सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

नाव - अरुणाचलम् मुरुगनंतम्. वय - ५२ वर्षं. राहणार - पप्पनैकेनपुदुर, कोईमतूर, तमीळनाडू.
‘जगातल्या शंभर सर्वांत प्रभावशाली व्यक्तींपैकी एक’ असा 'टाईम मॅगझिन'नं ज्यांचा गौरव केला, त्या अरुणाचलम् मुरुगनंतम् यांची बाहेरच्या जगात ओळख आहे ती ‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष’ अशी. अनेक वर्षं हालअपेष्टा सोसून, कष्ट उपसून मुरुगनंतम् यांनी सॅनिटरी नॅपकिन तयार करण्यासाठी यंत्राची निर्मिती केली. हे नॅपकिन बाजारात मिळणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेल्या नॅपकिनांपेक्षा एक-दशांश किमतीत तयार होतात. मुरुगनंतम् यांच्या यंत्रामुळे आज भारतातल्या तेवीस राज्यांमधल्या आणि तेरा देशांमधल्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया पाळीसाठी स्वच्छ नॅपकिन्स वापरू शकल्या आहेत, स्वत: ती तयार करून, विकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकल्या आहेत. अरुणाचलम् मुरुगनंतम् यांच्या कामाची थक्क करणारी ही खरी कथा.

muruga4.jpg

***

१९९८ सालच्या उन्हाळ्यातली गोष्ट. दुपारी जेवायला मुरुगनंतम् घरी आले. लग्न होऊन जेमतेम महिना झाला होता. घरात या दोघांशिवाय मुरुगनंतम्‌ची म्हातारी आई. कोणाच्या तरी शेतावर मजूर म्हणून काम करणारी. जेमतेम दोन खोल्यांचं कच्चं घर. त्यामुळे दुपारच्या वेळी आई घरी नसतानाच काय तो एकांत त्या दोघांना मिळे. त्या दिवशी दुपारी घरात पाऊल टाकल्यावर चुलीजवळ जेवण करणारी त्यांची बायको त्यांना दिसली नाही. मुरुगनंतम् ज्या घरात राहायचे, त्याच्या मागच्या बाजूला नारळाच्या झावळ्यांचं न्हाणीघर होतं. तीन बाजूंनी तट्ट्याच्या भिंती, समोरून पोतेर्‍याचा पडदा. वर मोकळं. त्यांना बायको न्हाणीघराजवळ मातीत काहीतरी पुरताना दिसली. मुरुगनंतम् चक्रावले. चोराचिलटांपासून लपवून ठेवावं असं त्या घरात काहीच नव्हतं. ‘काय करत होतीस?’ असं सहज विचारल्यावर बायकोनं उत्तर देणं टाळलं आणि पदराखाली काहीतरी लपवलं. पुन:पुन्हा विचारल्यावर शेवटी एकदाचं तिनं चाचरत काय ते सांगितलं. तिची पाळी सुरू होती, या काळात वापरण्यासाठी तिनं काही फडकी गोळा करून, लपवून ठेवली होती आणि आता वापरल्यानंतर खराब झालेली फडकी ती मातीत पुरून ठेवत होती. ‘इतकं कळकट फडकं वापरतेस तू? फरशीसुद्धा पुसायच्या लायकीचं नाही हे’, मुरुगनंतम् तिला म्हणाले. ‘सगळ्याजणी अशीच फडकी वापरतात, दर महिन्याला चांगली कापडं वाया घालवायला कशी परवडायची?’, तिनं उत्तर दिलं. मुरुगनंतम्‌च्या धाकट्या दोन बहिणींची लग्नं झाली होती. बहिणी घरी होत्या तोपर्यंत मुरुगनंतम्‌ना न्हाणीघराजवळ अधूनमधून रक्ताचे डाग असलेली मळकी, फाटकी फडकी दिसत. एकदा कधीतरी त्यांनी त्यांच्या आईला आणि बहिणींना त्याबद्दल विचारलंही होतं. तिघींकडूनही ‘तुला काय करायच्या नसत्या चौकश्या?’ असं ऐकून घ्यावं लागलं होतं. त्या डागाळलेल्या कापडांचा संबंध घरातल्या स्त्रियांच्या शरीरधर्माशी असू शकतो, असं त्यांच्या मनातही आलं नव्हतं. रोजच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न जास्त बिकट होते.

ती घाणेरडी फडकी पाहून मुरुगनंतम् अक्षरश: थक्क झाले. पूर्वी सॅनिटरी नॅपकिन नव्हते, तेव्हा फडकी वापरणं ते समजू शकत होते. पण आता कोईमतूरमध्ये जागोजागी त्यांना सॅनिटरी नॅपकिनांच्या जाहिराती दिसत. ते वापरायला काय हरकत होती? बायकोला विचारलं, तर ती म्हणाली, बाजारातले नॅपकिन वापरले, तर आपल्याला दूध आणि साखर असे दोन्ही खर्च झेपणारे नाहीत. त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा हा संवाद झाला दुपारच्या जेवणाच्या वेळी. लग्न नुकतंच झालं होतं. मुरुगनंतम् यांनी ठरवलं, बायकोला एक मस्त भेटवस्तू देऊन खूश करायचं. भेटवस्तू काय? तर बायकोनं कधीही न वापरलेला, तिच्या दृष्टीनं अतिशय महाग असलेला आणि म्हणून अप्राप्य असा सॅनिटरी नॅपकिन. गावाजवळचं औषधांचं दुकान त्यांच्या घरापासून दोनएक मैल लांब होतं. तिथेच जाणं भाग होतं, कारण घराजवळ असलेल्या वाण्याच्या लहानशा दुकानात उत्तम सॅनिटरी नॅपकिन मिळणार नाही, असं त्यांना वाटलं.

मुरुगनंतम् पायी चालत दुकानात पोहोचले तेव्हा दिवेलागणीची वेळ होती. त्यांनी दुकानदाराला म्हटलं, ‘मला बायकोसाठी सॅनिटरी नॅपकिन विकत घ्यायचा आहे. कुठल्या कंपनीचा चांगला आहे?’ दुकानदार सटपटला, त्यांच्याकडे काही क्षण बघत राहिला. मग पटकन आत जाऊन त्यानं दोनतीन जुनकट पुडकी आणली आणि काऊंटरवर ठेवली. आत्ता या क्षणी कोणी दुकानात आलं, आणि त्यानं आपल्या हातात ही असली वस्तू पाहिली तर काय, ही भीती त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. हेही मुरुगनंतम् यांच्यासाठी कोडं होतं. रात्री नऊनंतर औषध दुकानाची पायरी चढणारे ग्राहक काँडम विकत घेण्यासाठीच आलेले असतात, असा समज गावात रूढ होता. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर कोणी औषधांच्या दुकानात जायला धजावत नसे. काँडम विकत घ्यायला जाणारेही लपूनछपून जात. पण सॅनिटरी नॅपकिन विकत देतानाही तो दुकानदार घाबरला होता, याची मुरुगनंतम्‌ना मजा वाटली.

