम गॉर्की म्हणून कुणी आहे हे सगळं. शांताबाई त्या काळामध्ये फ्रेंच,जर्मन रशियन सहित्यातल्या गोष्टींचा अनुवाद सांगायच्या. त्याचं मला वेड लागलं. इतर कुणापेक्षा मी तिथे जरा शहाणा माणूस ठरलो असेन. कारण माझं वाचन जरा जास्त होतं.

पण शहाणं होण्यासाठी कॉलेज करावं, डिग्री घ्यावी असं कधीच वाटलं नाही. का कुणास ठाऊक, शिक्षणाविषयी पहिल्यापासून रसच नव्हता. आणि ही गोष्ट खरी होती की मी आयुष्यभर नोकरी करीन ही कल्पना कधी माझ्या डोक्यात नव्हती. मी ज्या काही नोकर्‍या केल्या असतील, त्या अतिशय नाईलाजानं केल्या. माळी कामाची नोकरी केली ती फोर्स केलेलाच होता म्हणून. ती मला आपोआप मिळून गेली. माझं आवडीचं काम होतं माळीकाम आणि मी हेडमाळीच होतो त्यामुळे कामं वाटून घेतली की, मी मोकळा व्हायचो पुस्तकं वाचायला. पुस्तकही वाचून व्हायचं आणि आवडीचं काम असल्यानं तेही व्हायचं. बाकी मी नोकरी करीन असं कधीच वाटलं नाही. का कुणास ठाऊक, तिरस्कार होता मला, की नाही मी नोकरी नाही करणार.

घरची परिस्थिती तर अतिशय सामान्य होती. आमचं दुकान होतं मंडईच्या आत भाजी पाल्याचे दोन गाळे होते. पण ते चालवायला कोणी नाही म्हणून आम्ही ते कराराने दिले होते. त्याचंही भाडं यायचं. ते दिवस फार कठीण. फार वाईट दिवस होते. तरीही येणार्‍याजाणार्‍याला चहा देण्याची आमच्या घरी पद्धत होती. भावाचा स्वातंत्र्य चळवळीतला संबंध आणि सगळी येणारी जाणारी अनेक माणसं. कुणी आले की त्याला चहा देणं हे घरामध्ये ठरलेलं असायचं. त्यामुळे चहा ठेवतानाच एक बुधलं भरूनच ठेऊन द्यायचा. तो आणखी वाढायचाच. एकेक एकेक असा. अप्पा मायदेव, लालजी कुलकर्णी, आचार्य केळकर, हमीद दलवाई ही मंडळी आमच्याकडे यायची. त्यांना चहाच. दुसरं काही देण्यासारखं नव्हतंच. कुणाला खायला द्यावं इतकी परिस्थिती नव्हती. तेव्हा सगळ्यात चांगलं म्हणजे चहा.

चैन करणं म्हणजे मटण खाणं ही कल्पना. खरं म्हणजे, आमच्याकडे नियमितपणे बुधवार आणि रविवार हे मटणाचे असायचे. कधी बुधवारी जर चुकून नसलं तरी रविवारी नक्की असायचं. घरामध्ये ज्वारी बाजरीच्या भाकरी आणि मटण असलं की चैनीचा दिवस असायचा. समजू लागल्यापासून सकाळी दहाचा एक सिनेमा मारायचो आम्ही. ही चैन.

श्रीमंत नातेवाईक होते, जे आता नातेवाईक म्हणवून घेतात, ते सगळे खूप दूर राहायला असायचे. त्यांना माहीत होतं की आम्हांला अडचण आहे. तात्या बोराटे जी जमीन करत होता ती नातू बागेतील एका ब्राह्मण माणसाची. कामासाठी एकदा तात्या नि मी गेलो तिथं. त्यांनी आम्हाला चहा दिला पण कपबशी बाहेर ठेवायला सांगितली. त्यात पाणी ओतायला सांगितलं आणि मग ते आत नेलं. मला आठवतं की, आम्ही दोघं चर्चा करत आलो की आपल्याला ते हलके समजतात. हा एक प्रसंग मला अगदी झोंबणारा आहे. मला अजूनही तो जसाच्या तसा आठवतो. त्याच्या घराबाहेरची ती पायरी, त्याच्यावर कप ठेवलेले. त्यात आम्ही पाणी ओतलं नि मग ते कप आत नेलेले सगळं आठवतं.

