पाव भाजी - एक चिंतन

Submitted by फूल on 27 April, 2016 - 04:31

मी: “काय करू जेवायला?”

नवरा: “काय आहे घरात?”

मी: सिमला मिरची, बटाटा, टोमेटो, थोडासा फ्लोवर आहे, पाव भाजी मसाला, बटर आणि पाव आहेत... काय करू? हा माझा ठरलेला प्रश्न एखाद्या सुंदर, सुरम्य शनिवार किंवा रविवार संध्याकाळचा. सुरूवातीला नवरा अगदी मिश्कील वगैरे हसून बघायचा माझ्याकडे. आणि मग म्हणायचा, “करा आता पाव भाजी काय..”.

आता मात्र असं विचारलं की कधी कधी वैतागून म्हणतो उकडीचे मोदक कर....(आता या शब्दात लग्नाला अनेक वर्ष झालीयेत असं आलंच ओघाने हे सूज्ञास सांगणे न लगे.)

तर पाव भाजी माझं पाणीपुरीनंतरचं अत्यंत आवडीचं खाद्य... हो मीच ती पाणीपुरी बद्दल मायबोलीवर लिहिणारी... आता पाव भाजी...

मी आयुष्यात सगळ्यात पहिली पाव भाजी कधी खाल्ली याचं उत्तर मी आईबाबांना पहिल्यांदा कधी बघितलं या उत्तराइतकंच अवघड आहे. पण ही चटकदार चीज आयुष्य अधिक स्वादिष्ट करून जाते नेहमीच हे मात्र अगदी खरं...

शुरुवातसे शुरू करते है... दोन कांदे असतील तर एक बाssssssरिक चिरायचा एकसाssssssरखा... मोगऱ्याच्या पाकळ्यांचा ढीग घातल्यासारखा दिसला पाहिजे. त्याच्याच जोडीला टोमेटो तोही तसाच बाssssssरिक आणि एकसाssssssरखा, आलं लसूण वगैरे उग्र मंडळींना त्या उरलेल्या एका कांद्याबरोबर चांगलं वाटून घ्यायचं... जोडीला दोन काश्मिरी लाल मिरच्या... पाव भाजीला पाव भाजीचा रंग येण्यासाठी पण रंग न घालता.... फ्लोवरचे पांढरे शुभ्र तुरे, सिमला मिरचीचे करकरीत पुन्हा एकसाssssssरखे आणि बाssssssरिक चिरलेले तुकडे, बटाटा आणि टप्पोरे हिरवे कंच मटार सगळं एकत्र प्रेशर कुकर मध्ये.... त्या कुकरमध्ये सगळ्यांचा ताठा, अहं सगळं सगळं जिरतं.. आणि सगळे एकजीssssव होतात... एकात्म होतात... ही सगळी तयारी झाली की खऱ्या पूजेला सुरुवात... थोडसं तेल आणि हवं तेवढं बटर... हौसेला मोल नाही... चवीला तर नाहीच नाही... म्हणून हवं तेवढं... पहिला मान उग्र मंडळींचा... आलं, लसूण, कांदा आणि काश्मिरी मिरची... चर्रर्र आवाज झालाच पाहिजे नाहीतर आमच्यात फाऊल धरतात.... पाप लागतं ते वेगळंच... या उग्र मंडळींचाहि अहं अस्साच नाहीसा करायला हवा... बटर मध्ये परतून परतून त्यांना पुढे येणाऱ्या मंडळींशी मिसळून घेता येण्याजोगं करायचं... आलं लसणीने बाकीच्या भाज्यांशी फटकून वागता कामा नये... गंध लावल्यासारखं हिंग आणि कसुरी मेथी त्यातच... आता साधारण दरवाज्यापर्यंत वास पोचलेला असतो... मग उरलेला कांदा आणि टोमेटो घालायचा... ही मंडळी तशी कुणाशीही सहज जुळवून घेणारी... कुठेही सहज रमणारी... पुन्हा एकदा परतणं... आता सगळाच लाल रंग... हा कांदा, हा टोमेटो असलं काही काही ओळखू येईनासं झालं आणि कढईच्या बाजूने बटरचं अस्तित्त्व जाणवायला लागलं की... इवलीशी हळद, हवं तेवढं तिखट आणि पावाभाजीतला षड्ज म्हणजे पाव भाजी मसाला... तो एव्हरेस्टचा नसेल तर उगीच चूटपूट लागून राहते... इथवर येउन ठेपलो की मग बाकीची सिमला मिरची वगैरे मंडळी समरसून घ्यायला तयारच असतात... त्यांना हलकेच आत ढकलायचं... तशी ती मिळून मिसळून वागणारच असतात पण आपली थोडी मदत म्हणून smasher नाहीतर blender फिरवायचा... उगाच किंचित हं... पिठलं नाही करायचं...शेवटी मीठ असून नसलेलं... पुन्हा एकदा हातीच्या डावाने सगळ्यांची विचारपूस करायची... कोथिंबीरीचा सडा शिंपायचा की ती तयार झाली पण अजूनही कोवळीच तशी... कुणाला अगदी गाडी पकडायलाच जायचं असेल तर वाढायला हरकत नाही... पण तसं नसेल तर मात्र झाकून वाढू द्यायचं तिला... पोक्त होउ द्यायचं... अशी भाजी मुरायला ठेवून आच बंद करायची... एव्हाना मजल्यावर सगळ्यांना कळलेलं असतं की आपल्याकडे पाव भाजी आहे... मग एकीकडे पाव भाजायला घ्यायचे... पुन्हा हवं तेवढं बटर... एकसाssssssरखा आणि बाssssssरिक चिरलेला कांदा, लिंबाच्या एकसारख्या फोडी आणि सवाष्णीला अपरिहार्य असा हिरवा रंग म्हणून कोथिंबीर ही पूजेनंतर वाहायच्या फुलांसारखी तय्यार ठेवली की... पूजेची यथासांग इतिश्री... पाव भाजी साक्षात तुमच्या घरात...