‘तुझ्या बायकोनं तुझ्यावर करणी केलेली दिसते, लग्नाला महिना झाला नाही आणि तू तिची कामं करतोस?’, भीतीचा भर ओसरल्यावर त्यानं खवचटपणे विचारलं. गावात पुरुषानं काम करणं, हे कमीपणाचं समजलं जाई. क्वचित एखादा पुरुष नदीवर कपडे धुताना दिसलाच, तर अगदी अनोळखी स्त्रियाही ‘अण्णा, आणा ते कपडे धुऊन देते, बाईचं काम तुम्ही का करता?’ म्हणत त्याचे कपडे धुऊन देई. एक अनोळखी स्त्री आपले कपडे धुते आहे, याबद्दल काडीची लाज न वाटून घेता तो बाप्या झाडाखाली सावलीत बसून राही. आणि आता मुरुगनंतम् दुकानात सॅनिटरी नॅपकिन विकत घेत होते. तो वापरणार होती त्यांची बायको. तेसुद्धा मासिक धर्माच्या वेळच्या स्वच्छतेसाठी. मासिक पाळी, त्यावेळी होणारा रक्तस्राव यांबद्दल गावात कोणीही बोलत नसे. अर्थात हे काही मुरुगनंतम् यांच्या लहानशा गावापुरतंच मर्यादित नव्हतं. शतानुशतकं, प्रत्येक देशात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात मासिकधर्माच्या जोडीनं किळस आणि लाज या दोन भावना कायम आल्या आहेत. मासिकधर्माभोवती गुंफल्या गेलेल्या मिथकांमुळे असेल हे कदाचित. मासिक पाळी आली की बाई अपवित्र होते, तिनं देवाची उपासना किंवा स्वयंपाक करता कामा नये, तिनं तुळशीच्या रोपाजवळ जाऊ नये, तिनं लोणच्याच्या बरणीला हात लावू नये असे कितीतरी समज सर्वत्र प्रचलित आहेत. त्यामुळे या विषयाबद्दल मुलीशी मनमोकळं बोलणं, तिला स्वच्छता कशी राखायची याची कल्पना देणं, या गोष्टी अजिबात घडत नाहीत. खुद्द स्त्रियाच याबद्दल बोलायला तयार नसतात, तिथे पुरुषांना कितीसा दोष देणार?

त्यामुळे मुरुगनंतम्‌ची कृती त्या गावासाठी एक क्रांतिकारी घटना होती. समोर ठेवलेल्या पाकिटांपैकी सर्वांत जास्त रंगीत पाकिट मुरुगनंतम् यांनी निवडलं, दुकानदारानं इकडेतिकडे बघत एका वर्तमानपत्रात घाईघाईनं ते गुंडाळून त्यांच्या हातात दिलं. ते दुकानाबाहेर पडले आणि थोडं पुढे जाऊन त्यांनी ते पाकीट उघडलं. दुकानदारानं एवढं घाबरत पुडक्यात नक्की काय बांधून दिलं, हे बघण्याची उत्सुकता त्यांना होती. पाकिटात साधारण आठ इंच लांबीची, कापसाच्या बँडेजासारखी दिसणारी एक वस्तू होती. त्यांनी वजनाचा अंदाज घेतला. साधारण दहा ग्रॅमचा तो नॅपकिन होता. त्यांनी हिशेब केला. तेवढ्या कापसाची १९९८ साली किंमत होती दहा पैसे. त्यांनी तो विकत घेतला होता चार रुपयांना. म्हणजे चाळीसपट किमतीला. तेवढ्याशा कापसाची किंमत इतकी कशी, हे त्यांना कळेना. उत्पादनाचा, वितरणाचा, जाहिरातीचा खर्च जमेस धरला, तरी त्या नॅपकिनची किंमत बरीच जास्त होती. आपण यापेक्षा कमी किमतीत असाच नॅपकिन तयार करू शकू का? मुरुगनंतम् यांच्या डोक्यात विचार सुरू झाला.
मुरुगनंतम् यांचे वडील वीणकर होते. त्यांचा स्वत:चा हातमाग होता. आपल्या मुलानं शाळा शिकताशिकता इतर अनेक विषयांचं ज्ञान मिळवावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मुरुगनंतम्‌ना हातमाग चालवायला शिकवला, सुट्ट्यांमध्ये शेतावर जायला लावलं. एक हुशार विद्यार्थी म्हणून मुरुगनंतम् यांची ख्याती होती. विज्ञान आणि गणित हे त्यांचे आवडते विषय. सलग दोन वर्षं त्यांना जिल्हास्तरीय विज्ञानस्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं होतं. स्पर्धेत एका वर्षी त्यांनी कोंबडीची अंडी कृत्रिमरीत्या उबवण्यासाठी अतिशय स्वस्त असं इनक्यूबेटर तयार केलं होतं. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्या या प्रकल्पाची नोंद घेतली होती. इंजिनीयर होऊन स्वत:चं वर्कशॉप काढण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. पण अचानक त्यांच्या वडलांचं निधन झालं आणि शाळा सुटली. त्यांची आई, दोन बहिणी आणि ते दुसर्‍याच्या शेतात मजुरी करू लागले. पैसे पुरेनात तेव्हा त्यांनी कोईमतूर शहरात पेपराची लाईन धरली, भाजी विकली. पण या कामांत त्यांचं मन रमेना. त्यांना व्हायचं होतं इंजिनीयर. ते काही आता शक्य नव्हतं. गावात एक लहानसं वर्कशॉप होतं. बंगल्यांचे, इमारतींचे मोठे लाकडी आणि लोखंडी दरवाजे या वर्कशॉपमध्ये तयार होत. मुरुगनंतम् तिथे नोकरीला लागले. अंगभूत कसबामुळे लवकरच त्यांनी या कामात नैपुण्य मिळवलं. आता ते स्वतंत्रपणेही ऑर्डरी घेऊ लागले.

