अर्थान्वयन- उड जायेगा हंस अकेला !

Submitted by चैतन्य दीक्षित on 26 April, 2016 - 06:44

उड़ जाएगा हंस अकेला।
जग दर्शन का मेला ।। धृ ।।
जैसे पात गिरे तरुवर के ।
मिलना बहुत दुहेला ।
ना जानू किधर गिरेगा ।
लग्या पवन का रेला ।। 1 ।।
जब होवे उमर पूरी ।
जब छूटेगा हुकुम हुजूरी ।
जम के दूत बड़े मजबूत ।
जम से पड़ा झमेला ।।2 ।।
दास कबीर हर के गुण गावे ।
वा हर को पार न पावे ।
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला ।। 3 ।।

- तसं समजायला सोपं असं हे निर्गुणी भजन.
आत्म्याला पक्ष्याची आणि देहाला पिंजऱ्याची उपमा अनेक काव्यातून दिसते. कबीरांनीही पक्ष्याची उपमा दिली आहे. मग ते हंसच का म्हणाले असावेत? हंसचं उलट केलं की सहं (अपभ्रंशाने सो$हं) होतं. आपल्या श्वासांतूनही हां सो$हं नाद अखंड चालू असतो (ध्यान देऊन ऐकावा लागतो मात्र). श्वास चालू असणं म्हणजेच पक्षी अजून पिंजऱ्यात असणं. श्वास थांबले म्हणजेच हंस उडून गेला.
जगात शाश्वत अशी एकच गोष्ट, मृत्यू !
अनेक संतांनी या मृत्यूचे स्मरण ठेवीत सत्कर्म करण्यासाठी सामान्य लोकांना उद्युक्त केलं.
'मरणाचे स्मरण असावे । हरिभक्तीसि सादर व्हावे ।'
कबीरही हंसाच्या उपमेतून हेच सांगतात.
जग दर्शन का मेला - हे जग एखाद्या मेळ्यासारखं आहे. मेळ्यात आपण गेलो म्हणजे घरी परत जायचं आहे ही गोष्ट आपल्या मनात पक्की असते. मेळ्यातच आपण राहणार नाही आहोत याची खात्रीच असते.
आत्मारूपी हंसाचेही तसेच!
मृत्यू कसा अटळ आहे? तर झाडाची पाने एकदा का पडून गेली की ती पुन्हा झाडाला लागणे अशक्य! तसाच मृत्यू अटळ आहे.
यातला दुसरा अर्थ जो मला जाणवला तो असा की
समजा एका झाडावरची दोन पाने आहेत, त्यातले एक जरी पडून गेले तरी त्या दोन पानांची पुन्हा भेट होणे अशक्य! कारण सोसाट्याचा वारा वाहतोय. झाडापासून तुटलेले पान उडून जाणार.
आपल्याला मृत्यू कधीही येऊ शकतो आणि आला की पुन्हा कुणालाच भेटणे शक्य नाही. त्यामुळे अकारण कुणाचा द्वेष न करता आनंदात राहावे असेही कदाचित कबीरांना सुचवायचे असेल.

वेळ आली की कुणीच इथे थांबू शकत नाही. सगळ्यांना जावंच लागणार. जेवढं आयुष्य खात्यावर जमा आहे तेवढं भोगलं की 'आलं बोलावणं'. यमाचे दूत आलेच न्यायला. ते फार मजबूत आहेत, त्यांच्या हातून सुटका नाही, कुणाचीही नाही.

सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ॥
अवचितें काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें । (म्हणियारे- दूत)
ने‍ऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥
किंवा-
मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥
- दासबोध.

मृत्यू कधी येणार ह्याची कल्पना नसल्याने ईश्वरचिंतनात काळ व्यतीत करणे उत्तम हे सांगताना कबीर म्हणतात की, "हा दास शिवाचे गुण गातो. परंतु शिवाचं माहात्म्य समजणे त्याला शक्य नाही".
यातून अजून एक छुपा संदेश कबीर देतात असे मला वाटते. आपल्याजवळ जे आहे त्याचा गर्व नसावा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे नको. सर्वसत्ताधीश ईश्वर आहे हे जाणून असावे.
हे सांगून पुढे "यथेच्छसि तथा कुरु" असेच जणू ते म्हणतात.
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला ।।
कर्माची गती गुरूलाही चुकणार नाही आणि शिष्यालाही नाही! करम की गति न्यारी !!

