अवधूत (भाग-३)

Submitted by विजय पुरोहित on 31 March, 2016 - 02:09

नरकचतुर्दशीची पहाट. घरोघरी बायकांची धांदल उडालेली होती. अजूनही गाढ झोपेत असलेल्या पोराटोरांना रट्टे दिले जात होते. नवीन कपडे घालून थोडंसं मिरवायच्या मनःस्थितीत असलेल्या मुली उगाचच पुन्हा पुन्हा अंगणात येऊन परत घरात जात होत्या. बाप्ये लोक मात्र निवांत घोरत पडलेले होते. वातावरणात चांगलाच गारठा होता. काही तरूण मंडळींनी शेकोटी पेटवून गप्पांचा अड्डा जमवलेला होता. थंडीनं हैराण झालेली कुत्री देखील त्यांच्यापासून आदबशीर अंतर ठेवून शेकोटीच्या उबेला सुस्तावली होती.

गावाच्या मधोमध असलेल्या विठ्ठल मंदिरात मात्र अंधार होता. त्याच मंदिरात एका कोपर्‍यात तो आईने दिलेल्या शालीत गुरफटून झोपलेला होता. साधारण सूर्योदयाची वेळ झाली असेल. अचानक मंदिराचा लोखंडी दरवाजा करकरत उघडला. देऊळ झाडणारा माणूस आला होता. दरवाजाच्या आवाजानं त्याची झोप मोडली. आपण आत्ता पहात होतो ते स्वप्न की सत्य, हे कळायला त्याला थोडा वेळ लागला. जे काही स्वप्नात पाहिलेलं होतं, त्याचा अर्थ त्याला समजत नव्हता. कुणा तरी माहितगाराला विचारावा हा अर्थ, असा विचार करून आह्निके आटोपण्यासाठी तो बाहेर पडला.

गावाबाहेरच्या विहिरीवर स्नान करून त्यानं रानातील शिवमंदिराचा रस्ता पकडला. ऊन आता बर्‍यापैकी तावलं होतं. थोडीशी थंडी आणि थोडा उन्हाचा चटका असं मजेदार वातावरण होतं. त्या मंदिरात नियमित येणारा एक बैरागी अजून असेल तर त्याच्याशी थोडं बोलता येईल या विषयावर, असा त्याचा अंदाज होता. रानात जिकडं तिकडं हळदुलं ऊन सांडलं होतं. सण असल्यामुळे रानात माणसं देखील दिसत नव्हती. कुठेतरी एखाद-दुसरा चुकार पक्षी, बस! मंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आलं. तसं त्यानं चालण्याचा वेग वाढवला.

अगदी प्राचीन काळातील मंदिर. काळ्या दगडात बांधलेलं. थोडंसं मोडकळीला आल्यासारखं दिसणारं. पण तितकंच मनाला भारून टाकणारं. काही ठिकाणी थोडी पडझड देखील झालेली. चिर्‍यांमधील फटीतून हातहात लांब गवताचे तुरे उगवले होते. पावसाळ्यात भिंतीवर धरलेल्या शेवाळाचे आता पोपडे सुटू लागले होते. एक पारव्याचं जोडपं छतावर बसून निवांत ऊन खात होतं. ती शांतता भंग करण्याची त्यांची देखील इच्छा नसावी.
शेजारी एक छोटंसं कुंड. केवळ पावसाळ्यातील पाण्यावर भरणारं. दर्शनास आलेल्या लोकांच्या हातपाय धुण्याची सोय म्हणून केलेलं. त्याची चाहूल लागताच दोन-तीन बेडकांनी ‘डुब्बुक्क’ करून लांब उड्या मारल्या. शेवाळाचा तवंग बाजूला सारून त्याने कुंडातून पाणी काढून हातपाय धुतले. त्या थंड स्पर्शाने त्याला अगदी बरं वाटलं. देवळात प्रवेश करून प्रथम त्याने नंदीला नमस्कार केला. घंटानाद करून अंधार्‍या गाभार्‍यात प्रवेश केला. आत बैरागी रूद्रपाठ करीत बसलेला होता. देवाची छान पूजा केलेली होती. पांढर्‍या भस्माचे पट्टे ओढलेले होते. पिंडीवर थोड्या थोड्या अंतरावर स्वस्तिकाची फुले कल्पकतेने मांडलेली होती. अभिषेक पात्रातून टपटप पाणी पिंडीवर पडत होतं. तिथंच थोडी बेलाची पाने आणि तांदूळ वाहिलेला.

