“नायक”आणि देवदत्त पटनायक

Submitted by अतुल ठाकुर on 17 January, 2016 - 07:25

patt1a.jpg

मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाचा “आख्यान” सोहळा काल संपन्न झाला. विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.संजय देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण भाषणानंतर परिसंवाद, नृत्य, चर्चा असा कार्यक्रम होता. “हिरोज जर्नी” ही थिम असलेला आख्यान कार्यक्रम रंगत गेला. सुरुवातीच्या चर्चासत्रात भाग्यश्री वर्मा यांनी बुद्ध अ‍ॅज हिरो, तर शिल्पा छेडा यांनी महावीर अ‍ॅज हिरो या बद्दल आपली मते मांडली. त्यानंतरच्या चर्चासत्रात अमरचित्रकथेच्या राजेश अय्यर यांनी “स्टोरी टेलिंग” अद्दल आपली भुमिका स्पष्ट केली तर डॉ. राधाकृष्ण पिल्लई यांनी चाणक्य या त्यांच्या हिरोबरोबरचा त्यांचा प्रवास कसा घडला हे प्रेक्षकांसमोर मांडले. भोजनानंतरच्या सत्रात महेश संपत आणि डॉ. देवदत्त पटनायक यांची चर्चा रंगली आणि देवदत्त पटनायक यांनी विचारांना अतिशय चालना देणारे जे मुद्दे मांडले त्यापैकी काही मुद्द्यांचा परामर्श या लेखात घ्यायचा आहे. तत्पुर्वी अशा तर्‍हेचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवणार्‍या आमच्या संस्कृत विभागप्रमु़ख डॉ. माधवी नरसाळे यांच्याबद्दल संस्कृतचा एक विद्यार्थी म्हणुन कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. अशा तर्‍हेचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडतात.

आपले म्हणणे मांडताना सुरुवातीलाच “हिरो” ची कल्पना भारतीय पुराणांमध्ये किंवा रामायण महाभारतात नाही असे सांगुन त्यामागचे कारण देखिल पटनायकांनी सांगीतले. त्यांचे म्हणणे असे होते कि आपल्याकडे अनंताची, पुनर्जन्माची कल्पना आहे. आपल्याकडे सान्ताचा विचार नाही तर अनन्ताचा विचार आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञान सान्ताचा विचार करते. त्यामुळे त्यांच्या हिरो समोर एक ठाशीव असे ध्येय असते, काहीतरी गाठायचे असते आणि ते साधल्यानंतर ती कथा संपते. आपल्याकडील राम आणि कृष्ण या व्यक्तीरेखांचा अशा तर्‍हेने विचार करता येत नाही. कारण ते अवतार आहेत. भूत, भविष्य त्यांना ठावुक आहे. पृथ्वीवरील त्यांचा अवतार ही त्यांची लीला आहे. ते कोण आहेत हे त्यांना नीट माहित आहे. लीला विशद करताना पटनायक यांनी चपखलपणे आईचे उदाहरण दिले. आई ज्याप्रमाणे मुलाला खेळवताना स्वतः मुल होऊन जाते, त्याचप्रमाणे भगवंत देखिल मनुष्य जन्म घेतल्यावर साधारण मनुष्याप्रमाणेच सुखदु:ख भोगतो. ही तो करीत असलेली लीला आहे. त्यामुळे भारतीय “हिरो” हे खर्‍या अर्थाने पाश्चात्य “हिरो” च्या कल्पनेत बसु शकत नाहीत.