त्यांनी बायकोला तो सॅनिटरी नॅपकिन दिला, एवढी महागाची वस्तू आणली, म्हणून बायकोकडून रागावून घेतलं. पण आपणही असा नॅपकिन तयार करावा, हा विचार काही त्यांना स्वस्थ बसू देईना. दोनतीन दिवसांनी संध्याकाळी ते दुकानात जाऊन पांढरं कापड, कापूस घेऊन आले आणि विकत आणलेल्या नॅपकिनसारखा नॅपकिन त्यांनी तीनचार तास खपून तयार केला. मग एका चांगल्याशा कागदात गुंडाळून त्यांनी तो बायकोच्या हाती दिला. हा घरगुती नॅपकिन कितपत काम करतो, याची चाचणी करण्यासाठी उपलब्ध असलेली एकमेव स्वयंसेवक म्हणजे बायको. ‘हा मी तयार केलेला नॅपकिन आहे, वापरून सांग कसा आहे ते’, ते बायकोला म्हणाले. बायकोनं मान डोलावली. मग दुसर्‍या दिवशी त्यांनी बायकोला विचारलं, ‘वापरलास का नॅपकिन?’ तेव्हा बायकोनं ‘पाळी दर महिन्याला येते, रोज किंवा सिनेमासारखी दर शुक्रवारी येत नाही, पाळी आली की सांगेन नॅपकिन कसा आहे ते, तोपर्यंत सारखंसारखं विचारून त्रास देऊ नका’, असं त्यांना सुनावलं. आपण नॅपकिनाचं उत्पादन करायचं ठरवलं आहे खरं, पण त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, या विचारानं ते खंतावले. पण विचारणार कोणाला आणि सांगणार कोण?

यथावकाश पुढच्या महिन्यात त्यांच्या बायकोनं त्यांना त्यांनी तयार केलेला नॅपकिन अजिबात चांगला नसल्याची आणि म्हणून ती पूर्वीप्रमाणेच तिनं जमा करून ठेवलेली कापडं वापरणार असल्याची बातमी दिली. मुरुगनंतम् मग पुन्हा कामाला लागले. यावेळी त्यांनी दहाबारा नॅपकिन तयार केले आणि आपल्या बहिणींनाही ते दिले. बहिणी संकोचल्या, पण भावाला काय बोलणार? त्यांनी निमूट मान डोलावली. पुढचे सहाआठ महिने ते बायकोला, बहिणींना स्वत: तयार केलेले नॅपकिन पुरवत राहिले. त्यांचे अभिप्राय विचारत राहिले. पण त्या तिघीही ‘चांगला नाही’ या पलीकडे एक शब्दही बोलत नसत. आपल्या मासिकधर्माबद्दल नवर्‍याशी, भावाशी कसं बोलणार? मुरुगनंतमांच्या प्रश्नांना उत्तरही मिळत नसत. बायकोला, बहिणींना खोदूनखोदून विचारलं तर त्या तिथून निघून जात. प्रत्येक खोलीत देवादिकांच्या तसबिरी असत. देवांसमोर मासिक पाळीबद्दल कसं बोलणार? मग शेवटी बहिणींच्या नवर्‍यांनी मुरुगनंतम्‌ना तंबी दिली. पुन्हा आमच्या घरांत असल्या घाणेरड्या वस्तू दिल्या, भलतेसलते प्रश्न विचारले, तर तुमच्याशी संबंध तोडू, असं सांगितलं. त्यांच्या बायकोलाही नवर्‍यानं असं बहिणींना नॅपकिन देणं, त्यांना प्रश्न विचारणं पसंत नव्हतं. तिनं आपली नाराजी दोनतीनदा बोलून दाखवली होती.

आता काहीतरी वेगळा मार्ग शोधणं भाग होतं. मुरुगनंतम्‌ना एकच हक्काची बायको आणि तिलाही महिन्यातून एकदाच पाळी येणार. उत्पादन बाजारात आणायचं तर ते उत्तम दर्जाचं हवं. ते अनेक कसोट्यांवर खरं उतरायला हवं. त्यासाठी भरपूर चाचण्या घ्यायला हव्या. पण एकट्या बायकोच्या भरवश्यावर हे काम कसं जमणार? शिवाय ती ‘चांगलं नाही’ याखेरिज काही बोलतही नाही. मासिक पाळीबद्दल मोकळेपणानं कोण बोलू शकेल? डॉक्टर. मग डॉक्टरांना हे नॅपकिन वापरायला दिले तर? गावापासून चाळीस किलोमीटर अंतरावर मेडिकल कॉलेज होतं. दुसर्‍याच दिवशी ते कॉलेजच्या बाहेर असलेल्या बसथांब्यापाशी गेले. तिथे मुलींचा एक घोळका होता. त्यांच्यापाशी जाऊन त्यांनी आपलं काम सांगितलं. या मुलींनी त्यांचं बोलणं पुरतं ऐकूनही घेतलं नाही. दिवसभर थांबून मग मुरुगनंतम् यांनी कसंबसं वीस मुलींना स्वयंसेवक म्हणून तयार केलं. या मुली त्यांनी तयार केलेले नॅपकिन वापरून अभिप्राय द्यायला तयार झाल्या. पुढचे तीन महिने एका ठरावीक तारखेला मुरुगनंतम् स्वत: तयार केलेले साठ नॅपकिन घेऊन कॉलेजपाशी जायचे. त्या मुलींना ते नॅपकिन देऊन आधीच्या नॅपकिनांबद्दल विचारायचे. पण इथेही निराशाच पदरी पडली. या भावी डॉक्टरणीही ‘हो-नाही’ यांपलीकडे काही बोलायला तयार होईनात. मग त्यांनी एक प्रश्नपत्रिका तयार केली. त्यात नॅपकिन वापरण्याच्या अनुभवाबद्दल, नॅपकिनाच्या गुणवत्तेबद्दल दहाबारा प्रश्न होते. मुलींनी त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची होती. हे काम सहज जमण्यासारखं आहे, असं मुरुगनंतम्‌ना वाटलं. पहिले दोन महिने उत्तरपत्रिका मिळाल्यावर त्यानुसार त्यांनी नॅपकिन तयार करण्याची पद्धत बदलली. अगदी मुंबईहून कापूस मागवून नॅपकिन तयार केले. तिसर्‍या महिन्यात नवीन नॅपकिन द्यायला आणि उत्तरं गोळा करायला ते कॉलेजात गेले, तर एका झाडाखाली तीन मुली एकमेकींच्या वह्यांमध्ये बघत घाईघाईनं उत्तरं लिहिताना त्यांना दिसल्या. मुरुगनंतम्‌ना खूप वाईट वाटलं. इथेही प्रामाणिक उत्तरं त्यांना मिळणार नव्हती. अजिबात ऐपत नसताना ते हे नॅपकिन तयार करत होते आणि ते वापरून प्रामाणिकपणे त्यांच्याबद्दल अभिप्राय देणारं त्यांना कोणी सापडत नव्हतं. त्या दिवशी मुलींना न भेटताच ते परतले.

