शरद जोशी: पंगा घेणारा गेला

Submitted by चिंतामण पाटील on 20 December, 2015 - 00:11

चिंतामण पाटील****
शेतकरी राब राब राबून पिकवतो. पण त्याने घाम गाळून
काढलेल्या मालाचं बाजारात कवडीमोल होतं. तेव्हा
त्याच्या त्या घामाच्या मोबदल्यात रास्त दाम
मिळविण्यासाठी हा शरद जोशी नावाचा माणूस
व्यवस्थेशी पंगा घ्यायला उतरतो. शेतकऱ्यासाठी
लढणाऱ्या या शिलेदाराने 12 डिसेंबरला अखेरचा निरोप
घेतला. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांसाठी राजकारणीही
आंदोलन करताना दिसतील, पण मतांचं गणित
सांभाळण्यासाठी शेतमालाचे दरही घसाघस उतरवतील,
तेव्हा शेतकऱ्यांसाठी निर्भेळ पंगा घेणारा शरद जोशी
नावाचा महान माणूस आठवत राहणार
.
आय.ए.एस. झालेला एक माणूस राष्ट्रसंघातली नोकरी सोडून
भारतात परततो नि शेतकऱ्यांसाठी लढा पुकारतो, ही
अनाकलनीय गोष्ट. ना वाडवडलांनी कधी शेती कसली, ना
कधी स्वत: शेतीचा बांध पाहिला. मग दैनावस्थेतून
शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी हा माणूस कसा सरसावला?
रुळलेल्या पायवाटेवरून चालायचंच नाही, अशी खूणगाठ
बांधलेली. शेतकऱ्यांच्या संघटनेचं अवघड काम उभं करणाऱ्या
या माणसाने सतत स्वत:शी व व्यवस्थेशी लढा पुकारला.
तरीही ''संघटनेच्या कामात मी काही करुणेच्या प्रेरणेने
पडलो नाही. या कामात मला आनंद मिळतो म्हणून मी यहे
काम करतो.'' असं म्हणून श्रेय घेणंही टाळतो.
स्वित्झर्लंडमध्ये वाढलेल्या आपल्या दोन्ही कन्यांना सोबत
घेऊन त्यांनी तो देश सोडला, तेथूनच निर्णय पक्का झाला
होता - भारतात गेल्यावर शेती करायची. एकीकडे
अणीबाणीचा कालखंड सुरू झालेला. शासकीय यंत्रणेच्या
हुकूमशाहीचे चटके स्वतंत्र हिंदुस्थानची जनता सोशीत होती.
शासकीय सेवेतल्या मंडळीचा मगरूरपणा त्यांना पदोपदी
जाणवायचा. मुलींच्या शाळाप्रवेशाच्या वेळी त्यांना
अडचण निर्माण झाली. तीच गत रेशन दुकान, गॅस वितरक,
मुख्याध्यापकांची. सामान्य कर्मचाऱ्यांपुढे ते रांगेत उभे
राहिले, दरवाजापाशी बसत. पण आपण कोण ही ओळख
दाखवायची नाही हे ठरवलेलं. आपल्या देशात तुम्ही कोणी
विशेष असल्याशिवाय कामं पटकन होत नाहीत, तिथे
अशिक्षित, अल्पशिक्षित शेतकऱ्याची काय अवस्था होत
असणार? हे त्यांच्या मनाने तिथेच टिपलं.
पुण्याजवळ आंबेठाण येथे साडेतेवीस एकर कोरडवाहू जमीन
घेऊन त्यांनी शेती कसायला सुरुवात केली. पुढे शेतकऱ्यांचं
संघटन करायचं, तर शेतकऱ्यांचं शेतीतलं दु:ख नि सुख समजायला
पाहिजे म्हणून केलेली ही पूर्वतयारीच. उद्या उठून 'हा
पांढरपेशा काय शेतकऱ्यांसाठी लढणार?' हा प्रश्न उभा केला
जाऊ नये, यासाठी स्वत:ला त्यांनी शेतीचे नि शेतकऱ्याच्या
रखरखीत सत्याचे चटके सोसण्यासाठी आधीच तयार करून
घेतले. आंबेठाणच्या त्या शेतात रणरणत्या उन्हाशी दोन हात
केले. विहीर खोदताना निघणाऱ्या मातीच्या पाटया
मजुरांसोबत फेकल्या. दगड रचून केलेल्या आडोशाच्या
खोपीत रात्रीही काढल्या. शेतकऱ्याचं जीवन तर त्यांना
समजू लागलंच, तसंच शेतकरी दिवसेंदिवस रसातळाला का
चाललाय? हा निर्माण झालेला प्रश्नही अनुभवला. मजुरांना
कायद्याने ठरवल्याप्रमाणे मजुरी दिली, तेव्हा परिसरातील
शेतकऱ्यांनी ''तुम्ही द्याल, पण आमच्या ज्वारीला,
कांद्याला फारसा भाव नाही तिथे मजुरी कोठून वाढवून
देणार?'' हा प्रश्न उपस्थित केला. आहे ती मजुरीही शेतकरी
देऊ शकत नाही, कारण त्याच्या मालाला कष्टाच्या,
