फुसके बार – १७ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 16 December, 2015 - 11:57

फुसके बार – १७ डिसेंबर २०१५

.
१) काही लोक उगाचच टीका करण्यात इतके वाकबगार असतात, की संधी मिळाली तर ते ऑक्सिजनवरपण टीका करतील किंवा त्यात न्यून शोधतील.

२) खंडोबावर चालू असलेल्या छपरी टीव्ही मालिकेमध्ये निर्मात्यंना एक टेन्शन नेहमी असणार. खंडोबाची भूमिका करणारा नट आजारी पडला तर काय करायचे? एरवी काही मालिकांमध्ये सर्रास हे प्रकार चालतात, पण येथे त्यांना आधीच दम नसलेल्या कहाणीत थोडा बदल करावा लागला असता की खंडोबा काही काळासाठी रूप बदलून वावरणार आहे.

३) प्लॅनेट या शब्दाचा मूळ ग्रीक अर्थ भटके असा आहे. एरवी हा शब्द आपण इंग्रजी म्हणून गृहीत धरतो. अगदी चपखल शब्द योजला आहे. नारळीकरांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकात अनेक धमाल गोष्टी सांगितल्या आहेत.

४) एक आवडलेले पोस्टर
When you are sound financially,
Do not raise your standard of living,
But raise your standard of giving.

५) बाजीरावाची तलवार ४० किलो वजनाची होती असे सध्या वाचनात येत आहे. ते जर खरे असेल तर स्वत: बाजीरावाचे वजन किती असावे?. मुळात अशा अतिरंजित गोष्टी सामान्यांना आवडतात, त्यामुळे ते इतर विचार करू शकत नाहीत.

यावरून आठवले, ब्रेव्हहार्ट सिनेमा ज्याच्यावर आहे त्या विल्यम वॉलेस या स्कॉटिश योद्ध्याचा पुतळा स्कॉटलंडमध्ये पाहिला. तोही असाच साताठ फुटी, भली मोठी तलवार हातात असलेला. प्रत्यक्ष सिनेमातही त्याच्याच तोंडी तसा संवाद आहे, की ज्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलेले नाही ते तो आठफुटी वगैरे आहे असे समजतात. त्याशिवाय माणसासारखा माणूस एवढा पराक्रम कसा गाजवू शकेल अशी सामान्यांची भावना.

ता.क.: ब्रेव्हहार्ट अजूनही पाहिला नसेल तर जरूर पहा.

६) माझ्या वडलांचे माझ्या आईवर प्रेम नव्हते. योगायोगाने माझ्या आईचेही माझ्या वडलांवर प्रेम नव्हते. केवळ या एकाच कारणामुळे त्यांचा संसार सुखाचा झाला, असे मार्क ट्वेन सांगे.

सिगरेट सोडणे हे फार सोपे आहे, ती मी अनेकदा सोडलेली आहे, हे वाक्य तर आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. तेही ट्वेनचे.

महान लेखकांना मरायची फार हौस असते. चॉसर गेला, स्पेन्सर गेला, मिल्टन व शेक्सपियरचेही तसेच. आणि अलीकडे मलाही बरे वाटत नाही. हे वाक्यही ट्वेनचेच. आपल्याकडे आचार्य अत्रे यांनी हे विधान गांधी-नेहरूंची नावे घेऊन फार हुशारीने वापरले.

७) आजची अंधश्रद्धा

सारसबागेत मुलींचा संवाद. गणपतीला लोकांनी अर्पण केलेले नारळ तेथे कमी भावात विकतात.
एकीने तीन नारळ घेतले.
दुसरीचे म्हणणे, की तसे कशाला घेतले? लोकांनी काय भावनेने देवाला दिलेले असतात, त्यामुळे आपले काही वाईट झाले तर?
जिच्या हातात नारळ ती सटपटली. बरे, आता परत देवाला देऊन येते.
असे म्हणून अगदी बाहेरच्या रस्त्यावर आलेली मुलगी ते देवाचे नारळ पुन्हा त्याला द्यायला गेली.
केवढे संकट टळले दोघींवरचे अशा प्रकारे. २०-२२च्या असतील दोघीही.

या प्रसंगातल्या अंधश्रद्धा मोजा व सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users