तर्क, विश्वास, वगैरे वगैरे...

Submitted by सई. on 8 April, 2016 - 04:18

नवं वर्ष सर्वांसाठी आनंदाचं होऊ दे!

असं केवळ मी म्हणत नाहीये, तो बाहेर नटलेला बहरलेला निसर्ग म्हणतोय. आज सकाळपासून तिघा-चौघांकडून माझा विश्वास नाही गं, मी काही हे मानत नाही गं ऐकलं. ओके, अॅग्रीड. अगदी मनापासून आदर आहे. पण प्रत्येक गोष्ट इतकी तर्का-विश्वासाच्या कसोट्यांवर का तासायची आहे? तुमची मतं, तुमचा धर्म, तुमच्या विश्वासानं त्या निसर्गाला काडीचाही फरक पडत नाही, माणसांनो! तुम्ही सण साजरे करा, नका करू, जुळवून आपल्याला त्याच्याशी घ्यायचंय, त्याला कवडीमात्र देणंघेणं नाही. तसंही आता गेल्या काही वर्षांपासून तो 'तडफडा तिकडे' म्हणतोचंय. अरे, बाहेर बहावे, काटेसावर, पळस, अगदी बोगनवेलीही झडझडून उठतात, नव्या कोवळ्या पालव्या फुटतात, त्या केवळ राम वनवासातून परतला किंवा बळीनं दानशूरपणा दाखवला म्हणुन नाही, ना तो केवळ हिंदूंसाठी फुलतो, ना इतर कुणासाठी. आपण मात्र सगळं कोष्टकात बसवतो.

आज कडूनिंब अख्ख्या उष्ण कटीबंधीय लोकांनी खायला हवाय, आजच नाही, आजपासून. नुसता खावा किंवा पाण्यात घालून आंघोळी करायला हव्यात. उष्मा नियंत्रित ठेवण्यासाठी, परंपरा पुढे रेटण्यासाठी नाही. घाम उत्सर्जित होत राहून उर्जा कमी होते, साखरेच्या सेवनाने ती पातळी वाढवू. पन्ह्यानं उन्हाळा बाधत नाही. पटत नाही ना, मग सण म्हणुन नका ना बघू तिकडे. होळी आता हानीकारक म्हणुन पेटवू नये, पण इतकी शतकं होळीनं थंडी काय फक्त हिंदूंसाठी पळवली का, शेवटी ती एक पोर्णिमेचा मुहूर्त साधून पेटवलेली साधी शेकोटीच ना? सुगी झाली म्हणुन त्या निमित्तानं पुरणाच्या पोळ्या होतात. रंगपंचमीला तुम्ही नका हवंतर रंग खेळू, पण बाहेर वसंत जिकडंतिकडं रंगांची उधळण करतोय. ती केवळ हिंदूंसाठी नाही. मार्चएंडला अकौंटींग इयर संपतं तेव्हा करतो का आरडाओरडा? ते आपण सोयीसाठी सर्वमान्यतेनं स्विकारलेलं आहे, पण तेही कुणीतरी कधीतरी म्हणालेलंच आहे ना? शिशिरात पानगळ करून निसर्गाचं वर्ष संपतं. तुम्ही कीर्द खतावण्या नव्या घाला, नका घालू, बाहेर पालव्या फूटून खरोखरचं नवीन वर्षं सुरू झालंय. ते कुणीही कधी सांगितलेलं नाही त्या निसर्गाला. श्रावणात निसर्गातल्या पत्री गोळा करून घरादाराचे कानेकोपरे सजवा ना, इकेबाना करा, कुणी सांगितलं, फक्त मंगळागौरीलाच वहा म्हणुन? अशी निमित्तं इतरेजन कसे साजरे करतात तेही समजून घेता येईल. गुढी उभारली, अगदी एखादी गौर झोपाळ्यात झुलवत दिवाणखान्यात बसवल्यास झकास इंटिरीयर डेकोरेशन होतंय. वर पन्हं, कैरीची डाळ म्हणजे तर दुधात साखर आणि गारेगार! हवेत एखादी हलकी सनईची धून तरंगत ठेवावी. छानपैकी जमेल त्या जीवाभावाच्या सग्यासोय-यांना बोलवावं त्यानिमित्तानं. केवळ बायकांनाच का हा लाभ? असं अधूनमधून निसर्गाशी समन्वय साधून काही केलं तर आपल्या नेहमीच्या रटाळ रुटीनमधून ब्रेक मिळाल्यासारखं वाटत नाही का आपल्याला? का इतके तर्ककर्कश्श होतो आपण?

