देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!'
असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्‍या पुष्पाने जाताना सांगितली. माझे वय ७ आणि तिचे वय १५. तिने नववीत नापास झाल्यावर शाळा सोडली होती. एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे नव्हती. भारीच वाटली होती ती युक्ती.
मी लग्गेच अमलात आणले ते. सर्व वह्यांवर लिहिले. पेपरात प्रत्येक पानाच्या डोक्यावर लिहायचा विचार होता पण माझा लिखाणाचा वेग इतका सुपरफास्ट असायचा की बरेचदा पेपर लिहून पूर्ण व्हायचा नाही त्यात ही ब्याद कुठे लिहीत बसा. देव बघेल तेव्हा त्याला पहिले पान दिसेलच की. असा सोयीस्कर विचार करून मी हे वाक्य फक्त पहिल्या पानावरच लिहिले.

इयत्ता तिसरीत मला तसेही बरे मार्कच पडायचे, तेवढेच याही परिक्षेत पडले. वाक्य लिहिण्याचा स्पेशल असर काही दिसला नाही. मात्र पेपरात पहिल्या पानावर लिहिलेल्या वाक्यांबद्दल वर्गशिक्षिका बाईंकडून त्यांची आख्खं विश्व इकडचं तिकडे हलेल अश्या पावरची स्पेशल थोबाडित मात्र मिळाली.

तेव्हा शिक्षकांनी थोडेफार फटके हाणले तरी पालक आकांडतांडव करत नसत त्यामुळे घरी येऊन थोबाडितचे सांगितल्यावर 'तू काय केलं होतंस?' हाच प्रश्न पहिला. उत्तरादाखल भारी युक्ती आईला सांगण्यात आली.
आईने डोक्यावर हात मारला, स्वतःच्याच. लिहिलेल्या वाक्याचा अर्थ नीट स्पष्ट करून सांगण्यात आला. अभ्यासाशिवाय, स्वतःच्या प्रयत्नांशिवाय तरणोपाय नाही हे नीटच बसवले डोक्यात. परिक्षेला जाताना देवाला नमस्कार करणे हे फारतर केलेल्या अभ्यासाचा शांतपणे विचार करण्यापुरते उपयोगी पडते. हे पक्कं बसलं डोक्यात. आणि शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यांमधे अजूनच खोल कोरलं गेलं.

कट टू पाचेक वर्षांपूर्वीची एक घटना.
"आपण या भागात शूट करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला इथले सगळे रस्ते माहिती हवेत. आत्तापर्यंत आपण तीन चार वेळा इथून गेलोय. तेव्हाच तुम्हाला रस्ता लक्षात ठेवायचा सांगितलेले आहे. आता ड्रायव्हर वेगळा आहे. त्याला मुंढरपर्यंतचा रस्ता तुम्ही सांगायचा."
दिग्दर्शकाने त्याच्या तीनही एडीजना सांगितले. रत्नागिरी शहरातून राई-भातगाव पुलाच्या मार्गे आम्हाला मुंढर गावात पोचायचे होते. रत्नागिरीत कामे आटपता आटपता संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते. मला राई-भातगाव पुलापर्यंतचा रस्ता माहित नव्हता. पुढचा फारच ओळखीचा होता. शहरातून बाहेर पडतानाचा फाटा योग्य तो निवडला आणि मग निघालो. बराच वेळ जात राह्यलो तरी राई-भातगाव पूल येण्याचे चिन्ह दिसेना. डोंगरातला रस्ता, अंधाराची वेळ त्यामुळे रस्ता चुकलोय हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. बर चुकलोय तर नक्की कुठे चुकलोय हे कळायला मार्ग नाही. आता काय करायचे?
एडी १ - अं अं अं
एडी २ - रस्ता चुकलो? रस्ता चुकलो? (खिशातून फोन काढून त्यात कुठल्या तरी गुरूच्या भजनाची ऑडिओ सुरू केली.)
एडी ३ - कुणाला तरी विचारायला पाहिजे.
ड्रायव्हर - आता कसा रस्ता कळणार? ( गाडीत वाजत असलेले किशोरकुमारचे गाणे बंद करून टाकले. खिशातून मोबाइल काढून कुठल्या तरी गुरूच्या फोटोचा वॉलपेपर बघून फोन डोक्याला लावणे सुरू)

