आपली सामाजिक जबाबदारी आणि त्यातून मिळणार सुख

Submitted by Swara@1 on 1 April, 2016 - 04:49

दिनांक : ३१/०३/२०१६
वेळ : रात्री ८. ००
स्थळ : बोरीवली स्टेशन (२९३ चा बस stop )

काल रस्ता तसा बऱ्यापैकी सामसूम होता. वाहनांची वर्दळ खूप कमी होती. चालत जायचा कंटाळा आला होता म्हणून बसच्या लाईन मध्ये जाऊन उभे राहिले. तिकडे काही काही लोक २०-२५ मि. पेक्षा जास्त वेळाहून उभे होते ऱिक्शा पण मिळत नव्हत्या आणि बसही येत नव्हती. ज्या काही taxis उभ्या होत्या त्यातही taxi drivers आपापल्या गाडीत कालच्या भारत - वेस्ट इंडीज क्रिकेटच्या सामन्याची कॉमेंट्री ऐकत आरामात बसले होते.

काही जण एखादी रिक्षा येताना दिसली कि पटापट आत बसायचे अगदी बायकांना धक्काबुक्की झाली तरी. खूप राग येत होता त्यांचा. बस आणि रिक्षाची वाट पाहण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हत. असच आजूबाजूला बघत उभी होते. तेव्हा मला दिसलं कि त्याचं लाईन मध्ये (लाईन? नव्हतीच ) थोडंस मागे एक २०-२१ वर्षांचा मुलगा उभा होता (त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हत). तो पण माझ्या आधीपासूनच उभा होता. माझ लक्ष सारखं त्याच्याकडेच जात होत. कंटाळला होता तोही उभ राहून, बऱ आजूबाजूचे लोकही त्याला 'बस' म्हणून सांगत नव्हते. तो बिचारा एका कोपऱ्यात उभा होता आणि थोड्या थोड्या वेळाने पाय चेपत होता. जेव्हा एखादी रिक्षा यायची तेव्हा हा पुढे जाईपर्यंत लोकं त्याला ढकलून स्वत: आत बसायचे अस १-२ वेळा झाल्यावर माझं डोकंच सटकल. खूप चीड येत होती त्या लोकांची. असं वाटल कि फटकवाव एकेकाला.

तेव्हाच एक रिक्षा येताना दिसली मनात कुठलाही विचार न आणता सरळ रस्त्याच्या मधोमध जाऊन उभे राहिले आणि रिक्षा थांबवली. मी रिक्षा थांबवल्यावर लगेचच दोघे जन रिक्षात बसायला सगळ्यांना ढकलून पुढे आले. तशीच त्याची कॉलर पकडली आणि त्याला मागे खेचला आणि म्हटलं "आहे तिथेच उभा राहा… " रिक्षावाला पण बघत राहिला माझ्याकडे… मागे आले आणि गर्दीतल्या 'त्या' मुलाचा हात पकडला आणि म्हटलं "बस आत ", त्याच्याबरोबर मीही बसले आणि एक मध्यमवयीन स्त्री होती उभी तिलाहि घेतलं रिक्षात आणि रिक्षावाल्याला म्हटलं, "चल… गणेश चौकला जायचय" त्यानेही आढेवेढे न घेत रिक्षा चालू केली.

थोड्यावेळाने त्या काकू म्हणाल्या, "हा तुझ्याबरोबर आहे का ?" मी म्हटलं, "नाही, पण माझ्याबरोबर असेल तरच मदत करायची का?" सगळे जण गप्प…. त्या काकु उतरल्या आणि माझ्याकडे बघून माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला, मी पण थोड्या वेळाने उतरले, मला थोड आधी उतरायचं होत, त्याला विचारलं "जाशील ना रे नीट?" तो पण "हो" आणि "thank you ताई" असं म्हणाला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगूच शकत नाही.

कालचा तो प्रसंग काही केल्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. कसे जगतो आहोत आपण? मान्य आहे सगळेचजण खूप बिझी आहोत आपापल्या आयुष्यात, सगळ्यांनाच घाई आहे पहिलं यायची. पण हे सगळ करताना आपण 'अश्या' लोकांकडे कसं काय दुर्लक्ष करू शकतो. देव न करो पण अशीच वेळ जर उद्या आपल्यावर आली तर ? किती यातना होतील आपल्याला. 'ह्या' लोकांची काळजी घेणे आपलीसुद्धा जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पार पडलीच पाहिजे. तसं बघायला गेलं तर मी काही अशी डेअरिंगबाज मुलगी नाही आहे. पण त्याक्षणी माझ्यात ती ताकद कुठून आली ते माझं मलाही कळल नाही. पण त्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप समाधान वाटल. निदान त्या रात्री सुख - समाधानाची झोप काय असते ती अनुभवली असं म्हणता येईल. तुम्ही हि प्रयत्न करा अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या पार पाडायचा आणि त्यातून मिळणार सुख अनुभवा. तुम्हीहि कारण व्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद आणणारं. कारण त्यातून मिळणार सुख तुम्हाला कितीही पैसे दिलेत तरी मिळणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वरा,अभिनंदन आणी खूप खूप कौतुक.. खरंय आपल्यापासूनच सुरुवात करायला हवीये ..
निश्चितच तुझ्या आसपासच्या माणसां वर तुझ्या या कृतीचा चांगला परिणाम झाला असेल.

स्वरा, खुप-खुप कौतुक तुझे
तुझ्या पालकांनी तुला चांगले संस्कार दिले आहेत.

Pages