वाय डी - इंजिनीयरींग विद्यार्थी आणि पालक

Submitted by नितीनचंद्र on 25 April, 2016 - 04:53

( ही घटना एक सत्य घटना आहे. गुरुवार दिनांक २१ एप्रीलला याची सुरवात झालेली असुन हा मुलगा लेख लिही पर्यंत परत आलेला नाही. मुद्दामच मुलाचे नाव आणि बदलले आहे )

गुरुवारी रात्री मी झोपलो असेन नसेन तोच रात्री अकरा वाजता मोबाईल खणाणला. माझा मित्र लातुरकर फोनवर होता. मला म्हणाला कपडे घालुन घराखाली ये. एक महात्वाच काम आहे. मी कपडे करुन घराच्या खाली उभा राहिलो तोच लातुरकर पोहोचला. त्याचा चेहेरा चिंताग्रस्त होता. तोंडातुन शब्द फुटत नव्हता. कसा बसा मोजकी वाक्ये बोलला की कॉलेजला जातो सांगुन चिरंजीव सकाळी गेलाय तो अद्याप घरी आलेला नाही. त्याचा मोबाईल दुपारी बारावाजेपर्यंत सुरु होता पण दुपारी चार वाजता संपर्क केला तेव्हा पासुन स्विच्ड ऑफ आहे.

लातुरकरांचा मुलगा स्वप्नील तिसर्‍या वर्षाला मॅकेनिकल इंजिनीयरींग ला शिकतो आहे. घरातुन निघुन जाण्याची ही दुसरी वेळ. पहिल्या वेळेला लातुरकरने मला तो परत आल्यावर सांगीतले. ही घटना सुध्दा मोठी चमत्कारिकच आहे. स्वप्नील पहिल्यावर्षाला असताना घरातुन निघुन गेला. लातुरकरांनी त्याच्या दिनचर्येचा अभ्यासक्रम करुन एका सैबर कॅफे वाल्याला शोधला. त्याने एकच दिवस आधी स्वप्नीलने पुणे- गोवा रेल्वेचे बुकिंग केल्याचे सांगीतले. सुदैवाने आय आर सी टी सी चे अकाउंट सैबर वाल्याचे असल्याने रेल्वे सुटण्याची वेळ , बोगी नंबर तसेच सीट नंबर माहित पडले. एका स्थानिक नगरसेवकाचा मित्र कर्मधर्म संयोगाने रेल्वे ड्रायव्हर आहे. नेमका तोच त्या दिवशी तीच गाडी चालवित होता. त्याने टी सी ला बोगी चेक करायला सांगीतले. टीसी ला स्वप्निल दिसला पण तो त्याला ताब्यात घेऊ शकत नव्हता म्हणुन मिरजेचे स्थानिक पोलीस तिथे गेले आणि त्यांनी स्वप्निलला रेल्वेतुन खाली उतरवुन ताब्यात घेतला.

पहिल्या वर्षाला स्वप्निल दोन विषयात नापास होता. घरचे रागावतील म्हणुन तो घराबाहेर पडला होता. लातुरकरांनी न रागावता त्याला दोन पर्याय खुले ठेऊन पुढे जा म्हणुन वडीलकीचा सल्ला देत धीर दिला. पहिला पर्यायात इंजिनीयरींग सोडणे व आवडीची शाखा निवडणे तर दुसर्‍या पर्यायात ए. टी के टी स्विकारुन इंजिनीयरींग शिक्षण चालु ठेवावे असे ठरले. स्वपिलने इंजिनीयरींग चालु ठेवले.

लातुरकरांनी त्याच बरोबर योगाभ्यास करण्याचे वचन मुलाकडुन घेतले आणि चक्क दुसर्‍या वर्षाला स्वप्नील पहिल्या वर्गात पास झाल्याचे मधल्या काळात मला सांगुन आनंद व्यक्त केला होता.

आज जेव्हा मी नेमके काय घडले आहे याची चौकशी केली तेव्हा तिसर्‍या वर्षाला स्वप्नील पास असुन त्यांनी पी डी एफ फाईलमधला निकाल पालकांना दाखवला. जेव्हा स्वप्नील ची आई ओरीजीनल मार्कलिस्ट हवीच म्हणुन खनपटीला बसली तेव्हा सुरवातीला त्याने ती एका मित्राकडे राहिली आहे. तो गावाला गेला आहे असे सांगुन आईला वाटेला लावले. गुरुवारी जेव्हा आई कॉलेजला येते म्हणाली तेव्हा हा कॉलेजच्या वेळेच्या आधीच घराच्या बाहेर पडला. दुपारी बारा वाजेपर्यंत माझी तोंडी परिक्षा सुरु आहे असे सांगुन त्याने आईला येण्यापासुन परावृत्त केले आणि त्यानंतर मात्र फोन बंद झाला.

