शब्दपुष्पांजली: मला भावलेले गोनिदां. माझ्या वडीलांच्या नजरेतुन

Submitted by मुग्धटली on 28 February, 2016 - 08:05

सर्वप्रथम मराठी भाषा दिवस या उपक्रमाअंतर्गत लेखन करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी सर्व संयोजकांचे आभार मानते. मराठी भाषा दिवस साजरा करताना संयोजक मंडळाकडुन शब्दपुष्पांजली या उपक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध लेखक श्री. गो. नि. दांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या संदर्भात लिखाण करण्याचे आवाहन मायबोलीकरांना केले. विषय वाचल्यावर मनाने आधी उचल खाल्ली पण नंतर एक पाउल मागे आल कारण त्यांची पुस्तकं खूप लहानपणी वाचलेली होती, त्यांना प्रत्यक्ष भेटले आहे ते ही अगदी लहान असताना त्यामुळे त्यांच्याविषयीच्या आठवणी माझ्याजवळ अशा नाहीतच. गड, किल्ले फिरण्याच म्हणाल तर तिथेही नन्नाचाच पाढा. पण माझे बाबा श्री. मुरलीधर वामन दांडेकर यांच्याकडुन ते जेव्हा त्यांच्या घरी शिकायला राहिले होते त्यावेळच्या त्यांच्या अनेक आठवणी ऐकल्या होत्या. या आठवणी प्रकाशित करण्याविषयी संयोजक मंडळाकडे विचारणा केल्यावर त्यांनी होकार दिला. बाबांकडुन त्यांना जेवढ्या आठवतील तेव्हढ्या आठवणी गोळा केल्या आणि त्याच तुमच्यासमोर मांडते. आठवणी बाबांच्या, शब्द माझे.

बाबा आणि आप्पा उर्फ गो. नो.दां ची पहिली भेट

१९५९ साली गो. नि. दां उर्फ आप्पा त्यांच्या काकांच्या घरी दापोलीजवळील गुडघे या गावी आले होते. त्यावेळी मी इयत्ता ८ वीची परिक्षा देउन दाभोळहुन मे महिन्याच्या सुट्टिसाठी म्हणुन घरी आलो होतो. आप्पांना गावात आणि आसपास फिरण्यासाठी कुणाच्यातरी सोबतीची आवश्यकता होती. माझ्या शाळेला सुट्टी असल्याने मी ही मोकळाच होतो. मग आम्ही गावाजवळील बालेपीर या डोंगरावर फिरायला गेलो. त्यावेळी गप्पा मारता मारता सहजच त्यांनी माझी चौकशी केली. काय करतोस? कुठे शिकतोस? कितवीत आहेस? वगैरे वगैरे, बोलता बोलता तु शिक्षणासाठी माझ्या घरी तळेगावला येशील का? अस विचारल आणि मी त्यांच्याबरोबर तळेगावला आलो. अशी झाली माझी आणि आप्पांची पहिली भेट.

त्यांच्याबरोबर फिरलेला पहिला किल्ला

१९६० साली माझी परीक्षा संपल्यावर आम्ही सर्वांनी १० दिवस सिंहगडावर मुक्कामाला जाव अस आप्पांनी ठरवल. त्याप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबिय म्हणजे आप्पा, त्यांच्या पत्नी सौ. निराकाकु व कन्या वीणा, शिवाय काही आप्त जसे की श्रीनिवास कुलकर्णी, मोहन वेल्हाळ आणि विख्यात भावगीत गायक बबनराव नावडीकर यांची बहीण प्रभा असे आम्ही सर्व सिंहगडावर मुक्कामासाठी म्हणुन गेलो. सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात आम्हा सर्वांची मुक्कामाची सोय करण्यात आली होती. आम्ही गेल्यानंतर साधारण दोन्/तीन दिवसांनी लोकमान्य टिळकांचे नातु मा. जयंतराव टिळक आणि त्यांच्या पत्नी सौ, इंदुताई टिळक हे सुद्धा आम्हाला सामिल झाले. आमचे सिंहगडावरच्या वास्तव्याचे दहा दिवस अतिशय मजेत गेले.

तेव्हापासुन सुरु झालेली आप्पांबरोबरची दुर्गभ्रमंती

१९६१ साली मी आप्पा व प्रा, पद्मा नित्सुरे रायगडावर मुक्कामासाठी गेलो होतो. रायगड किल्ला बघता बघता आप्पांकडुन त्याबद्दल माहितीही होत होती. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात रायगडावरील प्रसिद्ध जागेचा, टकमक टोकाचा उल्लेख झाला. शिवाजीमहाराजांच्या राज्यात गंभीर गुन्ह्यासाठी सुनावल्या गेलेल्या कडेलोटाच्या शिक्षेची अंमलबजावणी या जागेवरुन व्हायची. त्यामुळे हि जागा नक्कीच खूप खोल असली पाहिजे हे लक्षात येत होत, पण ती जागा नक्की किती खोल आहे हे पहाण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसु देत नव्हती. शेवटी मी आप्पांना सांगितल की मला टकमक टोक किती खोल आहे ते बघायच आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला उपड (पालथ/पोटावर) झोपायला सांगितल आणि माझे पाय घट्ट धरुन ठेवले. मी हळुहळु पालीसारखा सरपटत गेलो आणि जोपर्यंत माझ्या मनाच समाधान झाल नाही तोपर्यंत आप्पा माझे पाय धरुन बसले होते.

मनात घर करुन राहीलेली, कधीही विसरता न येणारी आप्पांची एक आठवण

मी तळेगावच्या शाळेत असताना देवीची लस देण्यासाठी स्थानिक आरोग्यविभागातील कर्मचारी आले होते. त्यावेळी मला लस देताना त्यांच्याकडुन ती चुकीच्या ठिकाणी दिली गेली आणि त्याचा मला अतिशय त्रास झाला. मला होणारा त्रास बघुन आप्पा आणि त्यांच्या पत्नी सौ, निराकाकु हे दोघेही आळीपाळीने माझ्या जखमा फुलवातीने शेकत बसले. जवळपास तीन रात्र हे उभयता माझ्यावर घरगुती उपचार करत माझी शुश्रुषा करत होते. या घटेनेने खरतर मी भावनिक दृष्ट्या त्या उभयतांच्या जवळ गेलो.

१९५९ साली जेव्हा त्यांनी मला तळेगावला येण्याबद्दल विचारल तेव्हा खरतर माझ्या वडिलांची इच्छा नव्हती मला तळेगावला पाठवण्याची. पण आईने पुढाकार घेउन मला त्यांच्याबरोबर जाउ दिल. आता विचार करताना अस वाटत की त्यावेळी आईने पुढाकार घेउन तळेगावला येउ दिल नसत तर आप्पांबरोबर गड किल्ले पहाण्याच्या सुंदर आणि सुखद अनुभवाला मुकलो असतो. त्यांना गडकिल्ल्यांबद्दल असलेली माहीती, ते जतन व्हावे याविषयी असलेली आस्था हे सर्व त्यांच्या तोंडुन ऐकण हा एक वेगळाच अनुभव होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages