द शायनिंग-पुस्तक

Submitted by mi_anu on 13 March, 2016 - 09:38

(स्पॉईलरः यात पुस्तकाची थोडी कथा उघड झाली आहे.शाईनिंग हे असं पुस्तक आहे की कथा उघड होऊनही त्यातली उत्कंठा कमी होत नाही, तरी तुमची कमी होणार असल्यास यापुढे वाचू नका.
स्टिफन किंग च्या काही जबरदस्त कथा: शाईनिंग, कुजो, पेट सिमेटरी, सालेम्स लॉट, कॅरी. या सर्वांवर चित्रपट निघाले आहेत. पण मूळ कादंबर्‍या ज्याने वाचल्या त्याला हे चित्रपट पाहताना 'दुनियादारी' सारखी थोडी निराशा वाटण्याची शक्यता आहे.)

द शाईनिंग वर चित्रपट आलेला आहे.पण पुस्तकात ज्या बारकाव्याने गोष्टी घेता येतात त्या चित्रपटात दाखवताना बदल करावे लागतात.हे पुस्तक प्रचंड ताकतीचं आहे.निव्वळ हॉरर म्हणजे घाबरवणारे चेहरे इतकी या पुस्तकाची मर्यादा नाही.

जॅक टॉरेन्स. मुळात एक चांगला नवरा, चांगला बाप. पण त्याच्यात एकच दोषः शीघ्रकोपी स्वभाव. यामुळे त्याच्या नोकर्‍या टिकत नाहीत.त्याच्या या स्वभावामुळे त्याच्यात आणि बायकोतही तणाव आहेत.अनेक ठिकाणी मिळत असलेले नकार, घरातले थकलेले खर्च आणि बिलं, कधीकधी मित्राबरोबर 'थोडीशी' करत करत एक न सुटणारी सवय बनलेली दारु.आणि या सगळ्या अपयशातून अधून मधून मनात येणारे आत्महत्येचे विचार.

वेंडी/विनीफ्रेड टॉरेन्स.कधीकाळी जॅक वर झोकून देऊन प्रेम केलेली.त्याच्या नोकर्‍यांच्या अनिश्चिततेच्या काळात जास्त श्रम करुन घर सांभाळणारी एक प्रेमळ स्त्री.जॅक वर तिचं मनापासून प्रेम आहे. पण पिणं आणि नोकरीतली भांडणं वाढल्यापासून बदलत गेलेला हा जॅकसारखा दिसणारा नवीनच माणूस तिला आता सहन होत नाही.अगदी आपण सहन केलं, गरीबीत राहिलो तरी पण डॅनी सारख्या गोड मुलासाठी वाढीच्या नकळत्या वयात हे योग्य वातावरण नाही हे तिला हल्ली सारखं वाटतं.

सहा वर्षाच्या लहान मुलाची समज किती असावी? डॅनी मनकवडा आहे.त्याला शब्द समजत नसले तरी त्यांचे अर्थ समजतात.आई बाबांच्यातला तणाव कळतो.त्याच्या हसण्या खेळण्याच्या वयात त्याला बराच वेळ आई बाबांच्या मध्ये 'डिव्होर्स' हा शब्द लटकताना दिसतो.डिव्होर्स म्हणजे नक्की काय माहिती नसलं तरी हा प्रकार आला की आई बाप वेगळे होतात आणि मुलं एकाकडे राहतात आणी दुसरा कधीतरी आठवड्या महिन्यातून एकदाच भेटतो हे त्याला माहिती आहे.आईबाबांच्यातला तणाव बाबा पीत असलेल्या 'वाईट गोष्टीमुळे' आहे हे पण त्याला कळतं.मोठ्या माणसांच्या एकंदर अनुभवावरुन त्याला कळत असलेल्या सर्व गोष्टी बोलून न दाखवण्याचं/न विचारण्याचं अवधान त्याच्याकडे आहे.डॅनीची जुनी शाळा, जुनं घर सर्व सोडून ते नव्या जागी राहायला आलेत, तो सध्या एकटा आहे पण तरी तो स्वतःला रमवतो आहे.आई बाबांच्या आयुष्यात सध्या इतके ताण आहेत की आपलं एकटेपण बोलूनही उपयोग नाही हे समजून तो एकटा एकटा खेळतो.त्याला अगदी नुकताच भेटलेला मित्र एकचः टोनी.टोनी डॅनीइतकाच आहे, तो कधीकधीच भेटतो.डॅनी जसा मनकवडा आहे तसा टोनी हा भविष्य जाणणारा आहे.हा टोनी आता आता पर्यंत डॅनीला साध्या साध्या घटना दाखवत होता, कधीतरी बाबा मजा करायला उद्या जत्रेत घेऊन जातील ते दाखवत होता. पण हल्ली टोनी पण बदललाय.तो डॅनीला भयंकर दृष्य दाखवतो.'रिड्रम' हा एक शब्द, ज्याचा अर्थ डॅनीला कळत नाही पण तो शब्द काहीतरी भयंकर घडण्याची नांदी आहे हे त्याला कळतंय.टोनी 'रिड्रम' बद्दलच्याच घटना हल्ली सारख्या दाखवतोय.