माझ्या स्वभावात जो मवाळपणा आहे तो पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे माझी ह्या प्रसंगावरची प्रतिक्रियाही तशीच होती. त्या काळामध्ये इंदुताई, आचार्य केळकर, हरीभाऊ लिमये, सदाशिव बागाईतकर, प्रभाकर मानकर ही सर्व मंडळी होती. ती फार निष्ठावान मंडळी होती.

त्यावेळेला ब्राह्मणप्रवृत्ती विरोधी आणि ब्राह्मणविरोधी असे दोन भाग होते. आणि त्यावेळी सगळी चळवळीतली मंडळी, सगळी ब्राह्मण होती. आणि त्यांचं आमच्याशी वागणं चांगलं असायचं म्हणजे अगदी धाकट्या भावासारखे. अप्पा मायदेव हा माणूस तर उत्तम संघटक कसा असावा याचं उदाहरण. लालजी कुलकर्णी यांचा व्यवहार अत्यंत चांगला असायचा. संघटनेमध्ये काही अडीअडचणी, कुणी आजारी आहे, कुणाला शिक्षणाला फी नाही, कुणाला कपडे नाहीत अमुक नाही, हे सगळं हे पहात असत. या दोन माणसांनी मिळून त्या काळामध्ये एवढी जवळीक साधलेली होती की, आज जो भाग संघटनेने भरलेला नाही किंवा कट्टर ब्राह्मण झालेला नाही याचं कारण ही मंडळी. यांच्यामुळे तुम्ही कडवे ब्राह्मणविरोधी नाही होऊ शकत, तुम्ही त्या प्रवृत्तत्तीविरुद्ध झगडा. हा एक विचार त्यांनी आम्हाला दिला.

त्याच काळामध्ये, ४२च्या आसपास लोहियांचं नाव ऐकायचो तरी त्यांच्याशी तसा काहीच संबंध नव्हता. उलट असं होतं की त्यांची जी मित्रमंडळी पुण्यात होती ती त्यांचा थोडा रागरागच करायची किंवा टिंगल करायची.

साने गुरुजींशी ते शिबिरात आले की प्रत्यक्ष बोलणंही व्हायचं. त्यांचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला. स्वयंसेवक होतो मी त्या वेळेला. अफाट जनसमुदाय समोर बसलेला. व्यासपीठ टाकलेले. आमची गाणी झाली की गुरुजींनी बोलायचं होतं. गुरुजी खाली मान घालून कुठेतरी बसलेले, एवढी मोठी टोपी, मळलेला शर्ट अन् धोतर. मला वाटलं बेडेकर म्हणून आमच्याकडे एक गृहस्थ होते. मी म्हटलं, बेडेकर का? नंतर हेच साने गुरुजी असं कळल्यावर चला म्हटलं. ते असे खाली मान घालून वगैरे बसलेले. बोलायला उठले. ५-७ मिनिटांमध्ये त्यांची तार लागली १||-२ तास. गुरुजी त्यावेळी काहीही सांगतील ते मॉब ऐकायला तयार आहे अशी परिस्थिती होती. मला वाटतं की ते भाषण त्यावेळी बाळासाहेब खेरांनी सेवादलावर बंदी घातली त्यावेळचं असावं. गुरुजी भडकलेले होते आणि संतापाने बोलत होते. जबरदस्त प्रभाव माझ्यावर होता त्यांचा.

