एक आगळे वेगळे ट्रेनिंग ( Retirement and Investment Planning )

Submitted by मनीमोहोर on 21 January, 2016 - 06:36

प्रत्येक संस्था, कार्यालय आपल्या मनुष्य बळ विकासासाठी अनेक प्रकारचे ट्रेनिंग, मीटींग्ज, सेमिनार इ. सारखे कार्यक्रम हाती घेत असते. यामुळे त्या संस्थेचा फायदाच होत असतो. पण निवृत्त होणार्‍या स्टाफला आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने कसे घालविता येईल याचे ट्रेनिंग देणार्‍या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या संस्था मला माहित आहेत त्या पैकी आमचं ऑफिस एक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे . नुकतीच मी Retirement and Investment Planning ह्या ट्रेनिंगला जाऊन आले आणि त्याने मी अक्षरशः प्रभावित झाले आहे. चांगली विषय निवड , कुशल , विषयात पारंगत व्याख्याते यामूळे ह्याचा फायदा आम्हाला कायम स्वरुपी होणार आहे. त्यापैकीच काही गोष्टी मी इथे शेअर करत आहे.

१) निरोगी शरीर आणि मन ही आपली पहिली संपत्ती आहे. कोणत्याही गोष्टीचा आनंद घेण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी असणे आवश्यक आहे . वाढलेल्या जीवनमानामुळे प्रत्येकाला रिटायरमेंट नंतर सरासरी १५ ते २० वर्ष आयुष्य मिळते, ते जास्तीत जास्त आनंदात घालविता यायला हवे. ह्या वयात काही ना काही आरोग्याच्या समस्या असतातच त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. योग्य आहार विहार आणि नियमित वैद्यकीय सल्ला याच्या सहाय्याने आपले आरोग्य संभाळा. उदा. झोप येण्यासाठी गोळी लागत असेल तर ती डॉक्टरी सल्याने जरुर घ्या. झोप न येण्याचे दुष्परिणाम गोळीच्या दुष्परिणामांपेक्षा नक्कीच अधिक आहेत. योगासनांचा फायदा निर्विवाद आहे. मोठ्या आजारपणासाठी मेडिक्लेम सारखी पॉलिसी जरुर घ्यावी आणि निश्चिंत रहावे.

२) आपली निवृतीनंतरची पुंजी गुंतविण्याचे अनेक पर्याय आज बाजारात उपल्ब्ध आहेत पण मुद्दला सकट सगळेच जाण्याचा धोका पत्करायचे हे वय नाही. म्हणून सेफ इन्वेस्ट्मेंट करावी. नॅशनलाईज्ड बँका, पोस्ट ऑफिस सर्वात उत्तम . क्रेडिट सोसायट्या, को ऑप बँका यात जास्त व्याजाच्या मोहाने पैसे गुंतवि़णे टाळणेच इष्ट. आजपर्यंत तुम्ही तुमच्या कुटंबासाठी , मुलांसाठी आर्थिक, शारिरीक दॄष्ट्या खूप काही केले आहे. आता वेळ आहे ती स्वतः करता आणि आपल्या जोडीदारासाठी काही करण्याची. तुम्ही पै पै करुन, जीव मारुन साठविलेल्या पैशाची तुमच्या मुलांना खरचं किती गरज आहे याचा विचार करा आणि तशी गरज नसेल तर कौटुंबिक जबाबदारीमुळे आजवर राहुन गेलेल्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यावर तुमचा पैसा खर्च करा. पर्यटन, जोडीदाराला भेट वस्तु, नाटक, सिनेमा किंवा आपला काही छंद यावर खर्च करण्यास कचरु नका. पत्नीला हिर्‍याची कुडी भेट द्यायचीय बिन्धास द्या... हीच वेळ आहे, कारण हिर्‍याला कुठे माहित आहे तुमच्या पत्नीच वय काय आहे ते ( स्मित)