खर्चाच्या मानाने भावच नाही. निसर्गाचं संकट आणखी
वेगळंच. शेतकऱ्याच्या जीवनातील संकटांची दाहकता
त्यांनी तिथेच अनुभवली.
1975 ते 80 हा निव्वळ राजकीय उलथापालथीचा काळ.
सर्वत्र तडजोडीचं राजकारण चाललेलं. ज्याच्यासाठी
काहीही करावं लागत नाही आणि आपल्या मागण्यांसाठी
जो कधीच रस्त्यावर येत नाहीत, असा हक्काचा मतदार
म्हणजे शेतकरी. राजकारणी मंडळी पाहिजे तेव्हा, पाहिजे
तसा त्याचा उपयोग करून घेणार. पण तो पिकवतो त्या
त्याच्या मालाची कदर होईना. त्याच्या समस्या वाढतच
चाललेल्या. शेतीतलं उत्पादन तर वाढलं, पण काढलेल्या
उत्पादनाला बाजारात रास्त दाम काही मिळेना. तेव्हा
आंबेठाणच्या शेतीशी झुंजणाऱ्या या अर्थतज्ज्ञाला
शेतकऱ्याचं गणित उमगू लागलं होतं. शेतात कमी पिकतं तेव्हा
होणारी लूट नि भरपूर पिकलं की त्याच्या कष्टाचा बेभाव
होणारा लिलाव तो पाहू लागला. इथेच शेतकरी संघटनेची
पेरणी सुरू झाली.
1980च्या नोव्हेंबरात नाशिक भागात ऊस उत्पादकांच
आंदोलन पेटलं. मुंबईला जाणारा महामार्ग शेतकऱ्यांनी
अडवला. शेतकऱ्याने गाळलेल्या घामाला रास्त दाम
मिळालाच पाहिजे हे ठणकावून सांगणारा शेतकऱ्यांचा एक
नेता तिथे जन्माला येत होता. तोपर्यंत शेतकरी संघटित होऊ
शकतो, ह्याची कल्पनाही केली जात नव्हती. शरद
जोशींच्या नेतृत्वाखालच्या या शेतकरी संघटनेच्या
आंदोलनाचं वारं फार वेगाने फोफावलं. महाराष्ट्रात
नाशकातल्या आंदोलनाची चर्चा पार पंजाबपर्यंत
पोहोचली. प्रथमच शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल
वर्तमानपत्रांनी घेतली. आपल्या समस्येची जाण या
नेतृत्वाला आहे, हे शेतकऱ्यांनी ओळखलं. त्यामुळे नेतृत्वाला
अटक होऊन तुरुंगामध्ये जावं लागलं, तरीही शेतकरी बायका-
पोरांसह आंदोलनासाठी रस्त्यावर येत राहिले. अशीच
आंदोलनं मग ठिकठिकाणी होत राहिली. निपाणीचं तंबाखू
उत्पादकांचं आंदोलन, चाकणचं ऊस उत्पादकांचं, नाशिकचं
कांद्यासाठीचं. या आंदोलनांमुळे शेतकरी एक होऊ लागले
नि आपल्या मागण्यांसाठी व्यवस्थेशी पंगा घेऊ लागले.
शरद जोशी कशी काय शेतकऱ्यांची संघटना बांधू शकतात? हा
प्रश्न तत्कालीन राजकारण्यांना तेव्हा पडू लागला. ''या
ब्राह्मणाची कॉलर पकडून त्याला शेतीतलं काय समजतं ते
विचारा'' असे फुत्कार सभांमधून ते काढू लागले. पण शेतकरीच
त्यांना या वक्तव्याचा जाब विचारू लागले. समाजातल्या
सगळयाच घटकांनी या जातीयवादी वक्तव्याचा खरपूस
समाचार घेतला.
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची फलितंही निघू लागली.
अर्थात केवळ शेतकऱ्यांनाच फायदा व्हावा, हा या
आंदोलनाचा हेतू नव्हता. देशातला 70 टक्क्यापेक्षा जास्त
समाज शेतकरी आहे. त्यामुळे देशातल्या मूळ समस्या, मोठे
प्रश्न तिथेच निर्माण होतात. हा शेतकरी स्वत:च्या
मालाला जास्त नाही, तर रास्त भाव मागतोय. बहुसंख्येने
आहे म्हणून केवळ स्वार्थासाठी ही मागणी नाही. तो
शेतीमालाला रास्त भाव मागतोय, कारण तो दारिद्रयाचे
चटके सोसतोय म्हणून. या दारिद्रयातून त्याला बाहेर
पडायचंय. शेतकऱ्याचं दारिद्रय दूर होणं म्हणजे देशातील
दारिद्रय दूर होणं. यासाठीच शेतीमालाला रास्त भाव
मागणं हा शेतकरी संघटनेचा एककलमी कार्यक्रम होता.
शेतकऱ्याचं शेतीतलं गणित त्यांनी शेतकऱ्यांसह ग्राहक आणि
राजकीय नेतृत्वासमोर वेळोवेळी मांडलं. कधी चर्चेतून, तर
कधी आंदोलनाच्या लढयातून हे गणित सोडवण्याचा त्यांनी
प्रयत्न केला.