पटनायकांचा दुसरा मुद्दा हा तांत्रिक होता. त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य पुराणांच्या “एपिस्टेमॉलॉजी” बद्दल चर्चा केली. त्यांचे म्हणणे असे होते कि प्रत्येक संस्कृतीची स्वतःची अशी एक एपिस्टेमॉलॉजी असते. आणि त्या फ्रेममधुनच त्यांच्या नायकांकडे पाहावे लागते. दुसर्‍या फ्रेममधुन त्यांच्याकडे पाहण्यात काहीही अर्थ नसतो. त्यामुळे गोंधळ वाढतो. त्यांचा तिसरा मुद्दा नायकाच्या परिपूर्णतेबद्दलचा होता. पटनायकांना परिपूर्णता महत्त्वाची वाटली नाही. नायक हा अनन्त जाणणारा असला तरी तो परिपूर्ण असतोच असे मानण्याचे काही कारण नाही असे त्यांचे मत पडले. देवदत्त पटनायकांनी चर्चेच्या ओघात बरेच महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या सर्वांचा परामर्ष येथे घेता येणार नाही. मात्र या तीन मुद्द्यांची चर्चा करावीशी वाटते. बाकी नोंदवण्याजोगे वाटणारे निरिक्षण म्हणजे पटनायक हे महाभारतापेक्षा रामायणाला झुकते माप देणारे आहेत हे जाणवले. त्यांचे विवेचन हे भरताच्या नाट्याशास्त्राच्या वर्तुळातुन असल्याने भाव आणि रस निर्मितीवर त्यांचा जास्त भर दिसला आणि तदानुषंगाने त्यांना रामायण हे महाभारतापेक्षा उजवे वाटले असावे.

वरील तीन मुद्द्यांपैकी अवताराची लीला आणि त्याची परिपूर्णता हा मुद्दा मला एकाचवेळी घ्यावासा वाटतो. पटनायकांचे याबाबतचे विवेचन पटणे कठिण आहे. याचे महत्त्वाचे कारण आपल्या परंपरेत अनन्ताचा अनुभव असलेला पुरुष आणि अपरिपूर्णता या दोन बाबी एका ठिकाणी नांदु शकत नाहीत. पटनायकांनी मोक्ष हा शब्द वापरला नाही, मात्र अनन्ताचा अनुभव आलेली, भूत, भविष्य जाणणारी अवतारी व्यक्ती ही एकतर परमेश्वराचा अवतार असेल किंवा मोक्ष मिळवुन जगाच्या कल्याणासाठी कर्म करणारी संतपदाला पोहोचलेली व्यक्ती असेल. आपल्याकडे अशातर्‍हेच्या व्यक्तींकरवी प्रत्यक्ष परमेश्वरच कार्य करवुन घेत असतो अशी कल्पना आहे. त्यामुळे देवदत्त पटनायक म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या “इंपरफेक्शन” किंवा “अपरिपूर्णता” असु शकते हे मानणे अतिशय अवघड वाटते. हे झाले अवतारी पुरुषांबाबत. आपल्याकडे सर्वसाधारण साधक जेव्हा मोक्षाच्या वाटेवर जातो तेव्हा त्याच्या सर्व कृती या ईश्वरेच्छेला सुसंगत घडु लागतात अशी देखिल एक कल्पना आहे. भक्तीयोगात तर भक्त संपुर्णपणे भगवंतावर भार टाकुन चालतो आणि त्याचा “योगक्षेम” भगवंत वाहतो असे म्हटले आहे. असे असताना परमेश्वराच्या भक्ताची कर्म देखिल जेथे सुसंगत असतात असे मानले जाते तेथे प्रत्यक्ष अवतारी पुरुषांमध्ये काहीतरी “अपुरेपणा” असतो हे मान्य करणे कठिण आहे.