लातुरकर पोलीसात जाण्यास नाखुष होते कारण मागील वेळी स्थानिक पोलीसांनी कोणतेच सहकार्य केलेले नव्हते. मी लातुरकरांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. नेहमीप्रमाणे पोलीसांनी तो कॉलेजमधुन मिसिंग असेल तर तिथल्याच पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदविण्याचा सल्ला दिला. मी खनपटीला बसुन एफ आय आर दाखल करुन त्यांना ब्रॉडकास्टींगवर मुलाचे वर्णन सर्वत्र कळविण्यास सांगीतले. यावर उद्याच संबंधीत अधिकारी कारवाई करतील असे सांगुन आम्हाला पाठवण्यात आले.

गुरुवारी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत किमान ५० मित्रांना फोन करुन झाला होता. कुठेही पत्ता न लागल्याने लातुरकर कुटुंबिय उपाशी पोटी आणि रडत रडत गुरुवारची रात्र कशी बशी घालवु शकले,

शुक्रवारी मी आणि लातुरकरांचा आणखी एक मित्र आधी पोलीस स्टेशनला सकाळीच पोहोचलो आणि समजले की संबंधीत सबइन्सपेक्टर यांना तात्पुरते चिंचवड हुन पुणे येते भरती मेळाव्याच्या बंदोबस्तासाठी गेल्याचे समजले. लगेचच आम्ही कॉलेज गाठले आणि तिथे जी माहिती समजली त्याने आम्ही आश्चर्य चकित झालो. लातुरकर तर मान खाली घालुन ही माहिती ऐकत होते.

मॅकेनिकल इंजिनीयरींग एच ओ डी म्हणाले की स्वप्निलचा पहिल्या वर्षाचा एक विषय अद्याप सुटलेला नाही म्हणुन दुसर्‍या वर्षाला तो जरी सर्व विषयात पास असला तरी तिसर्‍या वर्गाला त्याला प्रवेशच देण्यात आलेला नाही. तसेच तो कधिही आम्हाला गेल्या वर्षभरात दिसलेला नाही.

आमच्या कॉलेजमधे अशी अनेक मुले आहेत की जी घरी निकाल नेमकेपणाने सांगत नाहीत. पोस्टाने आम्ही निकाल पाठवत नाही. बाहेरगावची मुले पालकांकडुन फीचे पैसे मागवतात. प्रत्यक्षात अ‍ॅडमिशन झालेली नसते आणि मुले ते पैसे उडवुन शक्य तितके दिवस चैन करत रहातात.

अशासकीय इंजिनीयरींग कॉलेजमधे आजकाल प्रवेश मिळाला नाही असे होत नाही कारण उपलब्ध जागांपैकी अनेक जागा कॉलेजांची संख्या खुप असल्याने महाराष्ट्रात रिकाम्या रहातात. परिणामी इंजिनीयरींग कॉलेजला पहिल्या वर्षाला प्रवेशासाठी बारावी परिक्षा ५० % मार्कांनी पास आणि सी ई टी पास ह्या शैक्षणीक निकषाबरोबर पालकांची फी भरण्याची क्षमता असले की झाले. इंजिनीयरींगला प्रवेश मिळवणे आता फारसे अवघड नाही फक्त हव्या त्या कॉलेजमधे किंवा हव्या त्या शाखेला प्रवेश मिळणे ह्या साठी चुरस आहे.

लातुरकरांनी मग प्रो. बार्शीकरांची चौकशी केली ज्यांना स्वप्निलची आई मधुन मधुन फोन करुन स्वप्निलच्या शैक्षणीक प्रगतीची चौकशी करायची. प्रो बार्शीकर आमच्या समोरच होते. त्यांनी असा कुठला फोन घेतल्याचा इन्कार केला. आम्ही फोन नं. चेक केला असता तो बार्शीकरांचा नव्हताच असे लक्षात आले. मग हा फोन नंबर कुणाचा होता हे तपासल्यावर तो चक्क एका पास झालेल्या विद्यार्थ्याचाच होता हे समजले. सुरवातीला हा विद्यार्थी फोनवर मी बार्शीकर असल्याची बतावणी करत होता पण लगेचच त्याने स्वप्निलला मदत करायची म्हणुन स्वप्निलच्या आईला सर्वकाही ठीक असल्याचे खोटे सांगीतले हे कबुल केले.