दुसर्‍या दिवशी त्यांनी एक लहान चेंडू विकत आणला. त्याला एक छिद्र पाडलं. त्यांचा एक मित्र खाटिक होता. त्याच्याकडे जाऊन बकरीचं रक्त घेतलं. एका रक्तपेढीत काम करणार्‍या मित्राकडून रक्तात गुठळ्या होऊ न देणारं अँटिकोअॅग्युलंट त्यांनी अगोदरच आणलं होतं. हे रसायन त्यांनी रक्तात योग्य त्या प्रमाणात मिसळलं, मग ते रक्त त्या चेंडूत भरलं, चेंडूच्या छिद्राशी एक नळी जोडली आणि तो चेंडू आपल्या दोन जांघांमध्ये व्यवस्थित राहील, असा बांधला. वरून सॅनिटरी नॅपकिन घातला. असा नॅपकिन घालणारे कदाचित ते पहिले पुरुष असावेत! आता चालताना, बसताना चेंडूवर दाब आला की नळीतून रक्त बाहेर येई. आपण तयार केलेला सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थित काम करतो की नाही, हे आता त्यांना कळणार होतं. पण अनेकांनी त्यांना ‘असा विचित्र का चालतोस?’ असं विचारून भंडावून सोडलं. काय उत्तर देणार प्रत्येकाला? त्या दिवशी ते दुपारी जेवायला घरी आले, तेव्हा जरा वैतागलेलेच होते. घरी आले, तर बायकोचे डोळे रडून लाल. घरात शिरताना त्यांनी चेंडू काढून ठेवायची दक्षता घेतली होती आणि गावातले पुरुष ती एकटी घरात असताना येऊन चहाडी करणं शक्य नव्हतं. मग ही का रडत असावी?

‘तुमचं मेडिकल कॉलेजातल्या मुलींबरोबर प्रेमप्रकरण आहे, असं सगळे गावात म्हणतात’, असं तिनं रडत सांगितल्यावर त्यांची ट्यूब पेटली. त्यांना त्या मुलींबरोबर बोलताना कोणीतरी पाहिलं होतं आणि हळूच ही प्रेमप्रकरणाची पुडी सोडली होती. ‘प्रेमप्रकरण वगैरे काही नाही, कॉलेजचे दरवाजे दुरुस्त करायचे होते, म्हणून मी तिथे जात होतो, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस’, असं समजावून सांगूनही बायकोची खात्री पटेना. नवर्‍याकडून कबुलीजबाब येत नाही बघून तिनं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं - ‘मला आत्ताच्या आत्ता माहेरी नेऊन सोडा’. मुरुगनंतम् विचारात पडले. बायकोची खात्री पटवून देणं, तिला खरं सांगणं शक्य नव्हतं. मेडिकल कॉलेजातल्या मुलींना आपण नॅपकिन देतो, त्यांना प्रश्न विचारतो, हे बायकोपासून त्यांनी लपवून ठेवलं होतं. त्या मुलींच्या घरीही हे माहीत नव्हतं. आपलं संशोधन करायला मुरुगनंतम् यांनी न्हाणीघरापलीकडे एक लहानशी खोली बांधून घेतली होती. ते बाहेर असले की या खोलीला कुलूप असायचं. ‘मला दरवाजे तयार करण्यासाठी एक मोठं कंत्राट मिळालं आहे, त्यासाठी मी काम करतोय, मी त्या खोलीत असताना तुम्ही तिथे यायचं नाही’, असं त्यांनी आईला, बायकोला बजावलं होतं. बायकोला भलताच संशय आल्यावर तिला खरं काय ते सांगितलं असतं, तर ती अजूनच भडकली असती. अनोळखी स्त्रियांच्या मासिकधर्माबद्दल नवरा त्यांच्याशी बोलतो, हे कळल्यावर तिनं त्यांना घटस्फोट द्यायला कमी केलं नसतं.

तशी घटस्फोटाची नोटिस त्यांना बायको माहेरी गेल्यावर महिनाभरात मिळाली. तिला अर्थातच मुरुगनंतमांच्या प्रयोगांबद्दल अजूनही काही माहीत नव्हतं. पण आपल्या नवर्‍यानं ‘बाहेरख्याली’पणा थांबवावा, म्हणून वापरलेलं हे दबावतंत्र आहे, आपल्या बायकोचं आपल्यावर निरतिशय प्रेम आहे, तिला घटस्फोट वगैरे काही नको आहे, याची मुरुगनंतम्‌ना खात्री होती. त्यांनी शांतपणे ते कागद बाजूला ठेवले. बायको नक्की घरी परतणार होती, पण ती येईपर्यंतच्या वेळात त्यांना शक्य तितके जास्त प्रयोग करायचे होते, निरीक्षणं नोंदवायची होती. बायको घरात नसल्याच्या संधीचा पूर्ण फायदा घ्यायचा होता. ती नसल्यानं लपवाछपवीचे कष्ट थोडे वाचणार होते. आई घरात असल्यानं जेवणाची काळजी नव्हती आणि आपला मुलगा त्याच्या कामाच्या खोलीत असताना तिथे जायचं नाही, हे तिला ठाऊक होतं.

दुसर्‍या दिवशीपासून ते दुप्पट जोमानं कामाला लागले. चेंडू दिवसभर बांधून ठेवायचं त्यांनी ठरवलं. रोज बदलता यावेत, म्हणून भरपूर नॅपकिन तयार करून ठेवले. हे नॅपकिन वेगवेगळ्या दर्जाच्या कापसापासून, कापडापासून तयार केले होती. त्यांची जाडीही वेगवेगळी होती. मात्र चेंडू अशा अवघड जागी बांधून वावरणं अजिबात सोपं नव्हतं. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासूनच त्यांना त्रास व्हायला लागला. नाजूक जागी धक्का लागला की बराच वेळ पोट दुखत राही. पायात गोळे येत. पाचव्या दिवशी त्यांना ताप आला. वेदना सहन न झाल्यानं शरीरानं दिलेला तो इशारा होता. नाईलाजानं ते एका डॉक्टरकडे गेले. त्यांना खरा प्रकार काय तो सांगितला. सगळं ऐकून डॉक्टर थक्कच झाले आणि मग बराच वेळ हसत बसले. त्यांच्याकडून औषध घेऊन मुरुगनंतम् खालमानेनं बाहेर पडले. हे डॉक्टर आपल्याला चाचण्या घेण्यासाठी मदत करतील, स्वयंसेवक मिळवून देतील अशी अंधुकशी आशा त्यांना वाटत होती. पण ‘असले उपद्व्याप करू नकोस’ असं खिदळत सांगण्यापलीकडे त्या डॉक्टरानं काहीच केलं नाही, याचं त्यांना वाईट वाटलं. मुरुगनंतम् प्रामाणिकपणे संशोधन करत होते. लोकांची साथ मिळत नसल्यानं आता निराशा दाटू लागली होती. त्या डॉक्टरनं बजावूनही मुरुगनंतम् चेंडू वापरायचं थांबले नाहीत. जवळजवळ महिनाभर ते चेंडू आणि सॅनिटरी नॅपकिन बांधलेल्या अवस्थेत दिवसभर राहिले. शेवटी शरीर अगदीच साथ देईना, तेव्हा त्यांनी हा प्रयोग थांबवला.