३) आपण आयुष्यभर मिळवेलेल्या संपत्तीचे, जमीन जुमल्याचे ( असल्यास) वाटप आपल्या पश्चात आपल्याच इच्छेनुसार व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते त्यासाठी इच्छापत्र जरुर लिहुन ठेवावे. एका इच्छापत्रामुळे पुढची सगळी गुंतागुंत टळु शकते. इच्छापत्र तयार करणे अतिशय सोपे आहे एका प्लेन कागदावर तुम्ही स्वहस्ताक्षरात ते लिहु शकता. त्यावर दोन साक्षीदारांच्या तुमच्या सहीच्या खरेपणासाठी असलेल्या स्वा़क्षर्‍या पुरेश्या आहेत. साक्षीदाराला तुम्ही काय लिहीले आहे ते दाखविणे गरजेचे नाही. तसेच इच्छापत्राचे पंजीकरण ही बंधनकारक नाही. विना रजिस्ट्रेशन इच्छापत्र ही तेवढेच लीगल असते

४) नोकरीत असताना आपण अक्षरशः घड्याळ्याच्या काट्याशी बांधलेले असतो आपल्यासाठी सर्वात मौल्यवान वस्तु असते ती म्हणजे वेळ . पण आता तीच मौल्यवान वस्तु तुमच्याकडे अतिशय मुबलक प्रमाणात असणार आहे. एक मात्र पक्क ध्यानात ठेवा ऑफिस मध्ये बोलाविल्याशिवाय एकदा ही जाऊ नका. तुम्ही नोकरी असताना ही तुम्ही तिथे किती हवे असता तर आता हवे असाल ( स्मित) मिळालेल्या मोकळ्या वेळातुन आनंद निर्माण करायचा प्रयत्न करावयास हवा. वाचन, सत्संग, परमेश्वराची उपासना, एखादी लहानपणापासुन अंगात असलेली कला , सोशल सर्वीस ही त्यापैकीच काही उदाहरणे. एखाद्या फेसबुक सारख्या सोशल साईट वरुन जुने मित्रे मैत्रीणी ही परत एकत्र येऊन आनंद मिळवु शकतात.

५) ह्या स्टेजला मुले मोठी झालेली असतात. त्यांच्या आयुष्यात कमीत कमी ढवळाढवळ करण्याचे धोरण अंगीकारावे. चांगले शिक्षण, उत्तम नीतीमूल्ये मी पालक ह्या नात्याने त्यांना दिली आहेत आता त्यांचे निर्णय त्यानाच घेऊ देत असा विचार करावा. हे म्हणजे त्यांच्यावरचे आपले प्रेम , आपुलकी कमी झाली आहे असे नाही पण रोजच्या जीवनात ढवळाढवळ नको. शक्यतो होता होईल तोवर दूर दूर राहिले तर हे सोपे जाईल . कोणत्याही आनंदाच्या किंवा अडचणीच्या वेळी एकत्र येता येईलच. आपले रहाते घर मात्र आपल्या हयातीत आपल्या मुलांच्या नावावर कदापि करु नका. तो तुमचा विसावा आहे. ह्या गोष्टीवर फार भर दिला गेला. वक्त्यांनी खर्‍या घडलेल्या केसेस सांगुन हे आम्हाला पटवुन दिले.

६) नवनवीन तंत्रज्ञानाशी कायम मैत्री करा. तरुणांची फॅडं म्हणून त्याच्याशी फट्कारुन वागु नका. तसे केलेत तर जगच तुम्हाला फटकारेल. तुम्हीच एकटे पडाल.

७) आयुष्याच्या शेवटी वृद्धाश्रमात जाऊन रहावे लागले तरी ही त्याबद्ल खंत बाळगु नका , त्याचे दु;ख करुन मुलांना दुषणे देऊ नका. कारण बदलत्या परिस्थीतीनुसार वृद्धाश्रम ही काळाची गरज होणार आहे . तिथे ही आनंदातच रहायचा प्रयत्न करा.

८) तुमचे वय हे शेवट तुमच्या मनावर अवलंबुन असते. तुम्हाला वाटेल तेच तुमचे वय.

तर असे हे काही सल्ले / सुचना रिटायरमेंट ट्रेनिंग मध्ये मिळालेले . बघु या प्रत्यक्षात काय होते ! घोडा मैदान जवळच आहे....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. आणि मस्त ट्रेनिंग कल्पना.. सर्वच मुद्दे पटले.

६ नंबर दोन वेळा पडलाय..

