दुभतं

Submitted by मनीमोहोर on 23 March, 2016 - 13:36

कोकणात आमच्याकडे दुध-दुभतं असं न म्हणता फक्त दुभतचं असं म्हणतात. दुभतं हा आमच्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. गावाला फोन केला की विचारलच जातं " सध्या दुभतं कितपत ? " असं आणि तिकडुन " आहे भरपूर " असं उत्तर आलं की वारणा/गोकुळ वापरणारी मी इथे विनाकरण खुश होते आणि बेताचं आहे असं कळल की उगाचच हिरमुसते ही .

गावाला गुरं पाळायची ती बैलांच्या पैदाशीसाठी, दुधासाठी आणि गोबर गॅससाठी. आमचा गुरांचा गोठा आहे
घराजवळच . पक्क बांधकाम आणि लाईट, पाण्याची सोय असलेला. यामुळे गोठ्याची स्वच्छता राखणं ही सोप
होत.

पहाटेच दुभत्या गुरांची धार काढली जाते. त्यानंतर वासरांना दुधासाठी गाईकडे सोडतात. आपल्या दुडक्या
चालीने आईकडे बर्रोबर जातात वासरं. गाय ही आपल्या वासरांना बरोबर ओळखते. आपल्या जिभेने चाटुन त्यांना कुरवाळायला लागते ते दृश्य म्हणजे वात्सल्याचं मुर्तीमंत प्रतीक वाटत मला.

फेसाळलेल्या दुधाच्या कासंड्या घरात आणल्या जातात. त्या धारोष्ण, नैसर्गिक चवीच्या दुधाचा मोह या वयात
ही कधी कधी अनावर होतो. ताज्या दुधाचा, वाफाळणार्‍या चहाचा कप घेऊन पहाटेच्या वेळी खळ्यात बसणं म्हणजे साक्षात स्वर्गसुख !! दुध तापविण्यासाठी गॅसवर ठेवताना थारळ्याची मात्र आठवण आल्याशिवाय रहात
नाही. काही वर्षा पूर्वी पर्यंत आमच्याकडे दूध थारळ्यावरच तापविले जाई. थारळ म्हणजे लाकडी रेज्यांच
दार असलेलं स्वयंपाकघरातल्या भिंतीतलं एक खणवजा कपाट. याला जमीनीत एक उथळ खड्डा असतो. त्यात निखारे घालायचे, त्यावर दुधाच पातेलं ठेवायचं आणि थारळ्याचं दार बंद करुन टाकायच. मांजर, कीडा, मुंगी या पासून आपोआपच संरक्षण ही होत आणि दुध अगदी मंदपणे तापत रहात ऊतु न जाता. दुपार पर्यंत छान गरम रहात आणि भाकरीसारखी जाड साय ही जमते .

पहाटेच करायचं दुसर काम म्हणजे ताकाच. पहाटेच्या थंड वेळी ताक केलं की लवकर ही होत आणि लोणी ही
चांगल येतं. ओणव्याने उभ राहुन ताकमेढ्याच्या खांबाला बांधलेल्या रवीने मोठ्या चिनी मातीच्या डेर्‍यात दही घुसळुन ताक केले जाई. आता ताकमेढीची जागा इलेक्ट्रीक रवीने घेतली आहे एवढाच काय तो फरक. लोणी काढलं की घरात छोटं बाळ असेल तर त्याला थोडसं भरवलं जात घरातला बाळकृष्ण म्हणुन. लोण्याखालचं ताक मात्र कोणी गडी माणसं मागायला आली तर त्यानांच वाटलं जात. उन्हाळ्यात उन्हात काम करुन दमलेल्या गड्यांना ते आवर्जुन दिलं जातं

