तृप्तीचा ढेकर

Submitted by स्वप्नाली on 25 April, 2016 - 16:04

मार्चमधले दुपारचे टळटळीत ऊन हा हा म्हणत होते (मला तरी आज पर्यंत तसे ऐकू आलेले नाही कधी)..जेवणाच्या मोठ्या सुट्टी नंतरचा पहीलाच जीव-शास्त्राचा तास म्हणजे आमच्या जीवाला घोर. त्यात आज आज्जीच्या हातची "सुग्रास" का काय म्हणतात तशी भरली वांगी. मग काय विचारता, मीच नाही तर आम्या-सुम्या, भाल्या सगळेच तुटून पडतात डब्यावर माझ्या..आज्जीला हे माहीत असल्याने ती सुद्धा डब्बा भरताना जरा हात मोकळाच ठेवते..सोबत एका छोट्या डबी मध्ये श्रीखंड दिले असले तर मग "ब्रम्हानन्दी" टाळीच ! ते बोटानीच सगळे चाटून-पुसून खाउन, नळावर हात धुवून रूमालाला पुसून वर्गात येऊन बसलो होतो.. ह्या वर्षी आठवीला आल्यापासून आम्हाला फुल्ल पॅंट मिळाल्या तेव्हापासून आम्हा सगळ्या मित्रांच्या खिशामध्ये एक कन्गवा आणि रूमाल दिसू लागले...("आता गबाळ्यासारखे चड्डीला पुसल्यासारखे हात फुल्ल पॅंट ला पुसट जाऊ नकोस" असा आमच्या "फॅशनीस्टा" बहिणा-बाईंचा सल्ला मनोमन पटल्याने मी पण आता लक्ष देऊन रूमाल जवळ ठेवत असतो हल्ली.)
तर तास चालू झाला आणि थोड्या वेळातच आम्हा चौकडीची "ब्रम्हानंदी" टाळी लागू लागली...एकमेकांना "जागते रहो" च्या चिठ्ठ्या पाठवत आम्ही आमचा मागच्या 2 बेंच वरचा गड लढवत होतो..नाहीतर चुकुन जरी एखादा मावळा निद्रा-देवीच्या ह्ल्ल्याने धारातीर्थी पडला आणि जीव-शास्त्राच्या बर्वे-बाईंच्या हाती लागला, तर ऐनवेळी बाजीप्रभूची घोरपड दोर सोडून पळून गेल्यासारखी अवस्था होते त्याची..मग तो उरलेल्या मावळ्यान्कडे "कसा गनीमी-कावा करून पाठीत खंजीर खुपसला माझ्या" अश्या अर्थाने बघतो की, त्यासमोर शोले-मधला अमिताभ ही फिकका पडावा..त्याचे असे हाव-भाव "बच्चू"-बच्चन ने थोडे जरी शिकले तरी सून-बाईंना ऐश्वर्य उपभोगत सासू-बाईन्सारखे "अल्वेज खूशी-नो गम" म्हणत आयूष्य जगता आले असते..कुठूनही आमची गाडी मॅटीनी वरच घसरते, असो. वर आम्हा मित्रांमधली अशी दगाबाजी पाहून लाल रीबीन लावलेल्या वेण्या हालवत मुली फिदी-फिदी हसतात ते वेगळेच..

परवाच आमच्या ग्रँड-पिताश्रीन्चे एक मित्र घरी हाफ पॅंट आले. आता कोणे एकेकाळी स्वातन्त्र्य-सैनीक असले म्हणून काय कुठे ही तसेच फिरायचे ? त्यांनी खरे तर आमच्या बहिणा-बाईन्कडे क्लास लावायला पाहीजे..कधी कुठले कपडे घालू नये त्याचा..(नाहीतरी ती तेव्हढेच सांगत असते..काय घालावे हे नाही सांगत कधी)...त्यानिमीत्ताने तेवढाच आमच्या घरच्या आरश्याला चेंज मिळेल..सारखा तिचाच चेहरा बघून तो ही कंटाळल्यासारखा दिसतो बिचारा हल्ली… तर त्या स्वा.सै. आजोबांनी नेमकाच मला टी. व्ही. वर एक मस्त पिच्चर पहाताना पकडले आणि विचारले, "काय रे लेकाच्या ****, जेव्हा पहावे तेव्हा टी. व्ही. मध्ये नाक खूपसून बसलेला असतोस, मोठा झाल्यावर काय ब्लॅक मध्ये टीकीटे विकणार आहेस का थेटरात ???" मी नजर जर्राही न हलवता उत्तर दिले, "नाही, गर्रम गर्रम वडा-पाव विकणार इंटेर्व्हल मध्ये.."..पुढे काय झाले ते सांगायची सोय नाही...पण त्यांना काय कळण्णार त्यातली तृप्ती ?