त्यातील,
६) नवनवीन तंत्रज्ञानाशी कायम मैत्री करा. तरुणांची फॅडं म्हणून त्याच्याशी फट्करुन वागु नका तसे केलेत तर जग च तुम्हाला फटकारेल. तुम्ही एकटे पडाल.
>>>>
हा मुद्दा अगदी पर्रफेक्ट.

सध्याच्या वृद्ध पिढीनेही स्मार्टफोनचा आनंद घ्यायला सुरुवात केली पाहिजे. फेसबूक सारख्या सोशलसाईटवर खरे तर तरुणांची संख्या जास्त दिसण्यापेक्षा वृद्ध जास्त दिसायला हवेत. आयुष्य मस्त एंजॉय करा आणि शेअर करा Happy

छान आहे. नेत्रदान, अवयवदान हेही मुद्दे यायला हवे होते.
जिथे जिथे नॉमिनेशन शक्य आहे तिथे तिथे ते करावे.
आपली सर्व कागदपत्रे एका फाईलमधे व्यवस्थित जमा करुन ठेवावीत, जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर ती इतरांना विनासायास सापडतील.

ममो वेलकम

छान आहे. नेत्रदान, अवयवदान हेही मुद्दे यायला हवे होते. >> कदाचित लेखातील मुद्दे आपले निवृत्तीनंतरचे जीवन फुलवणे आणि सुरक्षित करणेबाबत असल्याने हे त्यात नसावे पण खरे तर यासाठी निवृत्त होण्याचीही वाट बघायला नको .. शक्य असेल त्यांनी आताच करा, माझ्या डोक्यातून हे निसटले होते, मला रिमाईंडर दिल्याबद्दल धन्यवाद.

छान लेख .सगळे मुद्दे छान.
दिनेशदांच्या अवयवदान मुद्द्याबद्दल अगदी सहमत. ज्यांना शक्य असेल त्यांनी नेत्रदान व इतर अवयवदान करण्याचा विचार नक्की करावा.

मस्त! सगळे मुद्दे पटले व आवडले ....
तर असे हे काही सल्ले / सुचना रिटायरमेंट ट्रेनिंग मध्ये मिळालेले . बघु या प्रत्यक्षात काय होते ! घोडा मैदान जवळच आहे . नोकरी करत नसले तरीही ... मैदान जवळ आहे ....+१

धन्यवाद सर्वांना .

दिनेश खरय, अवयव दान हा ही महत्वाचा विषय आहे.

नॉमिनेशन वर खूप सांगितले. नॉमिनेशन हे जास्त करुन बँकेच्या फायद्या साठी आहे. बँक नॉमिनीला किती ही रक्काम पे करु शकते. तो जरी कायदेशीर वारस नसला तरी. मग नॉमिनी कडून रक्कम वसुल करणे ही त्या वारसाची जबाबदारी ठरते. बँकेचा रोल नॉमिनीला पैसे दिले की संपतो. म्हणून विल ( इच्छापत्र ) जास्त महत्वाचे आहे.

आपण आत्ता पर्यंत आपल्या मुलांना खूप काही दिले आहे आता वेळ आहे ती सामाजिक संस्थाना दान देऊन आपले सामाजिक ऋण फेडण्याची हा मुद्दा चर्चिला गेला होता.

तुम्ही पै पै करुन, जीव मारुन साठविलेल्या पैशाची तुमच्या मुलांना खरचं किती गरज आहे याचा विचार करा आणि तशी गरज नसेल तर कौटुंबिक जबाबदारीमुळे आजवर राहुन गेलेल्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यावर तुमचा पैसा खर्च करा. पर्यटन, जोडीदाराला भेट वस्तु, नाटक, सिनेमा किंवा आपला काही छंद यावर खर्च करण्यास कचरु नका. >>> अगदी अगदी.
पण या सोबत , देव न करो , आजारपण आले , तर त्यासाठीही तरतूद करून ठेवा.

चांगला लेख. पण सध्या रेलेव्हंस नसल्याने 'सो ओब्व्यूअसं' म्हणून नाकाचा शेडा उडवून पुढे. वेळ आल्यावर वाचू. Happy
या विभागाला उत्तररंग का म्हणतात? पश्चिमरंग का नाही?