आमच्याकडे ताक अगदी सगळ्याना आवडतं. किंचित तुरट तरी ही मधुर चवीच वाटीभर ताक प्यायल्याशिवाय जेवण पूर्णच नाही होत. मी तर रोज ताक प्यायल्यानंतर मनातल्या मनात " तक्रम् शक्रस्य दुर्लभम्" हे आपल्याच मनाशी म्हणते.... त्या बिचार्‍या इंद्रदेवाला अमृत मिळत पण असं अमृततुल्य ताक नाही मिळत असो. ताकाची कढी कधी काही न घालता कधी पडवळ किवा काकडीचे तुकडे घालुन किंवा उन्हाळ्यात पिकलेल्या फणसाचे गरे घालुन ही करतो पण तांदळाच्या पिठाची उकड ही विशेष आवडीची. तसेच खुतखुत्या नावाचा एक प्रकारचा भात ही करतो ताक घालुन. शिळ्या भातात आंबट ताक घालुन तो सरसरीत करायचा. त्यात चवीला जिरं , मीठ, वेस्वार हि. मि घालायची आणि गॅसवर पाच मिनिटं उकळवायचा की झालं. तो उकळू लागला की " खुत् खुत् " असा आवाज येतो म्हणून हा खुतखुत्या भात. उन्हाळ्यात मात्र एकंदरच जनावरं कमी दूध देतात, त्यामुळे दही ताक ही बेताचच असत ती उणीव मग उन्हाळ्यात नाचणीची आंबील करुन भरुन काढली जाते. अर्थात आता दुध सर्रास विकत मिळायला लागलाय आमच्याकडे त्यामुळे प्रश्न नाही येत पण तरी ही सवयीने उन्हाळ्यात नाचणीची आंबील केली जातेच .

दर चार आठ दिवसांनी लोणी कढवण्याचा कार्यक्रम असतो. तूप आम्ही मोठ्या मोठ्या चिनी मातीच्या बरणीत ठेवतो. त्या घरच्या तुपाची चव, स्वाद इतर कोणत्याही पदार्थाची चव अधिकच खुलवते. गरम गरम पिठल भात आणि त्यावर घरच तुप ! किंवा मेतकूत भातात तूप... अहाहा स्वर्ग !!! घरी केलेल्या तुपातले लाडु, शिरा असे सर्वच पदार्थ चवीला अप्रतिम लागतात.

श्रावणात आणि भाद्रपदात ओल्या चार्‍यामुळे दुध दुभत भरपुर असत. मग काय... दूध जास्त असेल तर श्रीखंड, बासुंदी, खीर असे पदार्थ वरचेवर केले जातात. पण कधी कधी पेढे ही करतो घरीच. एका मोठ्या परातीत दूध आटवुन खवा केला जातो आणि नंतर त्यात अगदी थोडी साखर घालुन त्याचे फिके पेढे केले जातात. गुलाबी रंगाचे, जायफळ वेलचीच्या स्वादाचे, पापडाच्या लाटीसारख्या चपट्या आकाराचे, घरी केलेले पेढे अप्रतिम लागतात. शहरातल्या कोणत्याही प्रसिदध हलवायाच्या पेढ्यांपेक्षा किती तरी पटीने सरस. शेजार घरी काही कार्य वैगेरे असेल तर मात्र जास्तीच दूध तिकडेच जात. आता विकत मिळत सर्रास दूध तरी ही गरजेला पहिल्यांदा शेजारी विचारण्याचीच पद्धत आहे अजूनही गावाकडे. एवढी जनावरं असल्यामूळे खरवस ही खूप वेळा होतो. घरचा खरवस मिळत असल्याने इथे शहरात मिळ्ण्यार्‍या खरवसाची नेहमीच तुलना होते आणि इथला अगदी चांगला समजला जाणारा खरवस ही त्यामुळे आवडत नाही. ( स्मित)