सातबारावर महिलांचं नाव येऊ लागलं ते चांदवडच्या शेतकरी
संघटनेच्या महिला अधिवेशनामुळे. शेतकरी महिलेला सन्मान
मिळवून देणाऱ्या या 'लक्ष्मी मुक्ती आंदोलना'मुळे लाखो
महिलांची नावं शेतीच्या सातबारावर लागली.
मातृशक्तीच्या स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेला हा
मोठा विचार होता. कालांतराने हे वारं सर्वत्र पसरलं.
सतत परिस्थितीच्या उलटं पोहण्याचा नाद. परिणामी
शरीर दगा देऊ लागलं. आंदोलनामुळे 1984मध्ये चंदीगडच्या
तुरुंगात त्यांची रवानगी झाली होती. तिथेच त्यांना
हृदयविकाराचा पहिला झटका आला. 86मध्ये आणि 95मध्ये
पुन्हा मोठे झटके आले. बळावलेल्या हृदयविकाराची फारशी
काळजी घेतली गेली नाही. 1998 साली दिल्लीला
पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीस जाण्यासाठी निघाले
असताना शरीराचा डावा भाग लुळा पडला. पुढे उपचार
झाले, पण शारीरिक हालचालीसाठी परावलंबी व्हावं
लागल्याचं दु:ख त्यांना शेवटपर्यंत सलत राहिलं.
अर्धं शरीर निकामी होण्याचं दु:ख त्यांच्या पदरी उगीच
नाही आलं. ते त्यांनी ओढूनच घेतलं. स्वत:शीच पंगा घेण्याची
वृत्ती बालपणापासूनचीच. माध्यमिक शिक्षण घेताना
संस्कृतवरच्या निस्सीम प्रेमामुळे व अभ्यासामुळे बोर्डात
पहिला येऊनही महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र
वाणिज्य शाखा निवडली. पदवी घेतल्यावर सरकारी
महाविद्यालयात नोकरी पक्की असतानाही
कोल्हापूरच्या नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाची वाट
धरली. मोठया कष्टाने आय.ए.एस. झाल्यावर परदेशातील
चकाचक दुनियेत नोकरी केल्यावर ती सोडून देऊन मायदेशात
शेती कसण्याचं अवघड व्रत घेतलं. त्यात कळस म्हणजे शेतकऱ्यांचं
संघटन. ह्या स्वत:विरुध्द बंडखोरीच्या बाबी एकीकडे, तर
दुसरीकडे संघटनेच्या माध्यमातून सतत व्यवस्थेशी पंगा घेणं.
तिसऱ्या-चौथ्या इयत्तेत शिकत असताना रामशास्त्री
प्रभुणे हा चित्रपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यात
आपल्या विद्वत्तेच्या बळावर राजसत्तेलाही नमवण्याचा
अधिकार रामशास्त्री प्राप्त करतात. आपणही असंच
काहीसं केलं पाहिजे असं वाटू लागलं. ह्या वाटण्यातच
शेतकऱ्यांची संघटना बांधणाऱ्या नेतृत्वाचं बीजारोपण तर
झालं नसेल? सतत आहे ते सोडून नाहीच्या पाठीमागे
लागण्याच्या वृत्तीने शरीराची फारच आबाळ झाली.
'अंगारमळा' या पुस्तकात त्यांनीच त्याचं फार योग्य वर्णन
केलंय.
काही वेगळं करायला निघालेला माणूस हृदयाच्या
स्पंदनाच्या लयीला तोडल्याखेरीज काम करूच शकत नाही.'
'पिक्चर ऑॅफ डोरियन ग्रे'चा लेखक ऑॅस्कर वाइल्ड याने ही
कल्पना फारच सुंदर मांडली आहे. कोणी कवी घ्या, लेखक
घ्या, कलाकार घ्या - प्रतिभा असली की माणसाचा चेहरा
कुरूप बनतो, कपाळ मोठं होतं, नाक बाकदार होतं, चेहरा
सुरकतून जातो, डोळे ओढलेले दिसतात. नेमकी याउलट गोष्ट
चर्चमधल्या पाद्रयाची. लहानपणी शिकलेली वाक्यं वापरून
तो आयुष्यभर पोपटपंची करत राहतो. त्यामुळे त्याचा चेहरा
नेहमीच सुडौल, बांधेसूद आणि सतेज दिसतो; कारण त्याला
कधी डोक्याला त्रास द्यावाच लागत नाही.
वर्षानुवर्षाच्या धावपळीमुळे, ताणामुळे शारीरिक आणि
बौध्दिक अपंगत्व म्हणजे काय याची खोलवर विदारक
जाणीव झाली. संयत आणि नियमित दिनचर्या ठेवली
असती, तर हे आजारपण ओढवलं नसतं, हे उमजलं. निष्कर्ष काय
निघतो? सार्थक जीवनाचा मार्ग लयबध्द असूच शकत नाही.

पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशीही जाणीव नसताना
शेतकरी राब राब राबून पिकवतो. पण त्याने घाम गाळून
काढलेल्या मालाचं बाजारात कवडीमोल होतं. तेव्हा
त्याच्या त्या घामाच्या मोबदल्यात रास्त दाम
मिळविण्यासाठी हा शरद जोशी नावाचा माणूस
व्यवस्थेशी पंगा घ्यायला उतरला. शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या
या शिलेदाराने 12 डिसेंबरला अखेरचा निरोप घेतला.
जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांसाठी राजकारणीही आंदोलन
करताना दिसतील, पण मतांचं गणित सांभाळण्यासाठी
शेतमालाचे दरही घसाघस उतरवतील, तेव्हा शेतकऱ्यांसाठी
निर्भेळ पंगा घेणारा शरद जोशी नावाचा महान माणूस
आठवत राहणार.
(संदर्भ- 'अंगारमळा', शेतकरी संघटना विचार आणि
कार्यपध्दती)
8805221372

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख... आणि शरद जोशी यान्च्या कार्याची ओळख. मला या व्यक्तीबद्दल, आणि त्यान्नी शेतकर्‍यानसाठी केलेल्या कार्याबद्दल आदर आहे. भावपूर्ण श्रद्धान्जली.

थोड्या शब्दात अतिशय उत्तमपणे शरद जोशींची ओळख तुम्ही करून दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी निर्भेळ पंगा घेणारा शरद जोशी >>> +१०००

तेथे कर माझे जुळती!

थोड्या शब्दात अतिशय उत्तमपणे शरद जोशींची ओळख तुम्ही करून दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी निर्भेळ पंगा घेणारा शरद जोशी >>> +१०००

तेथे कर माझे जुळती! >>>>> +११११११

______/\______

शरद जोशी जाणून घ्यायला फक्त ४ च जण? >>>

त्यांच्या कार्याची महती व माहिती ठाउक आहे. तसेच श्रद्धांजली चा धागाही येऊन गेला आहे. त्यामुळे तसे झाले असावे.
ते हयात असताना ऑर्कुट च्या ग्रुपमधे त्यांच्या कार्याबद्दल खूप चर्चा झालेल्या आहेत.