रामाने केलेला सीतेचा त्याग, किंवा वालीवध याबद्दल ही चर्चा चालली होती. अशावेळी भवभुतीने उत्तररामचरित्रात सीतेला दिलेला न्याय पटतो. तेथे कविने आपले स्वातंत्र्य घेऊन सीतेला काव्यगत न्याय दिला आहे. अगदी दुसर्‍या बाजुला ही माणसे देव नसुन माणसेच होती. त्यांना नंतर देव बनवले गेले. त्यांच्याही हातुन चुका झाल्या होत्या. त्या मान्य करुन देखिल हे आदर्श असे थोर पुरुष होते हे दुसरे मत देखिल पटते. फार काय, रामाचे चुकलेच असे ठामपणे म्हणणारी मंडळीदेखिल पटतात. मात्र अनन्त विश्वाची, भूत, भविष्याची, आपण अवतार आहोत याची कल्पना असल्याने लीला करणार्‍या अवतारी पुरुषांची सांगड अपरिपूर्णतेशी घाललेली पटणे मात्र शक्य होत नाही. पटनायकांच्या विवेचनात हा सांधा नीट जुळला नाही असे वाटले. पौर्वात्य आणि पाश्चात्य नायकाची तुलना करण्याआधी जी माणसे भारतात कधीही आली नाहीत, ज्यांना भारतातल्या वैविध्याची काहीही कल्पना नाही अशा पाश्चात्यांच्या थियरीज वर आपण आपल्या इतिहासाच्या आकलनासाठी विसंबुन राहतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. माझ्या संस्कृतीबद्दल काय योग्य आणि काय अयोग्य हे पाश्चात्यांकडुन शिकण्याची मला गरज वाटत नाही असेही ते सडेतोडपणे म्हणाले.

मात्र एपिस्टेमॉलॉजीबद्दलचे त्यांचे विचार पटले नाहीत. कॉन्टेक्स्ट मध्ये नायकाचा विचार केला गेला पाहिजे हे खरे आहे. त्यामुळे कुठली पद्धत (एपिस्टेमॉलॉजी) वापरुन तुम्ही ज्ञान मिळवता हे महत्त्वाचे आहेच. म्हणुन जीझसचा विचार करताना कर्मसिद्धान्ताची एपिस्टेमॉलॉजी वापरता येत नाही आणि रामाचा विचार करताना मर्यादीत अशा सान्ताचा विचार करता येत नाही असे त्यांचे म्हणणे पडले. हा मुद्दा तर्कशुद्ध असला तरी कर्मसिद्धान्त हा निव्वळ वैचारिक सिद्धान्त नसुन मुळात तो जगण्याचा एक मार्ग आहे, एक जीवनशैली आहे हे विसरता येत नाही. आणि ती जीवनशैली ज्यांना पटते, ज्यांनी अंगिकारली आहे ती मंडळी सर्व हिरोंचा विचार हा त्या वर्तुळातुनच करणार. त्यामुळेच नायकाचे यशस्वी होणे महत्त्वाचे आहे. तो अयशस्वी झाला तर त्याची कर्मे योग्य नव्हती असाच निष्कर्ष भारतीय मनामध्ये येणार. यास्तव एपिस्टेमॉलॉजीचा मुद्दा हा मला फारसा पटला नाही. संस्कृत नाटकांमध्ये नायक शेवटी यशस्वी होताना दाखवलेला असतो, किंवा सुखान्त असतो याचे इंगित हेच असणार. अपयश म्हणजे दोषपूर्ण पुर्वकर्म हीच भारतीय विचारसरणी आहे.

त्यामुळे हिरोजचा विचार करताना त्यांना संकटे येवोत, कष्ट भोगायला लागोत शेवटी ते जर यशस्वी झाले तरच ते हिरो अन्यथा झिरो असेच आपल्याकडे मानले जाते. असे असल्याकारणाने आपण वकिलाच्या, जजच्या खुर्चीत बसुन आपल्या नायकांबद्दल निवाडा देत असतो हे पटनायकांचे मत देखिल पटणे कठिण वाटते. कारण हा निवाडा बरेचदा आपल्याकडे कर्मसिद्धान्ताने आगोदरच केलेला असतो. शिवाय हिरो हे जनतेने बनवलेले असतात. आणि त्यासाठीचा कौल जनतेने दिलेला असतो. संपूर्णपणे अलिप्त राहुन एखाद्याच्या आयुष्याचे काटेकोर परीक्षण करणे हे तज्ञांचे काम असते, जनतेचे नाही. त्यामुळे हिरो ही तज्ञांची निर्मिती नसुन सर्वसाधारण जनतेची असते असे मला वाटते. अशावेळी ज्या विचारसरणी मध्ये एखादी संस्कृती घडलेली असते ती विचारसरणी सोडुन देऊन दुसर्‍या संस्कृतीच्या नायकाचा विचार त्या संस्कृतीच्या अनुषंगाने करणे हे कदाचित तज्ञ किंवा विचारवंत करु शकतात, सर्वसामान्य जनता नाही. कदाचित म्हणुनच, ज्यांना राम आणि कृष्ण हिरो वाटतात त्यांना जीझस हिरो वाटेलच असे सांगता येत नाही.