परिस्थितीने अगतिक झालेलं हे एक कुटुंब.आता कोणीही यांना काहीही पैसे कमावण्याचा मार्ग दाखवला तरी हे स्वीकारणार आहेत कारण बाकी सर्व दारं बंद झाली आहेत.'ओव्हरलुक' नावाचं हॉटेल.हे इतर वेळी एक गजबजलेलं हॉटेल, पण हिवाळ्याचे पूर्ण चार महिने प्रचंड बर्फ आणि त्यामुळे बाकी रस्त्यांशी संपर्क तुटून पूर्ण एकाकी बेट बनणारं. जॅक ला एका मित्राच्या ओळखीने मिळत असलेली नोकरी ही: पूर्ण हिवाळा या हॉटेल मध्ये एकटं(किंवा कुटुंबाबरोबर) केअरटेकर म्हणून राहून हॉटेलच्या मालमत्तेची काळजी घ्यायची.ही सोपी वाटणारी नोकरी नाकारायचं जॅक ला काही कारणच नाही.त्याच्याकडे दुसरा पर्याय पण नाही.जॅक या नोकरीचा प्रस्ताव स्वीकारुन बायकोला ही चांगली बातमी द्यायला घरी येतो.

"डॅनी..ती जागा वाईट आहे..तिथे जाऊ नको...धोका आहे...रिड्रम..रिड्रम.." टोनी डॅनीला खूप भयंकर दृष्य दाखवतोय.टोनी डॅनीला 'धोका' म्हणून कोणती जागा दाखवत होता हे डॅनीला 'ओव्हरलुक' हॉटेलच्या दारात आल्याआल्या कळतं.डॅनीला इतकंच माहिती आहे की कोणत्यातरी जागी जायची नोकरी करायचे विचार पक्के केल्यापासून बाबांच्या डोक्यातले 'सुसाईड' आणि 'वाईट गोष्ट' पिणे हे दोन्ही विचार गेले आहेत. आईच्या डोक्यातला 'डिव्होर्स' हा विचार वितळून त्याच्याजागी चांगले विचार यायला लागले आहेत.इथे न जाणं आपल्या हातात नाही.

वाईट घटना घडतच जातात.डॅनीला सगळं डोळ्यासमोर दिसतंय पण ते थांबवणं त्याच्या हातात नाही.तो फक्त त्यातून वाचण्याची आणि त्यातल्या त्यात इतर वेळी आनंदी राहण्याची धडपड करतोय.डॅनीला एकमेव पुसट आधार आहे तो डिक हॅलोरान जाता जाता सांगून गेल्याचा. "तुला इथे काहीही धोका वाटला तर मला मनातल्या मनात जोरात हाक मार.मी जिथे असेन तिथून धावून येईन."

डिक हॅलोरान म्हणजे ओव्हरलुक हॉटेलचा आचारी.डॅनीला पाहिल्या पाहिल्या डिक ला जाणवलंय की डॅनीकडे 'शाईनिंग' म्हणजे कोणाच्या मनात एखाद्या टॉर्चप्रमाणे उजेड पाडून डोकावण्याची शक्ती आहे.डिक कडे पण ही शक्ती काही प्रमाणात आहे.डॅनीच्या मनातली भीती त्याने ओळखली आहे.पण 'हॉटेलातल्या गोष्टी फक्त वाईट चित्रं आहेत, तुम्ही डोळे बंद केले, ही चित्रं नाहीशी होतील.' ही त्याची धारणा आहे.या चित्रांमागची घातक शक्ती अजून त्याला पुरेशी जाणवलेली नाही.

