फेथ हीलिंग

Submitted by प्रकाश घाटपांडे on 14 July, 2015 - 04:03

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्|| समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणूस अमर थोडाच आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!
हा व्हिडिओ पहा
https://youtu.be/gVMMIaoVTPU

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यामुळे जे इतर भरडले जातात ते अशी घटकेपुरती आपली दु:खं, विवंचना त्या कर्त्या करवित्यावर सोपवतात..पुन्हा घरी येऊन रोजची लढाई लढायचे बळ मिळवतात. अशी उदाहरणे पाहिली की त्यांना का टोकावं असंच वाटतं.>>>>>> हे काही अंशी मान्य असले तरीही वरच्या व्हिडियोत भंपकपणा आढळतो.हा उन्माद (जो आपल्याकडे घागरी फुंकणार्‍या महिलांमधे असतो) जर रुग्णाच्या आधीव्याधी बर्‍या करीत असेल तर डॉक्टर आणि
हॉस्पिटले कशाला आहेत?

भंपकपणा हा शब्द अचूक वाटला. आपण समोर पाहतो आहोत तो भंपकपणा आहे हेही न समजण्याइतकी दयनीय अवस्था काही रुग्णांची झालेली असते ह्यावर विश्वास ठेवणे जड जात आहे. पण जर खरंच त्यांची अवस्था इतकी दयनीय असली तर त्यांना मानसिक आधार वगैरे देण्यापेक्षा थेट एज्युकेट करणे त्यांच्या भल्याचे ठरेल असे वाटते.

एका बाजूला ह्या बाबा बुवांचे सगळे धंदे डिसमँटल केले पाहिजेत म्हणजे आणखिन लोकं त्यांच्या नादी लागणार नाही आणि दुसया बाजूला बळी पडलेल्यांविषयी संयम आणि सहानुभुती बाळगून त्यांना अशा लोकांच्या नादी लागण्यापासून वाचवलं पाहिजे.
<
बुवा एक्झॅक्टली हेच माझेही म्हणणे आहे.

फक्त, बुवाबाजी करणारे थोडे, व बळी पडणारे हजारोंच्या संख्येने आहेत. तेव्हा, बुवाबाजी थांबवणे अधिक महत्वाचे. (व तुलनेने सोपे) हे कठोर कायद्यांचे काम. (तसेच समाजधुरिणांनी, प्रतिष्ठीत लोकांनी याबद्दल सातत्याने टिंगलीच्या सुरात बोलणेही गरजेचेच. पब्लिक फोरम्सवर चर्चांमधून हे क्लियरकट सांगितले गेले पाहिजेच, जेणेकरून बुवाबाजी _चूकच_ हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल.)

असल्या फेथ हीलिंग्जला सक्षम पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे मानसोपचार, ही बाब जनमानसापर्यंत पोहोचवणे हे चळवळीचे काम.

बाकी बळीबद्दलची सहानुभूती व त्यांचे रिहॅब हेदेखिल वैयक्तिक, जनसहभाग/शासकीय प्रयत्न. (उदा. "कुष्ठरोग जंतूंमुळे होतो, तो देवाचा शाप नाही." हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारी अभियान) व चळवळीमार्फतच करण्याचे काम होय.

या पार्श्वभूमीवर बुवाबाजी विधेयक डायलूट करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, अशा सर्व सुशिक्षित, सभ्य लोकांचा निषेध!

दी मा, आलं लक्षात. जे पबलिक बळी पडतय ते मात्र पब्लिक फोरम पासून खुप लांब आहेत त्यामुळे त्यानी किती फरक पडेल माहित नाही. बाकी ह्या बाबा बुवांचे धंदे बंद करायचे म्हणजे जरा किचकट काम आहे. एक तर लोकं स्वतःहून त्यांच्याकडे जातात आणि त्यात देवाचं नाव असतं मध्ये त्यामुळे इतर काही गुन्हे पुराव्यानी शाबित केल्या शिवाय त्यांना आत घालणे अवघड जातं.

बाकी घाटपांडेंनी कुठेही बाबा बुवांना सोडून द्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं लिहिलेलं मलातरी दिसलं नाही. तुम्ही आणि घाटपांडे दोन वेगळे मुद्दे मांडत आहात त्यामुळे त्यांच्यावर चिडू नका असं मी म्हणेन.

छे छे! एकाच पार्टीतल्या लोकांनी एकमेकांवर चिडून कसे चालेल?