लोहियांनी मी फार प्रभावित झालो. सतत विचार करणार्‍या माणसाला कसं मुद्याचा काही विचार करावा लागत नाही, तो एकदा बोलायला लागला की ते सुरुच राहतं. असं २/२।। तास बोलत राहणं आणि ज्या तपशिलानं बोलणं, समांतर काही बोलणं, उदाहरणं, तीसुद्धा तपशिलांसकट देणं हे लोहियांचे विशेष. त्याला मूलभूत विचाराचे म्हणतात. कठीण आहे हे आणि तेही अतिशय सोप्या भाषेत, पण त्याला अतिशय उत्तम अलंकार देत असत. काळजाला भिडेल अशी भाषा, कोट्या. हिंदु-मुस्लिम असाही काही प्रश्न आहे आणि अशा प्रश्नांची ही एक बाजू असते, ती त्यांच्याकडून कळली. दलितांच्या राखीव जागांसंबंधी किंवा स्त्रियांच्या प्रश्नांसंबधी पार्टीतले कोणीही कधीही बोललेलं मला आठवत नाही. विचार असतील त्यांचे पण आग्रहपूर्वक मांडणी या विषयाची लोहियांनी केली. इतरांच्याकडे ती नव्हती. कदाचित असंही असेल की, नेहमी एक गोष्ट बोलली जाते की सर्वच पक्षांचे कम्युनिस्ट असोत, की सोशॅलिस्ट असोत, या सर्वांचे नेतृत्व ब्राम्हणी असल्यामुळे - ते प्रश्न तितक्या पोटतिडकीने जाणवत नसावेत.

बाकी विरोधी पक्षांपैकी डांग्यांचा प्रभाव फार मोठा होता. डांग्यांच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळी आम्ही असायचो आणि अत्र्यांबरोबर तर मी कायमच असायचो.

अत्रे म्हणजे फड जिंकणारा माणूस. मंडईमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी बाबूराव सणस विरुद्ध एसेम जोशी होते. बाबूराव सणस यांचं भाषण मंडईत होतं. मंडई ही बाबूराव सणसांची राजधानीच. काय होईल याची चिंता. पण अख्खी मंडई भरलेली होती. आणि अत्रे इतका बिनधास्त माणूस होता की, पाठीमागून सिगरेट बिगरेट मारुन, एकटेच थोडीशी ब्रँडी घेऊन व्यासपीठाच्या मागे असलेल्या विंगेत गाणी होईपर्यंत सिगरेट ओढत बसलेले होते. उभे राहिले आणि नेहमी आपण बोलतो तसे सुरु झाले. कुठलं काय? मारामारी नाही न् काही नाही. टाळ्यांच्या कडकडाटात मला वाटतं, तिथे जमलेले काँग्रेसचे लोकसुद्धा हसून हसून बेजार झाले होते. हजारोंच्या संख्येत दाटीवाटीने त्या मंडईच्या आवारात लोक बसले होते. अक्षरश: मध्येच कुठेतरी गाय उठली म्हणून थोडीशी गडबड फक्त झाली. 'काय चिंता करु नका. कोण हरामखोर इथे मंडईमध्ये अत्र्याला अडवू शकतो? त्याचा बाप आहे मी', असे अत्रे म्हणाले. भयंकर हिंमत. त्यावेळी मंडईमध्ये अतिशय गुंडगिरी होती. पण अत्र्यांनी अख्खी मंडई त्यादिवशी जिंकून टाकली.

