राईस क्रिस्पी चिवडा

Submitted by परदेसाई on 23 December, 2015 - 09:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ डबा राईस क्रिस्पीचा (ग्रोसरी स्टोरमधे मिळतो).
२. १ १/२ ते २ टेबलस्पून तेल
३. काजू /शेंगदाणे
४. चिमुटभर हिंग
५. १ १/२ चमचा मोहरी
६. २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
७. ८ / १० कढिपत्याची पाने
८. ३ चमचे तीळ
९. २ चमचे तिखटपूड. (लाल मिरची)
१०. १ चमचा हळद.
११. २ चमचे साखर
१२. चवीसाठी मीठ
१३. ३ चमचे जीरे पावडर.
१४. ३ चमचे धणे पावडर.

क्रमवार पाककृती: 

१. एका कढईत तेल गरम करा.
२. त्यात काजू / शेंगदाणे तळून घ्या.
३. त्याच तेलात हिंग, मोहरीची फोडणी करा.
४. त्यात लगेच हिरव्या मिरच्या व कढीपत्ता टाका.
५. गॅस बंद करून तेलात तीळ टाका (तीळ पटकन जळतात , तसे होऊ नये).
६. एका वेगळ्या भांड्यात फोडणी, राईस क्रिस्पी, काजू/दाणे एकत्र करा. फार ढवळू नका.
७. उरलेले मसाले, मीठ , साखर घाला व हलकेच ढवळा..

हा चिवडा मी दर दिवाळीला हाफिसात डब्बे भरून नेतो आणि संध्याकाळ पर्यंत डब्बे रिकामे असतात.

वाढणी/प्रमाण: 
भरपूर जणांसाठी...
अधिक टिपा: 

चवी प्रमाणे अजून तिखट्पूड टाकता येईल...

माहितीचा स्रोत: 
बायको...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे चिवडा राईस क्रिस्पीचाच असतो. मी त्यात धणे जीरे पावडरीच्या जोडीला थोडी बडिशोप पावडर आणि थोडा आमचुर टाकते.

५. गॅस बंद करून त्यात तीळ टाका (तीळ पटकन जळतात , तसे होऊ नये).
<<
गॅसमधे तीळ का टाकायचे? दृष्ट काढल्यावर मीठमोहोरी चुलीत टाकतात तसं करायचंय का?

सही! आमचा पातळ पोह्यांचा चिवडा याच रेस्पीने होतो. (आम्ही लाडात येतो तेव्हा त्यात खसखस आणि सुक्या खोबर्‍याचे कापही घालतो.) Happy
मृण, भारी फटू! Happy

मी पण असाच करते वजा तिखट पूड. अशा चिवड्यात हिरवी मिरचीच हवी.

मृण, भारी दिसतोय चिवडा.

दीमा, इस्टर्न टायमातले फाको राइट्स माझ्याकडे आहेत बर्का.

मस्त फटू मृण! भारी लागत असणार चिवडा. पातळ पोह्यांचा नेहेमीच होतो.
एका आच्यार्‍याकडून आलेली सुक्या खोबर्‍याचे पातळ काप करण्याची युक्ती - सुकं खोबरं नीट धूवुन, कुकरमध्ये वाफवायचं. मग कापं काढणं अगदी सोपं होतं. नंतर ते कापं कापडावर पसरवून पाणी टीपून घेऊन तळायचे. जास्त चांगले लागतात.

मी एकाठिकाणी, सांडगी मिरच्या तळून घातलेला चिवडा खाल्लाय, खातांना ती मिरची चुरडून वर घालायची मस्त लागतं. असाच सुक्या लाल मिरच्या घालून पण मस्त होतो.

राईस क्रिस्पी म्हणजे इथे मिळतात ते भाजके पोहे वाटतायत. मी नेहमी ग्राहक संघातून पॅकेट मागवते आणि चिवडा करते. येता जाता तोंडात टाकायला असल्याने काजू बिजू लाड नाहीत. अगदी कमी तेलात होतो हा.

>>दीमा, इस्टर्न टायमातले फाको राइट्स माझ्याकडे आहेत बर्का.>> Lol
मला बन्सीचा नॉर्मल चिवडा खायची सवय्न्लागल्यापासून करवत नाही घरी. Wink

Lol

करवत नसेल तर सुक्या खोबर्‍यावर रंधा मार. काळी पाठ निघून शुभ्र खोबर्‍याचे काप मिळतील.

Lol

Lol
यावरून दोन सुतारांचा जोक आठवला. नीटसा आठवत नाहीये पण एक सुतार दुसर्‍याला विचारतो, अरे काम का करत नाहीस काही? दुसरा सुतार म्हणतो, अरे करवत नाही.
या विषयांतराबद्दल देसाई माफ करतीलच. Proud

करवतीचा जोक पुलंच्या नावावर जमा आहे.
एकदा पु. ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पु. ल. नी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली. ओशाळलेले प्रिन्सिपल पु. ल. ना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही."
पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत नसेल !"

भाजक्या पोह्यांसाठी केश्विला +१ आणि तिखट न घालता मिरच्यांचे तुकडे तळूनसाठी सिंडीला +१

खाताना सुहानाचा चिवडा मसाला भुरभुरवून खायला मज्जा येते. मिरचीचा तुकडा फक्कीत आला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्की तशीच मारायची Wink मिरची चावल्यावर गरम चहाचा घोट घ्यायचा, थेट स्वर्गच!

भाजक्या पोह्यांचा चिवडा हा.. राईस क्रिस्पी म्हणतात होय परदेशात ! आम्ही लहानपणी पोहे तांदूळ देऊन करवून घेतले आहेत .. मज्जा येते बघायला. झालच तर सरकी देऊन कपासिया तेल सुध्दा बन्वून घेतलेय. पेंड भाकरीत घातली तर काय स्वादिष्ट भाकरी होते.. माफ करजो अवांतरा बद्दल... Happy

Pages