म्हणुनच मला राम हिरो वाटत असेल तर पाश्चात्य शोकांतिकेचा नायक हिरो वाटणे कठिण आहे. कारण तो अयशस्वी झालेला आहे. अशावेळी मी पाश्चात्य एपिस्टेमॉलॉजी वापरुन शोकांतिकेच्या नायकाला हिरो मानावे काय? असा प्रश्न मला पडतो आणि याचे उत्तर सध्यातरी नकारात्मक वाटते आहे. हा प्रश्न निव्वळ एपिस्टेमॉलॉजीचा नसुन हिरोच्या परिपूर्णतेचा आहे. “याचसाठी केला होता अट्टाहास्..शेवटचा दिस गोड व्हावा” असे भारतीय मन मागत असते. त्यामुळे अयशस्वी झालेला नायक हा आपला “हिरो” म्हणुन स्विकारणे भरतीय मनाला कधीकाळी जमेल असे वाटत नाही. कदाचित वेगळ्या विचारसरणीतुन पाहिल्यास त्या हिरोचे अपयश पटेलही. त्यामागची कारणेही स्विकारली जातील. मात्र अशावेळी तो हिरो “हिरो” असणार नाही अशी माझी नम्र समजुत आहे. पटनायकांचे जे मुद्दे पटणे मला कठिण वाटले ते मी येथे मांडले. बाकी त्यांचे प्रतिपादन विचारांना जोराची चालना देणारे होते हे मी आधी म्हटले आहेच.

– अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. देवदत्त पटनायक यांच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानेच (म्हणजे त्यांचे याबाबतीतील...विशेषतः "नायक" संकल्पना) लेखाकडे पाहाताना जाणवते त्यांच्या विचारातील सखोलपणा आणि शेवटी ज्ञानशास्त्र (एपिस्टेमॉलॉजी) मूलतः अनुमान, प्रतीती, विधान यांच्या अनुरोधानेच सत्याकडील प्रवास करायला अभ्यासकाला प्रवृत्त करत असते. रामायण आणि महाभारत (विशेषतः महाभारतात) इथे अमुक एक "हीरो...नायक" असू शकतो ही सर्वमान्य आणि सर्वदूर पसरलेली कल्पना....जी भावनीकही आहेच आहे...असली तरी जेव्हा पटनायक दोन्ही ग्रंथांच्या जडणघडणीत अमुक एक पात्र हे हीरो म्हणून समोर येत नाही असे जेव्हा म्हणतात त्यावेळी हे त्यांचे एकट्याचेच अनुमान नसून ज्ञानशास्त्रातील अभ्यासाचा तो परिपाक आहे हे मान्य करावे लागेल.

पटनायकांनी आपल्या भाषणात सांगितले आहे..."प्रत्येक संस्कृतीची स्वतःची अशी एक एपिस्टेमॉलॉजी असते.." अर्थातच. त्यानुसार ती संस्कृती कुणाला नायक मानायचे वा कुणाला नाही यावर एक त्रयस्थ म्हणून आपण नाही विरोधाच्या रुपातील भाष्य करू शकत. होमरच्या "ईलियड" महाकाव्यात "नायक" नेमका कोण...? अकिलिस, हेक्टर की पॅरिस ? यावर ज्ञानशास्त्राचे अभ्यासक वर्षानुवर्षे खल घालत बसतात आणि प्रत्येकाचे त्या संदर्भातील तत्त्वज्ञान अभ्यासले जात असेलच...संस्कृतीचे हेच वैशिष्ठ्य मानले गेले आहे. महाभारतात अर्जुनापेक्षाही कर्णाला नायक मानणारे कमी अजिबात नसतील. त्यातही शेवटी आपल्या महाकाव्याचा खरा नायक कृष्ण हाच मानला जातो आणि त्या अनुषंगाने त्याची महतीही गाईली जात असल्याचे तुम्हालाही माहीत आहेच अतुल.

