शेट्टीची भट्टी - दिलवाले

Submitted by घायल on 18 December, 2015 - 15:55

10aca9e74d68d5343a68e44e40ba5923[1].jpg

शाहरूख खान पहाटे उठून मंत्र वगैरे म्हणत असतो. मग शुचिर्भूत होऊन देवाची पूजा अर्चा करतच असतो , इतक्यात काजोलने अंगण लक्ख झाडून स्वच्छ केल्याचे पाहून तो समाधानाने हसतो. आता प्रवचनाची वेळ होणारच असते तोपर्यंत काजोलशी बोलावे म्हणून तो ओल्या सोवळ्यानिशी तिच्याकडे जातो आणि विचारतो " मी प्रसन्न आहे, माग काय मागायचे ते :

यावर ती लाजते आणि म्हणते

" बाजीरावसारखा पती हवा "
या वर शाखाचा क्लोज अप टाळून त्याला पाठमोरा दाखवण्यात येते. हिंदी सिनेमात पाठमोरा अभिनय करणा-यांची परंपरा जपण्याचा हा प्रयत्न पाहून प्रेक्षकांना गलबलून येतं. ओलावलेले शब्द आपणास ऐकू येतात..

" जा मुली, तुला बाजीराव सिंघम मिळेल , त्यालाच मस्तानीचा बाजीराव समजून सुखाने संसार कर. "
,
,

असा सीन रोहीत शेट्टीच्या सिनेमात कसा काय पहायला मिळेल ?
संस्कार, समाज प्रबोधन,लोकजागृती यासाठी सिनेमा पहायला जाणार असाल तर मग तिकीटावर पैसे खर्च न करता सरळ बापूंच्या आश्रमाचा रस्ता धरावा.

तर आपण दिलवाले हा सिनेमा कशासाठी पहायला आलेलो आहोत याची थेटरात शिरताना एक दहा कलमी सूची बनवा. प्रत्येक कलमास एक गुण याप्रमाणे दहा पैकी किती गुण मिळतात हे आपले आपण ठरवावे.

सिनेमा सुरू होताना वरून खाली येत असलेल्या कॅमे-यात शिमला, मनाली, लद्दाख परिसरातल्या बंगल्यांप्रमाणे एक देखणं घर दिसतं. घराच्या बाहेर एक से एक इंपोर्टेट्ड कार्स पार्क केलेल्या दिसतात. कॅमेरा घराच्या आत शिरतो, तर आतही कार्स असतात यावरून घराचा मालक गॅरेज चालवत असावा असा आपला अंदाज लगेचच खरा निघतो आणि आपण आनंदाने खुर्चीत सावरून बसतो.

मालकाचा धाकटा भाऊ एक देखणी कार ट्रायलला घेऊन गेलेला असतो. तिथे एक सुंदर कन्या लिफ्ट मागताना दिसते. पण मित्र त्याला भावाची आठवण करून देतो. इथे शाखा स्पेशल सुसूचे विनोद सादर होतात व मित्राला अवघड परिस्थितीत टाकून मालकाचा भाऊ जो की शेट्टीपटांच्या गुरूचा अर्थात डे. ध. चा मुलगा आहे, तो नायिकेला इप्सित स्थळी ( इस्पितळ नव्हे, प्लीज नोट ! ) पोहोचवतो . या प्रवासात आपल्याला सिनेमाची कर्मभूमी गोवा आहे हे कळतं.

नायकाचा मोठा भाऊ हा महानायक असल्याचे आपणास सुरूवातीपासून माहीत असते. इथे त्याने वरणभात अवतार धारण केलेला असल्याने त्याचा नैतिक दबाव भावावर आणि त्याच्या मित्रांवर असतो. याच्या दाताखाली कधीही हड्डी आलेली नसणार या खात्रीमुळे हा आदरयुक्त दबाव असतो. पण पण..

आपल्याला लगेचच महानायकाचे नळी ठोकून खाण्याचे ,, चुकलो... महागड्या कार्सला करकच्चून ब्रेक्स लावत गोल फिरताना गोळ्या झाडतानाचे शॉट्स आपल्याला दिसतात आणि आपल्याला कळून चुकतं की नाही, श्रेयनामावलीत काहीही गडबड नाही झालेली, रोहीत शेट्टी बरोबरच होतं , भन्साळी एकाच दिवशी दोन दोन सिनेमे कसा रीलीज करेल ?

तर अशा या सिनेमात बंधूप्रेम उतू जात असताना छोटा नायक सुंदर तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो, पण तिला दिल की बात सांगू शकत नसतो. वरुण धवन नामक या नटाला तू अभिनय वगैरे किरकोळ बाबींचं टेन्शन घेऊन नकोस असं सांगितलेलं असावं . पण आपण त्याच्याएव्हढे असताना काय दिवे लावत होतो (आपल्या क्षेत्रात हो) असं म्हणून सात सिनेमे माफ असं आपण मनातल्या मनात म्हणतो.