सणवाराचे दिवस आले की विश्वास नसणारे तथाकथित निधर्मी लोक बेंबीच्या देठापासून कसा सगळा चळीष्टपणा आहे ते सांगत शब्दश: कोकलत सुटतात, विश्वास असणा-यांची यथेच्छ टर उडवत. आहे नाही ते सगळं बुद्धीचातुर्य तिथे खर्ची घालायची जणू अहमहमिका लागते. जे नकोसं आहे ते मान्यच आहे. टाकलंच पाहिजे. पण जिथे डावं आहे तिथे उजवंही आहेच. ते का दिसत नाही? उलट त्यानिमित्तानं पक्वान्नं चापू, मिळालेल्या सुट्टीचा सानंद उपभोग घेऊ, लोळू, फिरू, भेटू, जे हवं ते करू ना. मी निसर्गधर्मी आहे. तो सांगतो ते मनापासून ऐकावंसं वाटतं. आणि मला माझ्या कुवतीनुसार जितकं झेपतं ते मी ऐकते.
इतक्यात एक अफगाणी मित्र गोतावळ्यात सामील झालाय, इस्लामाबादला दोन वर्षं दूतावासात काम करून आलाय. त्याला पाडवा म्हणजे काय ते हवंय. त्याला कडूनिंबाची चटणी खाऊ घालायचं आणि त्याच्या गोष्टी ऐकायचं ठरलंय. त्याचं जग आम्हा बाकीच्यांच्या जगापेक्षा सर्वस्वी निराळं आहे. गुगल आणि सोशल मिडीयाचा जमाना असूनही, प्रत्यक्ष माणसानं सांगितलेल्या गोष्टी डोळे विस्फारत ऐकण्याची मजा आजही जशीच्या तशी टिकून आहे.

माझ्या मनात आपल्यापेक्षाही आपल्या मुलांबद्दल जास्त विचार येतो. आपण ही निमित्तं, क्षण नाकारतोय आणि त्यांना निसर्गचक्र, पर्यायाने जीवनचक्रही याची देही, याची डोळा सोदाहरण समजावण्याची संधी डावलतोय. कुणीतरी, पूर्वी कधीतरी, ह्या ह्या दिवशी हे हे करा असं सांगितलं असेल, ते आज तसंच्या तसंच केलं पाहिजे असं कुठाय? ज्यांना सांगितलंय त्यांनीच फक्त केलं पाहिजे असं तरी कुठे लिहीलंय? बिहू, ओणम आवडेल मला साजरं करायला. मला शीरखुर्मा तुफान आवडतो, लहानपणच्या माझ्या कितीतरी आठवणी ईदशी निगडीत आहेत. मी वाढले त्या परिसरात पाच मशिदी आहेत आणि आमचं घर मधोमध. आजही ईदला बिलाल मुल्लांचा फोन आला नाही तर मी फोन करते आणि शीरखुर्मा ओरपून येते. जेव्हा जाणं जमत नाही, तेव्हा घरी बनवायचा प्रयत्न करते. पण तशी चव येत नाही म्हणा.

आपण आज सर्वार्थाने इतक्या भयंकर वातावरणात जगतोय की मिळतील त्या प्रत्येक बारक्या सारक्या, छोट्या मोठ्या निमित्तांनी आनंद ओढून घेतला पाहिजे. तर तरू. ते करत नाही म्हणुन या भांडाभांड्या, लढाया अन् डोकेफोड्या. प्रत्यक्षही अन् व्हर्चुअलीही. बरं, तुम्हाला नाही करायचं तर नका करू, इतरांच्या आनंदाला कशाला कडवटपणाची विरजणं लावत फिरताय? तेही कडूनिंब न खाताच! उलट तो खाल्लात तर गोड व्हाल जरा. उगीच आपलं कायतरी!