तोंडाला पाणी सुटलं नै? मुंबईकराच्या खाद्य संस्कृतीत हा खाद्यपदार्थ कसा काय येउन ठेपला देवजाणे... मिल कामगारांना स्वस्तात भरपेट खायला मिळावं म्हणून ही पाव भाजी प्रचलित झाली असं ऐकून आहे मी पण याची पुष्टी द्यावी इतपत ठाम नाही...

या पदार्थावर अतोनात प्रेम जडलं... मुळातच मी आवड म्हणून खाणारी... उदरंभरणं या स्वच्छ हेतूपायी मी कधीच खाल्लं नाही....त्यामुळे चवीन खाणार त्याला देव देणार या न्यायाने मला देव देत असतो आणि मी खात असते... आणि गंमत म्हणजे law of attraction नुसार मला सखे सोबतीही तसेच भेटतात एक नवरा सोडून... तिथे unlike poles चा नियम लागू होतो. त्याला पाव भाजी आवडते पण म्हणून तो तुडुंब पोट भरल्यावर आवडते म्हणून खाणार नाही.... माझ्यामते अशी आवड ही आवड नाहीच... संपूर्ण जेवून झाल्यावर आवड म्हणून जो अजून एक गुलाब जामून पोटात ढकलतो तो खरा खवैय्या... खिलवणाऱ्याना असे खवैय्ये हवे असतात... एवढं बटर???? बाssssssप रे असं म्हणून पाव भाजीकडे तुच्छतेने बघणाऱ्या लोकांची मला प्रचंड चीड आहे...

माझ्या एका डाएट फ्रिक मैत्रिणीने मला आणि माझ्या एका पाव भाजी प्रेमी मैत्रिणीला डाएट पाव भाजी खाण्यासाठी घरी बोलावलं... अगदी तू करतेस तश्शीच होते असं वगैरे सांगून... बटर न घालता ऑलिव्ह ऑइल मध्ये केली होती तिने पाव भाजी आणि बटाटा नाहीच... मल्टीग्रेन ब्रेड नुसतेच तव्यावर भाजून खायला दिली आम्हाला... आम्ही ते रोगण कसं बसं घशाखाली ढकललं आणि त्यावर उतारा म्हणून तिथेच खाली अमृता हॉटेलात जाउन पाव भाजी खाल्ली... तेव्हा कुठे आंतरिक शांती लाभली...