पहिला परिच्छेद खरा वाटावा येणेप्रमाणे मोठा भाऊ सगळं करत असल्याने छोट्यावर काम करावं असं काही बंधन नसतं. छोटा भाऊ बागडता बागडता चुलतमैत्रिणीच्या वाढदिवसाला एका रेस्तराँमधे पोहोचतो. तिथे किंग नामक महामानवाचे कार्यकर्ते मॅनेजरचे अंमली पदार्थांची सवय युवा पिढीला लावण्याविषयी प्रबोधन करत असतात. मात्र त्याच्या मस्तिष्कात काही केल्या जागृती होत नसल्याने ते शॉक ट्रीटमेंट अर्थात झटका देण्याच्या उदात्त हेतूने स्वयंचलित लोहगोळीझाड यंत्र बाहेर काढतात. या यंत्राने मेंदूला शॉक बसून लवकर जागृती होते असा कार्यकर्त्यांचा समज असतो. शिवाय हे न केल्यास किंगबापूंचा कोप होईल असा वैधानिक इशारा द्यायलाही ते विसरत नाहीत.

इतक्यात आपला छोटा नायक वरून उडी मारतो आणि कार्यकर्त्यांचं पादकरलालित्याने प्रबोधन करावयास सुरूवात करतो. त्याच्या या नृत्यामुळे कार्यकर्ते काही काळ हवेत आणि नंतर भूमातेस समांतर अशी आसनं करू लागतात. या प्रकारास फाईट म्हणतात असे लहान मुलांनी थेटरात सांगितले. तर या प्रकारामुळे किंगबापू क्रोधीत होऊन शापवाणी उच्चारतात. ती खरी व्हावी म्हणून भक्तगण छोट्या नायकास पोत्यात घालून बेदम मारतात. इतक्यात महानायक पळत येतो. छोट्या भावाला इस्पितळात भरती करतो. त्याचे मुके घेतो. मग बाहेर येऊन थांबला असता त्याचे दोन सहकारी येऊन त्याला कुजबुजत्या आवाजात सांगतात की " उन लोगों का पता चल चुका है "

आणि काय आश्चर्य सांगावे महाराजा !!!

किंगबापूंच्या गोदामरुपी आश्रमात उपबापू आणि त्यांचे शिष्य शुभ्र आणि तपकिरी पिठाच्या पुड्या हुंगत बसलेले असताना आश्रमाचे शटर उघडून ऋत्विकच्या एलीयन जादूप्रमाणे आपला चेहरा झाकून घेतलेली एक मानवी आकृती आत शिरते. बाहेर अंधार. आक्रुतीच्या मागे दोन आणखी आकृत्या असतात. या आगंतुक भक्ताचं अवेळी येणं न आवडून शिष्य जोरदार प्रबोधनाच्या तयारीत धावत येतात, पण..

त्यांचंच घणाघाती प्रबोधन होऊन ते निश्चेट पडतात आणि मागच्या आकृत्या हातातील दंडगोलाने त्यांच्यावर प्रहार करून मिळालेली अकस्मात विद्या ठोकून ठोकून शरीरात घुसवतात. अशा रीतीने काहीच क्षणात आश्रमातले सर्वच शिष्य ज्ञानी होऊन गलितगात्र अर्थात शांत झालेले दिसतात. त्यानंतर उपबापूंचं शेट्टींच्या भौतिकशास्त्रातील नियमांप्रमाणे ज्ञानार्जन होऊन या पुड्या हुंगणे योग्य नाही या गोष्टीवर एकमत झालेलं आहे असा विचार करून आकृती त्या पुड्यांना आग लावते. त्या प्रकाशात आपणास चेहरा दिसतो.

महानायक ? आँ ?
आज सामिष भोजन ?? उठा ले रे बाबा ..

असं म्हणत असतानाच महानायक म्हणतो, बापू से कह दो की काली आया था !!

म्हणजे हा काली ? काळा इतिहास ?
थेट हम मधल्या अमिताभ सारखा ? अय्यो !!
म्हणजे आता जुम्माचुम्मा पण होणार ?

पण छे पहलाज निहलानी असताना कसला आलाय जुम्माचुम्मा . जनू बांडेला सोवळे नेसून यज्ञात आहुती देताना दाखवायचाच बाकी ठेवला होता त्यांनी. मग महानायकाचा इतिहास काय बुवा असा प्रश्न पडत असतानाच फ्लॅशबॅक मधे आपण जातो.

