रिक्त प्याल्याच्या तळाशी..पोकळी आभाळते!

Submitted by सत्यजित... on 6 May, 2016 - 14:32

ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते...
विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते!

ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी...
कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते!

तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला...
पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते!

तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले...
चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते!

केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या!
वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते!

नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा...
रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह वाह! मतला आणि प्रत्येक शेर सुंदर झालाय..:)

ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते...
विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते!>> फेसाळते दु:ख, वेदना साकाळते- मस्त!!!

तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले...
चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते!

केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या!
वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते!>> वाह!

मनःपूर्वक आभार माउ,भुईकमळ'जी!

बाळ पाटिल'जी धन्यवाद!
>>>.................. भेगाळते!.... डागाळते!........>>>आपल्याला नेमके काय म्हणायचे असेल,ते कळले नाही मला! सदर दोन शेर ईतर शेरांपेक्षा चांगले वाटले असतील तर मला छानंच! काही अक्षरे Dark fonts मधे लिहिली आहेत आपण,त्यावरुन अलामतीकडे आपला रोख असेल तर मतल्यात,'आ' ही अलामत निश्चित झाली आहे,त्याकडे आपले लक्ष वेधावेसे वाटले! धन्यवाद!

बाळ पाटिल'जी धन्यवाद!
>>>.................. भेगाळते!.... डागाळते!........>>>आपल्याला नेमके काय म्हणायचे असेल,ते कळले नाही मला! सदर दोन शेर ईतर शेरांपेक्षा चांगले वाटले असतील तर मला छानंच! काही अक्षरे Dark fonts मधे लिहिली आहेत आपण,त्यावरुन अलामतीकडे आपला रोख असेल तर मतल्यात,'आ' ही अलामत निश्चित झाली आहे,त्याकडे आपले लक्ष वेधावेसे वाटले! धन्यवाद! >>>.......
................. आ ही अलामत निश्चित झाली आहे हे खरे पण गाळतो ची पुनराव्रुत्ती आवडली नाही.

गाळतो ची पुनराव्रुत्ती आवडली नाही.<<<

पाटील साहेब आपल्या मनात अलामत बाबत जे ग्रह आहेत ते लवकर क्लीअर करून घ्या बुवा

अहो असा नियम नसतो हो

नियम फक्त असा आहे की ज्या अक्षरावर स्वराचे चिन्ह असणे अपेक्षित असते तिथे त्या स्वरानंतरची अक्षरे समान यायला हवीत इतकेच (म्हनजे एखाद दुसर्या शेरात ज्या अक्षरावर व्यन्जनावर अलामत येणार असते ते रीपीट होणे हा दोष नाही आहे ..मतला सोडून )

अहो एकच काफिया अख्खाच्या अख्खा (अर्थात मतला सोडून बरका ) पूर्ण गझलभर पुन्हा कितीदाही वापरला तरी चालतो आणि तुम्हि एका व्यंजनाला धरून बसत आहात
आहे कि नै गम्मत Happy