दोन बाय दोन चौरस फुटांचा सांदरी कोपरा.

Submitted by Charudutt Ramti... on 14 March, 2016 - 00:18

रविवारची सुस्त सकाळ. पेपरातल्या पुरवणीची पानं, अंगठा आणि तर्जनिच्या मधे चिमटीत पकडून चाळत बसलो होतो. बेल वाजली. दारात सचिन पन्हाळकर. आमच्याच बिल्डींग मधला. सहाव्या मजल्यावर राहतो.

" अरे…त्या आपल्या बिल्डींग मधल्या 'निसर्गमित्र' बाई आहेत त्या नक्की कोणत्या फ्लॅट मधे रहातात रे ? "

" चवथ्या....कुलक रण्यां च्या बरोब्बर वरती. का रे ? काय झाल ? " .... मी.

" अरे कै नई... ती परवाची मांजरी…"

" ती मांजरी ना......अरे थांब मी पण येतो. मला पण तक्रार करायचीय त्यांच्या कडे. अरे त्या वाट्टेल त्या प्राण्यांना खायला घालतात आणि मग आपल्याला फुकाटचा त्रास होत बसतो. "

" अरे, थांब तक्रार नंतर कर...मला जरा ताबडतोब त्यांच्या कडे जायचय "...सचिन थोडा गडबडीत वाटला. लिफ्टची वाट न पाहता पटकन धापा टाकत वरती निघून गेला. त्या निसर्गमित्र वाहिनींच्या शोधात.

मांजरीचा विषय निघताच माझी चार वर्षांची आर्या आतून झरझर हातातला खेळ अर्धवट टाकून दारात आली. तिला मांजर, विशेषता: 'ती' मांजरी जिच्या विषयी सचिन चौकशी करत आला तिच्या बदद्ल प्रचंड 'भय' परन्तु तितकेच 'औत्सुक्य'. एक दोन वेळा तर लिफ्ट मधे 'हिची' आणि 'ती'ची नजरानजर झाल्या पासून तर आर्या ने तिचा चांगलाच धसका घेतला होता.

मला स्वत:ला ही कुत्र्या-मांजर्यानविषयी मनस्वी तिटकाराच. सचिन ची मुलगी 'अन्वि'. ती मात्र त्या मांजरीला काही बाही खाउ घाली. आर्या पेक्षा चांगली वर्ष दीड वर्ष लहान. पण धीटपणे तिला पायात घूटमळू द्यायची.

गेले पंधरा एक दिवस झाले. त्या मांजरीने मात्र चांगलाच उच्छाद मांडायला सुरूवात केली. परवा, समोरच्या कुलकरण्यांच्या दारात पहाटे 'दुधाच्या' पिशव्या फस्त केल्या. हाकलायला गेल की चांगल उलट गुरकावायला लागली अंगावर. झूम आउट केली ४००%, तर एखाद्या वाघीणी सारखी अग्रेसिव दिसेल. सतत काही तरी शोधत असल्या सारखी या फ्लोअर वरुन त्या फ्लोअरवर, जिना , पॅसेज, कॉरिडॉर, पार्किंग एकडे तिकडे अस्वस्थ पणे घिरट्या घालायची. अलीकडे तर कुणाला फारशी घाबरेनाशिच झाली.

ती जशी जशी आम्हला घाबरेनाशी झाली, तसतसे आम्ही मात्र तिचा अग्रेसिवनेस्स पाहून तिलाच हाबकायला लागलो.

कुणी तरी खालच्या फ्लोअर वरच्यांनी सजेशन दिले, तिला पोत्यात बांधून लांब सोडून या. पण 'मिश्या' कापा हा. नई तर परत येणार नक्की आपल्या बिल्डींगचा माग शोधत. मग कुणी तरी वेड्यात काढत बोलले 'अहो ती मांजरी आहे - मिश्या कापा काय ? '

मग कुणी तरी बोलले, 'लोबो च्या तावडीत द्या. परत, फिरकणार नाही आपल्या 'विंग' मधे. लोबो म्हणजे सपकाळान्चा कुत्रा. पण 'लोबो; स्वत:च एक दोनदा तिला टरकला असच उलट समजल.

काल परवा पासून दोन तीन दिवस मात्र ती दिसेनाशी झाली होती. अधुन-मधून गुरगुर ऐकू यायची तीही बंद झाली.

आणि आज मात्र सकाळी सकाळी अचानक सचिन त्या 'निसर्गमित्र' वाहिनींच्या शोधात आला.