हाती फारसं काही लागत नाही म्हटल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रयोगाचा आढावा घेतला. बाजारात मिळणारे नॅपकिन कापसापासून तयार केले आहेत, हे त्यांना नक्की ठाऊक होतं. पण बाजारात मिळतो तो, किंवा हातामागावर काम करणार्‍या विणकरांकडे असतो तो हा कापूस नाही, हे आता त्यांना कळलं होतं. विकतच्या नॅपकिनांमधला कापूस आणि ते वापरत असलेला कापूस नक्की वेगळा होता. हा कापूस कुठला, हे कळलं तर काम सोपं होईल. पण हे सांगणार कोण? सॅनिटरी नॅपकिनांचा संपूर्ण उद्योग एकदोन मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती एकवटला होता. ‘तुम्ही नॅपकिन कसे तयार करता हो?’ असं विचारल्यावर उत्तर येणं अशक्य होतं. ते कशाला कोणाला आपलं ट्रेड सिक्रेट सांगतील? म्हणजे प्रयोगांना पर्याय नव्हता. त्यांनी मग दोन वेगवेगळ्या ब्रॅण्डांचे नॅपकिन विकत आणले आणि त्यांतला कापूस चेन्नई आणि हैद्राबाद इथल्या दोन प्रयोगशाळांकडे रासायनिक पृथक्करणासाठी पाठवला. हे खर्चिक काम होतं, पण इलाज नव्हता. या प्रयोगशाळांकडून उत्तर यायलाही वेळ लागणार होता.

दरम्यानच्या काळात प्रयोग थांबून चालणार नव्हतं. ते पुन्हा मेडिकल कॉलेजात गेले. आता कॉलेजात मुलींची नवी बॅच आली होती. या मुलींना गाठून त्यांनी त्यांना आपली सगळी कहाणी ऐकवली. प्रयोगात सहभागी होण्याची विनंती केली. वीस मुली तयार झाल्या. या सगळ्या मुली कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहणार्‍या होत्या. यावेळी मात्र मुरुगनंतम् निरीक्षणांसाठी इतरांवर अवलंबून राहणार नव्हते. त्यांना आपण नक्की कुठे चुकतो हे स्वत: बघायचं होतं. त्यांनी साठ नॅपकिन स्वत: तयार केले आणि तितकेच विकत आणले. प्रत्येक मुलीला तीन स्वत:चे आणि तीन विकतचे असे नॅपकिन दिले. सोबत प्लॅस्टिकच्या तीन पिशव्या होत्या. त्या मुलींनी हे दोन्ही प्रकारचे नॅपकिन वापरून ते कचर्‍यात न फेकता त्या काळ्या पिशव्यांमध्ये जमा करायचे होते. प्रत्येक नॅपकिनावर वेगवेगळ्या रंगांत वेगवेगळ्या खुणा केल्या होत्या. कुठला नॅपकिन कुठल्या मुलीनं वापरला हे या रंगीत खुणांमुळे मुरुगनंतम्‌ना कळणार होतं. वापरलेले नॅपकिन गोळा करून निरीक्षणं नोंदवणं, हे कठीण काम होतं. भयानक दुर्गंधी, इन्फेक्शन होण्याची भीती हे लक्षात घेऊनही मुरुगनंतम् यांच्या दृष्टीनं हा प्रयोग अत्यावश्यक होता.

पुढचे दोन महिने दर आठवड्याला कॉलेजात जाऊन मुरुगनंतम् त्या काळ्या पिशव्या गोळा करत राहिले. मुलींना संकोच वाटायला नको, म्हणून कॉलेजच्या दाराजवळच्या पोस्टाच्या पेटीमागे होस्टेलमधल्या मुली रात्री आपापली पिशवी ठेवून जात. भल्या पहाटे मुरुगनंतम् त्या घरी घेऊन येत. आपल्या नॅपकिनमधला कापूस योग्य प्रकारे द्रव शोषून घेत नाही, हे पहिल्या महिन्यात मुरुगनंतमांच्या लक्षात आलं. बायकोनं ‘तुमचा नॅपकिन चांगला नाही’ हे त्यांना सांगितलं होतं, पण आता त्यांच्यासमोर पुरावाच होता. स्वत: विकतचा नॅपकिन बांधूनही त्यांना अशी निरीक्षणं नोंदवता आली नव्हती. निरीक्षणांच्या बाबतीत तरी हा प्रयोग यशस्वी होत होता. दुसर्‍या महिन्यात मात्र पुन्हा एक संकट उभं राहिलं. मागच्या खोलीत नाकावर रुमाल बांधून वापरलेले नॅपकिन तपासताना मागे त्यांची आई येऊन उभी राहिली. आपला मुलगा रविवारच्या जेवणासाठी कोंबडं कापतोय, असं त्यांना वाटलं होतं. बराच वेळ झाला तरी तो घरात येत नाही पाहून त्या मागच्या दारी आल्या आणि समोरच दृश्य बघून हबकल्या. काहीही न बोलता त्यांनी आपली दोन पातळं एका पिशवीत भरली आणि त्या घरातून चालत्या झाल्या.

काही गावकर्‍यांनी मुरुगनंतम्‌ना नदीवर रक्ताळलेले कपडे धुताना पाहिलं होतं. मेडिकल कॉलेजातल्या मुलींबरोबरच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होतीच. आता त्यांच्या आईनं घर सोडल्यावर ‘मुरुगा ड्रॅक्युला आहे, तो बायकांचं रक्त पितो’ अशी वदंता गावात पसरली. ड्रॅक्युलाला घालवून देण्यासाठी दुसर्‍या दिवशी कोईमतूरमधून मांत्रिक आणायचं पंचायतीनं ठरवलं. झाडाला उलटं टांगून घेऊन मार खाण्याची मुरुगनंतमांची मुळीच इच्छा नव्हती. शिवाय महत्त्वाचं होतं संशोधन. ते थांबून कसं चालेल? त्यांनी रातोरात पैसे, काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन पळ काढला. कोईमतूर गाठलं.