महानायकाची महान कहाणी सुरू होते.
इथे आपल्याला रणबीर बक्षी या डॉनच्या स्वरूपात विनोद खन्नाचं दर्शन होतं. सिंथॉलच्या जाहीरातीतला खन्ना पाहील्यानंतर आताचा विनोद खन्ना पहायला डोळ्याला त्रास होतो. तीच गोष्ट त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या मलिक उर्फ कबीर बेदीची. एकेकाळचे हे दोन तगडे आणि देखणे नायक रोहीत शेट्टीमुळे एकत्र पहायला मिळाले. रणबीर खन्नाचा मानलेला मुलगा "काली" याच्या बळावर त्याचं साम्राज्य बल्गेरिया सारख्या देशात पसरलेलं असतं. एकमेकांना संपवू पाहणारे हे कट्टर हाडवैरी एकमेकांचे सोयरे बनण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कारण बेदीची मुलगी मीरा मलिक आणि शाखा लग्नाचा निर्णय घेतात.

आणि अचानक परिस्थिती अशी वळणं घेते की प्रचंड गैरसमज होऊन जोरदार प्रवचनांचा भडीमार होतो आणि वेगवान प्रबोधनांच्या सहाय्याने महानायक आणि महानायिका नव्याने जीवन सुरू करण्याचा घाट घालतात. काली हा आपल्या गतायुष्याच्या खुणा मिटवून गोव्यात येऊन आपल्या भावाचा प्रतिपाळ करत असतो. पण पंधरा वर्षांनी योगायोगाने त्याच गावात काजोल येते आणि ..

पुढची कथा (?) काय आहे ते पडद्यावर पाहणंच इष्ट ठरेल.

या कहाणीसोबत प्रवास करताना आपल्याला पंधरा वर्षांपूर्वींची काजोल भेटते. सपने च्या काजोलची आठवण करून देणारी काजोल अतिशय सुंदर दिसलीय. कुठल्या का तंत्राने दिसेना, शेवटी पडद्यावरचा लूक महत्वाचा. काहींना ट्रक भरून मेक अप केला तरी दगडाचा धोंडा होईल फार तर देव होत नाही. त्यामुळे शाहरूख आणि काजोल यांचं वय पंधरा वीस वर्षांनी कमी करणा-यांच्या मेहनतीला दाद देत हा भाग एण्जॉय करायला काही हरकत नसावी.

संगीताच्या आघाडीवर आनंद आहे. गेरुआ हे जमलेय. त्याचं चित्रीकरण नेत्रसुखद आहे. मात्र यंत्रवत धबधब्याचा सीन चीप ग्राफीक्स वाटतो. काजोल इतकी सुंदर दिसत असताना धबधबे पाहणं गुन्हाच आहे खरं तर.

हमच्या कथेला वेगवान पाठलाग, अत्यंत महागड्या कार्सचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टंट्स आणि विनोदाची फोडणी देण्यात आलीय. विनोदासाठी जॉनी लिव्हरचा चांगला उपयोग केलाय. हल्लीच्या विनोदाला सरावलेले असाल तर रोहॉत शेट्टी हा कुणाकडूनही हशे वसूल करू शकतो याबाबतीत दुमत नसावं.

वरुण धवन शाहरूखच्या सहका-यांकडून त्याच्या गतायुष्याची माहीती काढायचा प्रयत्न करतो तो सीन धमाल झालाय. त्यातला एक इमोशनल फूल असल्याने तो चटकन पाघळतो आणि खरं ते सांगायला सुरूवात करतो, इतक्यात दुसरा सांभाळून घेत शब्दांच्या कसरती करतो. पण त्यामुळे तो अडकत जातो आणि काहीच सुचत नसल्याने टीव्हीवर जे दिसेल ते पाहून थापा मारत सुटतो. पण एक ग्राहक वेगाने चॅनेल्स बदलत असल्याने कहाणी अशी तयार होते की, शाहरूखखानचं खरं नाव रामलाल असून त्याला धुण्याची आवड होती. धुणे म्हणजे कपडे. अर्थात तो धोबी होता आणि कपडे धुवून घर चालवत होता. काजोलचं खरं नाव पोगो (चॅनेल बदलला गेल्याने ) असून रामलाल आणि पोगो मधे पैशावरून वाद झाले. पोगोला पैसे हवे होते ते न दिल्याने ब्रेक अप झालं. ही अ आणि अ गोष्ट पडद्यावर पहायला हवी.

प्रेम रतन धन पायो मुळे आता कुठलाही सिनेमा क्लासिक वाटू लागेल .तरी देखील कहाणी गुळगुळीत गोटा असल्याने चेई प्रमाणे भट्टी जमलेली नाही. मध्यांतरानंतरचा सिनेमा काही काळ चक्क रटाळ झाला आहे. प्रसंग प्रेडीक्टेबल आहेत. पण शेट्टीची भट्टी विझायला येताना पुन्हा भडकते आणि आपण शेवटपर्यंत थेटरात थांबतो.