दिग्दर्शक, मी आणि एडी ३ यांच्यात अजून थोडी वाक्यांची देवाणघेवाण होऊन आहे त्या रस्त्याने पुढे जाऊया. जे पहिलं गाव लागेल तिथे विचारूया. असे ठरले. गेलो.

वाटेत एक उजवे वळण आमचे सुटले होते त्यामुळे आम्ही पुळ्याच्या दिशेने निघालो होतो. पहिले जे गाव लागले तिथे हा उलगडा झाला. मग अजून चार पाच जणांना विचारल्यावर योग्य तो रस्ता कसा सापडेल तेही कळले. तसे गेलो. इप्सित स्थळी पोचलो. एक तासा दीडतासाचा उशीर झाला फारतर.

खाली उतरून किंवा गाडीतच बसून रस्त्याने येणार्‍या माणसाला थांबवून रस्ता विचारणे वगैरे करायला भाविक मंडळींची हिंमत होत नव्हती. कर्णकटू भजन सतत मोठ्ठ्या आवाजात ऐकणे आणि सतत फोनमधला गुरूंच्या फोटोचा वॉलपेपर बघत फोन डोक्याला लावणे यापलिकडे त्यांचे प्रयत्न जात नव्हते.

राई-भातगावच्या पुलावर आल्यावर पुढच्या रस्त्याबद्दल कुणालाच प्रश्न नव्हता. त्यामुळे पुलाशी पोचल्यावर 'चला आता प्रश्न नाही!' अशी आमची प्रतिक्रिया तर भाविक मंडळींचे भजन, नमस्कार, जप वगैरे चालूच होते. मुंढरला पोचल्यावर एडी २ म्हणे, 'स्वामींनी वाचवले!'. सर्वांनीच कपालबडवती करून घेतली तिथे.

कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो. आपल्यापेक्षा अनुभव जास्त असलेले लोक पॉइंटर्स देऊ शकतात. त्याचा विचार करण्याचा कदाचित उपयोग होऊ शकतो. श्रद्धेचा उपयोग फारतर मार्ग शोधताना डोके शांत ठेवायला होऊ शकतो. तुम्ही मनाने पुरेसे घट्ट असाल तर त्याचीही गरज नाही. मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही.

तस्मात 'अरे मूर्खा अभ्यास कर!' हेच अंतिम वगैरे सत्य...
डिंगडाँग...

प्रकार: 

बेफिकीर, तुम्हाला खरच इच्छा असेल तर A Universe from Nothing: Why There Is Something Rather than Nothing हे लॉरेन्स क्राउस यांचे पुस्तक वाचा. लॉरेन्स क्राउस हे आघाडीचे भौतिकशास्त्रज्ञ आहेत तसेच एक उत्तम वक्ते आणि लेखक आहेत.
काहीच का नाही, हेच विश्व का यांचाही शास्त्रात शोध चालूच आहे. फक्त तो 'श्रद्धे'वर आधारीत नसून उपलब्ध माहितीवर व त्यायोगे केलेल्या तर्कावर असतो. तसेच हे तर्क तपासून पाहिले जातात. श्रद्धेच उदा. देव आहे व तो या सृष्टीचा निर्माता आहे यात तपासण्याची शक्यताच नाही.

http://www.amazon.com/Universe-Nothing-There-Something-Rather/dp/1451624...