बाकी, पब्लिक फोरम म्हणजे अगदी गावतला पिंपळपारही मला अभिप्रेत आहे. चार डोकी जमून गप्पा करतात तो पब्लिक फोरम. नॉट जस्ट लिमिटेड टू ऑनलाईन/ व्हॉट्सॅप सदृश बाबी. इन फॅक्ट, ऑनलाईन वा व्हॉट्सॅप अशा जागी हा विरोध जास्त तीक्ष्ण असायला हवा, असे माझे वैम.

फेथ हीलिंगला जोवर आदर, मान, प्रतिष्ठा समाजात मिळते, त्यातून मिळालेले प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष उत्पन्न हे कायद्याच्या तडाख्याखाली येत नाही तोवर हे प्रकार करणारे लोक थांबतील असे वाटत नाही. समाजातील निंद्य काम करणाऱ्या व्यक्तीला लोकांकडून जशी तुच्छतेची किंवा हेटाळणीची वागणूक मिळते तशी वागणूक फेथ हीलर्सना मिळणे शक्य आहे का? लोकांना लुबाडणाऱ्या, भरीस घालणाऱ्या व्यक्ती राजरोस हजारोंना उल्लू बनवत राहातात. अशा प्रत्येक माणसाला व त्याच्या कार्यक्रमांना अटकाव कसा करणार? कायद्याने, पोलिसांनी अटकाव केला की यांच्या छुप्या सभा भरू लागतात. किंवा वेगळ्या नावांनी सभा भरवतात. काही भोळे लोक हकनाक बळी पडतात. त्यांच्यापर्यंत जनजागृतीची यंत्रणा कधी पोचतच नाही.

वाचतेय. छान माहिती मिळतेय. मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही, पण एक सभा पाहिली आहे त्यावरून लिहीले आहे. आणि ती एक बाजू असू शकते हे ही गृहीत आहे. या अशा सभांतून रोग्याला क्षणिक आराम पडत असला तरी व्यक्तिपूजेला खतपाणी मिळण्याचा जबरदस्त धोका त्यात संभवतो. त्यासाठी उल्लेखिलेली अभियाने, चळवळ, विरोध इ केला पाहिजे हे खरे, पण अशा सहभागींना पर्यायही तात्काळ उपलब्ध असला पाहिजे. तुमची सिस्टीम इन प्लेस येईपर्यंत कळ काढण्याचा धीर ते धरतीलच असं नाही आणि दरम्यान दुसर्या सभेला जाऊन बसण्याची शक्यता जास्त. मला वाटत, मानसोपचाराबद्दल सर्व स्तरांमध्ये अवेअरनेस अजून नाही. ज्या दुखण्यांना औषध सापडत नाही ती लोकं तर हमखास इथे सापडतात.

व्हिडीओ बघितला. अशा सभा घेऊन, इतक्या मोठ्या प्रमाणावर असं काही होतं हे अगदी नवीन होतं. अर्थात लहान काय मोठं काय सगळ्याचाच निषेध.

या फोरम वरील लोकांनी औषधं, उतारे आणि आशीर्वाद वाचल पाहिजे. मनोविकार तज्ञ डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच."
>>फक्त, बुवाबाजी करणारे थोडे, व बळी पडणारे हजारोंच्या संख्येने आहेत. तेव्हा, बुवाबाजी थांबवणे अधिक महत्वाचे. (व तुलनेने सोपे) हे कठोर कायद्यांचे काम. (तसेच समाजधुरिणांनी, प्रतिष्ठीत लोकांनी याबद्दल सातत्याने टिंगलीच्या सुरात बोलणेही गरजेचेच. पब्लिक फोरम्सवर चर्चांमधून हे क्लियरकट सांगितले गेले पाहिजेच, जेणेकरून बुवाबाजी _चूकच_ हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल.)<<
केवळ कठोर कायद्याने हे प्रश्न सुटणार नाही. प्रबोधन व कायदा हे दोन्ही कमी अधिक प्रमाणात मागे पुढे करुन हे सातत्याने केले पाहिजे. नुसत्या प्रबोधनानेही प्रश्न सुटणार नाही न नुसत्या कायद्यानेही. अंनिस दोन पातळीवर काम करते. तिथेही दोन प्रवाह आहेत. एकाला वाटते बुवाबाजी भंडाफोड सातत्याने केली पाहिजे. मूळावर घाव घातला पाहिजे. फांद्या कशाला तोडत बसताय. दुसर्‍या प्रवाहाला वाटत प्रबोधन ही वेळखाउ प्रक्रिया असली तरी तीच परिणामकारक आहे. म्हणुन अंनिसत दोन्ही पातळया राखल्या जातात. दाभोळकर व मानव यांची अनुक्रमे महाराष्ट्र अंनिस व अखिल भारतीय अंनिस अशी वेगळी होण्यात कार्यपद्धतीची मतभिन्नता हेही एक मोठे कारण आहे. जवळ पास १९८८ पर्यंत ते एकत्र काम करीत होते. असो सध्या इतकच
.

