ओझे झाले …

Submitted by कविता क्षीरसागर on 20 December, 2015 - 09:28

ओझे झाले …

ही फरफट आयुष्याची बघण्याचे ओझे झाले
रुसुनीया नशिबावरती जगण्याचे ओझे झाले

पण कितिदा गमवायाचे स्वत्वाला माझ्या मी
या मानी -हदया आता हरण्याचे ओझे झाले

जा दुस-या कोणा सांगा ह्या बाता स्त्रीमुक्तीच्या
या मुद्दयांवर पुरुषांच्या फसण्याचे ओझे झाले

बघ उडुनी गेले अत्तर घमघमतो अजुनी फाया
तो गेल्यावरही मागे उरण्याचे ओझे झाले

का शिवरायांच्या नावे तलवारी उठती अजुनी
ह्या इतिहासाच्या पोथ्या जपण्याचे ओझे झाले

पुष्पक धाडा हो त्यांना स्वर्गाची उघडा दारे
ह्या पृथ्वीला संतांच्या असण्याचे ओझे झाले

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला गझलेतला कंटेंट म्हणजे शेरातले विषय आवडले.

मांडणी अजून सफाईदार होऊ शकेल असे मला वाटते.

शुभेच्छा.

वैभव जी प्रतिसादाबद्दल धन्यवाद ... नुकतीच गझल लेखनास सुरुवात केली आहे ... आपल्या सुचनेचे स्वागत ...माझ्याकडून मी नक्की प्रयत्न करेन ...

बेफिकीरजी आपल्या प्रतिसाद अतिशय मोलाचा आहे ... धन्यवाद !!