मुलांना तर " हम्मा " बघण्याचे फार वेड. मुंबईच्या पाव्हण्या मुलांचा मुक्काम तर गोठ्यातच असतो पण तिथली मुलं ही रमतात गोठ्यात. एकदा काय झालं .... घरातला एक तीन चार वर्षांचा छोटा मुलगा बराच वेळ दिसत नव्हता चुकलेला फकीर गोठ्यातच मिळेल म्हणून मी गोठ्यात गेले आणि समोरचे दृश्य पाहुन अक्षरशः स्मिमित झाले. गाईच्या दोन पायांच्या मध्ये उभा राहुन मान उंचावुन हा वासरा सारखं दूध पिण्याचा प्रयत्न करत होता आणि ती गाय ही बिचारी काही न करता स्तब्ध उभी होती.... अर्थात सगळीच जनावरं काही अशी गरीब नसतात. आमचा पाखर्‍या नावाचा एक अति मारकुट्या बैल होता. त्याच्या नजरेला नजर सुध्दा देता येत नसे आम्हाला. असो. एकदा आमच्या एका गड्याला दूधाची गरज होती म्हणून आमची एक गाय आम्ही त्याला दिली होती काही दिवसांसाठी पण ती गाय ओळीने आठ दिवस दावं तोडून आमच्याकडे येत होती. नंतर रमली तिकडे.

जनावर म्हणजे आमच्या घरातले सदस्यच जणु. आमच्याकडे बैल पोळा हा सण नसतो पण नांगरणी झाली की एक दिवस सगळ्या बैलांना छान नटवतात. त्या दिवशी त्यांना कामाला जुंपत नाहीत आणि त्यांना नारळाचा रस पाजतात श्रमपरिहार, कृतज्ञता आणि कौतुक म्हणून. कोकणात नारळ भरपूर म्हणून असेल कदाचित पण आमच्याकडे बैलांना पुरणपोळी खाऊ घालायची पद्धत नाहीये, नारळाचा रसच पाजतात. वसु बारसेच्या दिवशी संध्याकाळी गोवत्स धेनुची पूजा करतात. कुंकवाचा टिळा लावलेल्या गाई फार छान दिसतात त्या दिवशी.

माझ्या एक चुलत सासुबाई नेहमी आमच्या भरलेल्या गोठ्याचा उल्लेल्ख वैभव असा करीत. त्याची सार्थकता आज हा लेख लिहीताना मनोमन पटतेय......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेय .. आमच्याकडेही सेम टू सेम प्रोसिजर आहे . मी लहान असताना एकदा दूध काढायचा प्रयत्न केला तर आमच्या गोदा गाईन मान हलवून नापसन्ति व्यक्त केलेली Wink वर्षातून एकदा गावी जाऊन कस ओळखणार ती Happy
ही सगळी प्रोसेस बघायला जाम मजा येते .

खुप सुंदर लिहिलेस गं.

माझी आई तिच्या घराच्या दुभत्याच्या आठवणी नेहमी सांगत असते. लहानपणी आजोळी मोठ्या डे-यात दही घुसळताना पाहिल्याचे आठवतेय अजुनही. आता मात्र ते वैभव गेले. आता आमच्या गावी एवढे दुभते नाहीय कोणाकडे. पिशव्यातले दुध आलेय सगळीकडे.

कोकणात मात्र आहे अजुनही. माझ्या मावशीच्या घरी घरच्या गोबर गॅसवर सैपाक होतो आजही. कोकणची माणसे जात्याच कामसू. Happy

मारकुट्या बैल आमच्याकडेही होता . पांढऱ्या रंगाचा धिपाड असा . त्याच्या आसापास जायचीही आम्हा मुलांना परवानगी नव्हती . त्याला हात फक्त काका आणि गडीच लावू शकायचे

मनीमोहोर, कसलं छान लिहीलं आहे, अगदी आजोळ डोळ्यांसमोर आलं, माझ्या आजीकडेपण असंच असायचं. आताही असतं पण तिथे रहायलाच मिळत नाही.