पौर्वात्य आणि पाश्चात्य संस्कृतीची ज्ञानशास्त्राच्या भूमिकेतून तुलनात्मक चर्चा करणे जवळपास प्रत्येक तत्त्वज्ञानी व्यक्तीला आवडत असेलच असेल. पटनायकांचीही अशीच भूमिका असेल असे मला तुमच्या वृत्तांतावरून जाणवते. "हिरोजचा विचार करताना त्यांना संकटे येवोत, कष्ट भोगायला लागोत शेवटी ते जर यशस्वी झाले तरच ते हिरो अन्यथा झिरो असेच आपल्याकडे मानले जाते....." ~ ही तर सर्वसामान्य व्यक्तीची भूकच असते. कारण हा माणूस जे मला करायला जमले नाही ते पडद्यावरील कुणीतरी करत आहे आणि त्यात तो यशस्वी ठरला तरच मी त्याला हीरो मानू शकतो, असे जेव्हा म्हणतो तेव्हा तो एका फार मोठ्या समुदायाचे प्रतिनिधीत्व करीत असणार हे त्र उघडच आहे...."हीरो" त्यासाठीच असतात, बनतात...बनू पाहातात. समाजाची ती एक आवश्यक अशी गरजेची संकल्पना आहे. त्यामुळेच तर कर्णाला कितीही मानले तरीही भारतीय जडणघडणीच्या नाळेशी त्याचे "हीरो" पदाशी सूत जुळेल असे नाही वाटत मला.

असो...खूप दिवसांनी एका शाखेविषयी इतके सुंदर लेखन वाचायला मिळाले....तुमच्यामुळे.

अतुल सर,

देवदत्त पटनायक ह्यांचा "देवलोक" नामक कार्यक्रम एपिक ह्या दुरचित्रवाणी वाहिनी वर लागतो, तुमच्या लेखात असलेले समस्त मुद्दे दर एपिसोडला एक विषय असे करत ते अतिशय उत्तमप्रकारे लेमॅन टर्म्स मधे खुपच ओघवत्या शैलीत सांगतात , विषय प्रसंग अन वक्ता ऐकून एकदम क्लिक झाले बघा हे एकदम

देवदत्त लिखीत काही पुस्तकं आहेत संग्रही, द प्रेगनंट किंग, देवी, इंडियन मायथॉलॉजी,शिवा..
लाईक अतुल , मलाही पटनायकांचे सर्वच मुद्दे पटत नाहीत बाकी त्यांची पुस्तकं, विचार करायला लावणारी असतात, हे मात्र खरंय!!

राम , कृष्ण यांना देवपण देण्यात आल्यामूळे त्यांचा "नायक" म्हणून विचार होऊच शकत नाही. त्यांनी केलेल्या चूकांना पण मग विचित्र स्पष्टीकरण ( बहुतेक नंतरच्या काळात ) देण्यात आले. ते देखील कदाचित लोकांनी त्यांच्या चूकांचा विचार करून, त्यांना देव मानणे सोडू नये म्हणून असावे.

नायक सर्वगुण संपन्न असावा... इतका संकोचित विचार भारतीय प्रेक्षकांनी खुप वर्षापुर्वीच सोडून दिला आहे.
अगदी अशोककुमारच्या किस्मत पासून. पुर्वी अशा नायकांच्या गैरमार्गाला लागण्याचे स्पष्टीकरण द्यायची पद्धत होती, आता त्याचीही गरज वाटत नाही.

देवदत्त पटनाइक एपिक चानेलवरचे वेगळे आहेत का?

