राजशेखराच्या काव्यमीमांसेतील प्रतिभेची संकल्पना

Submitted by अतुल ठाकुर on 4 April, 2016 - 22:06

northindiatours-khajuraho.jpgसारांश

राजशेखराचा काळ नवव्या शतकाच्या उत्तरार्धापासुन ते दहाव्या शतकाच्या पूर्वार्धाचा (इ.स. ८८० ते इ.स. ९२०). त्या अगोदर भरतमुनिचे नाट्यशास्त्र (इ.स.पू २०० ते इ.स. २००), भामहाचे काव्यालंकार (इ.स.५०० ते इ.स. ६००), दंडीचे काव्यादर्श (इ.स्. सातवे शतक), उद्भटाचे अलंकारसारसंग्रह (इ.स. ८०० च्या सुमारास), वामनाचा काव्यालंकार सूत्रवृत्ति (इ.स. ८०० च्या सुमारास), रुद्रटाचा काव्यालंकार (इ.स.८०० ते इ.स. ८५०) आणि आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक (इ.स. ८४० ते इ.स. ८७०) हे ग्रंथ काव्यशास्त्रात प्रसिद्ध झाले होते. ध्वन्यालोक जरी शैशवावस्थेत असला तरी ध्वनिसिद्धान्ताशी राजशेखराचा परिचय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काव्यमीमांसेमध्ये ध्वनिचा उल्लेख नाही. मात्र असे असले तरी यावरुन असे म्हणता येईल कि रस, अलंकार, गुणरीति हे संप्रदाय राजशेखराच्या काळात काव्यक्षेत्रात प्रस्थापित झाले होते. आनंदवर्धनासहीत राजशेखराच्या पूर्वसूरींनी आपापल्या मार्गाचे विवेचन करताना काव्याचे प्रयोजन, काव्याचा आत्मा, काव्यहेतू यासारख्या गोष्टींचा उहापोह केला आहे. हा उहापोह करताना प्रतिभा, व्युत्पत्ति, अभ्यास, असे अनेक घटक काव्यनिर्मितीसाठी या काव्यशास्त्राच्या आचार्यांनी आवश्यक मानले. यापैकी प्रतिभा हा भाग सर्वांनी एकमुखाने दैवी आणि जन्मदत्त मानला. याचा अर्थ प्रतिभावंत हा जन्माला येतो. प्रतिभा ही अभ्यासाने जास्त उजळुन निघते मात्र ती दैवी असते. मानवी प्रयत्नांनी ती एखाद्यामध्ये निर्माण करता येत नाही असाच घ्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर राजशेखराने आपल्या काव्यमीमांसा ग्रंथामध्ये शक्ती हा काव्यहेतू मानला आहे. ही शक्ती समाधी आणि अभ्यासाने वाढवता येते असे प्रतिपादन केले आहे. या बरोबरच प्रतिभा आणि व्युत्पत्ति हे शक्तीचेच परिणाम आहेत असे म्हटले आहे. प्रस्तूत पेपर मध्ये राजशेखराने शक्ती हा काव्यहेतू सांगुन समाधी आणि अभ्यास हे मानवी कक्षेतले घटक शक्तीच्या संवर्धनासाठी आवश्यक असतात असे प्रतिपादन करुन प्रतिभेला मानवी प्रयत्नांच्या कक्षेत आणले आहे का या प्रश्नाचे विवेचन केले आहे.