असो. अगदीच रहावलं नाही, म्हणुन बोलत सुटले. आधी वाटलं, नको, कशाला बोलून दाखवायचं, आपलं आपल्याकडं. पण जिथं तिथं नकाराचे गळे काढणारे विचार करत नाहीत, आपण मात्र नको, राहू दे, म्हणत बसतो. मतं प्रत्येकालाच असतात. आणि गप्प बसणारेही विचार करतच असतात. आज त्या 'न'कारकारांनी हे एक व्यक्त होण्याचं निमित्त (की कोलीत?) आयतं पुरवलं. ज्यांना ही मतं पटत नसतील, त्यांनी स्वत:ची मतं कृपया स्वत:पाशीच ठेवावीत. कोणत्याही युक्तीवादात स्वारस्य नाही, तेव्हा क्षमस्व.

पुनश्च सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मंडळी Happy
भ्रमर Happy

अगो, अगं क्षमस्व काय गं? तुला किंवा विधायक पद्धतीनं आपली मतं मांडणा-या कुणालाच माझं शेवटचं वाक्य लागू नाही, तेव्हा कृपया गैरसमज करून घेऊ नको. मतं स्वतःजवळ ठेवा सांगणं त्यांना उद्देशून आहे, ज्यांच्यामुळे हे मांडावंसं वाटलं. अशी अनेक मित्रमंडळी आहेत, आणि असेही अनेकजण आहेत ज्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख फारशी नाही, पण मित्रयादीत असल्यामुळे त्यांच्या चर्चा डोळ्यावर पडतात, जी सरसकट सगळ्याच सणांना नाकं मुरडतात आणि ते मुरडणं छान तावातावानं मांडतातही. ती मतं पटोत, न पटोत, त्यांच्या मतांबद्दल आदर आहे, तो व्यक्त करतानाच अरे, मग आपल्याला जे वाटतं, ते आपणही मांडलं पाहिजे असं प्रकर्षानं वाटलं. खरंतर मी त्यांचे आधी आभार मानायला हवेत की त्यांनी व्यक्त व्हायला भाग पाडलं.

तू म्हणतेस तसा आदर्शवाद मला ह्यात नाही दिसत. फार साधंसुधं, स्वान्त सुखाय असं काहीतरी आहे हे. जिथे समाजाचा संबंध नाही येत. तू पुन्हा पाहिलंस तर इथे मी आपण वैयक्तिक पातळीवर जे सण साजरे करतो, नुसतं त्याबद्दल वक्तव्य केलंय. गणपती, नवरात्राचे उल्लेख नाहीत. हे दोन्ही सणही खरं घरगुती पातळीवर किती आनंदाचे असतात ना? इथे माबोवरही आपला गणेशोत्सव किती धडाक्यात आणि विधायक पद्धतीनं साजरा करतो आपण. कसलं प्रफुल्लित वातावरण असतं हवेत. माबोवर आवर्जून पुन्हा पुन्हा डोकावलं जातं. त्यावेळी समाजात असते ती परिस्थिती आपण कुणीच नाकारू शकत नाही, म्हणुन तर जे डावं आहे, नकोसं आहे ते टाकायला हवं असं म्हणाले. तेव्हा हा केवळ विरोधाला विरोध नाही. मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक तो काय उरला Happy

पियू, बोलणारे सगळीकडून बोलतात, आपण काय करायचं ते आपल्यालाच ठरवायला हवं ना? Happy आंधळेपणानं अनुसरण्यापेक्षा समजून उमजून, योग्य ते अनुरूप बदल करून एखादी गोष्ट सहज अंगिकारता येते असं मला वाटतं.