दुसरा विद्यार्थी स्वतःहुन पुढे आला व त्यानेही मी माझ्याकडे ओरीजीनल मार्कलीस्ट असल्याचे स्वप्निलच्या आईला खोटे सांगीतल्याचे कबुल केले. शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे काल पर्यंत हा तिढा सुटलेला नाही.

स्वप्निल ने आपला फोन बंद केला आहे आणि अद्याप सुरु केलेला नाही. रविवारी दुपारी चिंचवड ठाण्याचे मुख्य पोलीस इन्सपेक्टर जेव्हा भेटले त्यांनी धक्का दायक माहिती पुढे केली आणि आमचे दुखः कसे शितल आहे याचा पाढा वाचला. त्यांच्या मते दिवसभरात दोन किंवा चार मिसींग केस येतात पैकी हल्ली दहावी झालेल्या किंवा न झालेल्या अल्पवयीन मुली घर सोडुन जातात असे सांगीतले. इंजिनीयरींगच्या मुलांना वाय डी झाल्यास अपमानास्पद वाटते म्हणुन ते घर सोडतात ही एक सर्वसामान्य घटना असल्याचे त्यांनी सांगीतले.

काही तांत्रीक बाबींमुळे आपली तक्रार नोंदवल्यावर वेळेवर तपास सुरु झाला नाही हे मान्य करुन सोमावरी आपण मुलाचा फोन ट्रॅकींगला पाठवु असे सांगीतले पण फोन बंद असल्यास काही उपयोग होणार नाही असेही सांगीतले. फोनचे दोन आय एम ई आय नंबर असतात पैकी एक सीम कार्ड ट्रेस करताना उपयोगी पडतो तर दुसरा मोबाईल फोन मधे जर दुसरे सीम कार्ड टाकुन तो जर पॉवर ऑन असेल तरच ट्रेस करता येतो असेही सांगीतले, जर तुम्हाला काही सुगावा लागला तर माझा स्टाफ मी मदतीला देतो तसेच त्याच्या मित्रांना पोलीस स्टेशनवर बोलाऊन काही माहीती मिळते का अशी आश्वासने घेऊन रविवारी लातुरकरांबरोबर आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलो.

स्वप्निलकडे दुसरे सीम कार्ड आहे किंवा नाही याची माहिती नाही. स्वप्निलचे फेस बुकवर ५०० च्या वर मित्र आहेत पैकी त्याचा बॅचलर असलेले आणि स्वप्निलला तात्पुरता आसरा देणारे किती असतील याची चाचपणी चालु आहे.

इंजिनीयरींग काय कोणत्याही आव्हानात्मक शाखेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या जागरुकीकरता हे लेखन आहे.

१. आपल्या पाल्याला हे शिक्षणाचे आव्हान झेपणार आहे का ?
२. अपयश आल्यास पर्याय काय ?
३. अपयशाचा सामना आपला पाल्य कसा करणार आहे ?
४. आपण आपल्या पाल्याचे शैक्षणिक वर्षात सर्व सुरळीत चालले आहे ना हे कसे तपासणार आहात ?
५. आपले ज्ञान या शाखेचे बझ वर्ड समजण्याइतपत आहे का ?

याच बरोबर आपला पाल्य कोणत्याही शाखेत शिकत असेल आणि जरी तो सज्ञान झाला तरी काही गोष्टी आवश्यक आहेत. कारण पाश्चात्य संस्कृती मध्ये १८ वर्षे वयाचा पाल्य हा एकतर कुटुंबात रहात नाही आणि तो आर्थीक दृष्ट्या स्वतंत्र होतो.

१. आपल्या पाल्याचा मोबाईल आणि सीम कार्डचा IMEI नंबर माहित असणे.
( वरील केस मधे IMEI नंबर माहित असुनही मोबाईल फोन स्वीच्ड ऑफ असल्यामुळे त्याचे लोकेशन सापडत नाही व त्यामुळे ही केस अद्याप दि. २७/४/२०१६ रोजी दिशाहीन आहे )

२. पाल्याचे फेस बुक वरील मित्र आणि त्यांचे नेमके मैत्रीचे स्वरुप काय आहे आहे हे जाणण्याचा प्रयत्न
३. आपल्या पाल्याशी नियमीत संवाद आणि त्याची मानसीक स्थिती चे आकलन.
४. आपल्या समस्या पालकांशी बोलुन त्यावर पर्याय निघेल असा पाल्याचा विश्वास निर्माण होणे.
५. जर काही मानसीक समस्या असतील तर समुपदेशनाने त्यावर पर्याय निघु शकतो यावर पालकांचा विश्वास तसेच ही आपली जबाबदारी आहे हे स्विकारणे.