ह्या लाल रीबीन वाल्या पण ना..कित्ती चिव-चिवाट करतात..मधली सट्टी संपवून मोठ्ठा आवाज ऐकून पळतच वर्गामध्ये आलो आज, वाटले, आज वर्ग लौकर भरला की काय..पाहीले तर दोनच चिमण्या, आपले, मुली गप्पा मारत होत्या.. आज कोणत्या बाईंनी कसे मॅचिंग केले होते, "क्ष" ने निबंधाची वही कशी मुद्दाम "य" ला दिली नाही, कोणाच्या आत्त्याच्या मामाच्या बायाकोच्या भावाच्या मुलीच्या बाळाचे बारसे कसे झाले वगैरे वगैरे...

तास चालू होता, आमचे गड लढवणे चालू होते, बर्वीन-बाई रंगीत खडूने फळ्यावरच्या पोकळ माणसाच्या पोटातल्या लहान-मोठ्या आतड्यान्ना जीव तोडून पिळवटे देत होत्या..आणि इकडे आमचे असतील- नसतील तेव्हढे सगळे आतडे "आनाकोन्डा" सारखे सूस्त पडत चालले होते...असे मस्त जेवण करून मिळणारा तृप्तीचा आनंद काय वर्णावा !

तास मध्यावरती आला, तसे आम्ही डोळ्यांवर् चढू पाहाणारी झोप उडवायचा प्रयत्न करत बसलो होतो..."पाणी पी, खिडकीबाहेरच्या झाडाला टेकून आज कोणी कोणी सायकल लावल्या आहेत ते बघ, मध्येच भाल्याची फेवरेट "टी.टी." (अर्थात "तृप्ती तावडे") आज कशी ग्रामोफोन सारखा दिसणारा लाल गुलाब डोक्यावर लावून आली आहे, हे त्यालाच खूणे ने दाखव.." असे एक ना अनेक उपाय निकामी ठरत होते.. आता बाईनी रंगकाम आवरते घेतले होते, तास संपायला शेवटची दहा मीनीटे राहीली होती आणि आम्या-सुम्या तालात डोलू लागले होते..."ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाहीतर गुण लागला" म्हणजे काय ह्याचे प्रात्यक्षीक दिसत होते...(कदाचित त्या ढवळ्या-पवळ्यान्चीही हिरवा-गार चारा खाऊन अशीच अवस्था होत असावी गोठ्यात).

पुढची काही मीनीटे तशीच गेली, भ्ररल्या-वान्ग्यान्ने आणि कालच्या रात्री उशीरा जागून पाहीलेल्या पिच्चर ने चांगलाच डाव साधला होता..भाल्या पुर्नच धारातीर्थी पडला होता बेंचवर...आणि बर्वीनीने नेमकाच त्याला पाहीला..त्याचा कान पकडून त्याची निद्रा-भंग करणार, तेवढ्यात मोठ्ठा आवाज आला "डूर्र..क्क"...सगळे आवाजाच्या दिशेने पाहू लागले...हा च तो "तृप्तीचा ढेकर" !!!

बाईन्सकट सगळे खदा-खदा हसू लागले आणि भाल्या आज मार खाण्या पासून वाचला...शेवटी भाल्याच्या "टी.टी." ने - तृप्तीनेच भाल्याला वाचवले आज !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णन मस्त केले आहे. एक्दम सायकली दिसल्या वर्गाच्या बाहेर. आम्ब्याच झाड, तिथे बसुन खाल्लेला डबा. आलेली झोप सर्व आठवल पुन्हा. आणि वाचेपर्यन्त झोप आली. हाहा Happy
छान.

विद्या.

तर ऐनवेळी बाजीप्रभूची घोरपड दोर सोडून पळून गेल्यासारखी अवस्था होते त्याची>> मस्त आहे हे तर फारच एल ओ एल. माझ्या एका मैत्रीणीस असेच घोरताना पकडले होते इंग्रजीच्या पटवर्धन सरांनी.

मस्त !!!

एकदम झक्कास… हे सगळे उपद्व्याप आम्ही केले आहेत शाळेत असताना. एकदम नॉस्टेलजिक का काय म्हणतात ते व्हायला झाल.

>>घोरपड तानाजीची ना?<<
आता त्या भंसाळीने सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावांखाली बाजीरावाला सोडलं नाहि तर यशवंती किस खेत कि मूली है... Happy

Pages