गोष्टी आता सुधारण्यापलिकडे गेल्या आहेत.मागे वळणं शक्य नाही. अशा परीस्थितीत टोनी डॅनीला भेटायला परत आला आहे.'हॉटेल तुझे आई बाबा दोघांचा जीव घेणार आहे, तुला वेळेत मदत मिळणार नाही.तुला स्वतःलाच स्वतःचा जीव वाचवायचा आहे.' ही बातमी टोनी देतो.डॅनी बोलून चालून एक सहा वर्षाचा लहान मुलगा.तो काय वाचवणार स्वतःला? तो टोनीला सारखा विचारतो, 'पण मी लहान मुलगा आहे.मी हे सगळं कसं करणार?' टोनी फक्त एकच वाक्य बोलतो, 'यु विल रिमेंबर व्हॉट युवर डॅड फरगॉट.' या एका वाक्याची किल्ली घेऊन डॅनीला आपला जीव वाचवायचा उपाय शोधायचाय.

डॅनी जे सहन करतोय, जे पचवतोय ते दुसर्‍या कोणा सहा वर्षाच्या मुलाने करावं अशी आपण कल्पनाही करु शकत नाही.आपण सारखी पुस्तकभर एकच प्रार्थना करत राहतो की लहानग्या डॅनीला काहीतरी करुन हा धोका इतरांपर्यंत पोहचवता यावा. या कुटुंबाने वेळेत तिथून बाहेर पडावं.काहीतरी मार्ग निघावा.

डॅनीला मदत कशी मिळणार आहे? डिक हॅलोरान खरोखर धावून येऊ शकेल का? ओव्हरलुक हॉटेल ला नक्की काय हवंय? वेंडी डॅनीला घेऊन तिथून आधीच बाहेर का पडत नाही?जॅक ला ही अशी नोकरी का स्वीकारावी लागतेय? हे सगळं वाचा प्रत्यक्ष पुस्तकातच.

पुस्तकः द शाईनिंग
लेखक: स्टिफन किंग

-अनुराधा कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला पॅरा वाचला..
स्पॉअ वाचुन बाजुला झाली..

कित्ती पुस्तक राहिलीत बै वाचायची..टेन्शन यायला लागलयं ना मला..

मस्त लिहीलंय! स्टीफन किंग वाचायच्या भानगडीत मी फारशी पडत नाही. उगीच कशाला विकतचं दुखणं - असा विचार! पण उतसुकता वाटत्ये!

छान परिचय. फक्त ते रिड्रम नसून रेडरम आहे ना?

हे पुस्तक अतिशय आवडलेलं म्हणून उत्सुकतेने Doctor Sleep वाचायला घेतलं होतं. पण लय बोअर केलं बाबा किंगकाकानी.

पुस्तक वाचलं नसेल तर किंवा एक पूर्णपणे वेगळी कलाकृती म्हणून पाहिला तरच सिनेमा आवडतो.

जॅक निकोल्सन साठी तो सिनेमा पाहिला मी. आता तो ब्लुरेवर पण आलाय . स्टॅन्ले कुब्रिकचा क्लोकवर्क ऑरेंज आजपर्यंत उमजला नाही.

कल्पनाताई, लेखाबद्दल चूक काढणे प्लस अजून 2 ओळी लेखाबद्दलही लिहिन्यालायक लेखात काहीच मूल्य नाही काय ? आवडला/नाही आवडला/सुमार/टुकार/भंगार इ? ☺️☺️

छान परिचय.
माझं मुळात इंग्लिश वाचन कमी. त्यात या प्रकाराची आवड कमी. त्यामुळे वाचण्याची शक्यता कमी:-)

पुस्तक अजून अस्वस्थ करणारं आहे.पिक्चर मध्ये काही गोष्टी विस्तार भयास्तव काटाव्या/बदलाव्या लागतात.
पुस्तकात जॅक चा अंत वेगळा आणि भयानक आहे.
अवांतर: विमान प्रवासात हॉरर पिक्चर अव्हेलबल करणं हे एअरलाईन चा फारसा चांगला निर्णय नाही.लोकांना आधीच फ्लाईंग फिअर असते.त्यात असे अस्वस्थ करणारे/रक्त/मारामारी वाले चित्रपट दाखवू नयेत.