ह्या चर्चेतुन आणखी काही उपाय समजले तर मला ही काही नविन ज्ञान मिळेल या आशा सह

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलगा सुखरूप परत येवो अशी दुआ मागत आहे.

तो पहिल्यांदाच घर सोडून गेला तेव्हा त्याचे योग्य ते काऊन्सिलिंग होने अत्यंत आवश्यक होते.

अश्या खुप केसेस पाहिल्या आहेत..
मुलांबरोबर पालकांचे पण चुकतच असते चुकासमजे पर्यन्त खुप उशिर झालेला असतो.
मुलगा नक्किच परत येईल.

खुपच अस्वस्थ वाटतेय. तो घरी परत यावा अशी प्रार्थना करतो.
इथे पालकांनी खरे तर योग्य ते प्रयत्न केलेच होते पण मुलगा त्यांना सर्वच बाबतीत अंधारात ठेवत होता असे दिसतेय.

समुपदेशनाची फार गरज आहे अशा मुलांना .
वर्षभर पालकांना अंधारात ठेवण्याचे धाडस त्याने दाखविले आहे त्यामुळे तो हळवा नसावा काही दिवसात स्वतःहून परत येईल असे वाटते. या वयात पालकांबरोबर मित्र आणि प्राध्यापकां चीही भूमिका महत्वाची ठरते, सकारात्मक विचार मिळाले कि माणूस सत्यापासून पळून जात नाही त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करतो.

धक्कादायक आहे. आम्ही आमच्या कॉलेजला १०-१२ केसेस दरवर्षी बघतो की मुलं नापास होतात ते कॉलेज सोडुन जातात. पण घरातुन निघुन जाणे हे खरच धक्कादायक आहे.

पालकांचि एक सर्वात मोठी चुक म्हणजे वर्षभरात ते एकदाही वर्गशिक्षकाशी किमान फोनवरही बोलत नाही. नंतर जेंव्हा मुलांना परीक्षेला बसू दिल्या जात नाही, तर चक्क रडणारे वडीलही मी बघितले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये मेहनत घेन्याची अजिबात तयारी नाही. नोटस लिहा म्हटलं की "सर झेरॉक्स काढतो" असं म्हणतात किंवा लगेच फोन काढुन फळ्यावर लिहिलेलं फोटोत बंदिस्त करतात. खरं तर सध्या इंजिनिअरींग सारखं सोपं शिक्षण दुसरं नसावं पण लक्षात कोण घेतोय....

खूप वाईट. तो मुलगा लवकर घरी येवो आणि त्याचे काऊन्सिलिंग होवो. तोवर तो जिथे आहे तिथे सुखरुप असो.

ह्या आणि अशा घटनांमधून आपण पालकांनी खूप काही शिकायला हवे. खरे तर पालकांचे काऊन्सेलिंग होणे खुप महत्त्वाचे आहे.

अभ्यासातून मन उडणे, शिकणे वगैरे सब झूठ आहे, त्यात लाईफची मजा नाही असे या वयात वाटणे हे कुठल्याही मुलाशी सहज होऊ शकते. हुशार मुलांशी सुद्धा अचानक होऊ शकते. कुठली घटना त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपला मुलगा काय करतोय, त्याच्या आयुष्यात काय घडतेय, त्याची शैक्षणिक प्रगती, प्रेमप्रकरण, साथसंगत याचा शक्य तितके ट्रॅक ठेवणे कधीही चांगले.

आवडीच्या वा नावडीच्या ब्रांचमध्ये शिक्षण घेणे जसे की सायन्स कॉमर्स ईंज्ञिनीअरींग असेही फार काही नसते. कारण बहुतांश मुलांना त्यांची आवड निवड करीअरचे ध्येय समजलेच नसते या वयात. अश्यात शिक्षण म्हणजे बरेच काही अशी मानसिकता असतेच. एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकांची नसली तरी जनमाणसांची असतेच. त्याचीही पर्वा केली जाते.