>>पण जर खरंच त्यांची अवस्था इतकी दयनीय असली तर त्यांना मानसिक आधार वगैरे देण्यापेक्षा थेट एज्युकेट करणे त्यांच्या भल्याचे ठरेल असे वाटते.<<
बेफी, मी याच्याशी सहमत नाही. असहाय्य झालेल्या माणसाला प्रथम मानसिक आधाराची गरज असते. एज्युकेट वगैरे नंतर च्या गोष्टी आहेत. सु़ज्ञ डॉक्टर रुग्णाला प्रथम धीर देतो. झोपडपट्टीतील एखाद्या गरीब माणसाला जर एखादा विद्वान तू गरीब का? हे अर्थशास्त्रिय सिद्धांत देउन पटवू लागला तर तो म्हणेल तुमचे लेक्चर बास झाल. आमची खायची/ रोजगाराची सोय करता का ते बोला.

झोपडपट्टीतील एखाद्या गरीब माणसाला जर एखादा विद्वान तू गरीब का? हे अर्थशास्त्रिय सिद्धांत देउन पटवू लागला तर तो म्हणेल तुमचे लेक्चर बास झाल. आमची खायची/ रोजगाराची सोय करता का ते बोला.>>>>>+१

एकंदरीत मुळ विषय व प्रतिसाद वाचले.

>>>> मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्|| <<<<
या श्लोकाचा, त्यातिल अर्थाचा अन पुढे मांडलेल्या विषयाशी काहीही संबंध दिसला नाही.

>>>> समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. <<<<
हे केवळ पेशंटच्याच बाबतीत होते असे नाही तर जिथे जिथे समुह गोळा करुन "गर्दीद्वारे" काही घडवून आणायचे असेल, तिथे तिथे उन्मादपूर्ण अवस्था तयार करण्यास नाना फन्डे वापरले जातात. व हे केवळ धार्मिक्/अंधश्रद्धेकरताच होते असे नाही, तसेच निव्वळ प्रत्यक्ष गर्दी जमवुनच केले जाते असेही नाही, तर मिडिया/नाटक/सिनेमा यामार्फतही विशिष्ट विचारधारेत लोकांना आणण्याकरता केले जाते. पथनाट्य हा देखिल त्याचाच एक अविष्कार आहे. अर्थात असे करणारे किती एक्स्पर्ट आहेत यावर समुहावर किती परिणाम होणार ते ठरते. रस्त्यावरील गारुडी/डोम्बारी देखिल याला अपवाद नाही.

>>>> आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. <<< कारण बरोबर. पण फक्त फेथ हिलिंगच का? अन्य असंख्य उपाय योजना केल्या जातात. व त्या निव्वळ शारिरीक दु:खाकरताच नव्हे तर यच्चयावत मानसिक अवस्थांच्या डागडुजीकरताही केल्या जातात.

>>>> रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. <<<< खरे तर पेशंट (शारिरीक रोगाचा) विचार करण्याच्या स्थितीत असेल, तर तो न परवडणारे वैद्यकीय उपचार न करता स्वस्थ बसेल (जसे मी करतो). पण पूर्ण विचारी कोणीच नसल्याने (माझ्यासहित) माणुस अन्य उपाय शोधू लागतो. यात गैर काहीच नाही व आधुनिक महागडी वैद्यकीय उपचारपद्धती म्हणजेच शेवटची अंतिम सुयोग्य उपचार पद्धती असेही कुठे सिद्ध झालेले नाही. फार फार तर हॉस्पिटल मधे दाखल झाल्यावर इतकेच होते की मरणोत्तर पोस्टमार्टेमच्या चिरफाडीशिवायच डेथ सर्टीफिकेट मिळण्याची सोय होते व मृतदेह लौकर ताब्यात मिळतो. बाकी वर म्हणता ते विचार करण्याच्या अवस्थेत ना पेशंट असतो, ना आर्थिक दृष्ट्या डबघाईस आलेले त्याचे नातेवाईक.