माझी उत्सुकता शिगेला पोहोचली.

मीही सचिन पाठोपाठ जिन्याने वरती गेलो. आर्या ही आई ला न जुमानता माझ्या मागे अनवणी पायाने जिन्यावर तिची बारकीशी पाऊले आपटत माझ्या मागे मागे आली.

वरती, सचिन आणि 'निसर्ग मित्र' वाहिनी काहीतरी गंभीर चर्चा करत होत्या. ह्या निसर्ग मित्र वाहिनी म्हणजे, उघड्या रस्त्यावरती जरी कुणी बेवारस पक्षी, प्राणी आजारी पडलेले दिसले तरी त्याना उपचार करतात. अगदी प्लास्टर वगरे पण घालून आणतात आणि परत बरे झाली की सोडतात अस ऐकल होत. अजब रसायन आहे हे.

"नक्की काय झाल सचिन ?" ... माझ्या कपाळावर आठयांच जाळ.

" अरे ती मांजरी नाही का? ती, काल आमच कुणाच लक्ष नसताना रात्री आमच्या बेडरूम मधे आली. रात्र भर तिथेच होती. आणि आज सकाळी केरवाल्या मावशी केर काढत असताना...बेड च्या मागे अगदी सान्द्रि मधे लक्ष गेल...तिथे तीने, तीन चक्क पिल्ल दिली. अरे ती गाभण होती, आपल्या कुणाच्या लक्षातच नाही आल." सचिन न एका श्वासात सगळ वाक्य संपवल.

मलाही ऐकून क्षणभर चर्र झाल. सचिन च्या दारा जवळ जुन्या चादरीत तीन पिल्ल होती. एकमेकांनाच बिलगलेली. गुबगुबीत. लालसर पिवळी. थंडीने थर्थर्ल्या सारखी वाटत होती. निसर्ग मित्र वाहिनिंनी काही तरी क्लुप्ति करून बेडरूम च्या सन्द्रितून बाहेर काढून आणली होती, पॅसेज मधे. अवघ्या काही तासांचे तीन जीव. मला सगळी लिंक लागू लागली. ती मांजरी एवढी अग्रेससिव का झाली होती? ती येरझर्या घालत काय शोधत होती? पोटात तीन जीव घेऊन, त्यांना जन्माला घालायची एक सुरक्षित साधी दोन बाय दोन फुटी जागा...तिला गेले पंधरा तीन आठवडे सापडत नव्हती ‘आमच्या’ या जगात.

आम्ही तर चक्क तिच्या जिवावरच उठलेलो. तिचे दिवस भरत आलेले. मिळेल ते खात पीत जागा शोधत होती. तिला कुलकरण्यांच्या दुधाची कुठली भीडभाड.

कुठल्या तरी एके दिवशी तीन-चार वर्षापूर्वी ती मान्जरी अशीच तिच्या आई च्या पोटी जन्माला आली असणार. सान्द्रिकोपर्यात कुठल्याशा अडगळ असलेल्या खोलीत. मग वाढली असेल तिच्या आईच्या अवती भवती. बोके म्हणे मांजरीच्या लहान लहान जन्मलेल्या पिल्लान्ना खातात जन्मल्या जन्मल्या. खरं-कोट माहीती नाही. पण त्या बोक्याच्या तावडीतून वाचून मोठी झाली असणार. कधीतरी वयात आली असणार. कुणा तरी बोक्याला ती जरा मादक - सेक्सी वाटली असणार. तिलाही तो आवडला असेल. किंवा नसेल ही कदाचित पण त्यांचा सहवास मात्र घडला. कधी तरी एका मुग्धशा प्रणयानंतर ती प्रेग्नेंट झाली असेल त्या बोक्या पासून. निसर्ग त्याचे सगळे नियम पाळायला शिकवतो. कुणाला आवडो वा न आवडो. तिला समजल असेल नसेल कुणास ठाऊक ती स्वत:चीच गुडन्यूज़, पण तिने तिच्या पील्लान्साठी जन्माची सुरक्षित जागा मात्र शोधायला सुरू केली. तिच्या बोक्याला पत्ता आहे की नाही काही कल्पना नाही. तो पिल्लाना खातो हे खरे असेल तर त्याला चुकवून च ती आली असेल कदाचित.