श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रयत्न, नशीब, आडाखा, भाकीत ह्या सर्व गोष्टी मायबोलीवर कायम एकांगीपणे चर्चिल्या गेल्या असे मला वाटते. एका बाजूला शुद्ध प्रयत्नवादी असल्यामुळे दुसर्‍या बाजूचे कायम 'शुद्ध' श्रद्धाळू'च' ठरत राहिले. पण तसे प्रत्यक्षात नाही आहे असे माझे मत! शुद्ध प्रयत्नवादी शुद्ध प्रयत्नच करतात व आपापल्या यशापयशाची कारणमीमांसा ठरवताना स्वतःचे फक्त प्रयत्न विचारात घेतात हे ठीक! पण म्हणून 'उगाचच शुद्ध श्रद्धाळू' ठरलेले लोक काही प्रयत्न करतच नसतात अशी प्रतिमा तयार होते. तसे मुळीच नसते. हा एक भाग!

दुसरा भाग! मनुष्याला काही गोष्टी ज्ञात नाही आहेत ह्याबाबतची मतेही फार एकांगीपणे समोर येतात. असे म्हणणारा एक समूह असतो की जे माहीत नाही तेही कालांतराने माहीत होईल आणि असे म्हणणारा एक समूह असतो की काहीतरी नेहमीच असे असेल जे मानवाला समजणार नाही. येथे मी दुसर्‍या प्रकारात मोडतो.

बुद्धी व प्रयत्न ह्यावर विश्वास असणे व कर्तबगारी दाखवणे हे नक्कीच महान व माणूस म्हणून मिळालेल्या जन्माचे सार्थक करणारे आहे. पण काहीतरी 'आपल्याला कधीच समजणार नाही' असेही असू शकेल हे मान्य न करणे हा मला खुळेपणा वाटतो. आता तो मला आणि माझ्या'सारख्यांना' खुळेपणा वाटतो त्यामुळे मला आणि माझ्या'सारख्यांना' असे वाटत राहते की ते जे काही 'बहुधा कधीच न समजू शकणारे आहे' ते कदाचित माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारेही असू शकेल. ह्याला श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, तो विषय वेगळा! किंबहुना, असे काही मानण्यामुळे वर म्हंटल्याप्रमाणे माणसात एक नम्रताही येते आणि असे काही मानण्यामुळे 'माणूस प्रयत्नांतीही अपयशी ठरलाच' तर त्याच्याकडे स्वतःची समजूत घालण्यासाठी एक 'खास त्याच्यापुरते' असे कारणही असू शकते. ह्याला मानसिक दुबळेपणा असे म्हणता येईल'च'.

पण माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा 'आपण व्यवस्थित वागूनही / प्रयत्न करूनही असे का झाले' ह्या प्रश्नाचे उत्तर समजतच नाही. अश्या वेळी ही थिअरी माणसाला दिलासा देते. हा अश्या प्रकारचा दिलासा ही माणसासाठी मोठी जमेची बाजू असते कारण तो स्वतःला दोष न देता पुन्हा प्रयत्नरत होऊ शकतो, होण्यास प्रवृत्त होऊ शकतो. चार अधिक चारचे उत्तर नेहमी आठच यायला हवे ह्या आग्रही भूमिकेपासून थोडा दूर होतो व त्यामुळे क्षमाशील होऊ शकतो. आयुष्याचा अंत होणारच आहे हे माहीत असताना गोष्टी किती गंभीरपणे घ्याव्यात ह्याबाबतची त्याची भूमिका थोडी शिथिल होते. तडजोड किंवा 'सोडून द्या' वाली प्रवृत्ती त्याच्यात भिनते. हे मूळतः ताण कमी होण्यास सहाय्यकारक ठरते. 'माझ्याकडून मी करायचे ते केले' हे समाधान त्याला यशाइतकेच महत्त्वाचे वाटायला लागू शकते किंवा त्या दिशेला प्रवास तरी सुरू होतो. अन्यथा, आग्रही भूमिका, मी असे असे करूनही असे असे का झाले नाही ह्याचा ताण, हे हानिकारक ठरू शकतात.

जेव्हा 'सगळेच त्याच्या इच्छेनुसार होते' ही भूमिका वरचढ ठरू लागते तेव्हा 'वर झालेली चर्चा' रिलेव्हंट होऊ लागते. असे होणे घातकीच आहे.