या विभागाला उत्तररंग का म्हणतात? पश्चिमरंग का नाही?
<<

पूर्वायुष्यात उधळलेल्या रंगांची उत्तरं या वयात मिळतात/द्यावी लागतात, म्हणून उत्तररंग.

सध्या तुम्ही पश्चिमेत आयुष्याचे पूर्वरंग उधळून ऐश करा. Wink

-*-*-*-

लेख आवडला. नपेक्षा त्या वक्त्याचे बोलणे आवडले म्हणतो.

नॉर्मली रिटायरमेंट प्लॅनिंगवर लेक्चर देणारे लोक कुणा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे एजंट असतात, अन सग्ळा भर, आत्ताची लाईफस्टाईल ३० वर्षांनंतर मेंटेन करायची, तर चला, दर रोज हजार रुपये आमच्या म्युच्वल फंडात भरायला सुरुवात करा, हा बेसिक संदेश वेगवेगळ्या आवरणांत गुंडाळून आपल्या गळी मारण्यावर असतो.

लेख आवडला. नपेक्षा त्या वक्त्याचे बोलणे आवडले म्हणतो.

नॉर्मली रिटायरमेंट प्लॅनिंगवर लेक्चर देणारे लोक कुणा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे एजंट असतात, अन सग्ळा भर, आत्ताची लाईफस्टाईल ३० वर्षांनंतर मेंटेन करायची, तर चला, दर रोज हजार रुपये आमच्या म्युच्वल फंडात भरायला सुरुवात करा, हा बेसिक संदेश वेगवेगळ्या आवरणांत गुंडाळून आपल्या गळी मारण्यावर असतो. >> +१

अतिशय सुंदर लेख
मी सेवा निवृत्त होवून ८ वर्षे झाली. त्या वेळी आम्हाला सुध्दा कंपनी कडून काही समुपदेशन आयोजित केले होते. त्या तील काहीचा आणि काही स्वत:चे प्रयोग करून आता मी खालील काही अनुभव लिहित आहे.
आरोग्य
य़ा कडे कंपल्शन म्हणून न पाहता आम्ही दोघे ही आठव्ड्यातून २०० मिनिटे चालतो व ७५ मिनिटे लवचिकपणाचे साधे व्यायाम करतो. या मुळे रोज प्रसन्न राहता येते व तणाव येत नाही. घाम आल्यावर थकल्याची जी अनुभूती असते ती केवळ अवर्णनीय.

कंप्युटरः
आमच्या दोन्ही मुली विदेशी स्थायिक आहेत. आम्ही दोघेही काही वर्षांपूर्वी कंप्युटर लिटरेट झालो.. विशेषत: हिने मुलीकेडे विदेशी गेली असतांना कंप्युटर शिकला व आता स्वत: त्यावर अनेक कामे करते ( बॅंकिंग, तिकिट बुकिंग) .त्या बरोबरच मुलींशी नातवंडांशी चॅट , स्काईप, फेस बुक इ. कडे आम्ही व्यसन न बनू देता भावनिक जवळकी चे उत्तम साधन समजतो. या व्यतिरिक्त अनेक प्रकारची माहिती मिळ्वतो वाचतो.

छंद:
दोघेही ३ फिल्म क्लबचे मेंबर आहोत ( ते मोफत आहेत व उत्तम चर्चा होते- स्क्रीनिंग नंतर). मला संगीताची आवड होती. इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही त्याचे व्यासंगात परिवर्तन केले आहे. जवळ जवळ ४००० तासांचे जगातील उत्तमोत्तम संगीत आम्ही डाऊन लोड केले आहे . त्यात भारतीय शास्त्रिय व्होकल पाश्चात्य शास्त्रिय , फोक इ. आहे. या गोष्टी आम्हाला आमच्या नोकरीच्या काळात करता आल्या नाहीत कारण एवढ्या उपलब्ध नव्हत्या आणि आम्हाला प्रिय असूनही परवडत नव्हत्या. तंत्रज्ञानाने त्या सुकर झाल्या आहेत.
या बरोबरच मला भाषेवर प्रेम आणि काही अंशी प्रभुत्व असल्याने मी भाषांतराची कामे घेतो व त्या तून काही मिळकत होते तसेच ज्ञान वाढते.