--/\---

उत्तम लेख. शरद जोशी बद्दल प्रथमच एव्हढी माहिती मिळाली. ते स्वतः शेतकरी कुटुम्बातले नसूनही शेती कडे वळले हे वाचून त्यांच्याविषयीचा आदर दुणावला.

चांगलं लिहिलंय.
कुठल्याही फालतू मुद्यांवर वेगवेगळ्या रंगांची रानं उठवणार्‍या सोशल मीडियापटूंना या माणसाची फारशी दखलही घेऊ वाटली नाही. शेतकरी संघटनेचा किंवा फक्त शेतकर्‍यांचाच नव्हे तर पूर्ण देशाचाच हा irreparable loss आहे हे फारसं कुणाच्या गावीही नाही असं दिसतंय....

'चिंतामण' पाटिल असल्याने म्हणा अथवा चिंतामण 'पाटिल' असल्याने म्हणा लेखाला फारशा प्रतिक्रिया आलेल्या नाहित. लेखात सांगितल्याप्रमाणे शेतकरी कोण असतो, कसा असतो, काय करतो हे जाणुन घेण्यासाठी शहरातुन बाहेर पडुन एकदा शेतात जावे लागते हेच खरे..!

सुरेख लिहीलय. नुसते लिहीण्यापेक्षा तळमळीने लिहीलय हे प्रत्येक ओळीत जाणवतय. शहरात रहातो म्हणून आपल्याला इतके खोलवर पोहोचलेले दु:ख जाणवत नाही, कारण आपण आपल्याच व्यापात मग्न असतो.

काही वर्षापूर्वी एक वयस्कर शेतकरी काका मार्केटमध्ये भेटले ( मार्केटयार्ड- पुणे) मार्केटयार्ड पहायला म्हणून सहज जाणे झाले तेव्हा यान्ची भेट झाली. मग बी-बियाणे लावण्याचा खर्च, पाऊस पाण्याची लहर, मजूर नाही मिळाले तर स्वतः उपसावे लागणारे कष्ट, दलालान्ची अडवणूक, मिळणारा भाव आणी हाती येणारा पैसा यातुन काहीच पदरी पडत नाही हे ऐकल्यावर मोठा आ वासला होता आम्ही.:अरेरे:

बरच काही त्यानी सान्गीतले. पण मला वाटते शेतकर्‍याला जात नसते, कारण तो लाखान्चा पोशिन्दा असतो. मग पाटिल असो की अहिरे वा नागरे. लेखक स्वतः एक शेतकरी आहेत, ते उत्तम रित्या जाणतील.

आजकाल चान्गले नेते मिळणे दुरापास्त झालेय, त्यातुन गरीबान्चा वाली गेला.

वरती भोसले यांनी पाटील नाव आणि प्रतिक्रिया यांचा अनाठायी संबंध जोडायचा प्रयत्न केला आहे . गेल्या १ वर्षातच शरद जोशींचा एक लेख वाचला. ते म्हणाले - शेतकरी संघटनेचे इतर नेते / कार्यकर्ते हे ( बहुतेक सर्व ) दुहेरी निष्ठा असलेले लोक होते. शेत मालाला भाव मिळावा / लढा लढायला जोशी. आणि मत द्यायची वेळ आली कि शरद पवार .. सर्व मते पवारांना. शरद जोशींना जेव्हा सरकार दरबारी न्याय मिळेना तेव्हा त्यांनी निवडणुका लढायचे ठरवले. साफ हरले ते. तोटा अर्थात शेतकरी लोकांचाच होता. जाती करता खावी माती. म्हणून मते पवारांना. आता रडू नका. आणि इथे तर अजिबात तुमचा जातिवाद आणू नका. खोटे आहे का हे ?

__/|\__ मोठा माणुस. मेल्यावरदेखिल शेतकर्‍यांची काळजी वाहणारा नेता. आज शेतकरी शेकडोंच्या संख्येने आत्महत्या करत असताना शरद जोशींसारख्या सहोदराची जास्त गरज होती.