हीच मैत्रीण... तशी बरी आहे ती खाण्याच्याच बाबतीत जरा प्रॉब्लेम आहे तिचा... तर तीच हॉटेल मध्ये पाव भाजी ऑर्डर केली की म्हणायची, “त्यापेक्षा तुम्ही त्याला सांगा एक प्लेट बटरच दे सब सब्जीया और पाव डालके...” त्या रात्री मला खरंच स्वप्न पडलं आणि स्वप्नात भैय्या सांगत होता, “बटर मध्ये थोडा पाव भाजी मसाला आणि भाज्या घातल्या नं की बटर ची चव चांगली लागते...”

एकदा नं असंच आम्ही सगळे पंटर एका मैत्रिणीकडे वाढदिवसाला जमलो होतो... माझ्या एका पाव भाजी प्रेमी मैत्रिणीने भाजीत घोळवलेला पावाचा तुकडा अलगद तोंडात सोडला आणि तिची तंद्री लागली... ब्रह्मानंदी टाळी... त्या ध्यानस्त अवस्थेत तिच्या तोंडून ब्रह्मवाक्य बाहेर पडलं, “ज्याने कुणी पाव भाजी हा प्रकार प्रचलित केला असेल नं तो नं स्वर्गात बसून पाव भाजी खात असणार.” तिच्या वाक्याला दाद द्यायची होती पण सगळ्यांच्याच तोंडात पूर्णब्रह्म.... त्यामुळे सगळेच “ह्म्म्मम्म्म्म” दीर्घ मकारले....

याच प्रेमाचा कडेलोट झालेला पण ऐकिवात आहे माझ्या....अश्याच एका चुलत मैत्रिणीच्या बिल्डींगमध्ये म्हणे एका मुलीने मुलाला पाव भाजी आवडत नाही म्हणून स्थळ नाकारलं... मला या नकारामागची मानसिकता अगदी तंतोतंत पटते असं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तर म्हणाला,” त्या मुलाच्या जागी मी असतो नं तर तिला मानसोपचार करण्यासाठीही मीच पैसे दिले असते...” या विषयावर आमची चर्चा फारच रंगली पण ते असो...

या पाव भाजीला नं मी असंख्य रूपात बघितलंय, घडवलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाल्लंय... काही वेळा अपरिमित सुखानुभूती आणि काही वेळी why me सारखे प्रश्नही पडलेत... पण ते “कर्मणि एव अधिकार: ते” सारखं कर्म करणं थांबलं नाही... पाव भाजी, मसाला पाव आणि तवा पुलाव ही पाव भाजीची सर्वमान्य, प्रचलित रूपं... पण मी अजूनही अनेक रूपं न्याहाळली आहेत.... हे अर्थातच प्रेमापोटी...

पाव भाजी डोसा... डोशात पाव भाजीची भाजी घालून... एका अश्याच टपरीवर खाल्ला होता... मस्त लागला... बरोबर चटणी आणि सांबारही दिला त्याने... त्याचं काय करायचं हे न कळून मी तो संपवण्यासाठी साधा डोसा घेतला... सोबत एक खादाड सखी होतीच... मज्जाच....

पाव भाजी पराठा... दोन मैद्याच्या पोळ्या आणि पाव भाजीचं स्टफिंग... मुंबईच्या या माहेरवाशीणीने पुण्यनगरीत या पंजाबी पराठ्याशी लग्न लावले... सोहळा थाट माट उत्तम होता.... पण पाव भाजी ती पाव भाजीच असं आम्हा ताव मारणाऱ्या दोघींचंही मत पडलं....

मसाला इडली... मसाला पावातल्या पावाच्या जागी इडलीचे तुकडे... हा प्रकार झक्कास लागला... घरी अनेकदा करूनही झाला...

इथे सिडनीत आल्यावर pastry sheets आणून त्यामध्ये पाव भाजीची भाजी भरून pattise केले होते... त्यासाठी भाजी मात्र थोडी घट्ट ठेवायला लागते... हे pattise खाताना नवऱ्याला म्हटलं, “बऱ्याच दिवसात पाव भाजी नाही खाल्ली नै? उद्या करूया....” त्याने सभात्याग केला... त्याच्या नेहमीच्या “कठीण आहे style” ने मान हलवून आत निघून गेला...