>>>>फेसाळलेल्या दुधाच्या कासंड्या घरात आणल्या जातात. त्या धारोष्ण, नैसर्गिक चवीच्या दुधाचा मोह या वयात
ही कधी कधी अनावर होतो. ताज्या दुधाचा वाफाळणारा चहा घेऊन पहाटेच्या वेळी खळ्यात बसणं म्हणजे साक्षात स्वर्गसुखच!! <<<

नका हो असं सांगू , त्रास होतो मनाला. हा असा चहा पहाटे पहाटे पिवून 'कैक' वर्षे लोटली.
--

माझ्या आईच्या मामाकडे अजूनही १० गुरं आहेत. २ म्हशी, ३ गाई, ४ बैल आणि १ वासरू असतच कायम(ते कसं काय मला तेव्हाही कळायचं नाही). अगदी मारकुटा किंवा वारू अंगात भरलेला तरूण बैल सगळ्यांकडे असतो असे दिसतय. एका बैलाने गोठ्याचा दरवाजा तोडला होता सतत डुसक्या मारून. मग कोकणताले लोकं 'तो' उपाय करतात. खूपच वेदनादायक असतो. अजून काय करतात माहित नाही.

आईचा हा मावसमामा कोकणातला आहे. ९० वयात सुद्धा तो दूध वगैरे काढतो.
....
तुमच्या लिखाणाने ते सर्व आठवलं. फोटो टाकायचे ना गाई-म्हशींचे. आम्हाला आवडतात बघायला. Happy

आहाहा हेमाताई, क्या बात है. अप्रतिम सर्वच. माहोल खडा किया आपने. गावाला गेले कधी तर नक्की तुमच्या घरी जाईन हे बघायला कारण माझं लग्न व्ह्यायच्या आधी आमच्याकडे एक म्हैस होती, सर्वजण शहरात आणि तेव्हा सासुबाई एकट्याच गावाला होत्या. मग नंतर नाहीच. नवरा शहरात येईपर्यंत भरलेला गोठा होता. माहेरीपण आजी-आते रहायच्या म्हणून नव्हती गाई-गुरं. आम्ही शेजारी खेळायला जायचो त्यांच्याशी.

खुतखुत्या भात माझे बाबा छान करतात (वेसवार नाही). सासरी वेसवार प्रस्थ. मलापण हा वेसवार प्रकार सासरी माहीती झाला. Happy

दुखती नस दाबलीत तै!! भयानक फीलिंग आले! १२ गुरे ते छप्पर पडून ओसाड पडणे ह्या फेज पर्यंत गोठा हाडीमाशी रुजवुन पाहिला आहे!! कठीण आहे सगळे काही, जमल्यास आठवणी लिहतो पुढेमागे

किती गोड आणि सुंदर लिहिलंय. तुमच्या सर्व लिखाणावर एक प्रसन्न समाधानाची दुलई असते. हे सर्व आधीच माहित असणारं असूनही वाचताना मन नकळतच गुंगत जातं. तुमचा लेख वाचून झाल्यावर अतिशय शांत वाटतं. अजिबात शब्दबंबाळ न लिहिता साध्यासाध्या शब्दांमधून तुम्ही तो सर्व माहौल अगदी डोळ्यांसमोर आणून ठेवता. शिवाय लिहिताना कुठेही "गेले ते दिन गेले" टाईप विव्हळता अजिबात नसते. तरीही त्या काळाबद्दल,अवस्तूंबद्दल तुमची ममता जिव्हाळा आणि भावनिक बांधिलकी सतत जाणवत राहते.

अशा सुंदर लेखांसाठी मनापासून धन्यवाद.

ममो अगा कसलं ग्वाड ग्वाड लिहितेस........ ____/\____

थांब अजून दोन तीनदा वाचते आता..हळू हळू चवी चवी ने.. Happy

नंदिनी,अगदी माझ्या मनातलं.
सर्वच लेखांवर या लेखातल्या भाकरीएव्हढ्या जाडीच्या एक तृप्त समाधानाची साय पसरून राहिलेलीत असते. जुन्याचे उमाळे नाहीत, नव्याचा तिटकारा नाही आणि वास्तवाशी फारकत घेणारं स्वप्नरंजन नाही.
सुंदर.