वेळ जात नसेल तर पहायला हरकत नाही. काजोलसाठी आवर्जून पाहीला तरी हरकत नाही आणि शाखासाठी नाही पाहीला तरीही हरकत नाही. टीव्हीवर येईलच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरुण धवन शाहरूखच्या सहका-यांकडून त्याच्या गतायुष्याची माहीती काढायचा प्रयत्न करतो तो सीन धमाल झालाय. त्यातला एक इमोशनल फूल असल्याने तो चटकन पाघळतो आणि खरं ते सांगायला सुरूवात करतो, इतक्यात दुसरा सांभाळून घेत शब्दांच्या कसरती करतो. पण त्यामुळे तो अडकत जातो आणि काहीच सुचत नसल्याने टीव्हीवर जे दिसेल ते पाहून थापा मारत सुटतो. पण एक ग्राहक वेगाने चॅनेल्स बदलत असल्याने कहाणी अशी तयार होते की, शाहरूखखानचं खरं नाव रामलाल असून त्याला धुण्याची आवड होती. धुणे म्हणजे कपडे. अर्थात तो धोबी होता आणि कपडे धुवून घर चालवत होता. काजोलचं खरं नाव पोगो (चॅनेल बदलला गेल्याने ) असून रामलाल आणि पोगो मधे पैशावरून वाद झाले. पोगोला पैसे हवे होते ते न दिल्याने ब्रेक अप झालं. ही अ आणि अ गोष्ट पडद्यावर पहायला हवी.>>>>>:हहगलो:

.

वेळ जात नसेल तर पहायला हरकत नाही. काजोलसाठी आवर्जून पाहीला तरी हरकत नाही आणि शाखासाठी नाही पाहीला तरीही हरकत नाही. टीव्हीवर येईलच.
>>

बॉटमलाईन बद्दल धण्यवाद. २ किंवा ३ आठवड्यांनी रेट उतरल्यावर विचार करण्यात येईल.

आता फक्त वाट बघणे सुरुय, स्टार वार्सची ... आय वील लेट द फोर्स डिसाईड!!

मस्त लिहिलय Happy
काजोल बाबत ही अगदी पटल . मेक अप करून तरूण दाखवण सोप आहे पण ते तिन कॅरी मस्त केलय

महाराष्ट्र टाईम्स - दिलवाले ऑडियन्स ले जायेंगे

http://maharashtratimes.indiatimes.com/movie-masti/cine-review/Dilwale/m...

काही प्लस पॉईंटस

'इन्सान की उमर उतनीही होती है जितना वो फील करता है' हा डीडीएजजे मधला हा संवाद शाहरुखनं फारच मनावर घेतलेला दिसतोय. त्याच्या चेहर्यावर वय जाणवत असलं तरी तरुण 'राज'चा 'चार्म' अजूनही कायम आहे. त्याचे हावभाव, गालावरची खळी आणि सिग्नेचर स्टेप नेहमीप्रमाणे भुरळ घालतात. आणि थिएटरमध्ये शिट्या, टाळ्या मिळवण्यासाठी एवढं पुरेसं आहे.

या सगळ्यांसोबतच जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, बोमन इराणी आणि लास्ट बट नॉट द लिस्ट वरुण शर्मा या चौकडीनं आपापल्या भूमिकांतून चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यांचे संवाद पडद्यावर हास्यफोट घडवून आणतात. विशेषतः वरुण शर्माचं कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे.

कलाकारांचे कॉस्च्युम्स आणि कला दिग्दर्शन एकमेकांमध्ये उत्तम समरस झालेले दिसतात. त्यामुळे प्रत्येक सीनमध्ये रंगीत जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. बऱ्याच कालावधीनंतर अनेक नवीन स्टाइल स्टेटमेंट्स एकाच चित्रपटात बघायला मिळत आहेत.

एकुणात काय तर निखळ मनोरंजन करण्यात हा चित्रपट यशस्वी होतो. एकदा थिएटर आणि नंतर पुन्हा पुन्हा टीव्हीवर बघता येईल अशी करमणूक करणारा पैसावसूल चित्रपट आहे.

Kajol ch kay SRK pan tufaan young ani cute :dolyat badam wali smily' disalay.
Avadala mala movie

राहून गेलेले मुद्दे.
वरुण शर्मा या कलाकाराचं नाव माहीत नव्हतं, ते कळवल्याबद्दल ऋन्मेषला धन्यवाद. आजच्या काळातल्या कॉमेडीचं बेअरिंग तो चांगलं सांभाळतो.

मुकेश तिवारीचं नाव आठवत नव्हतं. चायना गेटमधली खलनायकाची भूमिका दमदारपणे साकारणा-या या गुणी कलाकारावर इतकी दुय्यम भूमिका करण्याची का वेळ यावी बरं ? त्याने विनोदी भूमिकाही चांगली केलीय.