कधी कधी खूप चांगले पालक असणे देखील घातक ठरू शकते. त्यांचा विश्वास तुटू नये हे दडपण बरेच गोष्टी लपवायला भाग पाडते. आणि या लपवाछपवीत वाहावत जाणे होते. खरे तर परिस्थिती अश्या पालकांना विश्वासात घेऊन खरे सांगण्यानेच सुधारणार असते पण नेमके तेच केले जात नाही.

बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाआधी तुमच्या पालकांना विश्वास असतो की तुम्हाला नव्वद टक्के मार्क येणार. निकालाच्या आदल्या रात्री जेवताना ते तुम्हाला समजूतदारपणा दाखवत धीर देतात की जर निकाल वाईट लागला, मार्क कमी पडले, नव्वदच्या जागी सत्तर-ऐंशीच आले तर नाराज वा निराश होऊन काही उलटसुलट करू नको, सरळ घरी निघून ये.. अश्यावेळी ते त्यांच्या जागी योग्यच असतात. पण मुलाला माहीत असते की त्याने जसा वर्षभर अभ्यास केला आहे, जशी परीक्षा दिली आहे, ते पाहता त्याला पन्नास टक्केही मार्क येणार नाहीयेत. जेवताना घास गिळणे कठीण होऊन जाते.. या आणि अश्या काही प्रकारचे अनुभव आहेत. काही मित्रांचे तर काही ओळखीतले. तर स्वत:ही काही शैक्षणिक चढउतारातून गेलोय. एकंदरीत मानसिकता समजू शकतो.

सध्या धीर धरा. मुलगा जीवाचे बरेवाईट करणार्‍यातला वाटत नाही. फक्त वेडेपणाच्या नादात अडचणीत येऊ नये. सुखरूप असेल अशी आशा करूया.

इथे ही पालकच जागृत असावेत नाही का? अन पोरे? कुक्कुली बाळेच जणू ती! असल्या दिवट्या औलादीना उलटे लटकवुन चामडी सोलेपर्यंत फोडून काढायला हवे! ब्लडी इंडिसिप्लिण्ड ब्रैट्स! साले ज्या बापाने रक्ताचे पाणी करुन वाढवले त्याचा विचारच करणार नाही? लातुरकर देवमाणुस हो तुमचे पोराला "जमत नसेल तर दे सोडुन" म्हणाले अजुन काय आता त्याच्या नावची परीक्षा सुद्धा लिहायला जावे का बापाने कामधंदे सोडुन

कसलं पोरगं आहे राव स्वतः इंजीनियरिंग कंटिन्यू करायचं ठरवलं अन स्वतःच पळून गेलं राव. स्वतः घेतलेले निर्णय जर बरोबर सिद्ध करता येत नसतील तर बापाला कश्याला वैताग करावा म्हणतो मी, २ वर्षे इयर डाउन झालोय मी पण एकेकाळी ! कायद्याने बीएससी तीन वर्षात होऊन तीन मार्कशीट असायला हव्या, आम्हाला पाच वर्षे लागली अन बारा मार्कशीट आहेत वट्ट! असली थेरं नाही केली कधी खुट्टे ठोकुन बसलो जिथे आहे तिथेच चे चुक होते ते सुधारले ! आज निवांत आहे!

असो! सकाळ सकाळ चिडचिड बद्दल माफ़ी!

इथे ही पालकच जागृत असावेत नाही का? अन पोरे? कुक्कुली बाळेच जणू ती! असल्या दिवट्या औलादीना उलटे लटकवुन चामडी सोलेपर्यंत फोडून काढायला हवे! ब्लडी इंडिसिप्लिण्ड ब्रैट्स! साले ज्या बापाने रक्ताचे पाणी करुन वाढवले त्याचा विचारच करणार नाही? लातुरकर देवमाणुस हो तुमचे पोराला "जमत नसेल तर दे सोडुन" म्हणाले अजुन काय आता त्याच्या नावची परीक्षा सुद्धा लिहायला जावे का बापाने कामधंदे सोडुन>>>+१
आपल्याच एका मित्राला आइशी फोनवर खोटे बोलायला लावणे, दुसर्‍य्य मित्राकडे मार्कशीट आहे सांगणे, मित्रानेही त्याला दुजोरा देणे इइ करणारा मुलगा अजिबात हळवा वैगेरे नाही. त्याचं काउन्सलिंग होणं आवश्यक आहे.