सई, ब्रशच्या एकाच स्ट्रोकमध्ये अक्खे चित्र रंगवून व्हावे तसे झरझर लिहीलेत. << गुढी उभारली, अगदी एखादी गौर झोपाळ्यात झुलवत दिवाणखान्यात बसवल्यास झकास इंटिरीयर डेकोरेशन होतंय. वर पन्हं, कैरीची डाळ म्हणजे तर दुधात साखर आणि गारेगार! हवेत एखादी हलकी सनईची धून तरंगत ठेवावी. छानपैकी जमेल त्या जीवाभावाच्या सग्यासोय-यांना बोलवावं त्यानिमित्तानं. केवळ बायकांनाच का हा लाभ? असं अधूनमधून निसर्गाशी समन्वय साधून काही केलं तर आपल्या नेहमीच्या रटाळ रुटीनमधून ब्रेक मिळाल्यासारखं वाटत नाही का आपल्याला? का इतके तर्ककर्कश्श होतो आपण? >> हे विशेष आवडले. आनंदयात्री आहात तुम्ही! अशाच आनंदात डुंबत राहा, आणि अशा लिखाणातून आम्हालाही डुंबतं ठेवा. आजकाल उत्साहाचे 'सोर्स' कमी आणि 'सिंक' जास्त अशी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत सोर्सेसनी जास्तच काम करायला हवं. Happy

भास्कराचार्य यांची पोस्ट आवडली . शेवटची वाक्य विशेष आवडली . सईना लेखातून हेच अपेक्षित असावं

( दुसर्यादा पोस्ट टाकतेय सई. होप यू डोन्ट माइंड )

ओके सई., बरं वाटलं वाचून. तू म्हणतेस त्या आशयाच्या पोस्ट्स / चर्चा नजरेला पडलेल्या नाहीत त्यामुळे तसं लिहिलं Happy

<< फार साधंसुधं, स्वान्त सुखाय असं काहीतरी आहे हे. जिथे समाजाचा संबंध नाही येत.>> सहमत. सण साजरा करणारा प्रत्येक जण त्या सणाची पारंपारीक बाजू अगदीं गंभीरपणे घेतो व श्रद्धेने पाळतोच किंवा पाळावीच असं कुठे आहे ? सण हें आनंदाचं निमित्त आहे व त्याच्या पारंपारिक बाजूकडे मिष्किलपणे पहातही तो साजरा करतां येतोच कीं ! -

"तुम्हींच सोवळं खांद्यावर घेवून गॅलेरींत उभे रहा; वेगळी गुढी उभारायला कशाला हवी ? " ,
हा विनोद तूं केला होतास ना, तोच माझा सर्वांत आनंदाचा पाडवा होता !!!
youcan;t.JPG

गुगल आणि सोशल मिडीयाचा जमाना असूनही, प्रत्यक्ष माणसानं सांगितलेल्या गोष्टी डोळे विस्फारत ऐकण्याची मजा आजही जशीच्या तशी टिकून आहे.
>>>>>>
मूळ लेखाशी तसे संबंधित नसलेले हे वाक्य फार आवडले.

लेखही आवडलाच.

मला वाटते की सणांची निसर्गाशी सांगड घालायच्या बाबतीत सण साजरे करणारे आणि त्याला विरोध करणारे दोन्ही कमी पडत आहेत. त्यामुळे विरोधही आंधळा होतो आणि समर्थनही (अंध)श्रद्धाळू पद्धतीने होते.

माझी वैयक्तिक आवड म्हणाल तर ज्या सणांमध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळायची संधी असते ते मला जास्त आवडतात. त्यामुळेच गणेशोत्सव हा माझा सर्वात फेव्हरेट सण. त्या सणासारखे वातावरण महाराष्ट्रात तरी दुसर्या कुठल्या सणाला नाही. मुख्यत्वे आमच्या मुंबई आणि कोकणात.
आता म्हटलं तर मी नास्तिक. लहानपणापासून नाही, तर स्वताचा विचार मांडायची आणि तो अनुसरायची कुवत अंगी आली तेव्हापासून झालेलो. पण त्यानंतरही कधी गणेशोत्सवाचा संबंध कोण्या देवाशी जोडून जर देवच अस्तित्वात नाही तर का हा सण साजरा करा असा विचार मनात आला नाही की माझी गणपतीची आवड कमी झाली नाही, ना एकसाथ गणपती बाप्पा मोरया बोलण्यातील जोश कमी झाला. कारण सणांचा नेमका अर्थ मला कुठेतरी समजलाय असे वाटते ज्याचा कुठल्याही देवाधर्माशी काहीएक संबंध नाही.

