प्रवासात हरवली बॅग

Submitted by मधुरा मकरंद on 4 April, 2016 - 23:58

हल्ली कुणाकडे जाणे-येणे तसे कमीच झाले. तसेच फार महत्त्वाचे कारण असेल, कुणाकडे काही कार्य, वाढदिवस असेल तरच प्रत्यक्ष भेटी होतात. नाहीतर सगळे कसे फोनवरच बोलून होते. शिवाय इ-मेल, फेस बुक, व्हात्स उप आहेतच.
पण या वेळेस बरेच दिवसांनी पुण्याला जाण्याचा योग आला... तोही एकटीने. कशाला हवी ट्रेन? उगाच जाता येता बोरीवली दादर लोकलचा प्रवास ! आपण आपले बसने जावे. एसटी मिळाली तरी चालेल.
बोरीवली - पुणे प्रवास छान झाला. पुण्यातले कार्य देखील उत्तम पार पडले. दोन दिवस कसे मजेत गेले आणि परतीचा दिवस उजाडला.

स्वारगेट बोरीवली एसटी बसचे रिझर्वेशन केले. माझा दादा जवळच रहातो. दादा म्हणाला "एकटीच कशाला स्टॅन्डवर जातेस? मी येतो बरोबर." चला तेवढ्याच माहेरच्या गप्पा ... मी फारच खुश झाले. दुपारी तीनची एसटी.. लागलेलीच होती. थोडावेळ गप्पा झाल्या. मी गाडीत जाउन बसले. मी माझी मोठी बॅग माझ्या सीटवरच्या जागेत ठेवली. गाडी सुटायला थोडा वेळ असताना दादा निघाला. तेवढ्यात बस कंडक्टर बसमध्ये चढून ओरडू लागले "बोरीवलीवाल्यांनी उतारा पटापट. ती समोरची बस बोरीवलीसाठी लागली आहे. ही ठाण्याला जाणार. चला उतारा पटापट...." भराभरा गाडीतून उतरले. समोरच्या बोरीवली बसमध्ये जाउन बसले. 'हुश्श! मिळाली बाबा बस एकदाची. एकतर बरेच दिवसांनी एकटीने केलेला प्रवास आणि त्यात हि बसची अदला-बदल.' दोनच मिनिटात बस सुरु झाली. डेपो बाहेर येउन रस्त्याने प्रवास सुरु झाला. आणि लगेचच मगाचे 'हुश्श' आ वासून उभे राहिले. माझी वर ठेवलेली बॅगवरच राहिली ... आधीच्या बस मध्ये ... ठाण्याला जाणाऱ्या...

मला प्रश्न पडला. बॅग कशी मिळवायची. बस कंडक्टरने असहकार पुकारला. काय करावे काही सुचेना. शेवटी दादाला फोन केला. तो जगमित्र आहे... नक्की काहीतरी करेल. दादा म्हणाला तू काळजी करू नको. मी बस डेपोत जाउन चौकशी करतो. त्याने सगळी चौकशी केली. 'एवढ्यात कुठली बस बोरीवली ऐवजी ठाणे केली. कधीपर्यंत ठाण्याला पोहोचेल? गाडीत एक बॅग राहिली आहे. ती उतरवून घ्याल का? कोणी बॅग घ्यायला आले तर ओळख पटवून द्याल का? स्वारगेट डेपो ठाणे डेपोशी संपर्क करून ठेवाल का?"

दादाने मला फोन केला. म्हणाला, "बॅग जर गाडीत असेल तर ठाणे बस डेपोत उतरवून ठेवतील. तुला जाउन आणावी लागेल. किंवा कोणाला पाठवले तर ओळख पटवून बॅग परत घ्यावी लागेल."
त्याने मला ठाणे बस डेपोचा फोन नंबर आणि ठाण्याला निघालेल्या गाडीचा नंबर देखील सांगितला.

आता घरी फोन करणे गरजेचे होते. 'ह्यांना' फोन केला. वेंधळेपणाबद्दल ऐकण्याची तयारी ठेउन सगळी परिस्थिती सांगितली. कधी नव्हे ते 'ह्यांनी' शांतपणे ऐकून घेतले. ठाण्याला कोणी जाईल का ते पाहतो म्हणाले. फारच बरे वाटले.
'ह्यांच्या' ऑफिस मधला एकजण ठाण्यात राहतो. तो बॅग आणायला तयार झाला. मग ठाणे बस डेपोशी संपर्क ... तिथल्या साहेबांना सगळी हकीकत.. बॅग आणायला येणाऱ्या माणसाचे नाव सांगणे... असे सगळे सोपस्कार झाले. मला फोन करून सगळे सांगितले. दादाला अपडेट दिले. आता जरा हायसे वाटू लागले.

एव्हाना एक्स्प्रेस हायवे वर टोलनाका आला. "गाडी फक्त १० मिनिटे थांबेल." अशी सुचना करत बस मॉलला थांबली. मी खाली उतरले. ईतकी गडबड झाल्यावर रिफ्रेश होणे गरजेचे होते. चहा घेतला. उगाच ईकडे तिकडे पाहिले. एवढ्यात ती दिसली.... जिला मी सोडून आले होते. ती माझीच आधीची बोरीवली बस. पटकन बसमध्ये चढले माझी बॅग तिथे वरच होती. ताबडतोब घेतली, त्या बसमधल्या माणसांना थोडक्यात महत्त्वाचे सांगितले आणि माझ्या बसमध्ये येउन बसले.

दादाला फोन केला. घरी कळवले. त्यांनी दोन्ही बस डेपोमध्ये कळवले. त्या ठाण्याच्या माणसाला बॅग मिळाल्याचे कळवले. सगळ्याचे आभार मानले.

माझा जीव भांड्यात पडला होता. खरे म्हणजे बॅगेत पडला होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला...टोल नाक्याच्या स्टॉप्सबद्दल बरेच काही उलटेसुलटे लिहिले जात असल्याचे पाहाण्यात येते....पण नाका आणि मॉल स्टॉप्समुळेच असाही आश्चर्यकारक फायदा होऊ शकतो ही बाब छानच. बॅग मिळाल्यामुळे उर्वरीत प्रवास किती आल्हाददायक झाला असेल याची कल्पना सहजी करू शकतो.

सगळ्यांना धन्यवाद.

http://www.maayboli.com/node/57264 >>>> हे त्याहुन अजब प्रकरण >>> खरेच अजब प्रकरण.

माझ्या बहिणीचा सोमवारी ७० वा वाढदिवस होता. वरिल किस्सा तिच्याबाबतीत खरोखर घडला होता... २-३ वर्षांपूर्वी. तिच्या वाढदिवसानिमित्त मी हा लेख लिहिला.