गुंतवणूक:
मी बहुतेक गुंतवणूक आश्वस्त परतावा आहे त्यातच केली आहे ….. म्हणजेच एफ डी …. कारण मला म्युच्युअल फंडात वगैरे कळत नाही. एकच चूक म्हणजे काही गुंतवणूक सहकारी बॅंकेत आहे.

आम्ही दोघेही , विशेषत: ही तरुण मुला मुलींबरोबर त्यांच्या नाच गाणी इ. कार्यक्रमात भाग घेवून व्यतित करते. मी इंजिनीयरिंग व व्यवस्थापन कॉलेजात शिकवतो. हे स्किल आपल्यात आहे हे निवृत्तीच्या आसपास माझ्या लक्षात आले व त्या नुसार कॉलेजात संपर्क साधला. या मुळे तरुणाईत खूप वेळ जातो. मजा येते. मनाने आम्ही अजूनही ४० शीत आहोत असे आम्हाला वाटते कारण आम्ही कोणत्याही काळातील गाणी ऐकू शकतो आणि त्यांचा आस्वाद घेवू शकतो

वर्षात आवर्जून २ सहली ( एक आपल्या देशात व दुसरी देशा बाहेर )करतो.
माझे व हीचे बहुतेक मित्र मैत्रिणी आम्हाला फे बु व्र मिळाले पण आता संभाषण प्रत्यक्ष अथवा फोनवर होते. आम्ही आमचे सर्व जुने फोटो फे बु वर अपलोड केले आहेत त्या मुळे सर्वांना खूप आनंद मिळाला.

आम्ही खूप समाधानात आहोत. जीवनाकडून मुलाबाळांकडून कोणतीही अपेक्षा नाही . त्यांच्याशी उत्तम जुळते.
अर्थात या तील बरेचसे आर्थिक स्थैर्या मुळे आहे याची जाणिव आहे.
यात प्रौढी मिरवण्याचा मुळीच हेतु नाही पण असे आनंदात राहता आले आहे हे मात्र खरे.

लेख आवडला.माझ्या हापिसात वरिष्टासांठी रीटायर्ड होताना खरंच असे एखादे सेमिनार घ्यायला हवे.लोक स्वतःचा पीएफ, सोसायटी आदी चे पैसे केवळ सोने आनि जमीन मधे गुंतवणुक करणे पुरेसे नाही हे कळणे फार गरेजेचे आहे त्यांना.
मुद्दा नंबर ६ अगदीच पटला.
रेव्यु तुमची पोस्ट आवडली. Happy

रेव्यु , फारच मस्त .

माझ्या ओळखीतले एक काका-काकु आहेत .
४-५ वर्श झाली दोघाना रिटायर्ड होउन . दोघाना पेन्शन मिळते त्यामुळे आर्थिक स्थैर्य बर्यापैकी आहे.
सध्या मुलगा-सुनेबरोबर रहातात . पण स्वतःचे एक वेगळे घर जवळच घेउन ठेवले आहे.

आता वर्शातून एक - दोन सहली . एक सून-मुला सोबत . एक फक्त दोघच - दूसर्या ग्रूप बरोबर . त्याचे नातेवाईक फार आहेत . त्यान्च्या बरोबर वेळ घालवणे , कौटुम्बिक सोहळे आखणे , त्याची तयारी करणे वगैरे .
अधून मधून मित्र-मैत्रिणी सोबत बाहेर जाणं , निदान एखाद लंच प्लॅन करण , कधी सिनेमे बघणे - अगदी मस्त चालु आहे.
काकूना चित्रकलेची आवड आहे. आता अगदी क्लास वगैरे लावून पोट्रेट्स , निसर्गचित्र वगैरे शिकतायेत.
काकाना सन्गिताची आवड आहे .

पण निवृत्त होणार्‍या स्टाफला आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने कसे घालविता येईल याचे ट्रेनिंग देणार्‍या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या संस्था मला माहित आहेत त्या पैकी आमचं ऑफिस एक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे .>>>>> माझ्या ऑफिसमध्येही असं ट्रेनिंग असतं. बहुतेक रिटायरमेंटला जास्तीत जास्त एक वर्षं राहिलं असताना देतात.