बाकी शीरखुर्मा मुसलमानीच हवा. आपल्या घरच्या शेवयांना ती सर नाही. माझाही तो फेव्हरेट आणि सत्यनारायणाच्या प्रसादाएवढाच भारी आवडतो.

क्या बात है, भाऊ! खुपच छान. मी करून ठेवलेला हजार शब्दांचा फापटपसारा केवळ दोन वाक्यात किती समर्थपणे पोचवला तुम्ही Happy

जाई, यू आर वेलकम गं. असं का म्हणतेस?

धन्यवाद ऋन्मेष.

<< त्या सणासारखे वातावरण महाराष्ट्रात तरी दुसर्या कुठल्या सणाला नाही. मुख्यत्वे आमच्या मुंबई आणि कोकणात.>> १०० % सहमत.
धार्मिक भावनेपेक्षां मांगल्याचं, सदभावनेचं एक लोभस प्रतिक हीच बाप्पाची प्रतिमा बहुतेकांच्या मनात खोल रुजली असावी. माझी मुलगी ५-६ वर्षाची असताना माझ्या बहिणीने तिला दिलेली बाप्पाची छोटी मूर्ती 'शो-केस'मधून काढून ते ११ दिवस आम्ही दोघानी केलेल्या छोटशा मखरांत ठेवत असूं. पूजा , आरति नसे पण फुलं, प्रसाद वगैरे अगत्याने असायचं. आज माझा नातू ५-६ वर्षांचा झालाय तरीही गणपति आगमनाची चाहूल लागली कीं माझी मुलगी कुठेही, अगदीं अमेरिकेत, असली तरीही फोनवरून माझ्या मागे तगादा लावतेच- ""बाबा, मखराचं काम शेवटच्या दिवसावर नका ढकलूं; आणि त्याचा फोटो पाठवा मला ताबडतोब !". घरांत आलेला बाप्पा कायम मनात घर करून रहातोच; त्याचं धर्माशीं कांहीं देणं घेणं नसतं.

सुंदर लिहीले आहे. आवडले. मलाही सगळे सण जमेल तसे साजरे करायला आवडतात. लहानपणी तर या सगळ्यांतून खूप धमाल आलेली आहे.

स्वतः फारसे धार्मिक नसलेल्या पुलंनी सणांबद्दल, त्यातील आनंदाबद्दल लिहीलेले आहे. मला पुण्यातील गणपतीच्या मिरवणुकीत कायम एक मॅजिकल वातावरण जाणवायचे. दुपारचे सात्विक डेकोरेशन केलेले गणपती व नंतर रात्रीचे लायटिंग वाले, तो आवाज, गुलाल ई. व नंतर येणार्‍या मंडई, दगडूशेठ वगैरेंचे रथ आले की वातावरणात काहीतरी वेगळे होते. ते मॅजिक मला नंतर डिस्नेलॅण्ड ला ख्रिसमस परेड मधे सांताक्लॉज व डिस्ने कॅरेक्टर्स बघतानाही जाणवले. पुलं म्हणतात तसे भक्तांच्या गर्दीचे तेज देवाच्या/देवीच्या चेहर्‍यावर दिसते, तसेच काहीतरी असेल

सणांच्या बाबतीत आपल्या साजरा करण्याच्या पद्धतीने दुसर्‍याला त्रास होणार नाही (हा जरा ग्रे एरिया आहे याची कल्पना आहे :)) हे बघावे आणि मग त्यानंतर तर्क बिर्क लावत बसू नये Happy