तेच ते

दिनेशदा, हिरो म्हणजे आपला आदर्श, आणि तोही राम कृष्ण या अर्थाने, त्यामुळे त्यांचे भक्त त्यांना अपरिपूर्ण म्हणुन स्विकारतील का यावर चर्चा होती. भगवंत तरीही अपरिपूर्ण...मला वाटतं असं स्विकारलं जाणार नाही, पटनायकांचे म्हणणे असे कि हे स्विकारले गेले पाहिजे.

चित्रपटातल्या नायकाबद्दल तुम्ही म्हणालात ते मान्य आहे,

अतुल,पटनायक यांच्या विवेचनाचा खूपच चांगला परामर्श घेतला आहे तुम्ही या लेखातून .Hero Paradigm या सज्जड विषयावरील सेमिनार फार मोठ्या संकल्पनांची उलाढाल करणार हे उघड होते, पटनायकांनी या चर्चेला सहजतेने एका उंचीवर नेले.
देवदत्त पटनायक यांची मुलाखत एका प्रसन्नतेचा अनुभव देणारी ,रसपूर्ण होती. त्यांच्या व्यासंगाला आतून आलेल्या कळकळीच्या विधानांसारखी सोपेपणाची लय आहे.त्यांच्या यशस्वितेचं ते गमक असावं.मी त्यांचं काही वाचलेलं नाही,पण ऐकलेलं खूप आहे.आज ते तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.
भावांचं आवाहन करणं हे कथनात्म साहित्याचं मुख्य उद्दिष्ट हे सांगताना त्यांनी फँड्री या मराठी सिनेमाचा केलेला गौरवोल्लेख सुखावून गेला.

नायक आणि अवतार या दोन वेगळ्या संकल्पना,भारतीय परिप्रेक्ष्यात त्या सरमिसळून जातात..पण,
>>जीझसचा विचार करताना कर्मसिद्धान्ताची एपिस्टेमॉलॉजी वापरता येत नाही आणि रामाचा विचार करताना मर्यादीत अशा सान्ताचा विचार करता येत नाही >> हे विधान मलाही तुमच्याप्रमाणेच अपुरे वाटले.भारतीय मनाला शोकान्त झेपत नाही हेही पटलं नाही.महाभारतासारखं महाशोकात्म साहित्य ज्या लोकमानसात स्थिरावले आहे त्याची आकलनशक्ती व्यामिश्राचा अनुभव घेणारी आहे.
याच संदर्भाला पुढे नेऊन कृष्ण या पूर्ण-पुरुष मानल्या गेलेल्या महानायकाला /अवताराला एकूण सेमिनारच्या चर्चेतून वगळण्याचं कारण कळलं नाही,पण कृष्णावर बोलायला इरावतीबाई किंवा कुरुंदकरांच्या तोलामोलाच्या विद्वत्तेची माणसं हवीत ,नपेक्षा त्याला वगळलेलं बरं असंही जाणवून गेलं.)

भारती यांच्या प्रतिसादाची मला अक्षरश: भूक लागली होती.....ती भागली, वाचनानंतर.

नरहर कुरुंदकरांना प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य मला लाभले....कोल्हापूरातच....स्टेजवर केवळ एकच खुर्ची आणि माईक. अध्यक्ष, प्रमुख पाहुणा....कुणीही नाही. सारे काही समोर बसले होते. स्थानिक सचिवांनी कुरुंदकरांची ओळखही करून दिली नाही...आम्हाला तेही आवडले होते...कारण त्यांची ओळख ज्याना आहे तेच श्रोते सभागृहात आले होते हे तर उघडच. सरांच्या हाती कसल्याही नोंदीचे कागद नव्हते...."नमस्कार, कोल्हापूरकरांनो.....कृष्ण हा विषय आहे...." ~ बस्स एका सेकंदात ज्ञानगंगेचा जो ओघ सुरू झाला....तो जवळपास दीड तास अखंड.

कुठे असेल तो व्याख्यानाचा साठा ? देवदत्त पटनायक यानीही अशीच नामकमाई केल्याचे तुम्हा सर्वांच्या लेखनातून जाणवत आहे.