रद्दीपेपर च्या मोबदल्यात काय आवडेल घ्यायला?

Submitted by नानाकळा on 21 April, 2016 - 13:56

नमस्कार मायबोलीकर मित्रांनो,

सर्वसामान्य घरांमधे किमान एक किंवा दोन वर्तमानपत्रे येतात. वर्षाला साधारण ३० ते ५० किलो रद्दी तयार होते. बाजारभावाप्रमाणे दारावर येणारा रद्दीवाला ९-१०-११ रुपये किलोने रद्दी विकत घेतो. पण त्याच्या काट्यावर १० किलो रद्दी ७ किलो भरते. आमच्या घरात डिजिटल काटा आहे व नेहमी आधी मी मोजुन घेऊन नंतरच रद्दीवाल्याला मोजायला देतो म्हणून माहिती. जेव्हा माझ्या काट्यावर मोजतो तेव्हा रद्दीवाला ७ रुपये किलोने पैसे देइन असे बोलतो. रद्दीवाल्याच्या काट्यावर ३० किलो रद्दी फक्त २२ किलो भरली होती.

असो, अजून अनेक समस्या रद्दीवाल्यासंबंधित आहेत. रद्दीशीही संबंधित आहेत.

भारतात कचरासंकलनामध्ये निव्वळ रद्दीपेपरची समस्या इतकी आहे की डम्पींग ग्राऊंडचा सुमारे ४०-५० टक्के कागदासंबंधित कचर्‍याने व्यापला आहे. वापरल्या जाणार्‍या १०० किलो कागदापैकी फक्त २० टक्के पुनर्वापरासाठी उपलब्ध होतो. विकसित देशांत हे प्रमाण सुमारे ५० ते ७० टक्के आहे. भारतातल्या पेपरमिल्सना वापरलेले कागद लागतात, त्यांच्या एकुण गरजेपैकी त्यांना परदेशातून सुमारे ५०-६० टक्के आयात करावे लागते. नवीन पेपर तयार करायला सुमारे ६० टक्के नवीन कच्चा माल (झाडे), व ४० टक्के जुने कागद लागतात.

जर प्रत्येक घरातुन वापरलेले कागद नीट गोळा करता आले तर. ही आयात कमी करता येईल-त्यात जाणारे विदेशी चलन वाचवता येईल, डम्पिंग ग्राउंडची वाया जाणारी जागा वाचवता येइल. करोडो लिटर पाणी, लाखो झाडे, वीज वाचवता येईल. फायदे अनेक आहेत.

भारतातले रद्दी पेपर गोळा करण्याची व्यवस्था अतिशय वाईट आहे हे आपण वर पाहिलेच. मुळात आपण सामान्य लोक ह्याकडे तसे लक्ष देत नाही, सरकार जागृती करुन थकून जाते, पेपरमिलवाले त्यांच्या उद्योगाच्या व्यापातच फसले आहेत. अशा समयी जर व्यावसायिकरित्या घरोघरचे, ऑफिसांतले वापरलेले कागद गोळा करुन पेपरमिलवाल्यांपर्यंत पोचवले तर हे सगळे शक्य होईल. वापरलेल्या कागदांपैकी सुमारे ८० टक्के कागद पुनर्प्रक्रिया करुन नवीन कागदनिर्मितीसाठी वापरता येतो.

असे प्रयत्न झाले आहेत, होत आहेत. अनेक पेपर मील जसे खन्ना, आयटीसी, रामकी ग्रूप सारख्यांनी रिवर्स इंटीग्रेशन सुरु केले आहे, पण म्हणावे तितके यश येत नाही. अनेक एन्जीओ ह्यात आहेत पण तुम्हाला माहितच आहे एन्जीओ कसे काम करतात ते. मुख्य प्रश्न आहे सामान्य नागरिकांच्या सहभागाचा. माझ्यामते सामान्य लोकांना रद्दीच्या बदल्यात पैसे मिळतात ते हवे असतात विनासायास. घरबसल्या कोणी पेपर घेउन जातो, पैसे देउन जातो, कसं सुटसुटीत. एन्जीओ दान करा म्हणतात, पेपरमिलवाले आमच्या कलेक्शन सेण्टरवर आणुन द्या म्हणतात. बरेच इशु आहेत.

प्रश्न असा आहे की जर घरीच येउन कोणी हे पेपर घेउन जाणार असेल व ह्या बदल्यात पैसे न देता इतर काही देणार असेल तर तुम्हाला ह्या वर्षाच्या ३०-५० किलो रद्दीच्या ३००-५०० रुपयांच्या ऐवजी काय घ्यायला आवडेल? तुम्हाला काही कल्पना सुचतात का की पैशांऐवजी काहीतरी पर्यावरणासाठी केल्याचं समाधान व त्याचं बक्षिस म्हणून एखादी गोष्ट, सेवा, सवलत मिळाली तर सामान्य जनता आकर्षित होऊन सहभागाचं प्रमाण वाढेल?

माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत. बघा कशा वाटतात, यातल्या व्यवहार्य नसतील तर सांगा, वेगळ्या काही असतील तरी सुचवा.
१. एका वर्षाच्या रद्दीचे पैसे नियोजित करुन तेवढ्याचे गिफ्ट कुपन, डिस्काऊंट कुपन, गिफ्ट वाउचर्स देणे.
२. बचतगटांकडून हाताने बनवल्या जाणार्‍या वस्तू, अंध, अपंग मुलांकडून, व्यक्तिंकडून बनवल्या जाणार्‍या वस्तु देणे
३. सोडेक्सो कुपनसारखे फुड कुपन्स देणे
४. ५०० रुपयात बसेल असा जास्तीत जास्त रकमेचा हेल्थ इन्शुरन्स, अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स तत्सम देणे.
५. घरपट्टी, पाणीपट्टी, तत्सम करांतून १ टक्का सुट देणे.

स्वच्छ भारत अभियानास समस्त भारतीयांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपले अमूल्य मत जरुर नोंदवा.

धन्यवाद.

संदर्भः http://dipp.nic.in/english/Discuss_paper/DiscussionPaper_Recycling_Waste...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२.बचतगटांकडून हाताने बनवल्या जाणार्‍या वस्तू, अंध, अपंग मुलांकडून, व्यक्तिंकडून बनवल्या जाणार्‍या वस्तु देणे
३. सोडेक्सो कुपनसारखे फुड कुपन्स देणे >>>> हे आवडेल.

पण वरची योजना राबू शकणार नाही हे नक्की.

बिग बाजार दरवर्षी जुने सामान विकत घेते आणि त्या बदल्यात काही कूपन्स वगैरे देतं. तशी पद्धत इतरही ग्रोसरी चेन्स राबवू शकतात.
आमच्याक्डे रद्दीवाला पैसे देत नाही. त्याऐवजी कांद लसूण चिंच वगैरे काहीबाही देऊन जातो. अर्थात पुढे त्या रद्दीचे हाल तुम्ही म्हणता तसेच होत असणार.

कल्पना छान आहे.पण घरी येऊन कोणी पेपर गोळा करेल असे मला वाटत नाही.
बिग बाजारमधेही आपल्याला नेऊन द्यावे लागते.

आमच्याक्डे रद्दीवाला पैसे देत नाही. त्याऐवजी कांद लसूण चिंच वगैरे काहीबाही देऊन जातो.
>>>
प्लास्टीकच्या बदल्यात लसूण आणि कपड्यांच्या बदल्यात भांडी हे फेमस आहे आमच्याकडे, पण रद्दीच्या बदल्यात आवळा कोथिंबीर हे ईंटरेस्टींग आहे Happy

@ धागा,
फूड कूपन्स ऐवजी थेट पैसेच देण्यात काय अडचण आहे हे नाही समजले. भले रद्दीवाल्यापेक्षा भाव कमी असेल पण जर वजनात विश्वासार्हता असेल आणि दारात येऊन कोणी घेऊन जाणारे असेल तर व्यवहारी लोकांचीही हरकत नसावी. तसेच सोसायट्यांशी संधान बांधून एकदम रद्दी उचलावी.

धन्यवाद ऋन्मेऽऽष,

फूड कूपन्स ऐवजी थेट पैसेच देण्यात काय अडचण आहे हे नाही समजले

रद्दीचे मुल्य वाढवण्यासाठी पैशाऐवजी इतर काही देण्याची ही कल्पना आहे. जसे एखादे कुपन बुक असेल जे वर्षभर वेगवेगळ्या दुकानांमधून, हॉटेल्समधून, पेट्रोलपंपावर इत्यादी ठिकाणी वापरले तर किमान हजार रुपयांपासून लाखभर रुपयांचीही बचत होऊ शकत असेल तर पाचशे रुपयाच्या रद्दीच्या बदल्यात कित्येक पटीने ते मूल्य जास्त ठरते, शिवाय भावनिक जोडणीही जास्त राहू शकते. आपण एखाद्या मिशनमधे सामिल आहोत ज्याचे आपल्याला अनेक फायदे मिळत आहेत अशी भावना निर्माण करणे हा उद्देश आहे.

इंटरेस्टिंग कल्पना व चांगला धागा.

