हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 January, 2016 - 03:47

हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
मनाचा ऋतू याहुनीही निराळा

क्षमा कर अता त्रास देणार नाही...
म्हणाला तुझ्या आठवांचा उमाळा

असो वा नसो आज नात्यात अपुल्या
घराचे तरी नांव ठेवू 'जिव्हाळा'

उजेडातुनी खोल गर्तेत नेतो
तुझ्या अंतरंगातला डोह काळा

कधीची तुला वाटते संपली, पण...
नव्याने शिकवतेच आयुष्य शाळा

निघूद्यात....बरसू नका ऐनवेळी
अरे आसवांनो दिला शब्द पाळा

कुणाचे कुणावर खरे प्रेम कुठले
रिकाम्या मनाला हवा फ़क्त चाळा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users