प्रास्ताविक

काव्यशास्त्रातील ग्रंथात राजशेखराचे महत्त्व त्याने काव्याला ज्या दृष्टीकोणातुन पाहिले त्याम्ळे आहे असे मानावे लागेल. राजशेखराच्या पूर्वी अनेक साहित्यशास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी निव्वळ काव्यावर शास्त्रिय ग्रंथच लिहिले नाही तर ते स्वतःच नावाजलेले कवी होते. या विद्वानांचा संस्कृत वाङमयातील वाटा फक्त काव्यशास्त्रिय ग्रंथ आणि काव्य येथ पर्यंत सिमित नसुन त्यापैकी काहिंनी काव्यातील संप्रदाय निर्माण केले. राजशेखराच्या उदयापर्यंत काव्यशास्त्र हे प्रचिन भारतात नावारुपाला येऊन स्थिर झाले होते. काही संप्रदाय उदयास आले होते. काहींची सुरुवात झाली होती. तर काही अजुनही उदयास येणे बाकी होते. राजशेखरासमोर प्रचंड असे वाङमय आणि विचार या विषयावर त्या काळापर्यंत उपलब्ध होते. या विचारांवर लिहिताना राजशेखराने आपल्या पूर्वसूरींपेक्षा वेगळाच मार्ग पत्करला असे म्हणावे लागेल. जर या अठरा अधिकरणांपैकी आणखि काही उपलब्ध असती तर या प्रचंड कामाची दिशा नीट कळुन आली असती. मात्र जे पहिले "कविरहस्य" हे अधिकरण उपलब्ध आहे त्यामुळे देखिल शीतावरुन भाताची परीक्षा या न्यायाने राजशेखराला नक्की कुठल्या दिशेने जायचे होते याची काहीशी कल्पना येऊ शकते.

राजशेखराअगोदरच्या भामहासारख्या विद्वानांना काव्यशास्त्र हे नाट्यशास्त्रापासुन वेगळं काढुन त्याचा पाया रचायचा होता. रस, अलंकार हे संप्रदाय निर्माण झाल्यावर गुणरिति संप्रदाय निर्माण झाला. काव्याचा आत्मा कशास म्हणावे यावर शेकडो वर्षे चर्चा झडतच होत्या. साधारणपणे राजशेखराच्याच काळात आनंदवर्धनाने ध्वनिसिद्धान्ताचे विवरण केले. त्यामुळे एकंदरीत चर्चा ही, काव्याचे प्रयोजन काय, काव्य हेतू कशास म्हणावे, काव्याचा आत्मा काय? काव्याचे स्वरुप, प्रकार अशा तर्‍हेने सर्वसाधारणपणे चालली. राजशेखराने यातील काही मुद्दे जरी काव्यमीमांसेमध्ये घेतले असले तरी ते एखाद्या वैज्ञानिक ग्रंथाप्रमाणे त्यातील विषयांची त्याने वर्गवारी केली. त्यात स्वतःच्या नवीन वर्गिकरणाची भर घातली. काही शब्द त्याने पूर्वसूरींचे वापरले असले तरी त्यांचा अर्थ वेगळा लावला. आधिच्या ग्रंथांमध्ये काव्याची शास्त्र म्हणुन भरपूर चर्चा झाली असली तरी सअर्वसामान्य रोजच्या आयुष्यात कवीने कसे वागावे, बोलावे, त्याचे घर कसे असावे, त्यानी दिनचर्या कशी असावी, त्याने वेळेचा वापर कसा करावा, इतकेच नव्हे तर त्याचे नोकर चाकर कसे असावेत, त्याच्या बायका कशा असाव्यात यावर सांगोपांग चर्चा ही काव्यमीमांसेइतकी बारकाईने इतरत्र क्वचितच झाली असेल.

असे अनेक विषय फक्त पहिल्या अधिकरणात आहेत जी राजशेखराची स्वतंत्र निर्मिती आहे किंवा त्याने ते आपल्या पूर्वसूरींपेक्षा वेगळ्या तर्‍हेने हाताळले आहेत. एकाच अधिकरणात हे वैविध्य पाहिल्यावर अठरा अधिकरणात राजशेखराने काव्यशास्त्रातील असंख्य विषयांच्या बाबतीत विचारप्रवर्तक दृष्टीकोण दिला असता असे वाटल्याशिवाय राहात नाही. मात्र या पेपरसाठी राजशेखराने "प्रतिभा" या संकल्पनेबाबत काय म्हटले आहे इतकाच विचार करायचा असुन या पेपरची मर्यादा प्रतिभा आणि राजशेखराने तिचे केलेले वर्णन, त्याबद्दल व्यक्त केलेली मते, वर्गवारीआणि त्यावरुन काही अनुमान काढता येते काय इतकीच आहे.