आधी वाटलं आपल्याला अजून बरीच वर्षं आहेत तर इतक्यात कश्याला वाचायचं. पण तरी वाचलं कारण त्यामुळे काही प्लानींग इतक्या आधीपासूनच करता येईल का बघायचं होतं. रिटायरमेंटनंतरच नाही, तर आधीपासूनच बेभरवशी गुंतवणुकी टाळायला हव्यात.

अजून एक, आताची पैश्यांची किंमत आणि रिटायरमेंटनंतर पैश्यांची किंमत असेल त्या अंदाजाने आपल्याला महिन्याला खर्चाला किती पैसे हातात यायला हवेत त्याप्रमाणे आताच गुंतवणूक करुन ठेवायला हवी. मुद्दलाला शक्यतो हात लावायला लागता कामा नये. मुद्दल अगदीच अडचणीला तोडावे.

आर्थिक स्वावलंबनाबरोबरच उत्तम आरोग्यालाही मी तेवढेच महत्व देईल. ऑफिसातील काही मैत्रिणींचे गुढघे ४५ वयातच बदलायला झाले आहेत. त्या धसक्याने एकंदरच संपुर्ण आरोग्याची काळजी आतापासूनच घ्यायला हवी हे पटलंय.

मस्त माहिती....

पण इन्व्हेस्टमेंट ( सगळ्याच प्रकारचे इन्क्लुडींग आर्थिक) ट्रेनिंग हे पदवी दरम्यान , नोकरीच्या सुरवातीच्या काळात दिले तर बर्‍याच लोकांना त्याचा फायदा होउ शकेल. Happy

धन्यवाद सर्वांना .

अमितव खरच आहे, कराच आत्ता दुर्लक्ष याकडे. निराळी स्वप्न बघायचे दिवस आहेत तुमचे.

दीमा हे आमच ट्रेनिंग अजिबातच मार्केटिंगच्या दृष्टिकोनातुन अ‍ॅरेंज केलं नसल्याने तुम्ही लिहीलेले सल्ले तिथे दिले गेले नाहीत. सगळेच व्याख्याते खूप चांगले होते.रिटायरमेंट नंतर आवडीची कोणतीही गोष्ट करा हे सांगायला आलेले गॄहस्थ ८१ वर्षाचे रिटयर्ड आय पी एस अधिकारी होते. संस्कृतची आणि शिकवण्याची आवड म्हणून त्यांनी रिटयरमेंट नंतर या विषयात पी एच डी केली आहे आणि अ़जून ही ते विद्यापीठात शिकवण्याचे काम करत आहेत

रेव्हु, सुंदर पोस्ट. खूप आवडली. पण आता जेव्हा मॅच्युअर होतील तेव्हा को ऑप बेंकेच्या एफ डी रिन्यु करु नयेत हा प्रेमाचा सल्ल्ला. ( स्मित)

मस्त लेख ममो ,अगदी वेगळा पण खूप महत्वाचा.अयुर्मान वाढते आहे ,नियोजन व मार्गदशन गरजेचे आहे.सर्व मुद्दे विचारप्रवर्तक आहेत खूप खूप धन्स.

नॉर्मली रिटायरमेंट प्लॅनिंगवर लेक्चर देणारे लोक कुणा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे एजंट असतात, अन सग्ळा भर, आत्ताची लाईफस्टाईल ३० वर्षांनंतर मेंटेन करायची, तर चला, दर रोज हजार रुपये आमच्या म्युच्वल फंडात भरायला सुरुवात करा, हा बेसिक संदेश वेगवेगळ्या आवरणांत गुंडाळून आपल्या गळी मारण्यावर असतो. >> दीमा, तुमचा सल्ला म्हणजे मला हे अभिप्रेत होत आणि माझ्या प्रतिसादातुन तुम्ही वरच्या प्रतिसादात लिहीलेलं काही प्रतिबिंबीत होतय असं मला मुळीच वाटत नाहीये . तरी ही अजूनही काही कम्युनिकेशन गॅप राहिली असेल तर ती माझ्यामुळेच कारण आपल्या एवढे माझे भाषेवर प्रभुत्व नाही. ही माझी शेवटची पोस्ट ह्यावरची.

Pages