विचार करु तितकं अजून आत घुसत जाणारं हे भजन ! कुमारांनी ते गायलंय ही असं की शब्द(त्याचे अर्थ), सूर (त्यांचं व्याकरण) यांच्याही पलीकडे मन पोहोचतं...त्या क्षणापुरते का होई ना पण सगळ्या हेव्यादाव्यांतून, अकारण क्रोधातून, चिंतेतून आपण मोकळे होतो.

-चैतन्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे माझं ऑटाफे भजनच नव्हे तर जीवनाची फिलॉसॉफीच आहे. मस्त लिहीले आहेस. ही सर्व एक लेख माला बनव म्हणजे सर्व भजने एकत्रित मिळतील. शेवटी लिंक पण दिलीस तर छान यू ट्यूब व सावन वर बर्‍यापैकी उपलब्ध आहेत.

जब छूटेगा हुकुम हुजुरी ऐकताना प्राण जातातच. सीरीअसली. कुमार ऑसम आहेत.

हे ही मस्तच रे चैतन्य !
बाकीची अर्थान्वयनं ही वाचली. स्तुत्य उपक्रम
आता प्रतिक्षा निर्भय निर्गुण ची ते मात्र जरा सविस्तर लिही.

चैतन्य महाराज _/\_

प्रत्येक अर्थान्वयन वाचताना ते भजन मनात रूंजी घालू लागते आणि
विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः असे वाटत राहते. Happy

छान लिहिलंयस. कुमार एकदम ठाशीव आहेत ह्यात.
हे फारच अपिलिंग भजन आहे.
रचना तुलनेने सुबोध, सुरावट पकड घेणारी आणि लय थोडी जास्त असल्यामुळे असेल.

धन्यवाद मंडळी!
माधव, त्या दुव्याबद्दल धन्यवाद. तिथे तू दिलेला अर्थही खूपच छान.
विशेषतः गुरु की करनी ...बद्दलचे विश्लेषण_/\_

वाह रे! What a treat! साष्टांग दंडवत तुला!
खुपच सुंदर! अजुन असंच लिहुन आम्हाला समृद्ध कर! Happy

वाह.. सुरेख रे सुरेख. छान अर्थं उलगडून दाखवलायस.
मी ऐकलेलं म्हणजे कुमार आणि वसुंधराबाईंनी एकत्र म्हटलेलं. स्वर दोन पण विचार एकच असं असं विलक्षण एकात्मता असलेलं.
ह्यातलं हंसाचं "अकेला" उडणं मला फार फार टोचलं होतं.

दाद, कुमार आणि वसुंधराताईंना एकत्र ऐकणं म्हणजे पर्वणीच की हो!
आता वसुंधराताई पण नाही राहिल्या.
हंस हंसाय विद्महे । परमहंसाय धीमहि ।
तं नो हंस: प्रचोदयात् ।।

हंस हंसाय विद्महे । परमहंसाय धीमहि ।
तं नो हंस: प्रचोदयात् ।।>>>>> कुठल्या स्तोत्रात आहे? मी कंप्लीट अडाणी या बाबतीत!

कुलू, ती हंसाची गायत्री आहे. प्रत्येक देवतेची एक गायत्री असते. आपल्याला सगळ्यात परीचयाची म्हणजे गणेश गायत्री - एकदन्ताय विद्महे | वक्र्तुण्डाय ..........

माझं आणि नवर्‍याचं अगदी आवडीचं निर्गुणी भजन आहे हे! अर्थान्वयन मस्त लिहिलंय चैतन्य! खूप सुरेख.

माझं आणि नवर्‍याचं अगदी आवडीचं निर्गुणी भजन आहे हे! अर्थान्वयन मस्त लिहिलंय चैतन्य! खूप सुरेख.>> +१
जब छूटेगा हुकुम हुजुरी ऐकताना प्राण जातातच. सीरीअसली. कुमार ऑसम आहेत. >> +१