नमस्कार करून एका कोपर्‍यात शांतपणे ऐकत बसला. बैराग्याचा पाठ चालूच होता. एका बाजूला तेल माखलेला पितळी दिवा शांतपणे तेवत होता. उदबत्तीतून मंद सुगंधी वलये बाहेर येत होती. आतील हलका अंधार गडद गडद होत गेला. त्याचे डोळे जड झाले. श्वास मंदावला. सार्‍या शरीरातील संवेदना जणू गायब झाल्या. आणि प्रकाशाच्या एका लोळासरशी तो एका उत्तुंग पर्वतशिखरावर पोहोचला. ऊनपावसाचा खेळ चालू होता. सूर्यावरून भराभर काळे मेघ सरकत होते. अंगावर हलक्या हलक्या पर्जन्यधारा पडत होत्या. भन्नाट वेगाने वाहणार्‍या वार्‍याने गवतात लाटाच्या लाटा पसरत होत्या. अतर्क्य वेगाने वृक्षवेलींवर मादक सुगंधी फुले उमलत होती, कोमेजत होती. पूर्वी कधी न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज कानात घुमत होते. आकाशातून मोत्यासारखे चमकणारे तारे तडातड तुटून कोसळत होते. विश्वाच्या भयाण काळोख्या पोकळीत ग्रहगोल गरागरा फिरत इतस्ततः फेकले जात होते. त्याची जाणीव, अस्तित्व, अहंकार सारं काही द्रवरूप झालं आणि प्रचंड वेगाने एका प्रपाताचे रूप घेऊन डोंगरमाथ्यावरुन कोसळू लागलं. त्या प्रपाताच्या वाटेत येणारे सारे काही भक्षण करीत तो पुढे पुढे जाऊ लागला…

अचानक कुणीतरी दूरवरून जोरजोरात हाका मारू लागलं. संवेदना परत जागेवर येत त्याने हळूहळू डोळे उघडले. त्या पुरातन शिवमंदिरातच होता तो. समोर बैरागी चिंताक्रांत उभा. “अरे, तुला झालं तरी काय? कधीचा हाका मारतोय मी? श्वासदेखील चालत नव्हता. म्हटलं मेलाबिलास की काय भुकेनं?”
“ तसं नाही काही. झोप आली असावी अचानक.” तो थोडासा खजील होत उत्तरला.
“बोल, अचानक का आलास भेटायला?”, बैराग्यानं विचारलं.
“मला तुम्हांला एक विचारायचं होतं. आज पहाटे मी एक अद्भुत स्वप्न पाहिलं. साधारण सूर्योदयापूर्वी. एक स्त्री समोरून चालत आली. मी एक लहान बालक होतो. रडत होतो. तिनं मला प्रेमानं जवळ घेतलं आणि पदराखाली घेऊन स्तनपान करवू लागली. त्या दुधाची गोडी खरंच अमृतासारखी होती. इतकं सत्य वाटत होतं ते स्वप्न की, जागा झालो तरी बराच वेळ मला ती अमृताची चव जाणवत होती.”

बैराग्याचे डोळे उजळले. “अरे, ते दूध म्हणजे ब्रह्मज्ञान. जे मिळवण्यासाठी लोक जन्मोजन्मी प्रयत्न करतात, ते तुला जगदंबेच्या कृपेनं प्राप्त होणार आहे. पण आता तुला गुरुची खरेच गरज आहे. तू त्र्यंबकेश्वरला एकदा जाऊन ये. तिथे उत्तरेकडील काही शाक्त साधू आलेले आहेत. कुणाशी काही बोलू नकोस. कुणाला काही विचारू नकोस. फक्त जाऊन शांतपणे देवाचं दर्शन घे. जो तुझा खरा गुरु असेल, तो स्वतःच तुला शोधत येईल.”

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंक तुटली होती, परत पहिले दोन भाग वाचावे लागले. हा पण भारी लिहिलाय.
डोंगरावरच्या देवाचं पण मनावर घ्या Happy