खुपच आवडलं आहे. आणि वाचुन फार बरं वाटलं. कारण याच्यावर विश्वास नाही त्याच्यावर विश्वास नाही असे एवढे लोक भटतात की त्यावरच विश्वास बसत नाही. सण प्रतिक म्हणुन का साजरे करायचे नाहीत. काहीच साजर न करता राटाळ आयुष्य जगावं, रोज कामावर जावावं, दुपारच्या जेवणाची चर्चा व्हॉअ‍ॅ वर करायची एवढंच करायचं का? असा पण प्रश्न आहे. आणि कुठे किती तार्किकता लावावी हे जर लोकांना कळत नसेल तर त्यांच्या तर्किक विचार करण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं! आणि विश्वास नाही वगैरे लोक घरात आयत्या पुरणपोळ्या आल्या की तुटुन पडत असणारच की! विश्वास नाही म्हटलं की लोकाना आपण मॉडर्न झालो असं वाटतं! वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणे! जीवनाचा उत्सव साजरा करु नका असं कुठल्याही विज्ञानात मला आजपर्यंत सापडल नाही! तु जे पोटतिडकीनं कळकळीनं लिहीलियस ते पटतं. मी तर असं कुणी भेटलं की भांडायलाच उठतो! Proud

सई, छान लिहिलं आहेस.

मलाही सण आणि उत्सव आवडतात. त्यातल्या जल्लोषपूर्ण वातावरणाच्या आगमनासाठी त्या त्या उत्सवांच्या कितीतरी दिवस आधीपासून त्यांच्या वाटेकडे डोळे लागतात. किबहुना पुढे वाटेकडे डोळे लागण्यासाठी काहीतरी उत्साहपूर्ण असे लवकरच येत आहे ही भावनाच सुखावह वाटते. प्रत्येक सण/उत्सव हा त्याचा असा माहौल - गंध, स्वाद, प्रकाश, ध्वनी, यांची वेगळी अशी अनुभूती देतो आणि त्यातून रोजच्या जगण्याला उभारी मिळते. मग त्यात गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ, गावाकडच्या यात्रा, असे मोठे मोठे सणही आले. फारेंडच्या वरच्या पोस्टमधील दुसर्‍या परिच्छेदात अगदी नेमके आले आहे. आणि त्याच्या शेवटच्या परिच्छेदासाठीही - अगदी अगदी. दुसर्‍याला मनस्ताप आणि चीडचीड होणार नाही हे मात्र प्रत्येकाने कटाक्षाने बघितलेच पाहिजे. माझ्यापुरती आदर्श सणांची/उत्सवांची व्याख्या अशी आहे की, सण/उत्सव असे असावेत की इतरांनाही तिथे आवर्जून उपस्थित राहण्याची इच्छा व्हावी, त्याशिवाय 'मिस झाल्याची' भावना यावी.

(काहीना अगदी कशानेही त्रास होतो, म्हणजे दुसर्‍याने अगदी शांत बसले तरी. तर ते सोडून.)

{सणवाराचे दिवस आले की विश्वास नसणारे तथाकथित निधर्मी लोक बेंबीच्या देठापासून कसा सगळा चळीष्टपणा आहे ते सांगत शब्दश: कोकलत सुटतात, विश्वास असणा-यांची यथेच्छ टर उडवत. आहे नाही ते सगळं बुद्धीचातुर्य तिथे खर्ची घालायची जणू अहमहमिका लागते}

बराचसा लेख पटला पण वरिल वाक्याबद्दल तीव्र आक्षेप घ्यावासा वाटतो.

मी स्वतः संपुर्ण नास्तिक आहे पण मी आमच्या सोसायटीच्या सगळ्याच उत्सवांमध्ये सामिल असतो. गणपतीच्या मिरवणुकीत आणि नवरात्रीत ढोल वाजवतो, नाचतो, होळीला रंगांची उधळण करतो, दिवाळीत मुलांना फटाके आणुन देतो. दसर्‍याला जवळच्या आप्तांकडे जाउन घट्ट गळामिठी मारतो, म्हातार्‍यांना वाकुन नमस्कार करतो. सणांमधला पुजाअर्चा सारखा धार्मिक भाग वगळुन इतर सांस्कृतिक भाग मस्त एंजॉय करतो. माझ्या माहितीतले झाडुन सगळे नास्तिक असेच वागतात.