पाव भाजी fondue…. Facebook वर रेसिपी बघून लग्गेच करून बघितली.... “बटरने माखलेल्या भाजीत चीझची नुसती भरभराट काय वाईट लागणारे?” इति आई आणि नवरा.... मला मात्र मज्जाच आली...

ही झाली तिची सुंदर रूपं आता भायानाकतेकडे वळूया....

याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी... माझी आई एकदमच डाएट वगैरे पाळणारी अज्जिबात माझ्यावर गेली नाहीये... मला पौष्टिक खायला घालण्याचे तिने अनेक प्रयत्न करून बघितले त्यातलाच हा एक प्रयत्न... हवं ते हवं त्या वेळी खाउ न देणारी ती आई असं पुलं म्हणतात... या मताशी मी अगदी अगदी सहमत होते मला मुलगी होईतोवर... मग तिने नको ते नको त्या वेळी मागून मला बऱ्यापैकी वळण लावलं... ते असो.. तर माझ्या आईच्या एका सद्वर्तनी मैत्रिणीने तिला सांगितलं की पावाभाजीत बीट घातलं की अगदी बाहेरच्या सारखा रंग येतो.... पण ते किती घालायचं हे ती मैत्रीण सांगायला विसरली किंवा आई सोयीस्कररीत्या विसरली... बीट मला खायला घालण्याची नामी संधी आई कशी बरं सोडेल... ? बीटाच्या भाजीत पाव भाजी मसाला घातल्यासारखी ती मरून रंगाची भाजी मला आजही आठवते... दुसऱ्या दिवशी डब्यात नेल्यावर ही पाव भाजी आहे हे मैत्रिणीना सांगूनही पटेना.... चव घेउन तर अजिबातच पटलं नसतं.... पाव भाजी पेक्षा बीटाची भाजी आणि पाव असं म्हणणं जास्त योग्य होईल..

पण हौसेने लेकीसाठी म्हणून माझ्या जवळ जवळ प्रत्येक वाढदिवसाला माझीच फर्माईश म्हणून आईने केलेल्या सगळ्या भाज्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.... ओटा धूउन आणि मागचं सगळं आवरून आई बाहेर येउन बसली की खूप वेळ पाण्यात राहील्याने मउ ओल्या झालेल्या आईच्या हाताला भाजीचा वास यायचा... तसा तो त्या त्या दिवशीच्या सगळ्याच भाज्यांचा यायचा पण या भाजीचा माझ्या जास्त लक्षात आहे...

दुसरी भयावह पाव भाजी म्हणजे वडगाव च्या एका टपरी वजा हाटेलीत खाल्लेली... त्या महामानवाने त्यावर फरसाण घालून आणलं... त्याला सांगून थकलो आम्ही की ही मिसळ आहे... त्यावर त्यांने मिसळ म्हणून जो प्रकार आणला तो त्या पावाभाजीपुढे पूर्णान्न होता... त्याच्यामते मिसळीच्या रश्शात बटाटे घातले की पाव भाजी आणि मटकी घातली की मिसळ पाव... फरसाण आणि पाव दोन्हीतही...

नेपाळला एका मारवाडी चकचकीत हाटेलात पाव भाजी मागवली.... त्याने ताटात एका गोड भाजीचा मोठ्ठा ठिपका आणि दोन बन पाव दिले ते पण गोड होते... मारवाड्याचं बोलणंही गोडच होतं... आम्ही जे समोर आलं ते गोड मानून ढकललं...

कोल्हापूरला मामाकडे चैनीच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या... पाव भाजी वगैरे प्रकार फार कमी घडायचे... नाहीच खरं तर... मावशीच्या मागे लागून एक दिवस तिला पाव भाजी करायला लावली... ते सुद्धा घरात पाव आहेत ते संपवायचेत या कारणासाठी... त्यामुळे याच्या ऐवजी ते ढकल... त्याला काय होतंय शेवटी सगळं एकच होणार ते घाल तू.. असं करत करत जो काही प्रकार समोर आला तो भयावहच होता... वरती मिसळी सारखं शेव आणि लिंबू... वर झालीये की नै मस्त तुमच्या मुंबैसारखी? या प्रश्नाला हसून उत्तर देणं हे जास्त भयावह होतं...