त्यानंतर गोवा चळवळीशी संबंध आला. मी सत्याग्रह नाही केला. पण महिनाभर आम्ही गोव्यातल्या सत्याग्रह्यांसाठी चपात्या जमवल्या, धान्य जमवलं. एके दिवशी सरळ उठलो नि बेळगावला गेलो. घरी कुणाला माहीत नव्हतं. आम्ही फक्त पिशवीमध्ये एक शर्ट न् पायजमा एवढे टाकलं आणि निघालो बेळगावला. मोरारजीभाईंनी एस्. टी. बंद करुन टाकलेली होती सावंतवाडीला जायची. सावंतवाडी त्यावेळची गोव्याची सरहद्द. मग तिथून ७५ मैल आहे. चालत आम्ही गेलो. दंडवते त्यावेळी त्या तुकडीचे नेते होते. हिरवे गुरुजींचं गोळी लागून निधन झालं. त्यावेळी मोजक्याच लोकांनी सत्याग्रह करावा अशी तिथे गोवा समितीच्या कार्यकारिणीची बैठक बसली होती त्यांनी ठरवलं. त्यांनी मधु दंडवते आणि भाई वैद्य या लोकांना परवानगी दिली. दहा किंवा बारा लोक असावेत. बाकीच्या सगळ्यांना सांगितलं, 'कुणालाही परवानगी नाही, जायचं नाही'. आणि साने गुरुजींची परवानगी असल्याशिवाय तुम्ही भाग घ्यायचा नाही असं आम्हांला सांगितलं. मग आम्ही तिथं सावंतवाडीला एक दिवस राहिलो. पोलिस मारतील ही भीती होती. पण मरणाची तरी अशी भिती वाटली नाही. मला वाटतं की जोश असावा जरा त्या काळातला.

आजही त्याचा पश्चाताप होत नाही, उलट असं वाटतं बरं केलं, त्यावेळेला एवढे आपण धैर्य दाखवू शकलो. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला तसा पोलिसांचा मार खाल्ला. इंदिराबाई जेव्हा पुण्यात आल्या तेव्हा मी आणि शांती नाईक, आम्ही सगळ्यांनी त्यांच्या गाडीला डेक्कनवर अडवलं आणि रिबेरोने माझ्या पाठीवर सणसणीत छडी मारलेली आठवते. सगळे जण आम्ही रस्त्यावरच पडलो. गाडी पूर्ण ब्लॉकच केली. धडाधडा पोलिसांनी मारायला सुरुवात केली. रिबेरोने माझ्या पाठीत छडी मारली ती चांगली आठवते. रिबेरो अतिशय देखणे होते, उंच, सडसडीत. आजचे जे रिबेरो आणि त्यावेळचे रिबरो यात फार फरक आहे. पण लोक घाबरायचे. 'रिबेरो आला रे रिबेरो मारणार आता' सगळेजण ओरडायचे. तेवढाच मार, बाकी काही नाही.

मी : निळू फुले - अंतीम भाग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलाखत खूप आवडली. एकंदर दोघांच्या गप्पा तब्येतीत रंगलेल्या दिसतायत.
खूप चांगली माहिती मिळाली निळूभाऊंबद्दल.
मुलाखतीसाठी काकांना आवर्जून धन्यवाद कळव.

निळूभाऊ आमच्या अप्पांच्या चांगल्या परिचयाचे होते.
एका नाटकाच्या मध्यंतरात अप्पांबरोबर त्यांना भेटायला गेलो होतो ती आठवण आली Happy

बित्तुबंगा ... धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.. Happy वाचायचे राहून गेले होते... आता vachto. Happy

माणूस स्वच्छ, प्रतिभावान, विचारी व पारदर्शक ! मुलाखतही त्याच्यापुढे आरसा धरल्यासारखी !! छानच !!

सुरेख मुलाखत. हे वाचायचे राहुनच गेले होते. Happy

मंडईमधी अत्र्यांच्या सभेइतकी नाही पण एकदा दादा कोंडकेंची सभा झाली होती. अशक्य चेंगराचेंगरी.

पडद्यावरच्या सिनेमाचा जो उल्लेख आहे तस मी बाजीराव रोडला नातुबाग मित्रमंडळने दाखवलेले चित्रपट बघीतले आहेत. डावखरे नटनट्या बघायला मजा येत असे. Happy