प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं

Submitted by विद्या भुतकर on 28 January, 2016 - 18:54

माझ्या या पोस्टवरचे कमेन्ट वाचून सुचलेली ही कविता. http://www.maayboli.com/node/57353
कुणाला शेअर करायची असल्यास जरूर शेअर करा. फक्त माझे नाव आणि त्याच्या खाली दिलेली लिन्क टाकून करा. धन्यवाद.

प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं,
कणाकणात रुजलेलं, लहानपणी खेळलेलं,
आपल्यासोबत वाढलेलं
तर कधी स्वत:च्या हाताने वाढवलेलं.

कधी असतं बोरं चिंचानी लगडलेलं,
मित्रांसोबत चोरून तोडताना माळ्यानं पकडलेलं.
कैरीच्या रुपात कुणाची चाहूल देणारं,
कधी पानांनी नवीन घराचं तोरण बांधलेलं.

कधी असतं शाळेतलं पिंपळाचं,
मानगुटीवर भुतासारखं भीती बनून राहिलेलं.
तर कधी वडाचं, पारंब्याना लटकलेलं,
खाली पडून हात गळ्यात बांधून घेतलेलं.

असतं कधीतरी ते
माणसाच्या रूपातही, आईबाबा सारखं,
उन वारा स्वत:च्या अंगावर घेऊन
नेहमीच सावली देऊ पहाणारं.

असतं कधी भाऊ बहिणीचं
आपल्याला आतून बाहेरून ओळखणारं.
तर कधी मित्र-मैत्रिणीचं, कितीही वर्षांनी भेटलं
तरी जुन्या आठवणींनी हसवणारं.

असतं कधी आपलंच बीज ते,
पोटात वाढणारं, नंतर घरभर नाचणारं.
हाताचा पाळणा आणि
रात्रीचा दिवस करून वाढवलेलं,
गेल्यानंतरही आपल्या आठवणी काढणारं.

प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं,
दुखात आधार देणारं,सुखात आठवण येणारं.
कधी असतं ते तुझ्या-माझ्यासारखं
एकमेकांना धरून सोबत वाढणारं.

-विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users