सध्या लोकांना रोख पैसे मिळत असल्याने व जर वजनात गडबड केली जात असेल तर ती थेट दिसत नसल्याने त्यांना यापासून वळवणे जरा कठीण काम वाटते. पण उच्च/मध्यमवर्गीयांपासून सुरूवात करता येइल, कारण त्यांच्या दैनंदिन खर्चाच्या मानाने कधीतरी रद्दीतून मिळणारा पैसा तुलनेने खूप नसतो.

यात रद्दी देणार्‍या लोकांना जर आत्ता एका ठराविक वजनाकरता १०० रू मिळत असतील तर यातून साधारण तेवढेच इन्डायरेक्ट मार्गाने मिळतील, की कमी/जास्त मिळतील? म्हणजे समजा कूपन्स असतील तर ती कितीची असतील असा प्लॅन आहे? जर जास्त किमतीची असतील तर लोक बहुधा तयार होतील. ती रेस्टॉ व दुकानदारांकडून सबसिडाइज करून मिळाली तर एकूण इकॉनॉमिक्स जमू शकेल.

आमच्या कडे नवी मुंबईत एक ngo वाले येऊन रद्दी घेऊन जातात ते ती रद्दी विकुन गरजु विद्यार्थ्याना मदत करतात त्यांच्या संस्थे चे कार्ड त्यांनी मला दिले होते नेट वर पण त्या संस्थेची माहिती आहे पण सध्या नाव लक्षात नाही आहे.

एक ngo वाले येऊन रद्दी घेऊन जातात ते ती रद्दी विकुन गरजु विद्यार्थ्याना मदत करतात>>>>>>> हे मस्त आहे.

पेपरवाल्यांनीच ते पेपर परत घ्यावेत. काही पेपर ऐतिहासिक दस्तावेज म्हणून ठेवून, उरलेले स्वत:च रिसायकल करून नविन पेपर छापावेत.
जे लोक पेपर रद्दी म्हणून परत देत असतील, त्यांना नविन पेपरवर काही डिस्काऊन्ट देण्यात यावा.

इंटरेस्टिंग कल्पना व चांगला धागा.

२. बचतगटांकडून हाताने बनवल्या जाणार्‍या वस्तू, अंध, अपंग मुलांकडून, व्यक्तिंकडून बनवल्या जाणार्‍या वस्तु देणे - हे रुचले

असा गृहसंस्थांमधून एकत्रित रित्या रद्दी गोळा करण्याचा उपक्रम पुण्यात मैत्री संस्थेतर्फे गेली अने क वर्षे 'रद्दीतून सद्दी' नावाने राबवण्यात येत आहे. त्यातून जमा झालेले पैसे मेळघाटातील कुपोषण समस्येचे निराकरण व्हावे म्हणून जे प्रकल्प राबवले जातात त्याकरता वापरले जातात.

अर्थात जमा झालेल्या रद्दीची विल्हेवाट सुयोग्य रित्या होत्ये की नाही हे तपासून बघावे लागेल.

थोडं अधिकः

मी सदर विषयावर गेले १०+ वर्ष लक्ष ठेवून आहे. रद्दीपेपर गोळा करणे एक चांगला व्यवसाय आहे कारण इथे मार्केटगॅप खुप आहे. गेल्या दोन वर्षापासून तर या क्षेत्रात नवीन काय घडतंय यावर माझा सविस्तर अभ्यास सुरु आहे. अनेक ठिकाणी, शहरांमधे व्यावसायिकांनी स्टार्ट-अप सुरु केले आहेत. पण स्केलींगचा इशु येतोय. दुर्दैवाने गेल्या पाच वर्षात अनेक आस्थापनांच्या नियोजनानुसार अपेक्षित असलेला विस्तार होऊ शकलेला नाही. पुण्यातले ग्रीनरद्दीवाला बहुतेक मे २०१५ मध्ये सुरु झालेत व व एक वर्षात पुण्यासारख्या (अंदाजे) ५+ लाख घरे असलेल्या शहरात त्यांचे रजिस्टर्ड युजर्स फक्त १२०००+ आहेत. म्हणजे अंदाजे ०.०२५ टक्के. हे खूप कमी आहे. मोबाईल-इन्टरनेटच्या माध्यमातून हे करु पाहणार्‍यांचा फोकस टेक्नोलॉजीकडे जास्त आहे, मूळ विषयाकडे कमी.

मैत्रीचा उपक्रम स्तुत्य आहे व त्यात सहभागी नागरिकांचे कौतुक आहेच. पण इथेही आवश्यक तेवढा लोकसहभाग होत नाही हे लक्षात येत आहे.

लोकसहभाग कमी पडत आहे. त्याची कारणे काय असावीत व त्यावर उपाय काय करता येतील ह्यावर विचारविनिमय झाला तर उत्तम होईल.