तर अश्या माझ्या आजवरच्या उभ्या आयुष्यात अनेक पाव भाज्या आल्या आणि गेल्या... पण तरीही माझं पाव भाजीवारचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही... आणि होणार नाही...

विधात्याने अन्नमय देह दिलाय, मुखात रसना दिलीये आणि समोर पाव भाजीची प्लेट ठेवलीये... अश्या वेळी आत्मसंयम, मनोनिग्रह अश्या गोष्टी कश्या सुचायच्या.... अश्यावेळी फक्त पावाचा तुकडा तोडायचा, भाजीत बुडवायचा आणि अलगद जिभेवर सोडायचा... पूर्णात पूर्णं उदच्यते| अवघ्या देहाचे सोने झाले... ते आत्मानुभूती वगैरे काय म्हणतात ना त्याचा अनुभव मी अनेकदा घेउन सोडलाय बघा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या फूलाला हाणा धरून! Proud २-३ दिवस मायबोलीवर पहिल्या पानावर आणि पर्यायाने डोक्यात पावभाजी ठाण मांडून बसली आहे. आता खावीच लागणार! Happy

मुळात पाभा.त गाजर आमच्याकडुन पडवत नाही. गोड होऊन जाते पाभा. >>>> अगदी अगदी.

सकाळी सकाळी हा धागा पहिल्या पानावर पाहिला की डोळ्यासमोर लालबुंद पाभा आणि त्याबरोबर चकाकणारी पावाची जोडी.

पावभाजीचा तो गरम मसाल्यातला कांद्याचा वास ( दर्प) फार भयानक असतो.तसला वास इतर पंजाबी प्रकारांनाही योतो.लग्नाचे आमंत्रणात मेनु विचारून घेतो आणि तिकडे फिरकत नाही अजिबात.सर्वात कहर एसी हॅाल,एसी स्लिपर रेल्वेत तो कांद्याचा भपका जीवघेणा असतो.हे ताबडतोब ब्यान करायला हवे.
फालतू पदार्थांस फार डोक्यावर चढवले आहे.कांदा न घातलुली भाजी खूप चविष्ट लागते.नातेवाइकांकडे बटरवाले पाव मागून चहात बुडवून खातो.

मी कांदा घातलेल्या पाभाचा फ्यान नसलो तरी लेखिकेच्या लेखनाचा फ्यान आहे.संयमित चर्चा वगैरे ( कार ).

>><<<<<पूर्णात पूर्णं उदच्यते| अवघ्या देहाचे सोने झाले...>>>>> लै भारी>>तो श्लोक पुण्यातल्या ओंकारेश्वराच्या दारावर लिहिलाय म्हणतात-पूर्णात पूर्णं उदच्यते वगैरे काय योगायोग आहे!

मी सुद्धा पावभाजी वेडी आहे. भन्नाट आवडते. हा धागा वाचून तर मी पावभाजी इतकीच तुमचीही फॅन झाले.
पाव अन भाजी खाऊ द्या की व्हो नी मला बी फॅन क्लबात येऊ द्या की Happy