तिच्या तीन पिल्लान्चा झगडा आता सुरू झाला. बीन बापची ती तीन पिल्ल. माणसाच्या व्याख्येनुसार 'अनौरस' - कारण त्या तीन पिल्लान्चा बाप कोण माहिती नाही. आई एकटी लढणार. इतके दिवस स्वत: च्या आयुष्या साठी लढत होती. आता...या तिघांच्या आयुष्या साठी लढा देणार. तीन पिल्लान पैकी माजरी किती आणि बोके किती...मी नर मादी चा हिशेब लावत बसलो नाही. एखाद पिल्लू नर असाव. दोन माद्या. पण जन्मली तेंव्हा नर पिल्लू, मादी पिल्लान्च्या इतकच कावर बावर वाटल. किंबहुना थोडी जास्तच. त्याला अजुन त्याच नरत्व समजायच होत. ते समजू लागल्या वर वागेल बोक्या सारखाच कदाचित, कुणी सांगाव ?

पॅसेज मधे येरझार्या घालणार्या मांजरिला हाकलण्या साठी प्रयत्नांची शिकस्त करणारा मी, तिच्या पिल्लांचे फोटो काढण्यासाठी मोबाइल कॅमेरा स्विचऑन करताना...पिल्लान्ना त्रास नको म्हणून कॅमेराचा फ्लॅश मात्र न चुकता ‘ऑफ’ केला. तिघांचेही डोळे अजुन उघडायचे होते...!

चारूदत्त रामतीर्थकर.
पुणे, १३ मार्च २०१६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अस्सच आमच्या बिल्डींगमधे घडल होत. आम्हा सर्वांना माहित होत की तिला पिल्ल होणार आहेत. तरीसुद्धा प्रसवकळा सुरु झाल्यावर तिला आम्ही कोणीच घरात घेतल नाही. आमच घर तळमजल्यावर आहे आणि घराच्या बाजुला मीटरबॉक्सची जागा आहे जी पूर्ण मोकळी आहे.. माझ्या नवर्‍याने आमच्या कारच जुन टायर त्याच्या तिथे ठेवलेल्या सायकल खाली ठेवल, त्यात घरातली एक जुनी बेडशीट नीट अंथरुन ठेवली. आणि आडोसा तयार केला. कस कोण जाणे पण तिला कळल की ही व्यवस्था आपल्यासाठी आहे आणि तिने तिथे चार पिल्लांना जन्म दिला. सगळी पिल्ल अगदी तिच्यासारखीच... मस्त होती. एकेक करुन आता एकही शिल्लक नाही. दोन गायब झाली, दोन गेलीच.. मांजरी मात्र अजुन बिल्डिंगमध्येच आहे.

पॅसेज मधे येरझार्या घालणार्या मांजरिला हाकलण्या साठी प्रयत्नांची शिकस्त करणारा मी, तिच्या पिल्लांचे फोटो काढण्यासाठी मोबाइल कॅमेरा स्विचऑन करताना...पिल्लान्ना त्रास नको म्हणून कॅमेराचा फ्लॅश मात्र न चुकता ‘ऑफ’ केला. तिघांचेही डोळे अजुन उघडायचे होते...! >>>>> +१ तुमच्या जागी माझा नवरा होता.

आमच्या सोसायटीतही एका मांजरीने ४ पिल्ले जन्माला घातलीत. आता मोठी झाली आहेत पिल्ले. सोसा. मधली मुलं पिल्लांना दुध, चपाती. चॉकलेट, चिकन -फिशचे टाकाउ भाग खायला देतात. मुलं तर जाम खुश असतात पिल्लांवर. माझा मुलगा तर पिल्लं पाहिली की सुसाट धावत सुटतो त्याना पकडायला...पण ती पण चतुर आहेत. लगेच पसार होतात Happy

आमच्या कडचं एक पिल्लू पुर्ण पांढरं शुभ्र आणि त्याच्या कपाळावर एका कोपर्‍यात लहान काळा ठिपका आहे.. बाळाला तीट लावल्यासारखा Happy

आमच्या कडचं एक पिल्लू पुर्ण पांढरं शुभ्र आणि त्याच्या कपाळावर एका कोपर्‍यात लहान काळा ठिपका आहे.. बाळाला तीट लावल्यासारखा >>>> व्वॉव. फोटो टाका ना जमल्यास.