याउलट आमच्याकडचा एक कट्टर आस्तिक महाभाग ध्वनिप्रदुषण, पाणी प्रदुषण, वायु प्रदुषण, पाणी वाचवा, झाडे वाचवा वगैरे आक्षेप घेत वर सांगीतलेल्या प्रत्येक सांस्कृतिक अ‍ॅक्टिविटी विरुद्ध दर वर्षी मोहिम चालवतो. त्याच्या मते प्रत्येक सणाची धार्मिक बाजुच महत्वाची आहे आणि बाकीच्या सो कॉल्ड सांस्कृतिक बाबी, ज्यामुळे समाजाची आणि निसर्गाची हानी होते, नंतर घुसड्लेल्या आहेत. त्याला इतर काही आस्तिक लोकांकडुन पाठिंबाही मिळतो.

त्यामुळे तुमच्या या लेखाच्या संदर्भात निधर्मी, नास्तिक, ज्यांचा विश्वास नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना उगाचच धोपटण्यात अर्थ नाही.

भाऊकाकांचे हा प्रतिसाद खास आवडला.
{सण साजरा करणारा प्रत्येक जण त्या सणाची पारंपारीक बाजू अगदीं गंभीरपणे घेतो व श्रद्धेने पाळतोच किंवा पाळावीच असं कुठे आहे ? सण हें आनंदाचं निमित्त आहे व त्याच्या पारंपारिक बाजूकडे मिष्किलपणे पहातही तो साजरा करतां येतोच कीं ! ..... त्याचं धर्माशीं कांहीं देणं घेणं नसतं.}

टग्या, मला जे जसं दिसतंय, मी जे वारंवार वाचतेय, आणि त्याचा मला जो अन्वयार्थ लागतोय, त्याचं वर्णन करणारे शब्द मी वापरले आहेत. त्यात अतिशयोक्ती नाही.
मी 'अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले' म्हणाले असते तर मोघम वाक्यातही बरंच कव्हर झालं असतं कदाचित Happy
आपली काहीही मतं असली तरी जिथे दुस-यांच्या मतं, भावना, श्रद्धांचा आदर होतो, केला जातो, त्या कुणालाच माझं विधान लागू नाही, कृपया विपर्यास करू नये. तसा आस्तिक नास्तिक मुद्दाही इथे गैरलागू आहे, पण तुमची वर्तणुक नक्कीच कौतुकास्पद आहे. ह्यालाच तर प्रगल्भता म्हणतात ना! असो, बरंच स्पष्टीकरण झालं. आपले आभार.

बादवे, शेवटी भाऊंचा जो पॅरा आपण उद्धृत केला आहे, तोच लेखाचाही गोषवारा नाही का?

फारएण्ड, कुलू, गजानन, ऋचा, मनापासून धन्यवाद Happy

प्रतिसाद वाचताना अचानक जाणवलं, नवरात्रात नऊ दिवस आपण घरात जो सृजनाचा सोहळा साजरा करतो, त्याबद्दल लेखात नमूद करायला मी साफ विसरलेय!

मी काय विपर्यास केला हे कळेल का?
मी फक्त तुमच्या लेखातील एका वाक्यावर माझा आक्षेप नोंदवला. जर अस्तिक/नास्तिक मुद्दा गैरलागू असेल तर तुम्ही विश्वास नसणाऱ्या निधर्मी लोकांवर ताशेरे का ओढलेत?

बाकी बराचसा लेख पटला हे आधीच नमूद केले आहे.

तुमच्या आक्षेपाबद्दल काहीच हरकत नाही, टग्या. ताशेरे, धोपटणं, जे काही म्हणताय, अख्खा लेखभर त्याची कारणं दिलीयेत.
माझ्या मते, एखादा शब्द विनासंदर्भ उचलला की विपर्यास होतो.
तुमच्यासारखे आणि तुम्ही उल्लेख केलायत तसे अनेक समतोल लोक आपल्या आजुबाजूला आहेत, ज्यांना आपल्या मतांचा अनावश्यक डांगोरा पिटून इतरेजनांची मतं गढूळ करावीशी वाटत नाहीत. तुम्ही स्वतःचं जे वर्णन लिहिलंयत त्यावरून तुम्हीही तसेच असाल असं दिसतंय.

