घर,माझे.

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 02:35

घर,माझे.

[१]
मऊ फरशी, गुळगुळीत शहाबादी,
वासे भक्कम, जोत जुनी सागवानी.
ठेंगणे, स्नेहल वृन्दावन तुळशीचे,
महिरपीस मांडव जाई जूईंचे.
खुलती सोनचाफे पुढल्या दारी,
परसदारी पारिजात कण्हेरी.
लख्ख सारवल्या नितळ आंगणी,
सुबक रांगोळ्या छान मिरवती.
लपंडाव, फुगड्या, म्हणतो शिवाजी,
भोंडले, परवचे,अन शुभं करोती.
सणावारी उल्हास ओसंडे उत्साही,
किणकिणती कांकणे, भरल्या हाती.
लगबगती पैठण्या, लफ्फे खानदानी,
झळाळती तबके, निरांजने,अत्तरदाणी.
गजबज केवढी आल्या-गेल्यांची,
अगत्य ऊठबस पै पाव्हण्यांची.
मांडल्या पंगती, सुवास दरवळे,
गर्जत उठती श्लोक वामनाचे,
साश्रू नयने देती निरोप लेकींना,
भरा ग ओट्या, माहेरवाशिणी आल्या.
बाळंतिणी विडे तेरा गुणी, मंद धुपारे,
बारशी मुंजी, वाजवा रे सनई- चौघडे.
[२]
हवी उच्च विद्या,हवी उच्च राहणी,
मिसळलो लोंढ्यात, गाठण्या पर्वणी.
घेऊन बाड-बिस्तरा, केली मुलुखगिरी,
भेंडोळी पदव्यांची, ग्रीन कार्डाची कल्हई.
घर नव्हे काही, राहण्याची जागा,
तुमची ओळख हीच, तुमचा पत्ता.
हिरवळ केवढी,स्विमिण्ग पूल केवढा,
मोटारींचे गोठे किती, न्हाणीघरे किती?
कुठवर आलो,काय साधले,कोण जाणे,
मोठे घर, मोठे कर्ज, मोठी प्रतिष्ठा.
[३]
गावाकडे म्हातारा चुलत-चुलत काका,
रखवाली करून घराची,एकटा थकला.
पोचती करतो, रक्कम मी, धन्य होतो,
ऋणानुबंधांचे मोल, दरमहा चुकते करतो.
थरथरती कापरी, त्याची अक्षरे,
'एकदा तरी येऊन जा रे बाबा.
लाव काही विल्हेवाट, तुझ्या घराची,
आता नको धरू माझा भरवसा.'
मुले म्हणाली, 'यंदा नको ईण्डिया,
केव्हाच ठरले, ही सुट्टी यूरोपला.'
ती म्हणाली,'बरोबर आहे मुलांचे,
तुम्हीच का नाही जाऊन येत एकदा?'
[४]
कुठे विरली रे वर्दळ सारी?
भरून ऊरली निर्जन पोकळी.
फुटले पंख तशी उडाली पाखरे,
देशी-विदेशी एकेकाचे घरटे.
पेटली पणती, क्षीण भगभगते,
रांगोळी पारोशी, उदास कुढते.
अवघडली तुळस सोडून उसासे,
चाफे निष्पर्ण, तेही हताश झडले.
बंद कुंद दालने, कुबटली जाजमे,
अंधुकल्या तसबिरी,फिक्कट आठवणी.
उडाले रंग कुठे,ओघळले पोपडे,
माजली निर्लज्ज तणे, आक्रसल्या आंगणी.
[५]
नाही, नाही, नव्हेच हे, घर माझे.

बापू करंदीकर.

http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/102157.html?1137610629

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान,,,

वास्तव दर्शन,,,,,,

डोळ्यासमोर चित्र असल्यापरी भास होती अशी शब्दरचना सर्व अप्रतिम!
आवडली कविता अगदी मनापासून धन्यवाद!