पण दोन भूमिकांमध्ये ढळढळीत फरक आहे. न मानणे विरुद्ध मानणे इतके हे स्वच्छपणे वेगळे नाही. 'मानणे' ह्यातही प्रकार आहेत आणि त्यातील काही प्रकार प्रयत्नांवर 'न मानणार्‍यांइतकाच' विश्वास ठेवतात हे स्वीकारले जायला हवे असे मला वाटते.

मायबोलीसारख्या फोरमवर आपण एकदम हटके विचारांचे दिसायला हवे आहोत म्हणून विशिष्ट भूमिका मांडणार्‍यांच्या हो मध्ये हो मिसळणे हा भाग वेगळा आहे. प्रत्यक्ष आयुष्यात अनेक गणितांची उत्तरे भलतीच येतात तेव्हा कोणी विकिपिडियाच्या लिंक्स लोड करून समर्थने शोधू शकत नाहीत.

<<श्रद्धेशिवाय कष्ट करून यशस्वी होण्याची उदाहरणे भरपूर आहे.
कष्टाशिवाय श्रद्धेने यशस्वी होण्याचे उदाहरण नाही.

तस्मात श्रद्धा ही गरजेची गोष्ट नाही. आपण खंबीर झालो की तिची गरज पडेनाशी होते.>>

------- लेख आवडला.....

moga | 18 December, 2015 - 16:28

कष्ट व श्रद्ध्हा या दोन गोष्टी एकमेकाना पूरक होतात.

पण बरेच लोक श्रद्धा ही कष्टाना पर्याय म्हणुन वापरतात.
आणि
मनीमोहोर | 18 December, 2015 - 19:34

सुंदर लेख. खूप आवडला. प्रयत्न करणे, कष्ट करणे , एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे हे यशासाठी आवश्यकच आहे पण प्रयत्न केले तरी ही परमेश्वरी कृपेशिवाय यश मिळत नाही हे माझे वैयक्तिक मत.
-----------
ह्या दोन्ही प्रतिसादांना +१. ह्यावरुन श्रीसाईसच्चरितातील ह्या ओव्या आठवल्या. सद्गुरुंनीही माणसाच्या क्षमतेत बसणारे कमाल प्रयास करायलाच हवेत असे म्हटले आहे.

श्रीसाईसच्चरित अध्याय १९ ओवी १५८, १५९.

तुम्ही जोर काढू लागा | दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा |
वाटी घेऊनि उभाच मी मागां | पृष्ठभागा आहे कीं ||

म्हणाल जोर म्यां काढावे | दुधाचे प्याले तुम्हीं रिचवावे |
हें तों आपणा नाहीं ठावें | दक्ष असावे कार्यार्थीं ||

"असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी" असे होणे नाही. माझ्या कुवतीनुसार मी पुर्ण प्रयास करेन, पण त्या पलिकडे जे असेल त्यासाठी तू मला साथ दे, ह्या प्रवासात अतः पासुन इति पर्यंत सोबत मात्र कर. गुणावगुणांनी बनलेला सामान्य मानव म्हणून कधी माझे प्रयास चुकीच्या/माझा घात करणार्‍या गोष्टीसाठी असतील तर ते नक्कीच वाया घालव आणि यश देवू नको. भले भले जवळचे माझा हात सोडून जातील आपापल्या वाटेने, पण "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया" हा माझा तुझ्यावरचा विश्वास तू कधीच तोडत नाहीस...हा माझ्या मनातला विश्वास कितीही पायाखालची जमिन सरकली तरी मला पडू देत नाही......हा भाव असतो श्रद्धावानाच्या मनात. आणि हे सगळं त्या जीव तोडून केलेल्या प्रयासांच्या जोडीने असतं. प्रयासांशिवाय मागणं असेल तर ते देवाला आपल्या पिताश्रींचा नोकर समजणं झालं. मोगा म्हणाले तसं खरंच काही लोक श्रद्धा ही कष्टांना पर्याय म्हणून वापरतात.
-------------------

नीरजा, तुझे व्ह्यूज तू चांगले मांडले आहेस. हे तुझे रंगिबेरंगी पान आहे हे वर कुठेतरी वाचल्याने लक्षात आले. ह्या धाग्यावर तुला माझा प्रतिसाद ऑड वाटला तर नि:संकोचपणे सांग. जेव्हा परत लॉगइन करेन आणि वाचेन तेव्हा उडवेन.

कोणीतरी देव नावाची अज्ञात शक्ती आहे हे झाले पहिले गृहीतक
ती आपल्यावर, नव्हे जगातल्या सर्वच लोकांवर प्रभाव पाडायची क्षमता राखून आहे, लक्ष ठेवून आहे, हे दुसरे गृहीतक.
ती शक्ती अमुक तमुक केल्यावर प्रसन्न होते, वा अमुक तमुक केल्यावर नाराज अशी कैक गृहीतके.

आपला विनम्रपणा आपल्या यशाचा वाटा देवाला दिल्यावरच दिसून येतो का?
आपले सहकारी, आपले कुटुंबीय यांना योग्य ते श्रेय द्या ना.

वर कोणीतरी म्हटलेय की नास्तिक बनायला वा तसेच टिकून राहायला खूप गट्स लागतात. पर्सनली मला तसे वाटत नाही, कारण मी स्वताला नास्तिक समजतो आणि खूप सहजपणे जगतो. जगातील एकंदरीत आस्तिकांची संख्या नास्तिकांच्या तुलनेत खूप जास्तच असावी. पण तरीही नास्तिक खूप स्ट्राँग असतात आणि आस्तिक दुबळे हे मला पटत नाही. मी नास्तिक आहे आणि मी तितकासा स्ट्राँगही नाही. फरक ईतकाच की जेव्हा मी दुबळा पडतो तेव्हा देवाच्या हवाले न राहता जिवंत माणसांकडून मदतीची अपेक्षा ठेवतो. तसेच जो ती मदत करतो त्याला देवानेच पाठवला अश्या कल्पनांना एंटरटेन करत नाही Happy

आता या आस्तिक नास्तिक वादात एक गंमत आहे.
देव आहे की नाही यावरचा विश्वास एखाद्याचे आस्तिकत्व नास्तिकत्व ठरवते. पण देवाचे अस्तित्व याने नाही ठरत.
जर देव आहे तर तो आहे, भले मग जगातील ९० टक्के लोक नास्तिक का असेना,
आणि जर देव नाहीये तर तो बस्स नाहीये, भले जगातले ९९ टक्के लोक त्याचे अस्तित्व स्विकारून पूजा का करत असेनात.

त्यामुळे आपले आस्तिक असणे वा नास्तिक असणे हे आपल्यापुरतेच असते. तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक त्यातून तुम्हाला बळ मिळणे गरजेचे असते.
जर एखादा आस्तिक असा विचार करत असेल की मी माझे शंभर टक्के प्रयत्न करतो, बाकी मग देव बघून घेईल, तर असले आस्तिकत्व वाईट नाही.
जर एखादा नास्तिक असा विचार करत असेल की कोणीही देव नावाची शक्ती नसल्याने आता मलाच माझे शंभर टक्के द्यायचेय तर अर्थात हे नास्तिकत्वही फायद्याचेच.

अवांतर - हे रंगीबेरंगी पानाचा फंडा काय असतो नक्की. काही वेगळे कायदेकानून असतात का इथे लिहिण्याबाबत?

आणि हो, एक नास्तिक म्हणून प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण मला अशी वाचायला आवडेल,
प्रयत्न हेच परमेश्वर

ऋन्मेष, सहमत.