एकदम छान अनुभव पण आणी लिखाण पण.
प्रसूतीच्यावेळी मांजरी अशाच वागतात. घर न् घर धुंडाळतात आणि सुरक्षित जागा शोधतात.
कारण नालायक बोके (निसर्गनियंमामुळेच सोडा!!) या नवजात पिल्लांच्या (बोका असो की मांजर) गळ्याचा घोट घेतात, स्पर्धा कमी व्हावी म्हणून. Sad

नवजात पिल्लांच्या (बोका असो की मांजर) गळ्याचा घोट घेतात, स्पर्धा कमी व्हावी म्हणून..... अरेरे >> हे माहित नव्हत

लिखाण छान आहे. समोर घडत असल्यासारख सारचं ..

आमच्या इथे पण मांजरीने ४ पिल्लांना जन्म दिला पण मेल्या बोक्याने त्यातल्या २ पिल्लांना आणि खुद्ध त्या स्वसंरक्षण करणाऱ्या मंजीलाही नाही सोडले. (घेरी आलेली मला ते पाहून)

आमच्या घरच्या मांजरी लग्नाची बायको असल्यासारखी एकाच बोक्याशी संबंध ठेवून पिल्लं देते दर वर्षी - २ पिल्लं. ती पिल्लं आणि मांजरी मग घरात एकत्र राहतात. मग पिल्लांची पुढची बॅच जन्माला आली, की आई आणी नवीन पिल्लं घराच्या पुढच्या दरवाजाने ये-जा करतात, आणि आधीच्या बॅचची पिल्लं घराचा मागचा दरवाजा वापरतात. ते आपोआप त्यांच्या त्यांच्या जेव्णाच्या, दूध पिण्यासाठी आईच्या पायात पायात करण्याच्या वेळा मस्त अ‍ॅडजस्ट करतात. तिसर्‍या बॅचची वेळ झाली, की पहिली बॅच गच्चीत, दुसरी मागच्या दारी, आणि लेटेस्ट बॅच विथ आईमांजर पुढच्या दारात Lol

मी लहानपणी आमच्या बोक्याच्या मिशा खूप वाढल्या, म्हणून ट्रीम करायला, शेप द्यायला कापल्या होत्या. पण मग रात्री खिडकीच्या गजातून, दारातून , फटीतून ये -जा करताना तो अडकायला लागला. कारण मांजरं मिशांनी अंदाज घेतात की त्यांचं शरीर किती जागेत मावू शकेल. मिशा कापल्याने बिचार्‍याचं जजमेंट टोटल गंडलं होतं काही काळ Lol

असो. मांजर हा जिव्हाळ्याचा विषय. आवरता घेते.

मी लहानपणी आमच्या बोक्याच्या मिशा खूप वाढल्या, म्हणून ट्रीम करायला, शेप द्यायला कापल्या होत्या. पण मग रात्री खिडकीच्या गजातून, दारातून , फटीतून ये -जा करताना तो अडकायला लागला. कारण मांजरं मिशांनी अंदाज घेतात की त्यांचं शरीर किती जागेत मावू शकेल. मिशा कापल्याने बिचार्‍याचं जजमेंट टोटल गंडलं होतं काही काळ >>>>> माझ्या नवर्‍याने पण असच केल होत Lol

खुप छान Happy

माझा अतिशय आवडीचा विशय... मनी.. :*
छान लिहिलय... बरेचदा आपन मुक्क्या प्राण्यान्च्या बाबतीत फार कठोर वागतो...माणुस ईतक स्वार्थी होतो, तो दुसर्या सजीव जातिच्या पण काही गरजा आहेत हेच विसरतओ.....
.
.
.
मी लहानपणी आमच्या बोक्याच्या मिशा खूप वाढल्या, म्हणून ट्रीम करायला, शेप द्यायला कापल्या होत्या. पण मग रात्री खिडकीच्या गजातून, दारातून , फटीतून ये -जा करताना तो अडकायला लागला. कारण मांजरं मिशांनी अंदाज घेतात की त्यांचं शरीर किती जागेत मावू शकेल. मिशा कापल्याने बिचार्‍याचं जजमेंट टोटल गंडलं होतं काही काळ Proud

छान प्रसंग रेखाटलाय तुम्ही. माणुस असो किंवा प्राणी शेवटी आई ती आईच. आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी तीने केलेला आटापीटाच तीच्या मातृत्वाची जाणीव करुन देतो.
प्रसंग वाचून त्या पिल्लांचा फोटो पाहण्याची इच्छा झाली आहे. शक्य असेल तर प्रतिसादामध्ये पोस्ट करावा...