लेख वाचून चिडचिडच झाली. मुलाच्या बापाचा भयंकर राग आला आणि मुलाचा सुद्धा.

मुलगा बोलतोय ना की मला झेपत नाही, पण तरीही बापाने बाबापुता करुन अभियांत्रिकी चालू ठेवायला सांगणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.

असो. पण मुलगा सुखरुप घरी परत येवो..

देव करो आणि मुलगा सुखरुप घरी येवो.
इंजिनीयरिंग ला इयर डाऊन होणे बिग डिल वाटत असले तरी ते आयुष्य नाही.
पूर्ण सगळ्या सेमीस्टर फर्स्ट क्लास नसलेले वर्गमित्र सध्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आणी नीट काम करत आहेत.
इयर डाऊन झालेला मित्र ४-५ वर्षे परदेशातच होता, आता इथेही चांगले चालू आहे.
एम३ २ वर्षे न सुटल्याने वर्षं जाणे हाही कॉमन प्रकार होता.
या मुलांना संधी मिळाल्यास हे नक्की सांगेन की शैक्षणीक यशाचा आणि आयुष्यात पुढे यशस्वी होण्याचा फारसा संबंध नाही.
मुलगा परत येऊदे लवकर.या गोष्टी खरोखर इतके मोठे मॅटर नाही.

अश्या वेळेस "लक्ष्य" हा सिनेमा राहुन राहुन आठवतो.
अपयश आलं कि बिथरायला होतं हे हि तितकंच खरं, "दुनिया" गेली उडत असं काहितरी वाटत राहत, सोबती चांगले असले , घरुन पाठिंबा असला कि निभावून नेता येतं, भल्या बुर्याची जाण असतेच याही वयात. कशाला चिकटायच नि कशाला दुर लोटायच हा एक स्टियरिन्ग पोइन्ट असतो. बस तिथेच थोडं भान असलं कि झालं

आमच्या कम्पुत एक पद्धत होती - निराश, हताश, एकटं , हरल्या सारखं वाटु लागलं कि
स्वतः मनात अथवा मोठ्याने कसंही "हम होन्गे कामयाब" गाणं म्हणत राहयचं. बघा एक्दा प्रयत्न करुन..!

मी लातुरकर आणि आणखी एक मित्र एकमेकांना साथ करत आमच्या परिने दिशा शोधत आहोत. आज आणखी एक तशीच केस माहित झाली आहे. डिप्लोमाला असलेला एक विद्यार्थी भोसरी - पुणे मधुन मिसिंग आहे.

हाही मुलगा दिनांक २१/४/२०१६ पासुन गायब आहे. त्यानेही फोन स्विच्ड ऑफ ठेवलेला आहे. काही काळ जेव्हा याचा फोन चालु होता तेव्हा या फोनचे लोकेशन मुंबई सापडले आहे. लातुरकरांच्या मुलाने काही काळ फोन सुरु केला तेव्हा पोलीसांनी त्याचे ही लोकेशन मुंबई शोधले आहे. भोसरीच्या मुलाने परिक्षा न देता पास होण्यासाठी दहा हजार रुपये दिल्याची माहिती पुढे येते आहे.

ही दोन मुले एका वेळेला मिसींग होतात ती कुणा एकाच व्यक्तीच्या संपर्कात होती किंवा एकमेकांना ओळखत होती किंवा कसे याबाबत आम्ही यादोघांचे फेस्बुक मित्र तपासले पण ही मुले एकमेकांची मित्र नाहीत.

त्यांच्या फोनचे रेकॉर्ड घरच्या मंडळींना मिळु शकत नाही. पोलीसच ते रेकॉर्ड ताब्यात घेऊ शकतात म्हणे. आज या मुलाची माहिती पोलिसांना दिली आहे. भोसरीच्या मुलाचे अनेक नातेवाईक पोलिस खात्यात आहेत विशेष म्हणजे मुंबईला आहेत. त्यांचे या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

गुन्हा नोंदवताना पोलीस असे म्हणाले होते की वाय डी आणि घरातुन निघुन जाणे ही घटना सामान्य आहे. पुढे काय होते ? ही मुले नेमके काय करतात ? कुठे रहातात ? घरी येतात किंवा नाही ?

मायबोलीकरांना आव्हान आहे की अश्या मिसींग प्रकरणात मुले परत आली आहेत किंवा नाही याबाबत काही माहिती असेल तर द्यावी. यातुन काही दिशा मिळते आहे का ते समजेल.