(हे मी मायबोलीवरच्या इतरांपेक्षा आपण उठून दिसावे म्हणून तुझ्या हो त हो मिळवणे असेल तर असो बापडे! )

Wink

आपले सहकारी, आपले कुटुंबीय यांना योग्य ते श्रेय द्या ना.>>> +१ मनुष्यच नाही, तर संबंधीत प्राणी, पक्षी, झाडं, निर्जीव गोष्टी ह्यांनाही द्यायला हवे. उदा. एखादा कुत्रा भुंकल्याने चोर पळून गेला तर चोर पळवून लावण्याचे श्रेय त्या कुत्र्यालाही जाते.

पेपरच्या पहिल्या पानावर 'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!' लिहिणे, रस्ता चुकल्यावर खुद्द ड्रायव्हरने सतत फोनमधला गुरूंच्या फोटोचा वॉलपेपर बघत फोन डोक्याला लावणे हे जरा बळंच वाटलं. कदाचित माझ्या आजुबाजुला अशी लोक कधी नव्हती आणि नाहीयेत म्हणुन असेल.

माझ्या पहाण्यात काही डॉक्टर आहेत जे कठिण सर्जरीला जाताना गुरूंच्या फोटोला नमस्कार करून जातात .
हे ही एकवेळ ठिक पण सर्जरी सुरू असताना काही काँप्लिकेशन झाले तर आम्ही सगळे फिजीशीयन/ अ‍ॅनास्थेटिस्ट धावाधाव करत असताना हे गुरूला फोन करून 'सगळे ठिक होईल ना गुरुजी' विचारत असतात.
Happy

<<फोनमधला गुरूंच्या फोटोचा वॉलपेपर बघत फोन डोक्याला लावणे हे जरा बळंच वाटलं.>>
----- हे बळेच नाही वाटत. माझ्या माहिती मधे एक प्राध्यापक असे आहेत जे फोन उचलताना आधी "जय *** स्वामी.... " असे नाव घेतात...

हा स्वामी नम्बर १ भोन्दू होता आणि BBC कडे त्याची विभुती काढतानाची टेप अजुनही गुगलल्यावर मिळते. शिकलेल्या (?) लोकान्चे हे हाल तर जनसामान्यान्ची काय अवस्था असेल ?

<<असताना हे गुरूला फोन करून 'सगळे ठिक होईल ना गुरुजी' विचारत असतात.>>
----- उद्या गुरुचे मार्केटिन्ग करणारे याचा वापर`पुढील प्रमाणे करतील
अमुक एक तज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करायच्या अगोदर गुरुजीन्ना विचारायचे, त्यान्चे आशिर्वाद घ्यायचे... एकदा ते आशिर्वाद घ्यायचे विसरले, आणि नेमकी त्याचवेळा शस्त्रक्रिया अयशस्वी झाली... म्हणजे डॉक्टरचे शस्त्र चालवणारे हात, शास्त्र चालवणारे डोके हे महत्वाचे का भोन्दू गुरुचे आशिर्वाद?

गोष्टी रचायला तल्लख मेन्दू कमी नाही आहेत.

सर्व गुरु, स्वामी, बाबा हे आर्थिक सत्ताकेन्द्र आहे.... काळा पैसा साठवणारी चालती-बोलती बॅन्क.

सर्व पितळ उघडे पडायला लागल्यावर 'आवाज उठवणारी' व्यक्ती किव्वा महत्वाचा साक्षिदार अनपेक्षित नाहिसे होतात... घातपात, किव्वा अजुन काही... असो.

ह्या धाग्यावर तुला माझा प्रतिसाद ऑड वाटला तर नि:संकोचपणे सांग. जेव्हा परत लॉगइन करेन आणि वाचेन तेव्हा उडवेन.<<
कशाला? प्रत्येक मुद्द्यावर एकमत व्हायला हवे असे नाही. तू तुझे मत मांडलेस त्यात मला ऑड काय वाटायचेय?