काव्यहेतू

राजशेखराच्या काव्यमीमांसेतील प्रतिभेच्या संकल्पनेकडे वळण्याआधी त्याच्या पूर्वसूरींनी प्रतिभेचे वर्णन कसे केले आहे, त्यांच्या दृष्टीने काव्य हेतु काय आहे हे पाहणे आवश्यक ठरते. यात मम्मटासारखे राजशेखराच्या नंतरचेही तज्ञ आहेत ज्यांची मते अभ्यासल्यास, राजशेखराचे मत नंतरच्या विद्वानांनी स्विकारले कि नाही हे देखिल लक्षात येते. भरताच्या नाट्यशास्त्रातुन काव्याला वेगळे काढुन त्याचे स्वतःचे असे स्थान निर्माण करण्याचा मान भामहाकडे जातो. त्यावेळी व्याकरणासारख्या शास्त्रांना समाजात सर्वश्रेष्ठ समजले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुनच असेल कदाचित "काव्य तु जायते जातु कस्यचित् प्रतिभावतः" असे भामहाने म्हटले आहे. काव्यादर्शकार दण्डि याने "नैसर्गिक प्रतिभा" हा आवश्यक काव्यहेतु मानला आहे. तर रुद्रट आणि कुन्तकाने "शक्ती" म्हणजे जन्मजात बुद्धीमत्तेला मान्यता दिली आहे. वामनाने "प्रतिभाना" म्हणुन पुन्हा जन्मदत्त प्रतिभेचेच श्रेष्ठत्व मान्य केले आहे. काहिंनी प्रतिभा तर काहींनी शक्ती हा शब्द वापरुन, जन्मदत्त देणगीकडेच आपला कल सूचित केला आहे. या पार्श्वभूमिवर राजशेखराला प्रतिभेबद्दल काय म्हणायचे आहे ते पाहावे लागेल.

प्रतिभा, व्युत्पत्ति आणि अभ्यास हे काव्य हेतू मानले गेले असुन रुद्रटाने शक्ती हा शब्द प्रतिभेला पर्याय म्हणुन वापरला आहे. तर आनंदवर्धनाने शक्ती हाच शब्द प्रतिभेसाठी वापरुन ती व्युत्पत्तिपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. राजशेखर मात्र प्रतिभा ही शक्तीपासुन भिन्न मानतो. त्याच्या मते शक्ती ही प्रतिभा व व्युत्पत्तिपेक्षा भिन्न असुन ती प्रतिभा व व्युत्पत्ति यांची जननी आहे. डॉ. कमल अभ्यंकरांच्या मते राजशेखराने शक्ती हा शब्द बुद्धीमत्ता, विचारशक्ती, अवलोकनक्षमता आणि सहानुभव सामर्थ्य या अर्थी वापरला असावा. त्यामुळे शक्तीसंपन्न व्यक्तीच्या ठिकाणी प्रतिभा निर्माण होते आणि शक्तीसंपन्न व्यक्ती व्युत्पन्न होऊ शकते असे म्हणता येईल. थोडक्यात राजशेखराच्या मते शक्ती हा प्रमुख काव्यहेतू आहे. प्रतिभा व व्युत्पत्ति हे शक्तीचेच परिणाम असुन दोन्हींचा संयोग कवीच्या ठिकाणी होणे आवश्यक आहे. समाधि व अभ्यास हे शक्तीचे सामर्थ्य वाढवणारे असुन तेही कवीसाठी आवश्यक आहेत. राजशेखराने समाधि आणि अभ्यासाबद्दल आपले मत सांगण्याआधी श्यामदेव व मंगल या आपल्या पूर्वसूरींच्या मताचा उल्लेख करुन समाधिला आंतरिक प्रयत्न आणि अभ्यासाला बाह्य प्रयत्न म्हटले आहे.