वाय डी आणि घरातुन निघुन जाणे ही घटना सामान्य आहे.
>>
हो माझे दोन तीन मित्र/ ओळखीचे होते जे घरी न कळवता दुसरे वर्ष चालू आहे असे सांगून सेटींग लावून हॉस्टेलवरच राहायचे ..

सोन्याबापू, तुमची चिडचीड समजू शकते पण तुम्ही म्हणता ती अक्कल बहुतांश जणांना कॉलेजबाहेरच्या दुनियेत गेल्यावर येते. जेव्हा स्वता कमावून कुटुंब चालवावे लागते तेव्हा येते. कॉलेजमध्ये असतेच असे नाही. तसेच असे करणार्‍यांच्या मित्रांनाही नसते जे कोणी त्यांना समजूतदारपणाचे शब्द सांगतील. म्हणून पालकांनी जागृत राहावे. याबाबतीत तरी आपला मुलगा मोठा झाला असे समजू नये. भले त्या मुलाला आपल्याला खूप अक्कल आली आणि काय ती बापाची कटकट असे वाटले तरीही ...

कधी विचार केला आहे की शाळेत नापास होऊन वर्ष फुकट गेलेल्या मुलाला ही गोष्ट इतकी लाजिरवाणी आणि लपवावीशी का वाटत नाही जेवढे कॉलेजमधील मुलांना वाटते.. कारण आता तुम्हाला अक्कल आली आहे तर अभ्यासाचे महत्व तुमचे तुम्हाला समजायला हवे आणि नापास होत वर्ष फुकट घालवायचे नाही ही जबाबदारी येऊन पडली आहे

मी जिथे मुंबईत राहते त्या आमच्या बिल्डिगच्या टेरेसवर मुले जमायची कॉलेज बंक करुन रोजच ..खुप वाईट सवयी होत्या त्यांना कॉलेज जवळच होते. मी कॉलनितील एका मुलाला विचारले हे कॉलेज का जात नाहित तर त्याने सांगितले होते त्यांना ड्रॉप लागलाय पण घरच्याना माहित नाही रोज घरातुन डबा तिकिटाचे पैसे घेऊन निघतात बिना तिकिट प्रवास करतात व त्या पैशाने नशा करतात.
आम्ही सोसायटित तक्रार करुन त्याचे टेरेसवर येणे बंद केले खुप चांगल्या घरातली मुले होती ती..खुप वाटायचे यांच्या घरच्यांचा पत्त फोन नं मिळाला तर घरच्याना कळवावे पण तसे काही करता आले नाही.

या मुलांना झालेय तरी काय ?

http://indianexpress.com/article/cities/pune/d-y-patil-college-pratik-as...

सहा महिन्यातील वरील दोन केसेस अश्या आहेत ज्यात मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

ही केस मागच्या वर्षीची ज्यात पुन्हा मुलगा मिसींग आहे.

http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5556753123893033116&S...

http://www.dnaindia.com/locality/pune/youth-goes-missing-after-posting-%...

फोन स्विच्ड ऑफ असणे. मुलांचे लोकेशन न समजणे ही सुध्दा कॉमन गोष्ट झाली आहे.

शेवटी हा अभिजीत व्यवहारे सापडला किंवा नाही हे काही समजुन येत नाही.

पण तरीही बापाने बाबापुता करुन अभियांत्रिकी चालू ठेवायला सांगणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. >>> नाही पिंगु, वडीलांनी इंजिनियरच बन अस सांगण तर सोडाच पण इंजिनिअरींग सोडुन देण्याचा पर्यायही सुचवला होता पहिल्याच वर्षी.
मुळ लेखातला परिच्छेद खाली देते..

"लातुरकरांनी न रागावता त्याला दोन पर्याय खुले ठेऊन पुढे जा म्हणुन वडीलकीचा सल्ला देत धीर दिला. पहिला पर्यायात इंजिनीयरींग सोडणे व आवडीची शाखा निवडणे तर दुसर्‍या पर्यायात ए. टी के टी स्विकारुन इंजिनीयरींग शिक्षण चालु ठेवावे असे ठरले. स्वपिलने इंजिनीयरींग चालु ठेवले." यात मिळेल तुम्हाला उत्तर.

पालकांचे इंजिनिअरींग सोडुन दे म्हणने पण वरवरचे असते जे मुलांना जाणवत असते.
आंतरिक इच्छा त्याने इंजनियर बनावे अशिच असते.