हे रंगीबेरंगी पानाचा फंडा काय असतो नक्की. काही वेगळे कायदेकानून असतात का इथे लिहिण्याबाबत? <<
तुझ्या माहितीसाठी. कोणे एके काळी मायबोलीवरचा रंगीबेरंगी विभाग म्हणजे पर्सनल ब्लॉगसारखे पान असे. त्याला वार्षिक फी असे. ते वार्षिक फी प्रकरण संपले कधीच. तसेच माबो उपक्रमाच्या संयोजनात सामील होणार्‍यांना एक वर्षासाठी मोफत रंगीबेरंगी पान ही सदिच्छा भेट मिळत असे. मला तसेच मिळाले होते जुन्या मायबोलीत. वर्ष संपल्यावर रिन्यू करायची वेळ आली तोवर वार्षिक फी काढून टाकली होती.
असो.. अतिच अवांतर किंवा संबंध नसलेले मुद्दे काढून धाग्याचा कचरा करणे किंवा डूख ठेवून लिहिणार्‍याला वैयक्तिक पातळीवर वाकडे तिकडे बोलणे वगैरे चालू झाल्यास 'हे माझे रंगीबेरंगी पान आहे इथे हे उद्योग नको' असे सांगितले जात असे/ जाते. त्याचा अर्थ ज्याचे रंगीबेरंगी पान त्याच्यापेक्षा वेगळी मते मांडायची नाहीत असा होत नाही. तस्मात मूळ लेखातल्या मुद्द्यांना घेऊन जोवर सभ्य शब्दात चर्चा होते आहे तोवर ते मनावर घ्यायची गरज नाही.

मात्र तुझी गफ्रे, शाखा (तो एकवेळ चालेल मला), स्वजो हे माझ्या पानावर आणू नकोस. Proud
Light 1 घे

पटला. नास्तिक बनायला आणि ते सगळीकडे विश्वासाने निभावून न्यायला पण हिंमत लागते हे खरं. अगदी ओह माय गॉड मध्ये पण नास्तिक माणसाची बरोबर भूमिका पाहून त्याच्या पाठी देव उभा राहतो असं दाखवलंय. (आणी एक मराठी नाटक पण आठवलं कल्पनेचा खेळ नावाचं, ज्यात लहान मुलीचे आईबाबा नाटकभर मुलीवर जादूटोणा झालाय म्हणून घाबरत असतात आणि शेवटी त्यांचे डॉक्टर येऊन भूतप्रेत, जादूटोणा वगैरे काही नसतं म्हणून तोंडातला डिंकाचा खडा काढून मुलीची दातखीळ बरी करतात आणि नंतर कळतं डॉ आधीच मेलेले असतात Happy )

<<अगदी ओह माय गॉड मध्ये पण नास्तिक माणसाची बरोबर भूमिका पाहून त्याच्या पाठी देव उभा राहतो असं दाखवलंय.>>
----- देव केवळ मनुष्याच्या कल्पनेत आहे... त्यामुळे मागे रहाण्याचा प्रश्नच नसतो.

देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!

आमची आवृत्ती - देवा मला पास कर.. गाढवा आधी अभ्यास कर! अशी होती. आधीला म्हत्त्व! प्रिक्षा झाल्यानंतर अभ्यास करून उपेग? (कोरसमध्ये) नाऽऽऽऽऽऽऽऽई.

हे ही एकवेळ ठिक पण सर्जरी सुरू असताना काही काँप्लिकेशन झाले तर आम्ही सगळे फिजीशीयन/ अ‍ॅनास्थेटिस्ट धावाधाव करत असताना हे गुरूला फोन करून 'सगळे ठिक होईल ना गुरुजी' विचारत असतात.>>>>>
हि जरा अतिशयोक्ती होतेय असे नाही वाटत? कोणी व्हेरिफाय करायला येणार नाही म्हणुन काहीही लिहिताय का? आणि हे इथे लिहिलेत ते ओके पण त्यांच्याविरुद्ध हॉस्पिटल प्रशासनाकडे किंवा मेडिकल असोसिएशन कडे तक्रार केलीत का रुग्णाचे आरोग्य धोक्यात घातल्याबद्दल? का तुम्हाला त्यांचे Example बनवायचे आहे?

Pages