राजशेखराने प्रतिभेचे दोन प्रकारात वर्गिकरण केले असुन एक कारयित्री प्रतिभा तर दुसरी भावयित्री प्रतिभा असे त्यांस म्हटले आहे. यापैकि कारयित्री प्रतिभा म्हणजे प्रत्यक्ष काव्यनिर्मितीशी संबंधित असुन भावयित्री प्रतिभा ही आस्वाद व समालोचनाशी निगडित आहे. येथे कवीच्या प्रतिभेबद्दल विवेचन चालले असल्याने कारयित्री प्रतिभेचा विचार केला आहे. कारयित्री प्रतिभेचे पुन्हा राजशेखराने तीन प्रकार केले असुन, सर्वसामान्यपणे समाजात प्रतिभेचे जे स्वरुप ज्ञात आहे, त्या दैवी देणगीला राजशेखर "सहजा" प्रतिभा म्हणतो. शास्त्रज्ञान व अभ्यासाने संपादन केलेल्या प्रतिभेला त्याने आहार्या हे नाव दिले आहे तर मन्त्र, तंत्र, देवतेचा कृपाप्रसाद किंवा गुरुपदेश याद्वारे प्राप्त केलेल्या प्रतिभेला औपदेशिकि प्रतिभा असे म्हटले आहे. या प्रतिभांचे धनी असलेल्या कवींना राजशेखर अनुक्रमे सारस्वत, आभ्यासिक आणि औपदेशिक असे म्हणतो. औपदेशिक कविच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास हा नवव्या शतकातील काळ लक्षात घेता आणि त्याकाळातील विकसित झालेला तत्रमार्ग आणि तंत्रवाङमय पाहता आजच्याकाळातील आधुनिक विज्ञानाचे निकष लावुन याचे स्पष्टीकरण देता येणार नाही. त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातच हे समजुन घ्यावे लागेल. त्यामुळे कालिदासाबद्दलची आख्यायिका जर खरी मानली तर महाकवी कालिदासाला राजशेखराच्या वर्गिकरणानुसार औपदेशिक कवी मानावे लागेल.

पुढे एके ठिकाणी राजशेखराने कवीच्या अवस्था वर्णिल्या आहेत. त्यात संक्रामयिता या औपदेशिक कवीच्या अवस्थेत हा कवी इतरांमध्येही कवित्वशक्तीचे संक्रमण करु शकतो असे म्हटले आहे.

समाधि आणि अभ्यास

राजशेखराने शक्ती या काव्यहेतू सांगुन समाधि आणि अभ्यासाला शक्तीच्या संवर्धनासाठी आवश्यक मानले आहे. अभ्यास व समाधि या दोन्हींचे विवरण पातंजल योगसूत्रात केले आहे. अमाधिपादातील तेराव्या सूत्रात "तत्र स्थितौ यत्नो ऽ भ्यासः" असे अभ्यासाबद्दल म्हटले आहे. याचा अर्थ चित्ताचे स्थैर्य साधण्यासाठी केला जाणारा जो यत्न तो अभ्यास होय. कृष्णाजी केशव कोल्हटकरांनी (पान क्र. २५) आपल्या पातंजल योगदर्शनात याचे जे स्पष्टीकरण दिले आहे ते योगसाधनेइतकेच काव्यसाधनेलाही लागु पडणारे आहे. ते म्हणतात " चित्ताचा निरोध दीर्घकाल टिकु लागला कि त्या अवस्थेस प्रशांतवाहिता असे म्हणतात. ही स्थिती प्राप्त करुन घेतलीच पाहिजे अशा तीव्र इच्छेने ती प्राप्त करुन घेण्यासाठी अवश्य असलेल्या साधनांचे अनुष्ठान करण्याविषयी जो प्रयत्न तो अभ्यास होय." येथे एकाग्रता टिकण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नास अभ्यास म्हटले आहे. डॉ. कमल अभ्यंकरांनी समाधिस मनाची एकाग्रताच म्हटले आहे. योगदर्शनात पुढे विभुतिपादातील तिसर्‍या सूत्रात "तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधि:" असे समाधिचे लक्षण असांगितले आहे. कोल्हटकरांच्या मते (पान क्र. ३२३) कोणत्यातरी चित्तैकाग्र्य करणे हे ध्यानाचे स्वरुप तर ध्यानाचीच पक्वावस्था म्हणजे समाधि होय. एकंदरितच एकाग्रता आणि ती साधण्यासाठी केला जाणारा यत्न असे स्वरुप अनुक्रमे समाधि आणि अभ्यासाचे जे योगदर्शनात दिसते ते राजशेखराच्या प्रतिपादनाशी जुळणारे आहे.