बारा बाय बाराच्या एका लहानशा खोलीत इतर पाचजणांबरोबर ते राहू लागले. विद्यापीठात शिकवणार्‍या एका इंग्रजीच्या प्राध्यापकाकडे त्यांनी घरगडी म्हणून नोकरी धरली. एका वर्कशॉपमध्ये रात्री कामाला जाऊ लागले. प्रयोगशाळांकडून अजून उत्तर आलं नव्हतं. त्यांनी गावाहून बरोबर आणलेल्या काही वस्तू विकल्या आणि त्या पैशातून काही वितरकांना फोन केले, प्राध्यापकांच्या मदतीनं इंग्रजीत पत्रं लिहिली. बहुराष्ट्रीय कंपन्या नॅपकिन बनवतात, म्हणजे त्यांना कच्चा माल पुरवणारे वितरक असणारच. हे वितरक त्यांनी शोधले आणि त्यांच्याशी संपर्क साधला. ‘मी कोईमतूरमधला बडा उद्योजक आहे आणि मला माझा कारखाना सुरू करायचा आहे. तरी मला कच्च्या मालाचे नमुने पाठवा’ अशा अर्थाची ती पत्रं होती. महिन्याभरात दोनतीन वितरकांकडून त्यांच्या पत्त्यावर मोठाली खोकी आली. त्यांत ठिसूळ लाकडी ठोकळे होते. अडीच वर्षांपासून त्रास देत असलेलं एक मोठं कोडं सुटलं होतं. कापसाचा मुख्य घटक सेल्यूलोज. सॅनिटरी नॅपकिनांमधला कापूस हा एका विशिष्ट झाडाच्या सालीतल्या सेल्यूलोजपासून बनवला होता. म्हणूनच त्याचे गुणधर्म वेगळे होते. आता सेल्यूलोज हाती आल्यानं त्यांना हवा तसा कापूस मिळवणं कठीण नव्हतं. पण अजून एक समस्या होती. हा कापूस बनवण्यासाठी, कापसावर प्रक्रिया करून नॅपकिन तयार करण्यासाठी जे यंत्र उपलब्ध होतं, त्याची किंमत होती साडेतीन कोटी रुपये. इतकी रक्कम उभी करणं मुरुगनंतम्‌ना अशक्य होतं.

सॅनिटरी नॅपकिन बनवणं तर कुठल्याही परिस्थितीत आवश्यक होतं. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची बायको होती, बहिणी होत्या, मेडिकल कॉलेजातल्या मुली होत्या आणि चोरटं वाटून घेणारा तो दुकानदार होता. गावातल्या स्त्रियांनी नॅपकिन वापरणं हा मुख्य उद्देश होता. पण मशिन इतकं महाग असेल तर कसं जमायचं? मग आपणच एखादं स्वस्तातलं मशिन तयार केलं तर? हे मशिन गावातल्या स्त्रिया स्वत: वापरू शकतील, स्वत:साठी नॅपकिन बनवू शकतील. मग सुरू झाली नवं यंत्र बनवण्याची धडपड. साडेचार वर्षांच्या मेहनतीनंतर मुरुगनंतम् स्वत:चं यंत्र बनवण्यात यशस्वी झाले. यंत्र बनवण्याचा खर्च होता रुपये साठ हजार फक्त. राईट बंधूंच्या विमानासारखं दिसणारं हे यंत्र चार टप्प्यांमध्ये काम करतं. सर्वप्रथम स्वयंपाकघरत वापरतो तसा एक ग्राइंडर टणक सेल्यूलोजचं चोथा करतं. या चोथ्याच्या आयताकृती घड्या दुसर्‍या टप्प्यात केल्या जातात. तिसर्‍या टप्प्यात या घड्या एका पातळ कापडात गुंडाळल्या जातात. चौथ्या टप्प्यात अल्ट्राव्हायोलेट किरणांनी या नॅपकिनांचं निर्जंतुकीकरण केलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया एक तास चालते.

वापरायला अतिशय सोपं असं तंत्रज्ञान विकसित करणं, हे मुरुगनंतम् यांचं ध्येय होतं. खेड्यापाड्यांत राहणार्‍या स्त्रियांनी हे यंत्र सहकारी तत्त्वावर विकत घ्यावं आणि सॅनिटरी नॅपकिन तयार करून विकावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आईसारख्या, बहिणींसारख्या दिवसभर शेतात राबणार्‍या असंख्य स्त्रिया होत्या. या स्त्रियांना शाश्वत रोजगार मिळणं, त्यांचं आरोग्य जपणं हे महत्त्वाचं होतं. म्हणूनच त्यांनी तयार केलेल्या यंत्राची रचना सुटसुटीत होती. लाकडापासून तयार केलेल्या त्या यंत्रात धातूंचा कमीत कमी वापर होता.

मुरुगनंतम् यांचं पहिलं यंत्र चेन्नईच्या आयआयटीत पोहोचलं ते मुरुगनंतम् ज्यांच्याकडे नोकरी करत होता, त्या प्राध्यापकांमुळे. हे यंत्र बघून आयआयटीतले प्राध्यापक आणि विद्यार्थी थक्क झाले. शाळा अर्धवट सोडलेला, इंग्रजीचा एकही शब्द न येणारा इतकं अफलातून यंत्र तयार करू शकतो, हे त्यांच्यासाठी नवलाचं होतं. तिथल्या प्राध्यापकांनी यंत्राच्या कसून चाचण्या घेतल्या, मुरुगनंतम्‌नंच हे यंत्र तयार केलं आहे, याची खात्री पटावी म्हणून दिवसच्या दिवस त्यांना प्रश्न विचारले. मुरुगनंतम् आणि त्यांचं यंत्र या कसोट्यांवर खरे उतरले. मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांना हे यंत्र टक्कर देऊ शकेल, याची जाणीव त्यांना झाली. अहमदाबादला ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’तर्फे नावीन्यपूर्ण कल्पनांची, यंत्रांची स्पर्धा भरणार होती. आयआयटी मद्रासनं मुरुगनंतम् यांचं यंत्र त्यांच्या नकळत स्पर्धेसाठी पाठवलं. एकूण नऊशे त्रेचाळीस प्रवेशिकांमधून या यंत्राला पहिलं पारितोषिक मिळालं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अरुणाचलम् मुरुगनंतम् यांनी ते स्वीकारलं.

muruga1.jpg

दुसर्या दिवशी देशभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा फोटो होता. पंतप्रधानांनी खास पत्र लिहून त्यांचं कौतुक केलं. त्यांच्या यंत्राची चौकशी करण्याकरता आयआयटीत अनेक फोन आले. पण मुरुगनंतम् यांच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाचा फोन होता तो त्यांच्या बायकोचा, शांतीचा. सात वर्षांत पहिल्यांदाच तिनं नवर्‍याशी संपर्क साधला होता. दुसर्‍या दिवशी ती परत आपल्या घरी आली. त्यांची आईही परत आली. गावकर्‍यांनी सत्कार केला. बैलगाडीतून मिरवणूक काढली.