थोडे सुन्न झाले.

आपल्या पाल्याची आवड- नावड काय आहेत... त्याचे कोणत्या विषयात प्राविण्य आहे, कुठे तो कमजोर पडतो आहे, पडलेला आहे... हे प्रत्येक पालकान्ना माहित असायला हवे. सोबत त्याचा मित्र-मन्डळ माहित हवे, त्यान्च्याशी पण पालकान्चे मैत्रीचे सम्बन्ध हवेत.

अनेक पालक मुलान्ना झेपत नसताना, त्यान्च्या आवाक्या बाहेरचे आव्हान त्यान्च्यासमोर ठेवतात. बारावी पास होतानाच दमछाक झालेल्या मुलाला केवळ आई-वडिलान्च्या हट्टाखातर engineering ला प्रवेश घ्यावा लागतो. प्रत्येकाला गणित, विज्ञान झेपतेच असे नाही... दुर्दैवाने मुलगा नापास झाला तर पालकान्च्या समाजातल्या स्थानाला धोका पोहोचतो (त्यान्चे नाक कापले जाते - असा गैरसमज ते करवुन घेतात). आपला बाब्या पहिल्या वर्षात दहापैकी ७ विषय पास होतो तर पुढच्या वर्षी १३ विषय कसे पेलवणार ? जवळपासचा समाजही अशावेळी हटकुन बाब्याच्या पालकान्कडे बाब्याच्या अभ्यासाची, निकालाची "आपुलकीच्या" भावनेने चौकशी करतात.

आई वडिलान्नी स्वत:च्या इच्छा आकान्क्षा मुलान्वर लादायची अवशक्ता नाही. शिक्षणाचे सर्व पर्याय मुलान्समोर ठेवावेत, त्याच्या स्ट्रेग्न्थ- मर्यादान्चा अभ्यास करावा आणि त्यान्ना त्यान्च्या इच्छेनुसार विषय निवडण्याचे स्वातन्त्र द्यावे. निर्णय प्रक्रियेत आणि निर्णय घेण्यात मदत जरुर करावी पण मुलगा डॉक्टर, इन्जिनियरच व्हायला हवा हा वेडगळ अट्टाहास सोडावा.

वेळ खुप महत्वाचा असतो आणि घेतलेला चुकीचा निर्णय बदलायला मोठे धाडस लागते. मुलगा डॉक्टर, इन्जिनियर न होता पण कमालीचे यशस्वी होतात हे पालकान्नी समजणे गरजेचे आहे.

या घटनेत मुलगा सुरक्षित पणे घरी यावा या साठी माझी प्रार्थना...

मुलं मोठी झाल्यावर एकदम त्यांच्याशी संवाद साधण अवघड होतं. त्यासाठी लहानपणापासूनच त्यांच्या बरोबर असणं खूप गरजेचं असतं. त्यांच्याशी बोलताना काही गोष्टी खटकणाऱ्या असतील तर शांतपणे हाताळाव्या लागतात. या साठी पालकांचं डोकं प्रत्येकवेळी शांतच असेल असं नाही. दोघंही करियर मधे अडकलेली असतील तर बरंच अवघड होतं. यातून प्रत्येकाने आपापला मार्ग काढावा लागतो. तुम्ही जर मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये मुलांबरोबर असाल तर त्यांच्या आवडींचा अंदाज तुम्हाला नक्कीच येतो, त्यामुळे मुलही विश्वासाने स्वतःच्या करियरचा विचार करू शकतात. आजकाल करियरचे पण खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. आपणही मळलेल्या वाटा सोडायला हरकत नाही.
वरच्या केसमध्ये मुलगा लवकरात लवकर मिळावा हीच प्रार्थना. अशी आशा करू की तो कुणा मित्राकडे सुखरूप असावा व शांत झाला कि घरी परतावा.

लगेच पालकांना जज आणि ब्लेम करु नका रे..
कधीकधी मुलं पालकांना विकून खातील इतकी चालू आणि बनेल असतात.
मुलगा परत येऊदे.मग खरी परिस्थिती कळेल.
घरातल्या शिस्तीला कंटाळून निघून जाणे हा प्रकार बर्‍याच वर्षापूर्वी एका परीचित मुलीबाबत घडला होता.दुसर्‍या राज्यात सापडली(एकटी,लव्ह अफेअर वगैरे नाही.) आता यातून सावरुन व्यवस्थित नोकरी संसार आणि मूल सांभाळते आहे.

Pages