काव्यसाधनासाठी जी शक्तीसंपन्नता लागते तीच्या संवर्धनासाठी लागणारी सामुग्री म्हणजे समाधि आणि अभ्यास. हे दोन्ही प्रयत्न केल्यास मानवाच्या आवाक्यात असल्याकारणाने शक्ती आणि पर्यायाने प्रतिभा ही देखिल मानवाच्या आवाक्यातील बाब आहे असाच निष्कर्ष काढावा लागतो.

कवीची श्रेष्ठ कनिष्ठता

कवींचे सारस्वत, आभ्यासिक आणि औपदेशिक असे प्रकार सांगितल्यावर साहजिकच यात श्रेष्ठ कनिष्ठ कोण असा प्रश्न उद्भवतो. याचे निराकरण करताना राजशेखनाने प्रथम श्यामदेवाच्या मताचा समाचार घेतला आहे. श्यामदेवाच्यामते सारस्वत हा दैवी शक्तीचा वारसा घेऊन आलेला कवी हा सर्वश्रेष्ठ कवी. आभ्यासिक कवीकडे प्रतिभा असली तरी ती प्रयत्नाने प्राप्त झालेली असल्याने सीमित असते. आणि औपदेशिक कवीचे काव्य नि:सार असते असे अनाकलनिय विधान श्यामदेवाने केले आहे. राजशेखराला हा क्रम मान्य नाही. त्याच्या मते या तिन्ही कवींमध्ये ज्या घटकांमुळे काव्यनिर्मिती झाली त्या घटकांचा जास्तीतजास्त समन्वय ज्याच्या ठिकाणी झाला असेल तो श्रेष्ठ कवी. यावर टिप्पणी करताना राजशेखराने सारस्वत कवीला नकळत श्रेष्ठ ठरवले आहे असे म्हटले आहे जे मान्य करता येत नाही. निसर्गदत्त प्रतिभा असलेल्या कवीमध्ये अभ्यासही तितक्याच तीव्रतेने आढळेल आणि देवतेचा पूर्ण वरदहस्त त्यावर असेल असे सांगता येत नाही. त्यामुळे राजशेखराने ज्याच्यात गुण जास्त तो श्रेष्ठ कवी असा निर्णय दिला आहे असे म्हणावे लागते.

