कोणीच येत नाही माझ्या घरात आता (तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 September, 2015 - 23:35

अर्ध्यात जिवलगांचे सुटलेत हात आता
कोणीच येत नाही माझ्या घरात आता

दु:खेच वेचताना तारूण्य ख़र्च झाले
भाळू कशी सुखांवर कलत्या वयात आता

म्हणता भरून आले, झाले निरभ्र झाले
ना मागमूस उराला कुठल्या घनात आता

माझ्यातुनी मला जो ओढून दूर नेतो
त्यानेसुधा झुरावे त्याच्या मनात आता

मागे वळून त्याने बघताच वाटले की
विज कोसळेल येथे काही क्षणात आता

आतूर ते असावे भेटायला तुला पण....
ती काहिली नसावी त्या चांदण्यात आता

टाळून सर्व वाटा मागे फिरावयाच्या
उरले पुढेच जाणे माझ्या पुढयात आता

-सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यातुनी मला जो ओढून दूर नेतो
त्याने सुधा झुरावे त्याच्या मनात आता

आतूर ते असावे भेटायला तुला पण....
ती काहिली नसावी त्या चांदण्यात आता<<< वा वा, सुरेख!!

छान

सुप्रिया, ओळ अन ओळ थेट काळजाला भिडली..
कविता वाचतांना अगदी दाटुन आल..

दु:खेच वेचताना तारूण्य ख़र्च झाले
भाळू कशी सुखांवर कलत्या वयात आता+++ व्वा ! खुप सुरेख..

<<< आतूर ते असावे भेटायला तुला पण....
ती काहिली नसावी त्या चांदण्यात आता

टाळून सर्व वाटा मागे फिरावयाच्या
उरले पुढेच जाणे माझ्या पुढयात आता >>> सुंदर

"त्यानेसुधा">> सुधा ही सूट अत्यंत खटकते. काही लोक 'आणी' करतात त्याप्रमाणे. अर्थ न बदलता पर्यायी शब्द उपलब्ध होऊ शकत नाही का? द्वीपदी मनात घोळवत ठेवली तर मार्ग निघेल काही तरी....