मी स्टिफन किंग वाचला नाही म्हणून विचारतोय नारायण धारपांवर त्यांचा प्रभाव होता हे कितपत खर आहे?

एकदम खरे आहे.धारप आयुष्यातली काही वर्षे आफ्रिकेत नोकरीला होते.परदेशी लेखकांचे साहित्य लायब्ररी वगैरे मधून वाचले असेल.लुचाई स्टीफन किंग चे, आणि आनंद महल शायनिंग चे आणि शपथ ईट चे भारतीयीकरण आहे.त्यावेळी कॉपीराईट कायद्याची जाणीव होती का, कॉपीराईट कायदे रुपांतराला लागू होतात का, त्यांनी प्रथम प्रकाशन करताना कल्पना परकीय असा उल्लेख केला होता का हे मला माहित नाही.(त्याकाळी क्रॉसवर्ड किंवा इंटरनेट सारखे सर्रास परदेशी पुस्तकं सहज विकत मिळत नसतील.त्यामुळे 'केले तर कोणाला कळणार आहे' ही भावना होती का हेही माहीत नाही.धारपांच्या ओरिजिनल कल्पनाही तितक्याच सरस आहेत आणि ते जगात नाहीत. त्यामुळे खरे काय होते हे कोणीच सांगू शकणार नाही.)
सध्या गुप्ते बद्दलही तोच स्टीफन किंग कॉपी वाद चालू आहे.तेही सरस लिहितात.दैत्यालय, अंधारवारी आवडले.घनगर्द घ्यायचे आहे.माझ्या मते मतकरी आणि धारप यांचे ते नव्या पिढीतले कोम्बो आहेत.

The Shining पुस्तक आणि चित्रपटातील फरक:
https://metro.co.uk/2015/06/05/there-are-so-many-differences-between-ste...

आणि कुब्रिकच्या चित्रपटातील सिम्बॉलिझ्म वगैरे कसे पाहायचे हे समजवणारी ही लिंक
http://www.collativelearning.com/the%20shining%20-%20chap%208.html
शायनिंगबद्दल एकूण २१ पानं लिहली आहेत त्या सदगृहस्थाने. सगळी वाचलीत तर चांगलेच आहे पण न जमल्यास वरचे एक पान तरी नक्की वाचा.

@ ॲमी भारीच लिंक आहे कुब्रिकची. आता परत त्याचे सिनेमे पाहावे लागतील . कदाचित कुब्रिकपासून प्रेरित सिनेमे जे नीट कळाले नाहीत तेही परत पाहणार आता.

रोमन पोल्न्स्कीचे सिनेमे सुद्धा भारी आहेत . त्याचा १९७६ सालचा "द टेनंट" तर अप्रतिम आहे. रॉबर्ट डी नेरोचा "टॅक्सी ड्राइवर" हा सुद्धा असाच भारी सिनेमा आहे. मंडळी सायकॉलॉजिकल थ्रिलर-हॉरर या गटातील तुम्हाला आवडलेले सिनेमे इथे सुचवा

हो खरंच चांगली आहे ती लिंक.

> रोमन पोल्न्स्कीचे सिनेमे सुद्धा भारी आहेत . त्याचा १९७६ सालचा "द टेनंट" तर अप्रतिम आहे. रॉबर्ट डी नेरोचा "टॅक्सी ड्राइवर" हा सुद्धा असाच भारी सिनेमा आहे. मंडळी सायकॉलॉजिकल थ्रिलर-हॉरर या गटातील तुम्हाला आवडलेले सिनेमे इथे सुचवा > यासाठी वेगळे धागे आहेत.
• सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)
https://www.maayboli.com/node/33448
• सर्वात भीतीदायक चित्रपट
https://www.maayboli.com/node/44392