काव्यमीमांसेतील प्रतिभेची संकल्पना

राजशेखराने राजशेखराने जन्मजात आणि दैवी प्रतिभेची संकल्पना जरी मान केली तरी कारयित्री प्रतिभेच्या प्रकारांमध्ये आहार्य आणि औपदेशिक हे प्रतिभेचे दोन प्रकार सांगुन दैवी प्रतिभेचे एकमेवाद्वितीयत्व नाहिसे केले आहे. आहार्य ही प्रतिभा या जन्मी प्रयत्नाने प्राप्त करता येते. त्यासाठी विविध शास्त्रज्ञानाचा अभ्यास आवश्यक असतो. अभ्यासाने ही प्रतिभा प्राप्त करता येत असल्याने प्रतिभा ही नेहेमीच दैवी असते या पारंपरिक समजुतीला येथे छेद जातो. प्रतिभेच्या औपदेशिकी या प्रकारात जन्मजात संस्कारांचा भाग नसतो. शिवाय अभ्यास करण्याइतकी देखिल बुद्धी व्यक्तीमध्ये नसते. त्यामुळे अभ्यासाने प्रतिभेला घासुन पुसुन तल्लख करण्याचा भाग येथे नसतो. तन्त्र, मन्त्र, देवतेची वा गुरुची कृपा यांच्यायोगे ही प्रतिभा प्राप्त होते. या गोष्टी त्या काळात प्रचलित असाव्यात कारण क्षेमेन्द्राने "कवीकण्ठाभरणा" मध्ये दिव्य उपायांनी कवीत्वशक्ती प्राप्त करुन घेण्याची सूचना केली आहे. या विवेचनामुळे राजशेखराची दैवदत्त प्रतिभेइतकीच प्रतिभेच्या इतरही प्रकारांना मान्यता होती आणि त्या प्रतिभेचे धनी असे जे कवी होते त्यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठता ठरवताना दैवी गुणसंपन्न कवीला त्याने श्रेष्ठत्व बहाल केले नव्हते असे दिसुन येते.

समारोप

प्राचिन साहित्यशास्त्रकारांनी जन्मजात, दैवी आणि निसर्गदत्त अशा प्रतिभेस श्रेष्ठत्व प्रदान केले आहे. अभ्यासाचे महत्त्व सर्वांनी एकमुखाने मान्य केले असले तरी जन्मजात लाभलेली दैवी प्रतिभा ही श्रेष्ठ असाच सूर प्रत्येकाने लावलेला दिसतो. आणि मुळातच काव्यासाठी आवश्यक असे जे घटक आहेत त्यामधील प्रतिभा, अभ्यास आणि व्युत्पत्ती यामध्ये प्रतिभा महत्त्वाची असा कल बहुतेकांचा आढळला आहे. याचा अर्थ प्रतिभा श्रेष्ठ आणि ती दैवी असल्याने आणखिनच श्रेष्ठ असा घ्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर प्रतिभा हीच मूळात शक्तीपासुन उत्पन्न होते हा अत्यंत अभिनव आणि त्या काळाच्या पुढचा विचार राजशेखराने काव्यमीमांसेत मांडला. इतकेच नव्हे तर त्यापुढे जाऊन ज्यापासुन प्रतिभा निर्माण होते त्या शक्तीचे सामर्थ्य वाढवता येते, तिचे संवर्धन करता येते हे देखिल प्रतिपादन केले. त्यासाठी समाधि व अभ्यास हे उपाय त्याने सांगितले.

नैसर्गिक प्रतिभेव्यतिरिक्त आहार्य आणि औपदेशिकी असे प्रतिभांचे आणखि दोन प्रकार सांगुन अभ्यास आणि देवता किंवा गुरुच्या कृपेने प्रतिभा प्राप्त करता येते असे स्पष्टपणे राजशेखर म्हणतो. अशा तर्‍हेने दैवी प्रतिभेला मानवी प्रयत्नांच्या कक्षेत आणुन यादिशेने जास्तीत जास्त प्रयत्न केल्यास पुढे प्रतिभा ही दुसर्‍यामध्ये संक्रमित देखिल करता येते असे त्याने म्हटले.