पण मुरुगनंतम् यांचं काम अजून संपलं नव्हतं. हे यंत्र भारतभरात उपलब्ध होणं महत्त्वाचं होतं. त्यांनी भारत सरकारशी संपर्क साधला. उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या भेटी महत्प्रयासानं मिळवून त्यांना या यंत्राचं महत्त्व समजावून सांगितलं. पण अधिकार्‍यांच्या लेखी मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन हे चर्चेचे विषय नव्हते. गावातल्या स्त्रिया इतकी वर्षं काय ती काळजी घेत होत्या, तशी पुढेही घेतील, पुरुषांनी त्यात लक्ष घालण्याचं कारण नाही, असं त्यांचं म्हणणं पडलं. मुरुगनंतम् मग ‘निदान एक सर्वेक्षण करा, किती स्त्रिया नॅपकिन वापरतात हे तरी कळेल’ म्हणून त्यांच्या मागे लागले. ही मागणीही धुडकावली गेली. मुरुगनंतम् वास्तव जाणून होते. गावात मातीनं-तेलानं माखलेली फडकी, गवत, पालापाचोळा, राख मासिक पाळीच्या दिवसांत वापरणार्‍या स्त्रिया होत्या. पाळी आली म्हणून शाळा सोडणार्‍या मुली त्यांनी पाहिल्या होत्या. पाळीच्या वेळी स्वच्छता न राखल्यानं झालेले आजार त्यांनी पाहिले होते.
मुरुगनंतम् मग भारतभर फिरले. बिहार, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमधल्या खेड्यांमध्ये जाऊन त्यांनी बचतगटांतल्या महिलांच्या भेटी घेतल्या. त्यांना यंत्राबद्दल समजवून सांगितलं. या यंत्राचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला. बहुतेक स्त्रियांना ते पटलंही. पहिलं यंत्र बिहारमधल्या मधुबनी जिल्ह्यात विकलं गेलं. दुसरं गेलं नक्षलग्रस्त दांतेवाडा भागात. मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे त्यांचा हुरूप वाढला आणि ‘जयाश्री इंडस्ट्रीज’ या उद्योगाची त्यांनी स्थापना केली. पुढच्या दीड वर्षांत त्यांनी अडीचशे यंत्रं विकली. या यंत्रांच्या अनेक नकला पुढे बाजारात आल्या. मुरुगनंतम् यांना कोणीही त्याचं श्रेय दिलं नाही.

muruga 1 (1).JPG

मुरुगनंतम् यांनी ज्या सर्वेक्षणाचा आग्रह धरला होता, ते सर्वेक्षण २०११ साली निएल्सेन या कंपनीनं हाती घेतलं. २०१२ साली युनेस्कोनं जगभरात मासिकधर्म आणि सॅनिटरी नॅपकिन यांच्या वापराबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून सर्वेक्षण केलं. या दोन्ही सर्वेक्षणांचे निकाल गंभीर होते. ऋतुप्राप्ती झालेल्या शहात्तर टक्के मुलींना मासिक पाळी येईपर्यंत त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. दरवर्षी पन्नास लाख मुली मासिक पाळी आल्यानंतर शाळेत जाणं सोडतात. भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या फक्त सुमारे साडेअकरा टक्के स्त्रिया या सॅनिटरी नॅपकिनांचा नियमित वापर करतात. या सर्वेक्षणानंतर भारत सरकारनं ग्रामीण भागातल्या स्त्रियांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याचा निर्णय घेतला. सरकारनं या कामात आपल्याला सहभागी करून घेतलं नाही, याचं मुरुगनंतम् यांना विलक्षण दु:ख झालं, पण त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं.

मुरुगनंतम् यांच्याकडून बहुतकरून स्वयंसेवी संस्था आणि महिलांचे बचतगट यंत्र विकत घेतात. एका यंत्रामुळे दहा स्त्रियांना रोजगार मिळतो. एका दिवसात साधारण तीनशे नॅपकिन या यंत्रावर तयार करता येतात. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुरुगनंतम् यांच्या यंत्राचा वापर करून तीन वेगवेगळ्या आकाराचे, जाडीचे नॅपकिन तयार करता येतात. प्रत्येक नॅपकिन जास्तीत जास्त दोन रुपयांना विकला जातो. आजवर मुरुगनंतम् यांनी तयार केलेली पाच हजारांहून अधिक यंत्रं विकली गेली आहेत. या यंत्रांवर तयार होणारे आठशे सदुसष्ट ब्रॅण्ड आज उपलब्ध आहेत. डेफ्री, सही, नारीसुरक्षा, सुखचैन, लाडली, मदरकेअर, नाईस, बी कूल, आशा, रिलॅक्स, सखी अशी नावं त्यांना दिली गेली आहेत. मुरुगनंतम् यांनी पाच राज्यांमधल्या हजारभर शाळांशी संपर्क साधून त्यांना सॅनिटरी नॅपकिनांच्या नियमित पुरवठ्याची सोय केली आहे. बांगलादेश, सौदी अरेबिया, केनिया, युगांडा, श्रीलंका अशा तेवीस देशांमध्ये ही यंत्रं आता पोहोचली आहेत. देशोदेशांमध्ये आपली यंत्रं पोहोचावीत अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. परदेशात आणि भारतातही अनेक स्वयंसेवी संस्था आता या यंत्रावर तयार झालेल्या नॅपकिनांचा प्रचार आणि प्रसार करतात. मुरुगनंतम् यांची बायको, शांती आता ऋतुप्राप्तीच्या वेळी होणार्या धार्मिक समारंभांमध्ये भेट म्हणून हे नॅपकिनच देते.

पाळीच्या काळात भिंतींवरून उडी मारणारी, बास्केटबॉल खेळणारी मुलगी, ऑफिसात धावत जाणारी गृहिणी हे ग्रामीण भागातलं वास्तव नाही. पण मुरुगनंतम् यांच्या प्रयत्नांमुळे आज निदान काही स्त्रिया आणि मुली आरोग्यपूर्ण आयुष्य जगत आहेत. अनेक कष्ट सोसले, अनेकांचा रोष ओढवून घेतला तरी ध्येयापासून विचलित न होण्याची प्रेरणा त्यांना कुठून आली असेल? शिक्षण पूर्ण झालेलं नसताना प्रॉक्टर अॅन्ड गॅम्बलसारख्या मोठ्या कंपनीच्या अधिकार्‍यांना ‘मी तुमची मोनोपॉली मोडून काढेन आणि स्वस्तात खेड्यांमधल्या बायकांना नॅपकिन उपलब्ध करून देईन’ हे ऐकवण्याचा आत्मविश्वास कुठून आला असेल?