मी ज्या पद्धतीनं सणांबद्दल किंवा ते साजरे करण्याबद्दल बोलतेय त्यासाठी आतिक नास्तिकचे निकष आवश्यक नाहीत. दोघंही सणांचे आनंद सारख्याच तीव्रतेने लुटू शकतात.

खूप सुंदर लिहिले आहेस.

निसर्गाचे भान ठेवत, परीस्थितीनुरुप केलेले सण समारंभ खूप सुंदर असतात ते साजरे करावेतच.

खरेतर बहुतांश सणांचा धर्मापेक्षा जास्त संबंध निसर्गाशी आणि आनंदाशी असतो.

व्यक्ती आणि प्रकृती नुसार सण साजरा करण्याच्या पद्धती बदलतात. कोणाला कशातून आनंद मिळेल ते खूप सापेक्ष आहे. होणारा आनंद प्रकट करण्याच्या पद्धती समाजातल्या गटानुसार बदलतात. सगळी गडबड तिकडे चालू होते. त्यातही परत आवड निवड आणि सवड यांची चाळणी लावली जातेच.
गणपतीतल्या ढोलाचा त्रास होतो पण नवरात्रीतल्या दांडीयाचा होत नाही.
ज्यांनी तरूणपणी स्वतः ढोल वाजवला आहे त्यांनाही उतारवयात त्याची कटकट होऊ शकतेच! वगैरे वगैरे

सध्या, कुठे आणि कशाला विरोध करायचा / नावं ठेवायची हे स्वतःच्या आवडीनिवडी आणि हिंमत यानुसार ठरताना दिसतं. प्रत्यक्ष समोर असलेल्या माणसांना स्पिकर बंद करा ही सांगायला जितका दम लागतो किंबहुना एकाच माणसाला देखिल तू हे चुकीचे करतोयस हे सांगायला जितके धैर्य लागते त्यापेक्षा असा विरोध करणे आभासी जगतात खूप सोपे जाते. शिवाय आपली लोकसंख्या इतकी जास्त आहे की केवळ एक टक्का माणसं एखादी गोष्ट करणारी / एखाद्या गोष्टीच्या विरोधात आहेत असं मानलं तरी ती संख्या लाखाच्या घरात जाते. काहीवेळा
सबळ आणि सार्थ कारणं असतानासुद्धा प्रत्यक्ष (समोरासमोर) विरोध / प्रतिवाद करता न आल्यामुळे (व त्यामुळे आलेल्या नैराश्यामुळे ही असेल कदाचित) तू म्हणतेस तशा विश्वास ठेवणा-यांच्या सरसकट सगळ्याच गोष्टींची टर उडवणार्या पोस्टी जास्त प्रमाणात दिसत असाव्या.

तरीही मी असे म्हणेन की सरसकटपणे सगळ्याच सणांना / जीवन साजरे करण्याच्या उपजत मानवी प्रवृत्तीला, विरोध करणारे कोणी आपल्या समोर आलेच तर त्यांच्याकडे कानाडोळा करणे हे उत्तम.

लेख आवडला हे सांगायचं राहीलंच की तर लेख आवडला. Happy

माधव, हर्पेन, थँक्स Happy

हर्षद, कानाडोळ्याबद्दल अगदी अगदी! जिथे नाकं मुरडून चर्चा चालल्या होत्या तिथे सगळीकडे लाईक्सच ठोकलेत Lol
ते जसा स्वतःचा सूर लावतात तसा आपणही लावावा असं वाटलेलं, पण माझ्यामुळे त्यांच्या आनंदाला उगीच विरजण लागलं असतं. म्हणुन मग ती उकळी आपल्या आपल्या वॉलवर येऊन काढली Happy

Pages