यावरुन असे दिसुन येते कि इ.स. नवव्या शतकाच्या आसपास कवीच्या प्रतिभेभोवतालची दैवी झळाळी बाजुला सारुन कुठल्याही व्यक्तीला ही प्रतिभा प्रयत्नांची पराकाष्ठा करुन किंवा ईश्वरी कृपाप्रसादाने मिळवता येईल असे सांगुन एक प्रयत्नवादी विचार कलेच्या क्षेत्रात समोर ठेवला आहे. राजशेखराच्या प्रतिपादनातील समाधि, मन्त्र, तन्त्र, देवता कृपा या गोष्टी आजच्या काळात कदाचित कुणाला पटणार नाहीत पण दैवी प्रतिभेचा असा प्रान्त ज्यात कुणालाही आजवर प्रवेश नव्हता. ज्यावर माणसे फक्त आपल्या पूर्वकर्मानेच हक्क सांगत असत अशा प्रान्तात प्रयत्नाने कुणीही पाय ठेऊ शकतो असे सांगण्याचे धाडस करणारा राजशेखर क्रान्तिकारक साहित्यशास्त्रकार आहे असे म्हणावेसे वाटते.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल, लेख आवडला.

असे काही काव्यशास्त्रासंबंधी पहिल्यांदाच वाचले.
बरंच काही लिहावसं वाटत आहे पण अभ्यास तोकडा आहे.

मात्र तरिही मला 'नैसर्गिक प्रतिभाच श्रेष्ठ' म्हणणार्‍या अभ्यासकांचे म्हणणे किमान काव्य आणि इतर कलांच्या बाबत पटते.
अभ्यासाने , सरावाने किंवा गुरूच्या सहाय्याने एखादा तंत्रावर हुकुमत मिळवू शकतो. पण प्रतिभेवर नाही.
अभ्यासाने एखाद्या प्रसंगाकडे बघण्याची दृष्टी कदाचित बदलेल /विस्तारेल. पण मूळात असे प्रसंग पर्सिव्ह करण्याची, अश्यांकडे लक्ष देण्याची क्षमता केवळ प्रतिभावंतातच असते असे वाटते.

मात्र काव्य/कला सोडून इतर ज्ञानशाखांना
'माणसे फक्त आपल्या पूर्वकर्मानेच हक्क सांगत असत अशा प्रान्तात प्रयत्नाने कुणीही पाय ठेऊ शकतो'
हे नक्कीच लागू पडेल असे वाटते.

या विषयावर अजूनही बरेच काही वाचायला आवडेल.
तुमच्यामुळे कित्येक नवनव्या विषयांशी/व्यक्तींशी ओळख होत असते.
त्याबद्दल अनेकानेक धन्यवाद!

फार अभ्यासपूर्वक लिहीलेला नेटका लेख !
माझ्यासारख्याला तर काव्यशास्त्रावर त्यावेळीं इतका सखोल विचार केला जात होता, हेंच अचंबित करणारं.
विषयाच अभ्यास व गंभीर विचाराची जोड नसूनही एक गोष्ट मात्र जाणवते; << अशा प्रान्तात प्रयत्नाने कुणीही पाय ठेऊ शकतो असे सांगण्याचे धाडस करणारा राजशेखर क्रान्तिकारक साहित्यशास्त्रकार आहे >> पाय कुणीही ठेवूं शकतो, हें खरं असलं तरीही त्याच्या चालण्यात उपजत प्रतिभेच्या चालीची नजाकत जाणवणं दुर्मिळच ! काव्यच नव्हे तर कोणत्याही कलाक्षेत्रात, इतकंच काय बर्‍याचशा खेळांतही , हें प्रकर्षानं लक्षांत येतं . [हा माझा आगाऊपणा आहे, असं वाटणं योग्य व स्वाभाविकही आहे ]

छान लेख आहे.

साती यांच्या मताशी सहमत आहे. औपदेशीक प्रतिभेबद्दल काही म्हणु इच्छित नाही, पण नैसर्गीक आणि आभ्यासिक प्रतिभेची तुलना करायची झाल्यास नैसर्गिक प्रतिभा श्रेष्ठ असावी असे वाटते. अर्थात त्याला अभ्यासाची / सरावाची जोड असावी.