फुसके बार – २२ फेब्रुवारी २०१६ - पम्पोरमधील शहीद, जे जे मधील प्रदर्शन, पुण्यातील कॉमिककॉन

Submitted by Rajesh Kulkarni on 21 February, 2016 - 15:23

फुसके बार – २२ फेब्रुवारी २०१६ - पम्पोरमधील शहीद, जे जे मधील प्रदर्शन, पुण्यातील कॉमिककॉन
.

१) काश्मीरमधल्या पम्पोरमध्ये गेल्या जवळजवळ तीस तासांपासून अतिरेक्यांशी चालू असलेल्या चकमकीत उधमपूरच्या कॅप्टन तुषार महाजन या जवानाचा मृत्यु झाला. त्याच्या वडलांनी सांगितले की तुषार शाळेत असल्यापासूनच दहशतवादासंबंधीच्या बातम्या ऐकल्यावर मोठा झाल्यावर मी या दहशतवाद्यांना मारेन असे म्हणत असे.

हरयानातल्या जिंद या गावचा २३ वर्षीय कॅप्टन पवन कुमार हा त्याच्या आईवडलांचा एकुलता एक मुलगा. योगायोगाने त्याचा जन्मही आर्मी दिवसाचा. दोन आठवडे आजारी असल्यामुळे त्याला आजारपणाची रजा घेण्यास सांगितले होते. पण ते नाकारून तो कामावर रूजू झाला होता. आजच्या चकमकीत तो मारला गेला.

कालच त्याच्या फेसबुकवरील अखेरच्या पोस्टमध्ये
‘किसी को रिझरव्हेशन चाहिए, किसी को आजादी भाई
हमें कुछ नाही चाहिए भाई, बस पनी रजाई’
असे लिहिले होते.

त्याचे वडील म्हणत आहेत की तो माझा एकुलता एक मुलगा असला म्हणून काय झाले, त्याच्या आयुष्याचे चीज झाले हे महत्त्वाचे आहे.

हरयाणामध्ये जाट आरक्षणावरून उफाळलेल्या आंदोलनामुळे त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी त्याचे पार्थिव त्याच्या गावी पाठवणेही अवघड झाले आहे. आता ते हेलीकॉप्टरने पाठवायचे ठरवले, तरी इतर व्यवस्था करण्यात अडचणी येत आहेत. तुमच्याच मातीतल्या या वीराला योग्य तो अखेरचा सन्मान मिळण्यामध्ये कोणतीही अडचण आणू नये असे आवाहन आर्मीने हरयानाच्या जनतेला केले आहे. त्याचा कितपत उपयोग होतो हे पहायचे.

२) छत्तीसगढमधील धमतर्री जिल्ह्यातील कोटाभर्री नावाच्या खेड्यातील १०४ वर्षाच्या महिलेने तिच्या घरी शौचालय बांधण्यासाठी तिच्याकडच्या ७-८ बक-या विकल्या. पंतप्रधान मोदींनी स्वच्छता अभियानांतर्गत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या महिलेला तिच्यासमोर झुकून अभिवादन केले.

त्यांचे म्हणणे असे की कदाचित या महिलेकडे टीव्ही, वर्तमानपत्रे वगैरे काहीही नसेल, परंतु स्वच्छतेचा संदेश तिच्यापर्यंत ज्या कुठल्या पद्धतीने पोहोचला असेल कोणास ठाऊक, पण तिने लगेच त्यावर कार्यवाही केली हे विशेष.

३) धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे या डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या पुस्तकामध्ये महाभारतातील घटनांची आताच्या संदर्भातील अनेक घटनांशी तुलना केलेली आहे. उदा. नरकासुराच्या तावडीतून सोडवलेल्या अनेक महिलांशी लग्न करण्याचे म्हणजे त्यांना आधार देण्याचे काम कृष्णाने केले. १९७१च्या बांगलादेशमुक्तीच्या युद्धादरम्यान व त्याआधी पाकिस्तानी सैन्याकडून बांगलादेशी महिलांवर अनन्वित अत्याचार केले गेले. बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्याशी लग्न करण्याचे आवाहन शेख मुजीबुर रहिमान यांनी बांगला जनतेला केले. या दोन घटनांमधील साम्य त्यांनी दाखवले आहे. एकूणच स्त्रियांची समाजातली स्थिती – तेव्हाची व आताची यावर हे भाष्य आहे. अशी अनेक उदाहरणे या पुस्तकात आहेत. उदाहरणादाखल या संदर्भातल्या दोन पानांचे फोटो दिले आहेत.

४) मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये नुकतेच त्यांचे वार्षिक प्रदर्शन संपन्न झाले.

त्या भेटीच्या दरम्यान काढलेली काही छायाचित्रे येथे देत आहे.

५) कॉमिककॉनची जत्रा पुण्यात प्रथमच भरली होती. शनिवार-रविवारी. डेक्कन कॉलेजमध्ये.

विविध कॉमिक्सशी संबंधित टीशर्ट्स, मुखवटे व इतर वस्तु यांचे विविध स्टॉल्स होतेच, मात्र खरे आकर्षण होते ते शेजारच्या मंडपामधील विविध कार्यक्रमांचे.

आयव्हान ब्रेंडन यांचा डेडपूल, वुल्वरीन अशी पात्रे निर्माण करण्यात मोठा सहभाग आहे. मी त्यांना विचारले की लहानपणी डिस्नी कार्टून्स पाहणा-या तरूणाईला मोठे झाल्यावरही सुपर हिरो – सुपर व्हिलन यांचेच आकर्षण वाटताना दिसते. तेव्हा काही खास शक्ती असलेल्या पात्रांऐवजी मानवी पात्रे असलेली कॉमिक्स लोकांच्या पसंतीस उतरतील का? तेदेखील आता अशा मानवी पात्रांवरच भर देत असल्याचे ते म्हणाले.

भरत मूर्ती हे गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी बौद्ध धर्म स्विकारलेला आहे. गौतम बुद्धाचे ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या ठिकाणांना भेट देऊन त्या आधारावर त्यांनी द व्हॅनिश्ड पाथ या कॉमिकची निर्मिती केली आहे. तमीळनाडमधील एका वर्तमानपत्राचे त्यांना यात सहकार्य मिळाले. त्यात एकूण सहा ठिकाणांची निवड केली आहे. नालंदा हे बौद्ध धर्माच्या देशातील अस्ताचे साक्षीदार असल्यामुळे नालंदातील आजच्या अवशेषांचे स्केचिंग त्यांनी सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर केले असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांना जावा बेटावरील बोरोबुदूर हे सुंदर बौद्ध तीर्थक्षेत्रही त्यात अंतर्भूत करावे असे सुचवले.

ते स्वत: स्केचिंग आर्टिस्ट आहेत. चित्रांकडे एक नजर फिरवल्यानंतर वाचकाचे लक्ष सहसा संवादांकडे जाते. त्यामुळे त्यांच्या स्केचिंगच्या कलेवर थोडा अन्याय होतो, असे त्यांना वाटते का असे त्यांना विचारले असता, कॉमिकच्या विषयानुरूप याबाबतीतला निर्णय; म्हणजे किती स्केचिंग व किती शब्द; घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात कॉमिकसाठी त्यांनी निवडलेला विषय फारच वेगळा असल्यामुळे त्याला वाचकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे मी विचारले असता त्यांच्या या उपक्रमातून त्यांना आजवर एका पैशाचाही फायदा झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. तरीही आपल्या आवडीच्या विषयावर अशा निष्ठेने काम करण्यातली त्यांची जिद्द विलक्षण वाटली.

६) जेनेटिकली मॉडिफाइड अन्नाचा धोका.

अशा धान्याचा कसलाच धोका नाही असे अमेरिकेतील मोन्सॅंटोसारख्या या क्षेत्रातील कंपन्या जरी सांगत असतात व त्यावरून आपल्याकडेही अशा अन्नधान्याच्या उत्पादनास परवानगी मिळावी याचे समर्थन करणारे दिसतात.

पुण्यातील पर्यावरणवादी सुजीत पटवर्धन यांनी असे अन्न आरोग्याला अपायकारकच असते हे सिद्ध करणारे संशोधन करणा-या एका फ्रेंच संशोधकावर विविध प्रकारचे दबाव येऊनही त्यांनी तेथील न्यायालयात याबाबतचा लढा कसा जिंकला, हे सांगणा-या एका बातमीचा संदर्भ दिला आहे. त्या बातमीची लिंक खाली दिली आहे.
http://www.sott.net/article/308623-Scientist-who-discovered-that-GMOs-ca...

 ब्रेन्डन.jpg मूर्ती_0.jpg कुरूक्षेत्रे १.jpg कुरूक्षेत्रे २.jpg9 x 13 cm. (4).jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

० ?

आज.