भयानक अनुभवावरून एक किस्सा आठवला:
फार फार पूर्वी मी माझ्या मित्र गणां सोबत ठाण्यात कापूरबावडी ला एका हाटीलात गेले होते. खाण्या पेक्षा बसून गप्पा छाटणे हा उद्देश असल्याने काय ऑर्डर करायचं यावर फारशी खलबत न करता सर्वानुमते स्पेशल पावभाजी ऑर्डर करण्यात आली. थोड्याच वेळात आमची "स्पेशल पावभाजी" आमच्या पुढ्यात हजर होती पण सुकामेव्याचा साज लेवून. तिचं ते "गोड गोड" रूप पाहून आम्ही सगळेच चक्रावलो होतो. सगळ्या गप्पा, सगळी गॉस्सीप्स सगळं सगळं पार विसरलो. पावभाजी वर बटर च्या ऐवजी काजू, किसमिस वगैरे सारख्या गोष्टी पाहून काय बोलावं ते आधी सुचेना. पहिला घास तोंडात टाकण्याची तर काही जणांची हिम्मतच होईना. शेवटी आमच्यातल्या ज्या महाभागाने ती ऑर्डर दिली त्याला सगळ्यांनी झापुन झाले. मग ज्यानी ऑर्डर लिहून घेतली त्याची पूजा मांडली. तेवढ्यात मॅनेजर आलाच मग त्याची उत्तर पूजा झाली. आणि मग प्रदीर्घ पण "संयमित चर्चसत्रा" नंतर मॅनेजर ला हे पटले की हॉटेलातल्या कामाच्या प्रेशर मुळे, अतिउत्साहात त्यांनी चुकून अशी पावभाजी बनवली. आम्हाला आमची हक्काची लाडाची पावभाजी तिच्या ऑथेंटिक रुपात सर्व्ह करण्यात आली. तर चर्चेतून प्रश्न सुटतात हे अगदी अगदी खरं आहे. Happy

आणि मग प्रदीर्घ पण "संयमित चर्चसत्रा" नंतर मॅनेजर ला हे पटले की हॉटेलातल्या कामाच्या प्रेशर मुळे, अतिउत्साहात त्यांनी चुकून अशी पावभाजी बनवली. आम्हाला आमची हक्काची लाडाची पावभाजी तिच्या ऑथेंटिक रुपात सर्व्ह करण्यात आली. तर चर्चेतून प्रश्न सुटतात हे अगदी अगदी खरं आहे. Lol

खुप छान लेख
आत्ताच्या आत्ता पाभा ख़ाविशी वाटतेय

मस्त लेख. मी सुध्दा पावभाजी प्रेमी आहे.

विधात्याने अन्नमय देह दिलाय, मुखात रसना दिलीये आणि समोर पाव भाजीची प्लेट ठेवलीये... अश्या वेळी आत्मसंयम, मनोनिग्रह अश्या गोष्टी कश्या सुचायच्या.... अश्यावेळी फक्त पावाचा तुकडा तोडायचा, भाजीत बुडवायचा आणि अलगद जिभेवर सोडायचा... पूर्णात पूर्णं उदच्यते| अवघ्या देहाचे सोने झाले... ते आत्मानुभूती वगैरे काय म्हणतात ना त्याचा अनुभव मी अनेकदा घेउन सोडलाय बघा...

अगदी सारखीच अवस्था होते माझी पावभाजी समोर आल्यावर.

वॉव पावभाजी...

खुप छान लिहले आहे तुम्ही.

मुलुंड्च्या बावर्चीची पाव भाजी खाल्लीये का , खुप छान लागते

आता बरेच दिवस मे बी वर्ष गेली नाहीये पण कॉलेजात असताना बर्याचदा जायचो आम्ही

अहा.. कित्ती मस्त लिहिलंय तुम्ही! पाभा आवडते मलाही, पण बाहेरची नाही, घरातली. बाहेर टोमॅटोचा भडिमार असतो नुसता.. पण तुमच्यासारखी पाभा फॅन पहिल्यांदाच पहिली Happy लगे रहो!!!

काय उ-त्क-ट लेख आहे. आता उद्या नववर्षाच्या स्वागताला, नक्की पावभाजी करणे आले. Happy लेख महाभयानक आवडलेला आहे.

मस्त लेख. मी कशाबरोबर पण पाव भाजी खाऊ शकते, ब्रेड, पाव, पोळी, भाकरी, डोसा Happy आपल्या ला काय भाजीशी मतलब.
लास्ट वीक पिझ्झा च्या बेस वर घट्ट पावभाजी पसरली. मुलाच्या rip पिझ्झा इत्यादी उर्मट कंमेंट्ट्री कडे कानाडोळा केला आणि मनसोक्त चीझ चा सडा घालून पिझ्झा bake करायला ठेवला. बाहेर काढून मुलाला दिला. लगेच १८०डिग्री change झाले मत. म्हणे पुढच्या वेळी असाच पिझ्झा कर. पावभाजी ची कमाल च अशी असतें. एक बार खाओगे तो खाते रेहे जाओगे Happy

Pages