ममो.. सुंदर लिहलयं Happy
मामाकडे शेतात अजुनही हे वैभव आहे .. लहानपणी गाई म्हशींच्या कामात सगळी मदत केली आहे आजोबा नि मामाला .. धारोष्ण दुधाचा पहिला पेला मलाच मिळायचा .. Happy

आता पुण्यात राह्ते तिथे ही एक गोठा आहे .. वासरं बाहेरच बांधलेली असतात .. रोज त्यांना बघतच जाते.. कधीतरी खाऊ देते.. तिथुन जाताना दुध्,शेणाचा वास असं मिक्स फिलिंग येत मग मी मनातचं माझ्या आजोळी फिरुन येते Happy

किती सुंदर लिहिलं आहे! प्रसन्न सुरूवात झाली दिवसाची! माझ्या आजोबांची डेअरी होती त्यामुळे हे वैभव पाहीले आणि अनुभवले आहे!
नंदिनी +१

खुप छान लिहिता तुम्ही
एखादा black & white फोटोचा जुना अल्बम हातात घ्यावा आणि मनात समाधान दाटून याव अस फिलिंग आलाय

ममो, खूप सुंदर लिहिलंय..
आमच्याकडेही गावाला असंच दुभतं आहे, पण आता फक्त एक गाय आणि एक म्हैसच उरलीय Sad

फारच सुंदर! आमचाही गोठा ( आमच्याकडे 'वाडा' म्हणतात) एके काळी भरलेला होता, आता मात्र रिकामा! पण हे सर्व अनुभवलं आहे भरपूर!!

ममो, नेहमीप्रमाणेच मस्त. तुमचा लेख पाहिला की वाचल्याशिवाय पुढे जाववत नाही Happy

नंदिनी +१

बर्याच गोष्टी नविनच कळल्या - थारळ, ताकमेढ्याच्या खांबवगेरे.

धन्यवाद सर्वाना प्रतिसादाबद्दल. खूप जणांनी गावाकडे हे अनुभवल असल्याने त्यांना लगेच रिलेट होता आलं ह्या लेखाशी.

साधना, हो आमच्याकडे ही बहुतांश सैपाक गोबर गॅसवरच होतो. उन्हाळ्यात गरमी मुळे तो जास्त निर्माण होतो आणि तेव्हाच पाव्हणे मंडळी असल्याने त्याची गरज ही असते.

झंपी, आमच्याकडे ही तेच आहे . माझे ८० च्या पुढे असलेले दीर अजुन ही गोठ्यात जातात. त्यांचे जनावरांवर खरे पेम आहे. त्यांना चैनच नाही पडत त्या शिवाय.

अंजू, आता गेलीस कोकणात की नक्की जा आमच्याकडे, मी नसले तिथे तरीही.

सोन्याबापू अहो आमच्यावर ही संकट आलं होत दोन वर्षांपूर्वी. काय झालं ...... गोठ्यावर असलेलं आमच पायरीच कलम उन्मळून कोसळलं पण कोसळताना ते गोठ्याच्या विरुद्ध दिशेला पडलं त्यामुळे गोठ्याच थोडसचं झालं नुकसान आणि दिवस असल्यामुळे गुरं नव्हती गोठ्यात ती सड्यावर चरायला गेली होती म्हणून एकूण एक वाचली. हेच जर का रात्री पडल असत झाड तर काय झाल असत ह्याची कल्पना ही करवत नाही. त्या गोपालकृष्णानीच राखलं

मामी, खरं आहे थारळ्याची आयडीया मस्तच होती.

नंदिनी अग, तु एवढी मोठी लेखिका !! तुला माझे साधे सुधे लेखन आवडते हा माझा बहुमानच आहे. तुझा प्रतिसाद खूप आवडला.

तुमचा लेख पाहिला की वाचल्याशिवाय पुढे जाववत नाही स्मित >>> नताशा, धन्स.

Pages