आजही मुरुगनंतम् त्याच खेड्यात राहतात. घर मात्र दोन मजली आहे. यंत्र वाहून नेण्यासाठी एक जीप घेतली आहे. बाकी कष्ट तेच आणि ध्यासही तोच. अवघड जागी चेंडू बांधून ठेवल्यामुळे प्रकृतीवर मात्र आता परिणाम झाला आहे. पण त्यांच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं नाही. मिळालेली अनेक बक्षिसंही बिनमहत्त्वाची. बायको आणि आई घरी परतल्यामुळे ते आता आनंदात आहेत. कधीतरी बिहारमध्ये गेल्यावर कुठल्यातरी गावात कोणी म्हातार्‍या आजी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या यंत्रानं त्यांना कसं जगवलं हे सांगतात. कधी उत्तराखंडातून फोन करून कोणी आई त्यांच्या यंत्रामुळं ती आपल्या मुलीचं शिक्षण करू शकली, हे सांगते. दारुड्या नवर्‍याच्या त्रासापासून - या यंत्रांमुळे मिळणार्या उत्पन्नानं - सुटका करून घेता आली, असं सांगणारी अनेक पत्रं येतात. मुरुगनंतम्‌ना मग आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. ‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा जगातला एकमेव पुरुष’ ही ओळख मग ते अधिकच अभिमानानं मिरवतात.

11709659_913074152064229_8827266228882538301_n.jpg

11200792_915172865187691_8546958869475106787_n.jpg

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' - दिवाळी २०१४

हा लेख मायबोली.कॉमवर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख यांचे मनःपूर्वक आभार.

***

लेखातली सर्व छायाचित्रे श्री. अरुणाचलम् मुरुगनंतम् यांच्या खाजगी संग्रहातून.

***
प्रकार: 

आत्ता मगाशी एबीपी माझावर बातम्यादरम्यान दिवाळी अंक प्रकाशकांची/ लेखकांची(?) मुलाखत चालली होती, त्यात माहेर अंकाबद्दल ज्या बाई बोलत होत्या त्यांनी चिन्मय दामलेचे नाव घेऊन उदाहरण असे दिले की आमच्या मासिकात प्रसिद्ध होणारे लेख अशा दर्जाचे / विषयांना स्पर्श करणारे असतात कि ते लेख पुनर्मुद्रित होतात व तसे होणे आम्हाला बरे वाटते. त्याकरता वरील लेखाचे उदाहरण त्यांनि दिले. ते देताना चिन्मय दामले याचा नामोल्लेख केला. मजा वाटली ऐकताना. Happy लिंबीला म्हणलेही मी की हा जो म्हणताहेत तो आमचा मायबोलीवाला चिनुक्स बर्का... Happy
त्यांनी अजुन असेही सांगितले की लेख प्रसिद्ध झल्यावर चिनुक्स व मुरुंगनंतम यांना वाचकांचे कंटाळा येइस्तोवर काही हजारांच्या संख्येत प्रतिक्रियांचे फोन आले...

मला एक प्रश्न पडला की माहेर अंकात प्रसिद्ध झालेला वरील लेख चिनुक्स ने लिहिलाय का? Happy

मला एक प्रश्न पडला की माहेर अंकात प्रसिद्ध झालेला वरील लेख चिनुक्स ने लिहिलाय का? << असा प्रश्न का पडला?

>>>> तसे लेखाच्या शेवटी लिहिले आहे कि. <<<<
अरे नाही ना.. तसे नाही लिहीले... नुस्ते पुनर्मुद्रित करण्याच्या परवानगी बाबत आहे..... मला वाटले की दुसर्‍या कुणी लिहीलेला चांगला वाटला म्हणुन इथे दिलाय चिनुक्सने.

दुसर्‍या कुणाचा लेख त्या व्यक्तीचे नाव न घालता इथे छापणे हे चिन्मय करू शकेल असे वाटणार्‍यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! Proud

ए गप्पे नीरजे, काड्या पेटवुन दिवे लावतेस का?
असे लेख टीमने लिहीलेलेही असू शकतात.
>>>> पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' - दिवाळी २०१४
हा (माझा) लेख मायबोली.कॉमवर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख यांचे मनःपूर्वक आभार.
लेखातली सर्व छायाचित्रे श्री. अरुणाचलम् मुरुगनंतम् यांच्या खाजगी संग्रहातून. <<<<<<
चिनुक्सलाही वरील वाक्यात "माझा" (ठळक करुन दाखविलय तिथे) हा शब्द लिहायला काय झाले होते?
मी ढ माणूस, मी काही तुमच्या सारखा तल्लख/हुषार/चाणाक्ष नाही हो... .... तेव्हा शंका आली टीव्हीवरची बातमी पाहुन म्हणून विचारुन घेतले...

http://www.maayboli.com/node/51162 इथे माहेर चे मुखपृष्ठ आहे. तो लेख चिन्मय दामले यांचाच आहे.
@लिंबू त्या टीव्हीवर बोलणार्‍या बाई म्हणजे सुजाता देशमुख संपादिका.

अतिशय सूंदर लेख ! मुरूगनंतम यांच्या जिद्दिला सलाम . +१११११११११
कमाल आहे या माणसाच्या जिद्दीची! हॅट्स ऑफ! + १११११११११

हो प्रकाशजी, ते नंतर कळले. त्यांनीच चिन्मयचे नाव दोनतिनदा घेतले तेव्हा शंका आली की हा लेख चिन्मयनेच लिहिला असावा. पण लेखात सु:स्पष्टपणे तसा उल्लेख नाही म्हणून विचारुन घेतले.

माहेरमध्ये पूर्वप्रसिद्ध लेख, संपादकांच्या परवानगीने टाकला असला तरी मूळ लेखकाचा नामोल्लेखही करण्याची तसदी न घेतल्याबद्दल श्री. चिन्मय दामले यांचा त्रिवार निषेध! निषेध!! निषेध!!!

वरदा लिंक करता अनेकानेक धन्यवाद!

कुठे कोईमतूर... कुठे इंग्लंड... कुठे बडोदा... कुठे झातारी

मानव कल्याणाच्या ध्यासामुळे आणि विश्वबंधुत्वाच्या नात्याने सगळ्या सीमा पुसट झाल्या.

Great news ! He truly deserves it !

Congratulations to Mr. Muruganantham. We ( women) are so thankful to you.

श्री.मुरूगनंतम् ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांची ओळख करून दिल्याबद्दल चिनुक्स ह्यांचे आभार.

फारच छान बातमी. श्री.मुरूगनंतम् ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांची ओळख करून दिल्याबद्दल चिनुक्स ह्यांचे आभार

Pages