सांगेन तसं कर!

Submitted by मुग्धमानसी on 3 February, 2016 - 01:26

किती घोळ घालतेस?
बस ना जरा शांत!
प्रश्नांनाही वेळ दे की
थोडासा निवांत...

घाई सगळीच जगण्याची
सोड अल्गद वार्‍यावर...
जीव उडून गेल्यावरच
मन येतं थार्‍यावर!

कुठेही बस... देवघरात...
किंवा उघड्या खिडकिशी
एकलकोंड्या कोनाड्यात
वा झाडाच्या बुंध्याशी...

काहितरी असतंच तिथे
ठार भूल पाडणारं...
चक्क उघड्या डोळ्यांसाठी
सगळं जग मिटणारं!

दिव्याची केशरी थरथर किंवा
मुंग्यांची तालात धावपळ बघ
गरगरणारं पिवळं पान..
ढगांचं रांगतं हलतं जग!

तल्लिन होशील चढेल नशा
नशा... शुद्ध हरपणारी...
तुझ्यापासून तोडून तुला
तुझ्याच आतून जपणारी!

नशा हीच खरी राजा...
बाकी सारं झूठ झूठ!
अस्वस्थाला बेभानाची
क्षम्य असते सगळी लूट!

जागी होशील... होशीलच!
नशेत राहून चालतं काय?
प्रश्न, घोळ, जगणं, भान...
सगळा गोंधळ!... पायात पाय!

पुन्हा थांब, पुन्हा भेट...
मला तुझ्या सीमेपाशी
सांगेन तसं... तसंच कर
बैस थोडं... स्वत:पाशी!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

तरल....!!

पुन्हा थांब, पुन्हा भेट...
मला तुझ्या सीमेपाशी
सांगेन तसं... तसंच कर
बैस थोडं... स्वत:पाशी!>>>>> अहाहा! काय सुन्दर लिहिता तुम्ही!