>>>> माणूस अमर थोडाच आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो! <<<<
फेथहिलिंग वाल्यांचे यश निव्वळ या विचारामधे नाहीये. आर्थिक कमजोरी हे अनेक कारणांमागिल एक कारण आहे. पण समुह करतो, भले गैर असले तरीही करतो, म्हणुन आपणही करण्याचे धाडस समुहातील अतिसामान्यास प्राप्त होऊन तो बिनधास्त चार जण सिग्नल तोडतात म्हणून स्वत:ही तोडतो, तद्वतच, समुह एकाच्या भजनी लागला, तर अतिसामान्य माणूसही आपसुक नादावतो. हे नादावणे सुयोग्य बाबी करता असले तर लाभदायक, अयोग्य बाबीकरता असले तर नुकसानकारक इतका सोप्पा हिशोब आहे. नादावलेल्याचे नुकसान तो नादावणार्‍यांचा फायदा असे गणित असू शकते, व ते केवळ फेथहिलिंगवालेच करतात असे नाही. होय, अगदी राजकारणी पुढारी/पत्रकार्/ज्येष्ठ विचारवंत वगैरे लोकही हाच धन्दा उघडून बसलेले असतात.

>>>> हा व्हिडिओ पहा <<< व्हिडीओ बघु शकत नाही. लिन्क बॅन आहे.

जगावर दोन प्रकारे राज्य करता येते.
एक म्हणजे प्रत्यक्ष शारिरीक बळजोरी करून....
दुसरे म्हणजे लोकांच्या मनावर ताबा मिळवुन....
आणि हे प्रत्यही तुमच्या आजुबाजुला घडतच असते. कित्येकदा तुम्हीही तेच बळजोरीचे कार्य करीत असता वा तुम्हीच कुणाकडून तरी या बळजोरीचे सावज बनलेले असता.

या विषयावर प्रचंड काही लिहीता येईल. पण सध्या इतकेच.
(वि.सु.: वरील लेखनात मी अन्निस/नक्षली/कम्युनिस्ट्/ब्राह्मणद्वेष्टेपणा इत्यादी इत्यादी काहीही आणलेले नाही हे लक्षात घ्यावे तर्रीही काहीतरी ठळक केलेले असावेच म्हणुन विचारतो की "घाटपांडे साहेब, तुमचा वरील धागा वाचता विचारावेसे वाटते की तुम्ही पगारेसाहेबांची शिकवणि लावली आहे का?" Proud )

आणि आता लेखाच्या पहिल्याच वाक्यात दिलेल्या श्लोकासंदर्भाने....
>>मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् <<<
तर हा श्लोक मला मान्य आहेच, शिवाय वरील संपुर्ण पोस्ट हे या श्लोकाच्या अर्थानुरुपच घडले आहे यावरही माझा विश्वास आहे. मला वरील मजकुर सुचणे, तो टाईपायला मिळणे (व तुम्ही तो वाचणे) हे माधवाच्या कृपेनेच घडले यावर माझा ठाम विश्वास्/श्रद्धा आहे.

>> व्हिडीओ बघु शकत नाही. लिन्क बॅन आहे. <<
मेन गोष्टच पाहू न शकल्याने त्याअनुषंगाने केलेले भाष्य हे व्यवस्थित समजू शकणार नाही.
>>>> मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्|| <<<<
>>या श्लोकाचा, त्यातिल अर्थाचा अन पुढे मांडलेल्या विषयाशी काहीही संबंध दिसला नाही. <<
उपरोक्त श्लोक हा फेथ हीलींगचाच भाग आहे. त्यामुळे तो अस्थानी नाही.
बाकी विश्लेषणाशी असहमत नाही.
https://www.youtube.com/channel/UC-AgSfRjC3d3g4Z_6Dhje-w
वरील लिंक ही याप्रकारचे अन्य व्हिडिओ दाखवते.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मार्च २०१६ च्या अंकात या विषयावर सचिन थिटे यांची प्रत्यक्ष वृत्तांतावर कव्हर स्टोरी आली आहे.तसेच रेव्ह चित्रलेखा जेम्स यांचाही यावर लेख आहे.

Pages